गेल्या भागात आपण पाहीले की, नेहा त्या शेजारच्या मुलाला चॉकलेट द्यायला जाते; तेव्हा त्याची आई दार बंद करते. नेहाला लता काकू भेटते. दोघी गप्पा मारतात. लता काकू शेजारच्या बाई विषयी विचारपूस करते. तिच्या बद्दल नेहाला काहीच माहीत नसते. नंतर नेहा काकूंना त्यांच्या मुलीविषयी विचारते तेव्हा काकूचे डोळे पाणावतात.
नेहाने लता काकुच्या खांद्यावर हात ठेवून विचारले
“काही प्रॉब्लेम आहे का काकू? स्मिता बरी आहे ना?”
“नेहा, काय सांगू तुला माझे दु:ख. पोरीला इतका त्रास होतो आहे आणि मी काहीच करू शकत नाही.” असे म्हणत लता काकूने डोळे पुसले.
“काकू, तुम्हाला मन मोकळं करायचे असेल, तर माझ्याजवळ करू शकता.” नेहा धीर देत म्हणाली.
“नेहा, स्मिता माझी एकुलती एक मुलगी, तिला चांगलं शिक्षण दिले. चांगला मुलगा पाहून, थाटामाटात लग्न लावून दिले. प्रेम करणार नवरा, सासू, सासरा सगळेच चांगले होते, श्रीमंती होती. कसल्याही गोष्टीची कमी नव्हती. सारे सुख तिच्या पायाशी होते बघ; पण..” लता काकू बोलायच्या थांबल्या.
“पण? काय काकू?” नेहा.
“तिच्या संसाराला जणू दृष्ट लागली. लग्न होऊन पाच वर्ष झाली; तरी देखील आई होऊ शकली नाही, म्हणून सगळेच पाठी लागले. भरपूर डॉक्टर केले, देव धर्म केले; पण काही उपयोग झाला नाही. सर्व काही उपाय केले तरी मूल् झालेच नाही. आधीच तिला प्रचंड मानसिक त्रास होत होता आणि घरातले, बाहेरचे सर्वच तिला ‘बाळ कधी होणार’ म्हणून सतत विचारु लागले; त्यात नवऱ्याने सुरवातीला समजून घेतेल; पण तो देखील आता तिच्यावर नाराज झाला. तिच्याशी नीट बोलत नाही. मूल दत्तक घेऊया म्हणाली; तर तेही त्यांना पटत नाही.”
हे सर्व ऐकून नेहाला खूप वाईट वाटले.
“काकू, काळजी करू नका. सर्व व्यवस्थित होईल.” नेहा त्यांना धीर देत म्हणाली.
“आशेवरच तर सर्व काही आहे. मी देवाकडे नेहमी प्रार्थना करते. माझ्या लेकीच्या आयुष्यात पुन्हा सुख येवो.” लता काकू डोळे पुसत म्हणाल्या.
त्या पुढे बोलू लागल्या.
“नेहा, आज तुझ्याशी बोलून खूप बरं वाटलं गं. स्मिताचे बाबा गेल्यावर्षी गेले आणि मी एकटी पडले बघ. त्यांची सोबत होती तोपर्यंत कसली चिंता वाटत नव्हती, आता मात्र घर खायला उठतं. स्मिताची सतत काळजी लागून राहते बघ. काही सुचत नाही. कधी कधी मन इतकं भरून येते की खूप रडावसं वाटतं. आपला त्रास सांगावं तरी कोणाला? जवळची माणसे तर तमाशा बघतात. एक तूच अशी आहेस की, तुझ्याशी बोललं की मन हलके होते.
बायकांच्या पोटात गोष्टी राहत नाही असे बोलले जाते; मात्र तू त्याला अपवाद आहेस. तुझ्यावर मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकते.”
“काकू, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवता हे मला माहीत आहे. नक्कीच आपल्यातील गोष्ट इतरत्र सांगणार नाही.” नेहा काकुच्या हातावर हात ठेवत म्हणाली.
“माहीत आहे गं बाळा, हे केस असेच पांढरे झालेत होय? मी माणसं ओळखायला शिकले आहे. आता पर्यंत ह्या आयुष्याने खूप काही शिकवले आहे. बरं चल निघूयात, नाहीतर आपल्या गप्पा काही संपणार नाही.
नेहाने भाजीपाला आणला.
दरवाजा उघडू लागली, तोच तिला त्या लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला,
तो रडून म्हणत होता.
“आई, सॉरी मी परत बाहेर कोणाकडेही बघणार नाही. कोणी चॉकलेट दिले तरी घेणार नाही.”
नेहाने हे ऐकले तसा तिला प्रचंड रागही आला आणि त्या मुलासाठी वाईटही वाटले.
तिने ठरवलं, ह्यापुढे त्या मुलाकडे बघणार नाही आणि त्याला काहीच देणार नाही. आपल्यामुळे त्या लहानग्या जीवाला त्रास नको.
ती संध्याकाळी तिचा आवडता कार्यक्रम पहात होती.
दारावरची बेल वाजली. नरेश आला होता.
खांद्यावरची बॅग ठेवतच म्हणाला,
“काय मग काय म्हणते तुझी सिरियल?”
“माझी सिरियल एक दम मस्त चालू आहे. आता ती तिच्या सुनेला बाहेर काढणार आहे.”
“का बरं?” नरेश पाणी पित म्हणाला.
“कारण तिला मूल होत नाही.” नेहा.
“ह्या अश्या सासू सुनाच्या सिरियल तुम्ही चवीने बघता आणि मग प्रॅक्टिकली अमलात आणता.”
“नाही हा मी माझ्या सुनेला अजिबात त्रास देणार नाही.” नेहा.
“आधी मुलाचे शिक्षण तर होऊ दे, त्याच्या लग्नाला अजून बराच वेळ आहे सासूबाई.” नरेश तिला चिडवत म्हणाला.
नेहाचा चेहरा उतरला.
“आता काय झाले?” नरेश.
तिला स्मिताची आठवण आली. लता काकूंचे रडणे आठवले.
“काही नाही, आपण जेवायला बसूयात का.” नेहाने टीव्ही बंद करत विचारले.
“हो, वाढ ना खूप भूक लागली आहे.”
नेहाने सर्व कामं आवरली आणि झोपायला गेली.
बाजूच्या घरातून तिला त्या लहान मुलाचा हसायचा आवाज आला
त्याच्यासोबत त्याची आई देखील हसत होती.
नेहा ऐकू लागली, तर तो मुलगा तिला म्हणत होता,
“आई, तू खूप छान आहे, तू खूप गोड आहेस.”
सकाळपासून विचारात असलेली नेहा, त्या मुलाच्या हसण्याच्या आवाजाने सुखावली होती.
एक अपराधीपणाचा भाव जो वाटत होता, तो क्षणात नाहीसा झाला.
तिला गाढ झोप लागली.
दुसऱ्या दिवशी सकाळी पेपर वाचत बसली होती. तोच कुरियरवाला आला. नेहाने तर काहीच मागवले नव्हते. पाहते तर त्या बाजूच्या बाईचे कुरियर होते जे चुकून तो नेहाला देत होता.
नेहाने तिच्या घराकडे बोट दाखवले.
बेल वाजवली; तरी तिने दार उघडले नाही.
नेहाने स्वतःचा दरवाजा लावला तेव्हाच तिने दार उघडले.
नेहाला आता कळून चुकले होते, ती मुद्दाम समोर येत नाही. अगदी कचरा उचलायला येणारी ताई आली तरी देखील जोपर्यंत नेहाचा दरवाजा बंद होत नाही तोपर्यंत ती काही बाहेर यायची नाही.
नेहाला तर आता वाटू लागले ती वेडीच असावी. काहीतरी गडबड आहे. ती नॉर्मल नाहीच.
नेहाने ठरवले ‘आता मात्र आपणच तिला टाळायचे. अश्या विचित्र पद्धतीने वागणाऱ्या बाईला चार हात लांब ठेवलेलं बरं.’
क्रमश:
अश्विनी ओगले.
वाचकहो तुमच्या प्रतिक्रिया जरूर द्या. कथा आवडल्यास लाईक,शेयर जरूर करा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा