भ्रमिष्ट कोण? भाग तेरा

तोकड्या कपड्यांमध्ये बायका विक्षिप्त हावभाव करत पुरुषांना जवळ बोलवत होत्या.


गेल्या भागात आपण पाहिले की कांताला,तिची मामी घराबाहेर काढते आणि ती शहरामध्ये रस्त्यावर राहू लागते. दोन दारुडी माणसं तिची अब्रू लुटणार असतात, तोच एक म्हातारी तिचं रक्षण करते .


आता पाहू पुढे.

कांता त्या आजीवर खूप विश्वास ठेवू लागली होती. आई बाबा गेल्यावर जर तिला इतकं प्रेम कोणी देत होतं तर ती आजी होती.

कांता बोलू लागली,

"आजी एक दिवस मला म्हणाली,
बाळा, ह्या अवस्थेत तुझं इथं राहणं चांगलं नाही. पुरुषाची जात खूपच बेकार आहे, एकटी बाई पाहिली की, त्यांच्या तोंडाला पाणी सुटते. माझ्या ओळखीची एक खूप चांगली बाई आहे. ती तुझ्या सारख्या बायकांना मदत करते. ती समाजसेविका आहे. आपण एक काम करूया, आपण तिच्याकडे जाऊया, ती काही ना काही मार्ग दाखवेल."

ताई, मी त्या आजीवर विश्वास ठेवला, कारण मला तिच्यात आई दिसत होती; पण जेव्हा मी तिच्यासोबत गेले, तेव्हा पाहिले तोकड्या कपड्यांमध्ये बायका विक्षिप्त हावभाव करत पुरुषांना जवळ बोलवत होत्या. सगळ्यात मोठा कहर तर तेव्हा झाला जेव्हा, मी तिथे त्याच दोन दारुड्या माणसांना पाहिले जे रात्री माझी अब्रू लुटण्यासाठी आले होते. ज्या बाईविषयी आजीने गुणगान गायले होते,ती बाई सिगारेट पित होती. मला निरखून निरखून पाहत होती.जशी काय मी एखादी वस्तू आहे. तिचा नजरेचा स्पर्श नको वाटत होता.


तिथे गेल्यावर त्या आजीचा चेहरा मोहरा बदलला आणि ती त्या बाईला म्हणाली,

"हे घे गं चांगला हिरा शोधून आणला आहे."


मी त्या आजीला पाहतच राहिले, माझं डोकं त्यावेळी चालेनासे झाले, एक तर मी गरोदर होते आणि वरून वाघाच्या पिंजऱ्यात सापडावं असेच काहीसे झाले. मी काही न कळल्याचा भाव चेहऱ्यावर आणला.

आजीने काही पैसे घेतले,मोजले आणि मला न पाहताच निघून गेली. मला कळून चुकलं होतं की त्या दारुड्यांपासून माझं रक्षण करणं हा एक कट होता, खरं तर आजीने आधी माझा विश्वास संपादन केला आणि मला विकले.


माझ्या डोक्यात वादळ सुरू होते. ती बाई मला हिंदी मध्ये काहीतरी बोलत होती, पण मला काही समजत नव्हते. माझ्या मनाला इतकंच कळत होतं काहीही करून इथून बाहेर पडायचं.


मी तिला म्हणाले माझे डोकं दुखतंय, तिने मला गोळी दिली. ती गोळी मी फेकून दिली आणि गोळी खाल्ल्याचे मी नाटक केलं. थोड्यावेळाने मी मला झोप आली आहे असे म्हणाले. ती मला रूममध्ये घेऊन गेली आणि बाहेरून कडी लावणार तोच मी प्रसंगावधान राखून जीव तोडून वेगाने मी बाहेर पळत सुटले.


त्या बाईची माणसं माझा पाठलाग करत होती. मी माझा आणि माझ्या पोटातल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी धडपड करत होते.

जितकं जमेल तितक्या वेगाने मी पळत होते. सरतशेवटी मला अशी जागा भेटली जिथे मी लपले. माझ्या पाठीमागून येणारी ती माणसं आता मला दिसेनाशी झाली. एका झाडाच्या आडोशाला उभी राहून मी खूप रडले.

मी नियतीला कोसू लागले, माझ्या नशिबात काय मांडून ठेवलं आहे?

माझ्या पोटातल्या बाळाने लाथ मारली. मी शांत डोक्याने विचार केला. काहीही झाले तरी मार्ग काढायचा. हार मानायची नाही.


त्या दिवशी मी एक निश्चय केला,
\"काहीही झाले तरी कोणावरही विश्वास ठेवायचा नाही, हे जग खूप खराब आहे. गिधाड जशी मेलेल्या माणसाला खातात अगदी तसेच इथे सगळी माणसं जिवंत माणसाचे लचके तोडतात.\"

त्या दिवशी मी माझी अब्रू वाचवली होती. एक मोठा धडा शिकले होते.


माझ्या पोटातलं बाळ जणू मला शक्ती देत होतं. कदाचित तो अंश माझ्या पोटात नसता, तर मी स्वतःचं जीवन संपवलं असतं, पण का कोणास ठाऊक आई म्हणून मी इतकं सगळं सहन करून देखील जगण्यासाठी धडपडत होती. त्यानंतर मी छोटी मोठी कामं करू लागले.


काही दिवसानंतर मी बाळाला जन्म दिला. जेव्हा मी त्याला पाहिले, तेव्हा खूप खुश झाले. माझ्या शरीराचा तो एक भाग होता. माझ्या शरीरात नऊ महिने होता आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो अपंग नव्हता.


माझा मुलगा यश. तो आला आणि मला जीवनात एक दिशा मिळाली, कशासाठी जगायचं? या प्रश्नाचे उत्तर त्याला पाहिले आणि समजले.


मी जगू लागले, साऱ्या कटू आठवणी विसरून मी जगू लागले; पण भूतकाळाने जे अनुभव दिले होते ते मात्र विसरू शकले नाही. मी मनाशी ठरवलं काहीही झालं तरी, या समाजाचा हिस्सा बनून राहायचं नाही. ह्या समाजाचा भाग कधीच व्हायचे नाही.


समाजात राहून समाजाचा हिस्सा न होणं हे विचित्र जरी वाटत असलं तरी माझ्या दृष्टीने तेच योग्य होतं. हा धडा ह्याच समाजाने दिला होता.

क्रमशः

अश्विनी ओगले.

🎭 Series Post

View all