भ्रमिष्ट कोण? भाग पाच

नेहा आली पाहते तर सर्व काळा काळा रंग. ती प्रचंड घाबरली. तोच तिला तिच्या नवऱ्याच्या ऑफिस मधून फोन आला. पलीकडून एक माणूस बोलत होता “तुमचे मिस्टर पायऱ्यावरुन पडले आहेत. त्यांचा पाय मुरगळला आहे. तुम्ही घ्यायला या.”

गेल्या भागात आपण पाहिले, नेहाच्या मुलाचा अपघात होतो. घरासमोर सापडलेले लिंबू ह्याचा संबंध ती मुलाच्या अपघाताशी लावते. शेजारच्या बाईवर तिला शंका येते.

नेहाच्या वागण्यात कमालीचा बदल झाला होता. हल्ली ती घराचे दार लावून ठेवत होती. घरातून बाहेर पडताना ती काळजीपूर्वक लक्ष देत होती.

जेवत असताना राजने विषय काढला,
“आई, त्या आपल्या बाजूच्या सरला काकी कधी शिफ्ट झाल्या?”

“झाले तीन महिने.” नेहा.

“त्यादिवशी मी त्या घरात एका लहान मुलाला पाहिले, तो खूप गोड आहे.” राज.

“त्याच्याविषयी काही बोलू नकोस.” नेहाच्या कपाळावर आठ्या पडल्या.

“पण का आई? किती लहान आहे तो. त्याने काही त्रास दिला का तुला.”

नेहाला त्या मुलाचा त्रास काहीच नव्हता; पण राजचे असे झाल्यापासून तिच्या मनात वेगळीच भीती बसली होती.

“तुला चपाती वाढू का?” असे म्हणत तिने विषय बदलला.
“आई, मला चपाती नको आहे. मी त्या मुलाविषयी विचारले आहे, तू विषय का टाळते आहेस.”
राज काही गप्प बसणाऱ्या मधला नव्हताच, हे नेहाला चांगलंच माहिती होते.
म्हणून ती म्हणाली,
“त्या मुलाने काही त्रास दिला नाही; पण त्याच्या आईला माणसात राहायला आवडत नाही.”

राजला नेहाचे उत्तर काही पटले नाही. राज नेहाचा स्वभाव जाणून होता. त्याला चांगलेच ठाऊक होते, आई विनाकारण असे बोलणार नाही. तूर्तास तो शांत बसला.
त्याने ठरवलं आईच्या अश्या वागण्यापाठी काय कारण आहे? ह्याचा छडा लावल्या शिवाय शांत बसणार नाही.

नेहा बँकेच्या कामानिमित्त बाहेर गेली होती.
नरेश आणि राज घरी होते.
राजने विषय काढला.
“बाबा, आई आल्यापासून वेगळीच वागते आहे, काही झाले आहे का? मी तिला बाजूचा मुलगा खूप गोड दिसतो म्हणालो, तर म्हणे काही बोलू नको त्याच्याविषयी.”


“तर प्रकरण तुझ्याकडे आले म्हणायचे.” नरेश वर्तमानपत्रावर नजर फिरवत म्हणाला.
“बाबा, कसलं प्रकरण?” राज.
नरेश वर्तमानपत्र बाजूला ठेवत म्हणाला,
“बाजूला भाड्याने बाई आली आहे. तुझ्या आईने, तिला पूजेला बोलावले तेव्हा ती आली नाही. तिला वाईट वाटले. योगायोग असा झाला की ज्या दिवशी तुझा अपघात झाला त्या आधी हळद कुंकू लावलेलं लिंबू तिला दाराच्या इथे कुठे सापडले. तेव्हा तिला त्या बाईवर शंका आली, की तिने काहीतरी केलं आहे. जसं की जादूटोणा, म्हणून ती आता घाबरते आहे.”

हे ऐकून राज जोरजोरात हसू लागला.
“आई कसल्या गोष्टीवर विश्वास ठेवते आहे.”

“मी हेच तिला समजावले; पण आता ती भ्रमिष्ट झाल्यागत झाली आहे. मी तिला समजावले तरी ती काही ऐकत नाही. आता तूच बघ, आईला कसे समजवायचे.”

“ठीक आहे बाबा, आईचे ब्रेनवॉश करावे लागेल.”
तोच नेहा आली.
राज पुढे काही बोलला नाही.

राजच्या प्रकृतीत बरीच सुधारणा झाली होती. तो अभ्यास करू लागला होता. संध्याकाळी फेरफटका मारायला तो खाली उतरत होता.
एक दिवस तो असाच बिल्डिंगखाली फेरफटका मारायला उतरला. त्याची नजर त्या लहानग्या मुलावर गेली. तो त्याला बघून हसला. तसा तो मुलगा लगेच निघून गेला. थोड्या वेळाने आला आणि आतून खिडकी बंद करू लागला.

राजला वाटले कदाचित त्याच्या आईने अनोळखी लोकांपासून लांब राहायला सांगीतले असावे.
रोजचा हाच दिनक्रम होऊ लागला.
जेव्हा पण राज येत असे तो मुलगा लगेच आत पळ काढत असे. राज त्याला हसवण्याचा प्रयत्न करत असे.
काही दिवस गेल्यावर, त्या मुलाची आणि राजची गट्टी जमली.
राज खालून चेंडू फेकत असे आणि तो वरुन झेलत असे.
राज आणि त्याची मैत्री झाली होती.
आता तो राजची आतुरतेने वाट बघत असे.

राज त्याच्याशी गप्पा मारू लागला होता. त्याचे नाव यश होते. यश आणि राज दोघे जणू मित्रच झाले होते.

एक दिवस यशची आई कामावरून लवकर आली. तिने पाहिले यश, राजसोबत चेंडू खेळतो आहे. तिला प्रचंड राग आला. तिने यशला आत खेचले. राज खालून बघत होता. यशच्या हातातील चेंडू तिने रागानेच खाली भिरकावला. यश रडू लागला. तिने खिडकी जोरातच बंद केली.”

राज घरी आला.
त्याने घडलेला प्रकार नेहाला सांगितला.
नेहा राजवर प्रचंड चिडली.
“राज, तुला आधीच सांगितले होते, की त्या बाईला आवडत नाही माणसामध्ये राहायला. मग का तू त्या पोराशी जवळीक साधलीस? मला तर तिची भीतीच वाटते. ती मला विचित्रच वाटते. ती काय करेल ह्याचा काही पत्ता नाही. तू लांब रहा तिच्यापासून आणि तिच्या मुलापासून.” असे म्हणत तिने राजची नजर काढली.


“आई, काय डोक्यात ह्या असल्या गोष्टी घेऊन बसली आहेस? ठीक आहे नसेल आवडत त्यांना मिक्स अप व्हायला; पण ह्याचा अर्थ असा नाही की त्या काही टोणा टोटका करत असतील. तू म्हणते म्हणून मी आता यश पासून लांब राहतो; पण आई प्लीज हे सर्व नकारात्मक गोष्टी डोक्यातून काढ. त्याने तुला त्रास होईल. मी आल्यापासून बघतो आहे तू घाबरल्या सारखी राहते. सतत विचारांच्या दबावाखाली राहत आहेस. हे तुझ्यासाठी खरंच चांगले नाही.”

राजचं बोलणे तिच्या बुद्धीला पटले होते; पण मनाला नाही.
दुसऱ्या दिवशी राज वॉकिंग साठी बाहेर आला, बघतो तर पायऱ्यांवर काळा रंग पसरला होता.

त्याने नेहाला आवाज दिला.
नेहा आली पाहते तर सर्व काळा काळा रंग. ती प्रचंड घाबरली. तोच तिला तिच्या नवऱ्याच्या ऑफिस मधून फोन आला. पलीकडून एक माणूस बोलत होता “तुमचे मिस्टर पायऱ्यावरुन पडले आहेत. त्यांचा पाय मुरगळला आहे. तुम्ही घ्यायला या.”

हे ऐकून नेहा जागच्या जागीच बसली.

©®अश्विनी ओगले.
कसा वाटला भाग नक्की कंमेंटमध्ये सांगा. लाईक आणि शेअर करायला विसरू नका.
अश्याच कथा वाचण्यासाठी मला फॉलो करा.
धन्यवाद.

🎭 Series Post

View all