Oct 18, 2021
कथामालिका

कोण होती ती? ....भाग 11

Read Later
कोण होती ती? ....भाग 11
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now


कोण होती ती?..... भाग 11.


©रेश्मा आणि साक्षी.


(सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून यातील स्थळ, व्यक्ती, घटना, वास्तू, यांचा वास्तवाशी काहीही संबंध नाही....)


*******************************************


(मागील भागात आपण पाहिलं, अभिज्ञाला पाटलांच्या काळ्याधंद्याविषयी काही गोष्टी कळल्या होत्या, त्यामुळे तिला पाटलांच्या गुंडांनी धमकी दिली होती.... अभिज्ञाला धमकी देणारे गुंड आणि इन्स्पेक्टर अरविंदवर हल्ला करणारे गुंड हे एकच होते.... इन्स्पेक्टर अरविंद नी पाटलांच्या दारूच्या भट्टीवर धाड टाकली आणि रंगा आणि कुबड्या ला पकडून चौकीवर आणून चोप दिला...आता पुढे....)दोघही बोलू लागले," सागर हा नाशिकला कॉलेज मध्ये शिकणारा पोरगा व्हता... त्याला कमी मेहनतीमध्ये अन कमी येळात लय पैसा हवा व्हता... मग आम्ही त्याला परतेक येळी एक बॉक्स द्यायचो, जो बॉक्स आम्हाला पाटलांनी सांगितलेल्या ठिकाणी पोहोचवायचा असायचा पर तो आम्ही कधी बी सवता पोहोचवला न्हाय.....

सागर सारखी लय पोरं अशी व्हती ज्यांना आम्ही हे काम करायला लावायचो.... त्या बॉक्स मध्ये आम्ही गांजा पाठवायचो....तए त्या पोरांसनी माहिती नसायचं....

एक दिस सागर तो बॉक्स घेऊन जात व्हता अन नेमकं ते बॉक्स फुटलं अन त्यानं तो गांजा पाहिला.... त्यानं आम्हांसनी लय येळा हे समदं करण्यासाठी इरोध केला म्हणून आम्ही त्याला दम दिला....

तेव्हा तो लय घाबरला अन आम्ही दिलेली पार्सल तो आम्हाला पाहिजे असलेल्या ठिकाणी पोहोचवू लागला....

पर एक दिस आम्ही त्याला फोन वर बोलताना ऐकलं, तो त्याच्या बहिणीला समदं खरं सांगत व्हता तेव्हा आम्हीच त्याच्या हातातून फोन घेतला अन कट केला.... मग बराच येळ आम्ही त्याचा फोन बंद केला...

त्यांच्यातल्याच एका पोराला सागरच्या बहिणीला म्हणजेच सीमाला फोन लावून धमकी द्यायला सांगून नंतर आम्ही सागरचा फोन चालू करून त्याला सीमाला जीवे मारण्याची धमकी देऊन पाठवून दिलं....

पर त्याने पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार केलीच.... म्हणून आम्ही त्याला आमच्या ताब्यात घेतला अन त्याला मारून टाकला....

त्या दिवशी आमचं शेवटचं पार्सल एका ट्रक वाल्याकडे देऊन आमच्या बाजूच्या गावात पोहोचवायचं व्हतं, तो ट्रक मुंबई वरून येणार व्हता अन ते पार्सल सागर पोहोचवणार व्हता....

आम्ही त्याला मारून टाकला व्हता, म्हणून आम्ही सीमाला खोटा फोन केला की, सागर आमच्या ताब्यात अजून बी सुखरूप हाय तू ते पार्सल दे आम्ही त्याला सोडू....

आम्ही तिला ते पार्सल द्यायला बोलावलं कारण आम्ही तिला तिथंच त्या ट्रक ने उडवणार व्होतो पर ती वाचली अन तिच्या बरोबर येगळ्याच कोणत्यातरी पोराचा अपघात झाला.... तो जिवंत हाय का मेला ते काय आम्हांसनी माहिती न्हाय...!

नंतर दुसऱ्या दिवशी सीमा आम्हांसनी ह्याच गावात दिसली, तव्हा आम्हांसनी कळलं तिच्या जागी तिची मैत्रीण आली व्हती, हे आम्हांसनी नंतर समजलं.....

तव्हा आम्ही तिला धमकी दिली व्हती की, "पोलिसात जाऊ नकोस अन गेलीस तर तुझ्या मैत्रिणीला बी आम्ही सोडणार न्हाय.....

नंतर ती कुठं गेली आम्हांसनी काय बी माहिती न्हाय साहेब...!"

"मग अभिज्ञाचं काय केलंत तुम्ही?" सावंत साध्या गोष्टीसाठी सागरला मारून टाकल्यामुळे प्रचंड चिडले होते.....

" तुमच्या दोघांच्या सांगण्यानुसार सागरने पोलिसात तक्रार केली म्हणून तुम्ही त्याला मारलंत, मग पोलिसांनी तुमच्या विरोधात काही action कशी घेतली नाही?" इन्स्पेक्टर अरविंद नी विचारलं....

आता मात्र रंगा आणि कुबड्या पार घाबरले, कारण ते दोघेही नकळतपणे कोणालाही माहिती नसलेल्या सागरने केलेल्या पोलीस तक्रारीविषयी बोलून गेले होते.... आता त्यांना सगळं खरं सांगण्याशिवाय पर्याय नव्हता....

"नाही साहेब... म्हणजे हो....!" दोघांच्या बोबड्या वळल्या होत्या....

तोवर डी.सी.पी साहेब तिथे आले....

"काय कुलकर्णीsss.... काय चाललंय दोघांचं हो, नाही?...."डी.सी.पी साहेबांनी विचारलं....

"सर, दोघांना थर्ड डिग्री दिली आहे, दोघही आता पोपटासारखे बोलतायत..."इन्स्पेक्टर अरविंद डी.सी.पी साहेबांना म्हणाले....

"बोला आता पटापटा...! काय हो, नाही करताय?" सावंत म्हणाले....

"होs.. हो साहेब...सांगतो..! ते सागरने पोलीस तक्रार केली होती पण भोसले साहेब पाटलांच्या बाजूने होते म्हणून सागरने केलेल्या तक्रारीचा काहीच उपयोग झाला नाही....

आणि ती डाक्टरीण म्हणजेच अभिज्ञा गावात नवीन व्हती तोवर ठीक व्हती.... पर जवा पासून पाटील वाड्यावर येऊन गेली तवापासून जरा आमच्याकडं संशयाने बघू लागली....त्या दिवशी तर तिनं हद्द पार केली, ती आमच्या दारूच्या भट्टी पर्यंत येऊन पोहोचली.....

नंतर हळूहळू आम्हांसनी माहिती झालं की सीमाच्या जागी हिचा अपघात झाला व्हता.... हीच सीमाची मैत्रीण हाय.... अन तिला बी कुठंतरी आमच्या ईषयी कळलं व्हतं.... तिने गावात आमच्याबद्दल चौकशी करणं सुरू केलं व्हतं....

आम्ही तिला धमकी बी दिली व्हती, पर त्याचा काय बी उपयोग झाला न्हाय...! तिनं सागरच्या एका मित्राला गाठलं, जो आधी आमच्याबरोबर काम करत व्हता पर नंतर आमच्यात वाद झाला अन पाटलांनी त्याला गावातून हाकलून दिला....

त्याला आमचा बदला असं बी घ्यायचा व्हता म्हणून त्यानं अभिज्ञाला सागर ला मारून टाकल्याबद्दल सांगितलं.... अन ती अभिज्ञा आमच्या हात धुवून मागं लागली व्हती....

मग पाटलांनी आम्हांसनी तिचा बी पत्ता कट कराया सांगितला....एक दिस रात्री उशिरा गावाबाहेरून अभिज्ञा एकटी घरला जाताना आम्हांसनी दिसली, तव्हाच आम्ही तिचा पाठलाग केला.....

पर ती एका जंगलात घुसली.... आम्ही तिच्या मागं-मागं जात व्होतो अन अचानक ती एका कठड्याजवळ जाऊन पोहोचली.... आम्ही बी तिच्या मागं व्होतोच तिला आम्ही मारण्याचा लय प्रयत्न केला तर तिनं आमचा परतेक वार चुकवला....

आम्ही तिला आमच्या जवळ ओढलं पर तिनं आम्हांसनी धक्का दिला अन सवता पाय घसरून खाली दरीत कोसळली अन जवळच असलेल्या झाडाच्या फांदीला लटकली, पर आम्हाला बी तिला मारायचंच व्हतं, म्हणून ती जीव वाचवण्यासाठी मदत मागत असून बी आम्ही तिला वाचवली न्हाय, उलट दरीत ढकलून दिली.....म्हणून तिचा पत्ता कोणाला बी लागला न्हाय..... अन आम्हाला त्याचा पश्चाताप बी होत न्हाय....!

नंतर पोर हरवली म्हणून तिच्या घरचे लय येळा पोलीस चौकीत गेले पर भोसले साहेबांच्या मदतीने पाटलांनी ती केस बंद केली...
अन आम्हीच चौकीच्या फाईल ठेवण्याच्या ठिकाणी आग लावली.... जेणेकरून तिच्या घरचे जरी आले तरी बी, फाईलच जळाली असं सांगून त्यांसनी परत पाठवून दिलं....
पर त्या हवालदारानं सवताचा जीव धोक्यात घालून बऱ्याच फाईल वाचवल्या अन आमच्या सगळ्या मेहनतीवर पाणी पडलं...." रंगा आणि कुबड्या घडाघडा सगळं बोलले....

"ए.सी.पी भोसलेंना बोलवा...!"डी.सी.पी साहेबांनी सावंत ना सांगितलं....

ए.सी.पी साहेब सावंत नी निरोप दिल्याबरोबर लगेचच आले....
"सर...!"(सेल्युट करून)
"काय झालं सर? तुम्ही बोलवलंत?"ए.सी.पी भोसलेंनी विचारलं....

"हो...!
भोसलेss, मला सांगा ह्या दोघांना तुम्ही ओळखता का?" डी.सी.पी साहेबांनी भोसले साहेबांना विचारलं...

"ह्यांना?...
नाही सर, मी तर ह्यांना पहिल्यांदा बघतोय...!"ए.सी.पी साहेब म्हणाले.....

ए.सी.पी साहेब खोटं बोलतायत हे त्यांच्या चेहऱ्यावरून कळत होतं....

"मला खोट्याची चीड आहे भोसलेss....!"डी.सी.पी साहेब म्हणाले....

"अहो सर, ए.सी.पी साहेब कशाला खोटं बोलतील?"इन्स्पेक्टर अरविंद भोसले साहेबांना डीवचत म्हणाले....

" एssss ए.सी.पी आम्हांसनी का अडकवायलाय? आम्ही जे काय बी केलं ते पाटलांच्या सांगण्यावरून केलं अन तू बी त्यांना मदत केली व्हतीस....! इसरलास की काय?" रंगा आणि कुबड्या ए.सी.पी साहेबांना म्हणाले....

"आम्हाला माहितीये भोसलेss, तुम्ही यांना कधी कधी आणि काय काय मदत केली आहे ते...! ह्या दोघांनी सगळं कबूल केलं आहे.... तुमचं काय करायचं ते नंतर बघू पण त्या आधी पाटलांना अरेस्ट करायला तुम्ही स्वतः जा...!कुलकर्णी आणि सावंत तुमच्याबरोबर येतील...."डी.सी.पी साहेबांनी ए.सी.पी अजिंक्य भोसलेंना ऑर्डर दिली....

"शिंदे गाडी काढा...!"इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

गाडी सरळ पाटलांच्या वाड्यावर नेण्यात आली....
ए.सी.पी साहेब सतत त्या वाड्यावर ये-जा करून असायचे.... पण आज अचानक ए.सी.पी साहेबांबरोबर इन्स्पेक्टर अरविंद आणि सावंत ना बघून पाटलांना धक्काच बसला....

"आरंsss साहेब, या या...! बसा, गंगू ताई साहेबांचं चहा पाण्याचं बघा जरा...!" पाटलांनी त्यांच्या घरी काम करणाऱ्या मावशींना सांगितलं...

"नाही, चहा-पाणी नको..! ए.सी.पी साहेब तुम्हांला अरेस्ट करायला आले आहेत...."इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"का.....का....काय? मला कशाला? मी काय केलंय?तुम्ही कोणाच्या वाड्यात उभे आहात ते माहिती हाय ना...!"पाटील घाबरून म्हणाले....

"ते तुम्हाला चौकीत गेल्यावर कळेल...! चला आमच्याबरोबर चौकीत...!"इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"एss, म्या काय केलं न्हाय मग म्या कशाला यायचं पोलीस चौकीत? "पाटील तोऱ्यात म्हणाले...

"सागरचा आणि अभिज्ञाचा खून केलाय तुम्ही...!" इन्स्पेक्टर अरविंद म्हणाले....

"कोण सागर? अन कोण अभिज्ञा? काय बोलताय तुम्ही? अन तुमच्याकडे काय पुरावा असंल तरच बोला न्हायतर म्या तुमची वर तक्रार करंल...!"पाटील म्हणाले....

"सागर आणि अभिज्ञाला मारण्यासाठी तुम्हीच सुपारी दिली होती ना?" इन्स्पेक्टर अरविंद नी पाटलांना विचारलं.....

"म्या वर तक्रारच करतो तुमची, त्याशिवाय तुम्ही ऐकणार न्हाय...!"पाटील विषय बदलण्याचा प्रयत्न करत होते....

"अहो पाटीलsss, अश्याने तुम्हीच अडकाल...! कारण आमच्याकडे तुमच्या विरोधातील एक नाही दोन जिवंत पुरावे आहेत...!
आणि जर तुम्ही काही केलंच नसेल तर घाबरता कशाला? आता चौकीवर येताय की आमची वर तक्रार करताय...!"इन्स्पेक्टर अरविंद नी पाटलांना पूर्णपणे निरुत्तर केलं....

इन्स्पेक्टर अरविंद, सावंत, ए.सी.पी साहेब आणि पाटील चोघेही चौकीवर पोहोचले....

"या पाटील...!तुमचं स्वागत आहे आमच्या पोलीस चौकीत... आता लवकर खरं काय ते सांगा, आधीच बरीच वर्ष तुम्ही आम्हाला या केस पासून लांब ठेवलंय...!" डी.सी.पी साहेब म्हणाले....

डी.सी.पी साहेबांबरोबर रंगा आणि कुबड्या ला मार खाल्लेल्या अवस्थेत पाहिल्यावर पाटलांच्या पायाखालची जमीनच सरकली....

पाटलांना आता कळून चुकलं होतं की, रंगा आणि कुबड्याने मार खाल्ल्याने ते दोघेही नक्कीच सगळं काही बोलून बसले असणार.... त्यामुळे आपण काहीही सारवा-सारव करू शकत नाही....

पण पाटलांनी आधीच मनात ठरवलं होतं, जेव्हा केव्हा आपण पकडले जाऊ तेव्हा ए.सी.पी भोसलेंना सुद्धा सोडायचं नाही, त्यांचा खरा चेहेरा लोकांसमोर आणायचा.....


*******************************************

ए.सी.पी साहेबांचा खरा चेहरा पाटील नक्की कशाप्रकारे जगासमोर आणतील?...

नक्की पाटलांनी हे सगळं केलं असेल?....

या सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन भेटूया पुढच्या भागात....

क्रमशः
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Reshma Sonawane

Housewife

Listening and reading