गेल्या भागात आपण पाहिले की, नेहाच्या दारावर चुकून कुरियरवाला येतो. ती शेजारची बाई तोपर्यंत दार उघडत नाही, जोपर्यंत नेहा स्वतःचे दार बंद करत नाही. नेहा ठरवते आता आपण स्वतःच तिच्यापासून लांब राहायचे.
नेहा घराबाहेर पडते तोच तिच्या पायाला काहीतरी लागते. पाहते तर एक हळद कुंकू लावलेले लिंबू असते. नेहा ते उचलते आणि लांब फेकून देते. नेहा हा प्रकार बघून खरंतर घाबरते.
तिला त्या बाईवर शंका येते.
प्रत्यक्ष आपण डोळ्याने बघितले नाही, तर काहीच बोलू शकत नाही.
तिला मुलाच्या मित्राचा कमलेशचा फोन येतो.
"काकी,राजचा अपघात झाला आहे. तुम्ही लवकर या." कमलेश.
नेहाचे हात पाय गार पडतात.
ती लगेच नरेशला फोन लावते आणि दोघेही गाडी करून पुण्याला निघतात. नेहाला लगेच आठवते, सकाळी घरासमोर लिंबू होते. त्यामुळे तर असे काही घडले नसावे?
तिचे मन बेचैन होते.
"नरेश, हे सगळं त्या बाईमुळे झाले." नेहा रडक्या स्वरात म्हणाली.
"कोण बाई?" नरेश.
"तीच ती आपल्या बाजूला राहायला आली आहे, तिच्यामुळेच माझ्या राजचा अपघात झाला." नेहा आवाज चढवत म्हणाली.
"नेहा,काय बोलते आहेस? तिचा आणि राजच्या अपघाताचा संबंध काय?" नरेश.
"नरेश, मला खात्री आहे . तिनेच काहीतरी काळी जादू केली असावी." नेहा ठामपणे म्हणाली.
"नेहा, तुझं डोकं ठिकाणावर आहे का ? तू काहीही बोलते . ही सर्व अंधश्रद्धा आहे. असे काहीच नसते. चांगली शिकलेली आहेस आणि तरीही असल्या गोष्टींवर विश्वास ठेवते. असं काही नाही. हे डोक्यातून काढ." नरेश तिला समजावण्याच्या सुरात म्हणाला.
"नरेश, सकाळी आपल्या घरासमोर हळद कुंकू लावलेलं लिंबू सापडलं, मी ते फेकून दिले तसे मला कमलेशचा फोन आला. तू मला सांग मग मी कसा विश्वास ठेवू नको?" नेहा म्हणाली.
"नेहा,हे बघ तो योगायोग असू शकतो." नरेश.
"नाही, अजिबात तो योगायोग नव्हता." नेहा.
हॉस्पिटल आले. नेहा स्वामींचे नाव घेऊन हॉस्पिटलची पायरी चढली.
ती स्वामींकडे प्रार्थना करत होती.
\"स्वामी,माझ्या राजचे,माझ्या परिवाराचे रक्षण करा.\"
राजच्या पायाला जबर मार लागला होता.
आई बाबांना बघून राजच्या जीवात जीव आला.
"राज,कसा आहेस बाळा आणि हा अपघात कसा झाला?" तिने त्याच्या डोक्यावर हात फिरवत विचारले.
"आई, अगं समोरून एक लहान मुलगी रस्त्यावर लिंबू विकत होती. अचानक ती समोर आली. तिला वाचवायला मी ब्रेक दाबला आणि असे झाले." राज.
हे ऐकताच नेहाला परत लिंबू आठवला जो तिच्या पायाला लागला होता आणि नेमका राजच्या पायालाच मार लागला होता.
विचारात गर्क असलेल्या नेहाला पाहून राज म्हणाला,
" आई, मी बरा आहे तू काळजी करू नको. मी कमलेशला म्हणालो होतो, आई बाबांना नको मुंबई वरून पुण्याला बोलावूस; पण त्याने माझ्या नकळत तुम्हाला फोन लावला."
"राज,खूप मोठा झालास का ? इतका मार लागला आहे आणि म्हणे सांगणार नव्हतो. हे असे अजिबात करायचे नाही. जराही त्रास झाला तर लगेच फोन करायचा. झालं आता शिक्षणाचे तुझं एकच वर्ष राहिले, ते झाले की आपल्या घरी यायचे आहे. तोपर्यंत काळजी घे. दुखलं खुपलं की सांगत जा."
नेहा कमलेश कडे बघत म्हणाली "कमलेश, थेंक यु बेटा, तू फोन करून सांगितलंस."
"काकी, थँक्स नका म्हणू हे तर माझं कर्तव्य आहे. राज माझा जिगरी दोस्त आहे. त्याच्यासाठी मी इतकं तर करूच शकतो."
नेहा विचार करू लागली. \"आज राजवर खूप मोठं संकट आलं होतं, पण स्वामींच्या कृपेने तो वाचला.\"
हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट झाल्यावर नेहाने राजला घरी आणले. त्याच्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ लागली.
घरी आल्यापासून त्याला नेहामध्ये अनेक बदल जाणवत होते.
नेहामध्ये काय बदल झाले होते?
क्रमशः
अश्विनी ओगले.
कसा वाटला भाग जरूर कळवा. भाग आवडल्यास लाईक,शेअर आणि माझ्या प्रोफाईलला फॉलो जरूर करा. धन्यवाद.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा