Oct 24, 2021
कथामालिका

कोण होती ती......?

Read Later
कोण होती ती......?

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
*कोण होती ती......? भाग 1*

*©रेश्मा आणि साक्षी...*

*******************************************


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून, कथेतील स्थळ, घटना, व्यक्ती, वास्तू यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


"काळेभोर लांबसडक केस, थोडासा लांबट गोरा चेहेरा, बोलके डोळे, सरळसोट लहानश्या शेंड्याच नाक, दोन भुवयांच्या मध्ये लावलेली लाल गोल लहानशी टिकली, तिचं हे रूप कोणालाही प्रेमात पाडेल असं होतं.....ती जणू मला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होती, पण मला मात्र काहीच ऐकू येत नव्हतं....ती मला तिच्या मागे बोलवत आहे असं सतत वाटतं होतं.....

मी तिच्या मागे जाण्याचा प्रयत्न करू लागलो तशी ती पुढे पुढे चालू लागली...पण काही अंतर पुढे गेल्यावर ती अचानक नाहीशी झाली.....उरल्या त्या फक्त तिच्या पाऊलखुणा, त्याही काही विशिष्ट अंतरापर्यंतच मर्यादित होत्या....."आदित्य दचकून जागा झाला आणि जागीच स्तब्ध बसून राहिला..त्याच्या मनात अनेक विचारांची कालवाकालव सुरू होती.....

सतत तोच निरागस चेहरा समोर येत होता..हा भास असेल, फक्त स्वप्न असेल असे तो स्वतःला समजावण्याचा प्रयत्न करत होता. तरीसुद्धा ते सगळं खरं आहे असं त्याला भासत होतं.. तेवढ्यात त्याचा फोन वाजला...

नेहाचा मेसेज होता, "गुड मॉर्निंग आदि.....अरे मी ऑफिसला जायला निघतेच आहे..... एक दहा मिनिटांत तुझ्या सोसायटीजवळ येते आपण आज माझ्या गाडीतून एकत्र जाऊयात चालेल का?...."त्याने फक्त "हो.." असा रिप्लाय केला; \"चला मॅनेजर साहेब उठा! आवरा लवकर आपली "Dev Multinational companies" वाट बघत आहे...असे स्वतःशीच म्हणत तो आवराआवर करून पाच-एक मिनिटांत बाहेर आला....

तोवर नेहा सोसायटीच्या गेटजवळ आली आणि तिने आदित्यला कॉल केला, "अरे आदि मी आली आहे झालं का तुझं?"

आदित्यने निघालोच! एवढं म्हणून फोन कट केला...

आई येतो ग!, उशीर झालाय नेहा खाली वाट बघतेय ऑफिस मध्ये खाईन काहीतरी...bye... आई काही म्हणेपर्यंत हा निघून गेला....

जसा तो नेहाच्या गाडीजवळ पोहोचला तेव्हाच नेहाने ओळखलं काहीतरी गडबड आहे... नाहीतर एरवी बोलका, हसतमुख, आणि सगळ्यांना हसायला लावणारा आदित्य आज शांत, उदास, आणि जरा चेहेऱ्यावर ताण असल्यासारखा दिसत होता....

नेहाने विचार केला आपण स्वतः विषय नको काढायला सांगेल तो.... म्हणून ती काहीही बोलली नाही.... दोघेही गाडीत बसले....

गाडी थोड्या अंतरावर गेली तरी आदित्य काही बोलेना, शेवटी न राहवून नेहाने त्याला विचारले,"आदि काही प्रॉब्लेम आहे का?? आज तू खूप शांत आणि उदास वाटतोयस..."

"हिला सगळं सांगू का? तसही नेहा माझी कॉलेज पासूनची मैत्रीण आहे तिला माझ्याबद्दल सगळंच माहिती आहे,आणि त्यात आता ती माझी कलिग सुद्धा आहे....
नक्की सांगू का?
पण हा माझा भास असेल तर??" मी मनातल्या मनात विचार करत होतो...

"नेहा अग एक प्रॉब्लेम झालाय! कसं सांगू तुला तेच कळत नाहीये..."

"हे बघ आदित्य मला आता भीती वाटतेय, नक्की काय झालंय? सांगशील का please?"नेहाने गाडी side ला लावली आणि पोटतिडकीने विचारत होती.

मी तिला सांगू लागलो, "मला बरेच दिवस झाले रोज स्वप्नात एक मुलगी दिसते ती सुद्धा अंधुक! म्हणजे आधी मला तिचे फक्त लांबसडक काळे केस आणि बोलके डोळे दिसायचे...पण आज...."

"आज काय आदित्य कोण आहे ती मुलगी??बोल ना ?"नेहा काळजीने विचारत होती..

"आज मला तिचा पूर्ण चेहरा दिसला, पण तो चेहरा माझ्या ओळखीचाही नाहीये ग मग मलाच का दिसतोय तो चेहेरा? माझा काय संबंध असेल तिच्याशी?" माझ्या चेहऱ्यावरचं टेंशन बहुदा नेहाला दिसलं असेल...

म्हणून तिने मला धीर दिला, "अरे तुला त्या हॉरर मूवी बघायची सवय झाली आहे म्हणून असं स्वप्न पडलं असेल काळजी नको करुस" ...

"नाही नेहा मला असं नाही वाटत..." मला का कोण जाणे सतत ती माझ्या आजूबाजूला आहे आणि मला बोलावतेय असच वाटतंय....

"ठीक आहे, माझी एक मैत्रीण आहे... ती मानसोपचार तज्ञ आहे आपण तिला एकदा भेटून सगळं सांगू...तू तयार आहेस का??" नेहाने विचारले..

"मी काहीच उत्तर देत नव्हतो किंवा मला काही सुचतच नव्हतं म्हणून मी काहीच बोललो नाही!" हे पाहून नेहाने स्वतःच अपॉइंटमेंट घेण्याचा निर्णय घेतला असावा.....

तिने लगेचच Dr. रजनी देशमुखचा नंबर फोन मध्ये शोधून काढला आणि रजनी बरोबर बोलून संध्याकाळची अँपॉईंटमेन्ट घेतली...

चला आदित्य, आज संध्याकाळी आपल्याला 7 वाजता डॉक्टर रजनीकडे पोहोचायचं आहे,so ऑफिसच काम लवकर संपवून तयार राहा...

दोघेही ऑफिसमध्ये पोहोचले.....आज आदित्य आणि नेहाला ऑफिसला यायला जरा उशीरच झाला होता... तोच मोहित समोर आला आणि त्याने दोघांनाही गुड मॉर्निंग wish केलं.....

मोहित तसा ऑफिस मधला नवीन employee होता..पण अगदी मनमिळावू, समजूतदार, एका क्षणांत कोणाशीही मिळून मिसळून वागणारा, कोणतंही काम विनातक्रार करणारा असा मोहित सतत हसतमुख असायचा ....फार कमी दिवसांत तो मॅनेजर साहेबांचा म्हणजेच आदित्यचा अगदी चांगला मित्र झाला होता.....

मोहितच्या मनात नेहाबद्दल कुठेतरी सॉफ्ट कॉर्नर आहे हे आदित्यला माहिती होतं.....मोहितनेही काही काचकूच न करता एके दिवशी आदित्यला या सगळ्याची कल्पना देऊन ठेवली होती....

मोहितला स्केच अगदी छान हुबेहुब काढता येत होते आणि त्याला त्याची आवडही होती....त्याने बरेचसे स्केच काढले होते.....त्याने सर्व स्केचेस नेहाला दाखवले होते....

एकदा नेहाने माझे स्केच काढ असे सांगितले, तेव्हा त्याने नेहाचे स्केच अगदी हुबेहूब काढले....पण त्यामागचे कारण काही सांगितले नाही....कारण त्याला आधी पूर्णपणे set व्हायचं होतं....

मोहितच्या मनात काय चाललंय हे जरी नेहाला कळत असलं तरी ती त्याबद्दल काही बोलायची नाही किंवा काही कळत नाही असं दाखवायची.....

संध्याकाळी ऑफिसमधून निघायच्या आत आदित्यला समजलं की पुढच्या 7 ते 8 दिवसांत एक नवीन Chief Executive Officer(CEO) जॉईन होणार आहेत...त्याने लगेच सगळ्या स्टाफ मेम्बरसना याची कल्पना दिली...

सगळ्यांना उत्सुकता होती...की नवीन CEO कोण असेल?
स्वभाव कसा असेल??पण.....

आदित्यला मात्र स्वप्नात दिसलेली ती मुलगीच सतत आठवत होती.....

आदित्य आणि नेहाने आपले काम लवकर पूर्ण केले व बरोबर 6:30 वाजता ते दोघे डॉ. रजनी देशमुख कडे जायला निघाले....

साधारणतः 6:50 पर्यंत ते डॉ. रजनीच्या क्लीनिक मध्ये पोहोचले, कोणीही पेशन्ट दिसत नव्हता.....डॉ. रजनी जणू त्यांचीच वाट पाहत बसली होती...

"hey रजनी कशी आहेस?"नेहा रजनीला भेटताक्षणी तिच्या गळ्यात पडली जणू काही कितीतरी वर्षांनी दोघी भेटत होत्या...

दोघींच्या गप्पा झाल्या आणि मग विषय निघाला तेव्हा आदित्य हळूच पुटपुटला नशीब मी इथे आहे ते आठवलं तरी....

"hii मी आदित्य सरंजामे"

hello, मी डॉ. रजनी देशमुख...

दोघांनी एकमेकांशी ओळख करून घेतली...रजनीला थोडी कल्पना आधीच नेहाने देऊन ठेवली असल्याने तिने direct विषयाला हात घातला....

"हा तर मिस्टर आदित्य सरंजामे....." डॉ. रजनीने बोलायला सुरुवात केली....तुझ्या घरी कोण-कोण असतं? म्हणजे मला नेहाने थोडीफार कल्पना दिली आहे, पण नक्की काय झालंय किंवा तुला नक्की काय होतंय हे कळणं गरजेचं आहे.."

"माझ्या घरी मी आणि माझे आई-बाबा असे आम्ही तिघच जणं राहतो. पण त्याचा या मुलीशी किंवा मला होणाऱ्या भासांशी काय संबंध??" मी आश्चर्याने विचारलं...

"नाही त्याचा काहीच संबंध नाही असं नाही!" डॉ. रजनी बोलत होत्या...

"म्हणजे??" माझ्या चेहेऱ्यावर प्रश्नचिन्ह उभं होतं....

"म्हणजे, तुझ्या भूतकाळात काही घडलं असेल तेव्हा ती गोष्ट तुझ्या लक्षात आली नसेल, पण आता तुला ती गोष्ट आठवतेय"...डॉ. रजनीने मला विचारलं....

हे सगळं सुरू असतानाच त्यांच्या केबिनच्या दारावर टकटक ऐकू आली....त्यांनी सर्वांसाठी colddrink मागवलं होतं...... मी colddrink घेण्यास नकार दिला.....

पण विचार करून माझं डोकं जड झालं होतं, मला काहीच आठवत नव्हतं....

डॉ. रजनीने मला समोर असलेल्या Chaise Longue(Long Chair) (जी सोफ्याप्रमाणे आरामदायक असते, त्यावर आपण आरामात झोपू शकतो अशी खुर्ची)...त्यात बसायला सांगितलं....

आणि डॉ. रजनीने सांगितल्याप्रमाणे मी त्या Chaise Longue वर जाऊन पडलो....

"शांत हो....

एकदम रिलॅक्स...

डोक्यात कोणतेही विचार आणू नकोस....

आणि लहानपणापासून ते आतापर्यंत तुला जे काही आठवत असेल ते आठवण्याचा प्रयत्न कर...."

हळूहळू मी रिलॅक्स झालो...आणि नकळतपणे माझ्याच भूतकाळात डोकावू लागलो...

"मी आदित्य सचिन सरंजामे... माझी आई आधीपासूनच गृहिणी होती; बाबा बँकेत नोकरीला होते...

माझ्या लहानपणी आम्ही दादर ईस्ट ला राहत होतो...तिथल्याच \"नालंदा विद्यामंदिर\" या शाळेत माझं प्राथमिक शिक्षण झालं....

माझं बालपण तसं आनंदातच गेलं. मी घरात एकुलता एक असल्याने माझे सगळे लाड आणि हट्ट पुरवले जायचे.. मला बाहेर फिरायची हौस होती. माझ्या याच फिरण्याच्या हौसेमुळे आम्ही दरवर्षी आमच्या गावी \"पंढरपूर\" ला जायचो...

गावी माझे आजी-आजोबा, काका-काकू, आणि त्यांची मुलं राहायची...

आम्ही गावाला गेलो की, आम्ही भावंड मिळून फिरायला जायचो...

झाडावरील आंबे, कैऱ्या, चिंच, बोरं सगळं काही तोडून खायचो आणि मग आमची स्वारी नदीकडे निघायची...

त्यादिवशीही आम्ही नेहमीप्रमाणे नदीवर गेलो, आणि पाण्यात एकमेकांवर जोरजोरात पाणी उडवत होतो...

पाणी उडवत असतानाच माझा तोल गेला व मी अडखळून प्रवाहाबरोबर दूर गेलो..त्यात मला पोहोताही येत नसल्याने मी बुडायला लागलो....

हे पाहून सगळेच घाबरले आणि त्यांनी जवळच उभ्या असलेल्या हरीश काकांना हाका मारल्या, त्यांनी मला लगेचच उचलून किनाऱ्यापर्यंत आणलं आणि tyani माझा जीव वाचवला....

मी फार घाबरलो होतो,म्हणून त्यांनी मला घरी नेऊन सोडलं...मी आईला जाऊन बिलगलो...

हरीश काकांनी घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला...

आई-बाबांनी हरीश काकांचे आभार मानले. पण माझ्या मात्र डोळ्यातले अश्रू अजूनही थांबत नव्हते..

आई-बाबांनी मला समजावलं आणि जे झालं ते विसरण्याचा प्रयत्न कर असं सांगितलं...

पुढच्या दोन दिवसांत आम्ही मुंबईला परतलो, परंतु मी अजूनसुद्धा त्या धक्क्यातून सावरलो नव्हतो..मी बाहेर खेळायलाही जाणं सोडून दिलं...

त्यातच काही दिवसांनी बाबांना प्रमोशन मिळालं आणि आम्ही बोरिवलीला \"आदर्श\" सोसायटी मध्ये फ्लॅट घेतला...

तिथली नवीन जागा, नवीन मित्रमैत्रिणी यांच्याबरोबर मी रमून गेलो व कालांतराने गावी घडलेल्या गोष्टीचा मला विसर पडला...

बघता बघता माझं कॉलेज सुरू झालं...

त्यातच बारावीत असतांना माझी नेहाशी मैत्री झाली आणि पुढे आम्ही एकत्र असल्याने आमची मैत्री घट्ट होत गेली....

साधारण फर्स्ट इयर पासून आमचा एक नवीन गृप तयार झाला....

\"कॉलेज कट्टा\" कारण आम्ही सगळे जण कॉलेज च्या कॅटिंग जवळील कट्ट्यावर बऱ्याच वेळा एकमेकांना पाहत होतो व नंतर आमची ओळख होऊन आमचा गृप तयार झाला तोही सहा जणांचा...

तसा आमचा गृप म्हणजे टोटल फिल्मी बरं का!

रिया पाटील, सिद्धार्थ जोशी, सुयश देशपांडे, समिधा सबनीस, नेहा कारखानीस आणि मी.....

सगळेच नौटंकी.... मी आणि नेहा तर सगळ्यांत चांगले मित्र..... बाकी सगळे म्हणजे,

सतत सगळ्यांना चिडवणारी, वेळ पडल्यावर कोणालाही तुडवणारी आणि कारण नसतांनाही चिडणारी, तसा तर आमच्या ग्रुपचा चिडका बिब्बा म्हणायला हरकत नाही, त्यातच डॅशिंग पण मनाने चांगली अशी रिया.......

रियाच्याच Category मध्ये मोडणारा आमचा सिद्धार्थ जोशी उर्फ सिद्ध्या....
त्याची भाषा म्हणजे घरात अगदी सभ्यतेची पण घराबाहेर \"अबे जा रे, अबे चल बे\" ही त्याची मेन वाक्य.....
तशी तर रिया आणि सिद्ध्याची जोडी म्हणजे आमच्या गृपचे टॉम आणि जेरी, सतत भांडणं...

ते म्हणतात ना तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना असंच काहीसं त्यांचं होतं....

आमच्या गृप मधला अभ्यासू मेंबर म्हणजे सुयश देशपांडे....

हा तसा अभ्यासू पण एक नंबरचा छुपा रुस्तम....शांत स्वभावाचा, जास्त न बोलणारा असा हा पठ्ठ्या समिधाशी मात्र सतत काही ना काही कारण काढून बोलायला जायचा...

तिला मदत नको असेल तरी मदत करायचा...

हे जरी आम्हा सगळ्यांना कळत असलं तरी आम्ही काही बोलायचो नाही...पण हा सतत आम्हाला सांगायचा तसं काहीच नाही तिला मदत हवी होती म्हणून me केली...

यावर सगळे हसायचे पण त्याला आम्ही का हसतोय हे कधी कळलं नाही....

हा तर आता ही समिधा कोण?? तर समिधा म्हणजे आमच्या गृपची जान आणि शान...

दिसायला सुंदर, भोळी, सगळ्यांची काळजी घेणारी म्हणजेच प्रत्येक गोष्टीत थोडीशी इमोशनल.....

आम्ही सहा जण कॉलेज मध्ये असतांना एकत्रच असायचो...मग ते अभ्यास करण्यापासून लेक्चर बंक करून खाऊगल्लीत जाऊन खाणं-पिणं असो नाहीतर कुठे फिरायला जाणं असो सगळी मज्जा एकत्र करायचो......


*******************************************
डॉ. रजनीने आदित्यला जुन्या आठवणी आठवायला सांगितल्या आहेत पण त्याचा काही उपयोग होईल??

की ह्यातून काही वेगळंच वळण निर्माण होईल???

पाहूया पुढच्या भागात.......

(कथा लिहिण्याची ही पहिलीच वेळ असल्याने चुकांसाठी क्षमस्व...)

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading