Oct 24, 2021
कथामालिका

कोण होती ती....? भाग 8.

Read Later
कोण होती ती....? भाग 8.

❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..


कोण होती ती.....? भाग 8.


©रेश्मा आणि साक्षी..


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, सीमाने सांगितलेल्या अभिज्ञाच्या डायरीचा शोध घेण्यासाठी इन्स्पेक्टर अरविंद त्यांच्या टीम बरोबर अभिज्ञाच्या घराची झडती घ्यायला गेले, आणि त्यांना अभिज्ञाची डायरी मिळाली...आता पुढे....)


तोवर इकडे अचानकपणे रंगा आणि कुबड्या दोघेही धावतच पाटील वाड्याकडे आलेले पाहून पाटलांना काहीच कळेना....

रंगा आणि कुबड्या म्हणजे पाटलांचे दोन हात....

"अव्ह पाटील...! ती पोरगी परत आली हाय.....!"रंगा आणि कुबड्या धापा टाकत म्हणाले.....

राजाराम पाटील हे गावचे सरपंच....पिळदार मिशी, पांढरा सदरा आणि पांढरं धोतर, डोक्यावर टोपी..... तोंडात सतत पानाचा तोब्रा भरलेला....

उंच, आडदांड, हातात सतत सुपारी आणि सुपारी कातरायला अडकित्ता....असं पाटलांचं रूप....

त्यात \"आराराssss डोस्क्याचा भुगा झाला माझ्या\" हे वाक्य बोलल्याशिवाय त्यांचा दिवस संपत नाही....

"आराराssss डोस्क्याचा भुगा झाला माझ्या...! काय रं? काय झालं? कुठं भूत-बीत पाहिलं का काय?कशाला माझ्या नावानं बोंब करताय रं?..." पाटलांनी त्यांच्या खणखणीत आवाजात विचारलं....

"अव्ह पाटील, गावात पोलीस फिरत्यात.... त्या पोरीची चौकशी चालू हाय...."रंगा म्हणाला....

"मला तर वाटतंय, तीssss ती पोरगी परत आली हाय....!त्या पोलिसांबरोबर दोन-तीन तरुण पोरं बी व्हती.... ती बी गावातली न्हाय मुंबईची वाटत्यात....!"कुबड्या पाटलांना म्हणाला.....

"आराराsss डोस्क्याचा भुगा झाला माझ्या....!कोण ती? तिला नाव गाव काय हाय का नाय?...समजंल अस बोलता का देऊ एक....! "पाटलांचा राग आता अनावर होत होता....

"अव्ह पाटील.... कोण ती काय इचारताय? अव्ह तिच ती डाक्टरीणssss ...जीची केस बंद करायला तुम्ही त्या ए.सी.पी. अजिंक्य भोसलेंना पैसं बी दिलं व्हतं...."रंगा ने पाटलांना आठवण करून दिली....

"तुम्हाला काय यड-बीड लागलं हाय का काय? की रात्रीची घेतलेली उतरली न्हाय अजून.?"पाटलांनी विचारलं.....

"अव्ह पाटील, आम्ही खरंच सांगतोया..."रंगा आणि कुबड्या दोघे एकत्र म्हणाले.....

"खबर पक्की हाय ना?...जर ही खबर खोटी असंल तर ह्या पिस्तुलीतल्या समद्या गोळ्या तुमच्या डोसक्यात घालीन....!"पाटलांनी रंगा आणि कुबड्या दोघांना धमकीचं दिली.....

"इतके वर्ष काम करतोय पाटील आम्ही तुमच्याकडे... तुम्हाला कधी बी खोटी बातमी दिली न्हाय, अन कधी देनार बी न्हाय....!
त्या इन्स्पेक्टर साहेबांनी आम्हाला दोघांना बी सवता इचारलं, हिला कुठं पाहिलं आहे का म्हणून....

आम्हांसनी वाटलं समदी गावातली माणसं हिच्या बद्दल काय-बाय बोलतील मग हे जातील निघून पर तसं काय झालं न्हाय बघा, अजून बी चौकशी सुरूच हाय....!" रंगा आणि कुबड्या ने पाटलांच्या रागाला घाबरून सगळं घडाघडा सांगितलं....

"ठीक हाय... म्या बघतो काय करायचं ते अन मग सांगतो तुम्हांसनी... तुम्ही जावा म्या सांगितलेलं काम करा...."पाटलांनी दोघांना जायला सांगितलं आणि लगेच ए.सी.पी. साहेबांना फोन लावला.....

"काय रं ए नरसाळ्या, तुला दिलेलं पैसं कमी पडलं व्हय? अजून हवं व्हतं तर मागायचं व्हतं.... पुन्हा कशाला चौकशी सुरू करायला लावली...."आता तर पाटलांना ए.सी.पी साहेबांचा इतका राग आला होता की, त्यांनी हातातली सुपारी अडकित्त्यात इतकी जोरात दाबली की त्या सुपारीचा पार भुगा झाला.....

"अहो पाटील, काय बोलताय? कसली चौकशी? मी काही कोणती चौकशी करायला सांगितली नाही....आणि तुम्ही मला एवढे पैसे देत असतांना मी असं का करू? तुम्ही कुठल्या चौकशीबद्दल बोलताय जरा स्पष्ट सांगा...."ए.सी.पी साहेब पाटलांना म्हणाले....

"अरे त्या डाक्टर ची केस, तू बंद केली व्हती ना...!अभिज्ञा गायकवाड नाव व्हतं तिचं....!"पाटलांनी ए.सी.पी साहेबांना केसची आठवण करून दिली....

"नाही ओ पाटील, ती केस बंदच आहे.... तुम्हाला चुकीची माहिती मिळाली आहे....!"ए.सी.पी साहेब म्हणाले....

"अरे गप्प बस...! मला भूल देऊ नकोस...आता तुला पैसं हवं असतील म्हणून तू पुन्हा चौकशी सुरू केली आहेस, ते बी कुठल्यातरी नवीन हाफीसर कडून म्हणजे आम्हाला काय बी समजणार न्हाय....
तुला आज न्हाय ओळखत म्या...!लवकरात लवकर केस बंद कर नाहीतर या सुपारीच्या जागी तुझी मान असंल, लक्षात ठेव...!" पाटलांनी जवळजवळ भोसले साहेबांना धमकीचा दिली.....

"एक एक मिनिट पाटील, माझं ऐकून घ्या....खरंच मला काही माहिती नाही...पण तुम्ही म्हणालात कोणीतरी नवीन ऑफिसर आहे, म्हणजे हे कोणी केलं असेल याचा मला अंदाज आला आहे..... मी ही केस लवकरात लवकर बंद करतो, तुम्ही काळजी करू नका..."

तोवर तिकडे इन्स्पेक्टर अरविंद डायरी उघडणार तेवढ्यात त्यांचा फोन वाजला....

"कुलकर्णीSSS...जिथे असाल तिथून लवकरात लवकर चौकीवर पोहोचा...!" एवढं रागात बोलून ए.सी.पी साहेबांनी फोन कट केला.....

"शिंदे गाडी काढा....सावंत ती डायरी घेऊन चौकीत चला, ए.सी.पी साहेबांचा फोन आला होता...."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले...

"काय झालं साहेब? असं अचानक ए.सी.पी साहेबांनी का बोलावलं असेल?" सावंत नी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं....

"ए.सी.पी साहेब रागात बोलत होते हे त्यांच्या आवाजावरून कळलं....कदाचित त्यांना कळलं असेल की आपण अभिज्ञाच्या केसची चौकशी करतोय....बघू आता चौकीत गेल्याशिवाय कळणारही नाही...!" इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

इन्स्पेक्टर अरविंद नी चौकीत पोहोचण्यापूर्वी सावंत आणि मोरेंना त्या डायरीबद्दल किंवा बाकी पुराव्यांबद्दल चौकीत काहीही न बोलण्यास सांगितले....

इन्स्पेक्टर अरविंद ए.सी.पी साहेबांच्या केबिन मध्ये गेले....

"सर...!"(सेल्युट करून).
सर काय झालं इतकं urgent बोलावून घेतलं?" इन्स्पेक्टर अरविंद नी ए.सी.पी साहेबांना विचारलं....

"कुलकर्णीssss... तुम्ही कोणती केस रिओपन केलीत?तुम्ही कोणत्या केसच्या चौकशीसाठी गेला होतात?"ए.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं....

"अभिज्ञाची केस...!"इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले...

"ती केस जर मी क्लोज केली होती तर तुम्ही मला न विचारता ती केस रिओपन केलीच कशी? आणि केली ती केली पण नंतर मला सांगितलं का नाही?"ए.सी.पी साहेब चिडून म्हणाले....

"सर सॉरी टू से, पण तुम्ही मगाशी जेव्हा चौकीत आलात तेव्हा याच केसची चौकशी सुरू होती... आणि तुम्ही विचारल्यावर मी सांगितलं सुद्धा होतं की, जुनी अभिज्ञा गायकवाड ची केस रिओपन करावी लागली आहे...."इन्स्पेक्टर अरविंद नी ए.सी.पी साहेबांना आठवण करून दिली....

"मला असं नाव सांगितल्यावर कसं आठवेल कुलकर्णी की तुम्ही नक्की कोणती केस रिओपन केली आहेत ते...?मला मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या कुलकर्णीssss...!"ए.सी.पी साहेब आता जास्तच चिडले होते....

"सर तुम्ही रजेवर होतात, त्यामुळे मला नाईलाजाने डी.सी.पी साहेबांकडे रिपोर्ट करावा लागला आणि त्यांच्या अनुमतीनेच ही केस रिओपन झाली आहे..."इन्स्पेक्टर अरविंद ए.सी.पी साहेबांना म्हणाले...

"च्यायला...!ह्या केसची सगळे रिपोर्ट्स आता डी.सी.पी साहेबांकडे जाणार, म्हणजे मी काहीच करू शकत नाही.....पण काहीही करून ही केस बंद झालीच पाहिजे...!" ए.सी.पी साहेब मनातल्या मनात रागाने बोलले...

"सर, कॅन आय गो?.."इन्स्पेक्टर अरविंद नी विचारल्याबरोबर त्यांची तंद्री तुटली....

"अं.... हा या तुम्ही...!"ए.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ला जायला सांगितलं...

काही वेळापूर्वी.....

इन्स्पेक्टर अरविंद नी अभिज्ञाच्या घरातून निघाल्यावर डी.सी.पी साहेबांना केसची प्रोग्रेस कळण्यासाठी फोन लावला....

"सर.... आम्हांला अभिज्ञाच्या घरी तिच्या मैत्रिणीने म्हणजेच सीमाने सांगितल्याप्रमाणे अभिज्ञाची पर्सनल डायरी मिळाली आहे.... पण अचानक ए.सी.पी साहेबांनी चौकीत बोलवल्याने आम्ही तिथून निघालो...
मला असं वाटतंय की त्यांना आम्ही या केसबद्दल चौकशी करतोय याचा doubt आला असावा..."

"अहो कुलकर्णीsss... कशाला काळजी करता? मी आहे ना...! तुम्ही निर्धास्तपणे चौकीत जा.... आणि जर भोसलेंनी जास्त काही विचारलं तर त्यांना माझ्याशी बोलायला सांगा,मग मी बघतो काय करायचं ते...!"डी.सी.पी साहेब म्हणाले....

"आणि हो तिथे मिळालेल्या डायरी बद्दल आणि आदित्य किंवा अभिज्ञाची मैत्रीण सीमा यांच्याबद्दल काहीही भोसलेंना कळता कामा नये...मी तुमच्या सोबत आहे...!"डी.सी.पी साहेबांनी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं....

"ओके सर,थँक यु....!" एवढं बोलून इन्स्पेक्टर अरविंद नी फोन कट केला.....


आता.......


डी.सी.पी साहेबांकडे ही केस गेल्याने ए.सी.पी साहेब काहीच करू शकत नव्हते, म्हणून त्यांनी पाटलांना फोन लावला....

"नमस्कार पाटील....! ही केस आता डी.सी.पी साहेबांकडे गेल्याने मी काहीच करू शकत नाही.... तुम्हालाच काहितरी करावं लागेल....."ए.सी.पी साहेब पाटलांना म्हणाले.....

"आराराssss, डोस्क्याचा भुगा झाला माझ्या...! एक काम सांगितलं तुला, ते बी तुला धड जमलं न्हाय व्हय....! फुकणीच्या, तुला ए.सी.पी केला कोणी रंss...!" पाटील चिडूनच बोलले.....

"अहो पाटील, आता ही केस डी.सी.पी साहेबांकडे आहे.... आणि ते काही माझ्यासारखे नाहीयेत...!माझ्या नोकरीचा सवाल आहे...."ए.सी.पी साहेब पाटलांना म्हणाले...

"बरं बरं, तुझ्याच्यानं काय बी होणार न्हाय हे ठाव व्हतं आम्हांस्नी....! म्या बघतो काय करायचं ते....!"पाटलांच्या तळपायाची आग आता मस्तकात गेली होती....

"रंगा...! कुबड्या....!कुठं गेलं रं दोघं बी?....पाटील बेंबीच्या देठापासून ओरडत आहेत, हे पाहून रंगा आणि कुबड्या धावतच पाटलांजवळ आले....

"काय झालं पाटील? "दोघांनी घाबरून विचारलं...

"एकाचा बंदोबस्त करायचाय....कधी करणार ते सांगा....रातच्याला पार्टी देईन तुम्हांस नी...!" पाटलांनी त्यांच्या खणखणीत आवाजात रंगा आणि कुबड्या ला सांगितलं...

"व्हय की पाटील, तुम्ही एखाद काम सांगितलं अन् आम्ही ते न्हाय केलं, असं कधी झालं हाय का?..."रंगा आणि कुबड्या म्हणाले...

"आज काय बी करून त्या नव्या हाफिसर ला गाठायचं अन त्या डाक्टर ची केस बंद करायला भाग पाडायचं....

अन् नाहीच ऐकल तर द्या दोन - चार फटकं....अन येळ आली तर जित्ता गाडा....समजलं का म्या काय बोललो ते?.....चला लागा कामाला...!" पाटलांनी दोघांना काय करायचंय ते समजावून सांगितलं...

इन्स्पेक्टर अरविंद घरी जायला निघाले असताना अचानक रंगा आणि कुबड्या एक काळ्या रंगाची जीप घेऊन आले....

आणि डाव्या बाजूने इन्स्पेक्टर अरविंद च्या गाडीला धडक दिली.... तसा त्यांचा तोल गेला आणि ते खाली पडले....

"अयssss, हाफिसर आजच्या आज त्या डाक्टर ची चौकशी बंद कर, नाहीतर...."दोघं मिळून जणू इन्स्पेक्टर अरविंद ना धमकीच देत होते...

इन्स्पेक्टर अरविंद उठून काही बोलणार तेवढ्यात त्या दोघांनी त्यांना लाथा बुक्क्यांनी तुडवायला सुरुवात केली....

"जर पुन्ह्यांदा ह्या केसची चौकशी करायला गेलास तर तुला जित्त ठेवणार न्हाय....!"एवढं बोलून रंगा आणि कुबड्या तिथून निघून गेले....

इन्स्पेक्टर अरविंद कसेबसे उठले, पण हाताला आणि पायाला मुकामार लागला होता तसेच डोक्याला ही छोटीशी जखम झाली होती....

म्हणून त्यांनी सावंत ना फोन लावला आणि त्या ठिकाणी बोलावून घेतलं....

"साहेब अहो एवढं कसं लागलं तुम्हाला?"सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना म्हणाले....

"सावंत आपण माझ्या घरी जाऊन बोलुयात...!"इन्स्पेक्टर अरविंद नी सावंत ना सांगितलं....

सावंत इन्स्पेक्टर अरविंद ना घरी घेऊन आले...

"साहेब पाणी घ्या...!मी मलमपट्टी करतो..." सावंत frosted box आणायला गेले....

सावंत नी इन्स्पेक्टर अरविंद ना व्यवस्थित मलमपट्टी केली.... पेनक्युलर दिली....

आणि मलमपट्टी करून झाल्यावर सावंत नी इन्स्पेक्टर अरविंद ना विचारलं ,"साहेब बरं वाटतंय का? तुमचा accident कसा झाला?"

"सावंत मी घरी जायला निघालो होतो, पण अचानक काही गावगुंड काळ्यारंगाची जीप घेऊन आले आणि मला डाव्या बाजूने धडक दिली....."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"कोण होते साहेब ते?" सावंत नी आश्चर्याने विचारलं....

"मलाही नाही माहिती...! हो पण ते अभिज्ञाची केस बंद करण्याबद्दल बोलत होते....रादर त्यांनी मला ती केस बंद करा अशी धमकीचं दिली आहे...."इन्स्पेक्टर अरविंद नी घडलेला सर्व प्रकार सावंत ना सांगितला....

"साहेब खरं सांगतो, तुम्ही या गावात नवीन आहात....जर कोणी तुम्हांला अशा प्रकारे धमकवत असेल तर तुम्ही हे सगळं डी.सी.पी साहेबांच्या कानावर घालून ठेवा...."सावंत काळजीने बोलत होते....
कारण इन्स्पेक्टर अरविंद जरी नवीन असले तरी त्यांनी चौकीतील सर्वांना लवकरच आपलंसं केलं होतं....

"सावंतsss नका काळजी करू...! मला तर वाटतंय हे सगळं ए.सी.पी साहेबांनी केलं असेल....

कारण तुम्ही सांगितल्याप्रमाणे जर ही केस त्यांनी बंद केली होती याचा अर्थ अजूनही त्यांना ही केस परत रिओपन व्हायला नकोय....

पण आता ही केस डी.सी.पी साहेबांकडे गेल्याने त्यांनी त्या माणसांना पाठवलं असेल..."इन्स्पेक्टर अरविंद नी त्यांच्या मनातील शंका व्यक्त केली....

"साहेब तुम्ही काळजी घ्या.... मी निघतो..."सावंत नी इन्स्पेक्टर अरविंद ना सांगितलं व ते निघाले....

इन्स्पेक्टर अरविंद ना मात्र या अभिज्ञाच्या केस चा छडा लावल्याशिवाय शांत बसवणार नव्हतं....

खरंच जर अभिज्ञाच्या केसमुळे हे सगळं होत असेल तर मला ती डायरी वाचायलाच हवी.... हा विचार करून जखमी अवस्थेत सुद्धा त्यांनी अभिज्ञाची डायरी काढली....


छान गुलाबी रंगाचं कव्हर लावलेली, त्यावर थोडे नक्षीकाम......अशी ती डायरी फारच सुंदर दिसत होती, म्हणून इन्स्पेक्टर अरविंद नी ती डायरी उघडली.......


*************************************************

पाटलांनी अभिज्ञाचा शोध थांबवायला का सांगितलं असेल?


इन्स्पेक्टर अरविंद नी केसचा शोध अजूनही थांबवला नाही, हे त्यांच्या जीवावर बेतलं तर...?


अभिज्ञा गायब होण्यामागचं सत्य इन्स्पेक्टर अरविंद सर्वांसमोर आणू शकतील का?...


या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या भागात.....


क्रमशः....


❤️ ईरा दिवाळी अंक 2021 ❤️

मर्यादित प्रति.. आजच बुक करा खालील फॉर्म भरून..
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading