भ्रमिष्ट कोण? भाग बारा

देखील माझ्या आजूबाजूला असलेले छोटेमोठे दगड त्या दोघांना मारायला सुरुवात केली.

भाग 12.

गेल्या भागात आपण पाहिले, त्या बाईचा जीव वाचतो. नेहाला स्वतःच्या वागण्याचा खूप पश्चात्ताप होतो तिला रात्रभर झोप लागत नाही. आता पाहू पुढे.

दुसऱ्या दिवशी नेहा तिला भेटायला जाते.

ती जणू नेहाचीच वाट बघत होती. ती नेहाला पाहून खूप खुश होते. तिला पाहताच हात जोडते. तिच्या डोळ्यातून येणारे अश्रू खूप काही सांगून जातात. नेहा तिच्याजवळ जाऊन बसते आणि तिच्या तब्येतीची विचारपूस करते.


"ताई तुमचे आभार मानू तितके कमी आहेत, तुम्ही माझा जीव वाचवला." ती नेहाचे हात पडकून म्हणाली

"त्यात आभार मानण्यासारखे काहीच नाही, मी तर शेजारधर्म निभावला आहे." नेहा म्हणाली.

ती पुन्हा बोलू लागते.

"ताई, तुम्हाला तर माझं नाव देखील माहीत नसेल आणि कसं माहीत असणार? मी इतक्या तुटकपणे वागत आले. खरं तर आज माझ्या ह्या वागण्यापाठी जे रहस्य आहे ते सांगावेसे वाटते."


नेहा लक्ष देऊन ऐकत होती.

" माझे नाव कांता आहे. मी एका सर्वसाधारण घरातील मुलगी होते. माझे खूप छान कुटुंब होते. आई, वडील मी आणि माझा लहान भाऊ. माझे आई-वडील माझ्यासाठी सर्वस्व होते. माझ्या भावावर माझे खूप प्रेम होते. मला शिकायची खूप इच्छा होती. माझ्या आई-वडिलांचे स्वप्न होते मी ऑफिसर व्हावे, त्यासाठी मी खूप अभ्यास करायचे. आमचं कुटुंब खूप छान होते ; पण एक दिवस काळाने घात केला आमच्या गावी पूर आला आणि त्यात माझे आई, वडील,भाऊ सर्वच वाहून गेले. फक्त मी वाचले कारण त्या दिवशी मी माझ्या मामाकडे गेले होते.


मी का वाचले ? हा प्रश्न मला पडला होता. देवाने मलाही घेऊन जायला पाहिजे होते; पण गेल्या जन्मीचे पाप शिल्लक असावे जे मला ह्या जन्मी फेडायचे होते म्हणून मी जिवंत राहिले.


त्यानंतर मी माझ्या मामाकडे राहिले. आई वडील नसल्या कारणाने मामा मला खूप जीव लावायचा, पण त्याच्या बायकोला माझं तिथे राहणे अजिबात आवडायचे नाही. तिथे गेल्यापासून घरात कामं केली तरच मामी जेवायला द्यायची. मामासमोर ती खूप चांगली वागायची आणि मामाच्या पाठी मला जमेल तितका त्रास द्यायची.


माझं नशीब इतकं वाईट की, माझ्या मामाचा अपघात झाला आणि मामा देखील देवा घरी गेला. मामा गेल्यापासून मामीने तर अजूनच रंग बदलले. ती मला उपाशी ठेवायची. चूक नसेल तरी मारायची, शिवीगाळ करायची. मला खूप रडायला यायचे. मी देवाकडे माझ्या मरणाची भीक मागायचे.


एक दिवस मामीची मैत्रीण आली, तिने मला पाहिले. तारुण्यात पदार्पण केलेली मी तिच्या डोळ्यात भरली.

मामीची मैत्रीण येऊन गेल्यापासून मामी माझ्याशी खूप गोड बोलू लागली. कधी नव्हे ती माझे लाड करू लागली. स्वतःच्या हाताने जेवण बनवून मला भरवू देखील लागली. मला काही कळतच नव्हते की, मामी अशी का वागते आहे? मला मामीच्या या अशा स्वभावाची सवय नव्हती. आतून कुठेतरी मला भीती वाटत होती.


एक दिवस मामीची ती मैत्रीण आली आणि मामीला आणि मला दवाखान्यात घेऊन गेली. डॉक्टरांनी कसलं तरी चेक अप केलं. मला समजत नव्हते काय चालू आहे.


तिथे खूप श्रीमंत असे जोडपे चारचाकीतून आले. त्यांना मूल होत नव्हते, काहीतरी प्रॉब्लेम होता. म्हणून मी त्यांच्या बाळाला माझ्या पोटात वाढवावे असे त्यांचे म्हणणे होते.

मी घरी आल्यावर मामीला विचारले असता ती म्हणाली,

" तू अजिबात नाही बोलायचे नाही. जे होतंय ते होऊ दे. तुझे मामा गेल्यापासून घरात खायचे हाल आहेत. आपल्याला दोन पैसे येतील, आपल्यालाच कामी येतील. त्यामुळे तू त्यांच्या बाळाची आई हो. मी माझ्या भावाच्या मुलाशी तुझं खोटं खोटं लग्न लावून देईन. नावासाठी तो तुझा नवरा असेल. असाही तो बाहेरगावी राहतो. लग्न फक्त समाजाला दाखवण्यासाठी असेल. एकदा हे मूल झालं की तू ही मोकळी आणि तोही मोकळा. जे पण पैसे येतील, त्याच्यातली काही रक्कम तुलाही देईन. हे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मामी अशा थराला जाईल कधी वाटलं नव्हतं. लाचारी माणसाला मनाविरुद्ध गोष्टी करायला सुद्धा भाग पाडते आणि मी इच्छा नसताना \"सरोगेट आई \" व्हायला तयार झाले.

एक दिवस सोनोग्राफी केली असतांना कळले की, मूल अपंग होण्याची शक्यता आहे. ते दोघे नवरा बायको जिथून आले होते, तिथे निघून गेले. मामीने मला घराच्या बाहेर काढलं. आधीच मी तिच्यासाठी ओझं झाली होती आणि त्यात अपंग मूल.


मी गावातून बाहेर पडले आणि शहरात आले .कसं बसं मी रस्त्यावर राहून दिवस काढत होते. स्वतःचं रक्षण करून जगत होते.

एक दिवस मी झोपेत असताना मला माझ्या पायापाशी कसली तरी हालचाल जाणवली. मी उठून बघितले तर दोन दारुडी माणसं माझ्या जवळ उभी होती आणि माझी अब्रू लुटण्यासाठी दोघेही तयारीत होते.


त्या दोघांना पाहून मी खूप घाबरले. मी आरडाओरड सुरू केला, माझा आवाज ऐकून,माझ्या बाजूला झोपलेली आजीही उठून बसली. तिने हा सगळा प्रकार पाहिला आणि तिने तिच्या बाजूला असलेली काठी घेऊन त्या दोघांना मारायला सुरुवात केली. आजीची हिम्मत बघून मलाही हिम्मत आली. मी देखील माझ्या आजूबाजूला असलेले छोटेमोठे दगड त्या दोघांना मारायला सुरुवात केली.

दोघेही घाबरून पळून गेले.

आजी माझा आधार झाली होती .मला तिच्यात माझी आई दिसत होती. मी माझी सर्व कहाणी तिला सांगितली. तिला फार वाईट वाटले.

पण एक दिवस असे झाले की मी पुन्हा कोसळून गेले.

हे सर्व ऐकत असताना नेहाचे डोळे काठोकाठ भरले होते.

क्रमश:

अश्विनी ओगले..

🎭 Series Post

View all