भ्रमिष्ट कोण ? भाग दोन

हे असे माणूसघाण्यासारखे राहायचे तर जंगलात राहावे . इथे माणसांमध्ये कशाला कडमडली देव जाणे.

गेल्या भागात आपण पाहिले की, नेहाच्या शेजारी नवीन बाई तिच्या लहान मुलासोबत राहायला आली होती. नेहा तिच्या घरच्या पूजेला तिला बोलावते; पण ती येत नाही. ती बाई स्वतःच्या दुनियेत असते. पाहू पुढे.  

नरेश कामाला जातो.

नेहाला मार्केटमध्ये जायचे असते. ती देखील तयार होते आणि घरातून निघते. घराला टाळा लावत असताना तिला भास होतो की कोणीतरी तिला बघते आहे. ती मागे वळून पाहते; तर त्या बाईचा मुलगा दाराच्या फटीतून पाहत असतो. फारच गोड मुलगा. टपोरे डोळे, गुबगुबीत गाल.

नेहा त्याच्याकडे बघून हसते. तो देखील हसतो. नेहा पर्समधले चॉकलेट काढते आणि त्याला द्यायला जाते, तोच त्याची आई येते आणि लगेच जोरात दार बंद करून निघून जाते.

ह्या प्रकारामुळे नेहा फार अस्वस्थ होते. तिच्या मनात येते आताच्या आता जाऊन  ह्या बाईला जाब विचारावा; पण ती स्वतःला खूप कंट्रोल करते.

तिच्या डोक्यात तोच प्रसंग घोळत राहतो. मनातच विचार करते ‘काय विचित्र बाई आहे ही, हे असे माणुसघाण्यासारखे राहायचे तर जंगलात राहावे. इथे माणसांमध्ये कशाला कडमडली देव जाणे . किती विचित्र वागते.’

बिल्डिंगमधील  लता काकू येत होत्या. त्यांनी नेहाला हाक मारली. नेहाचे लक्ष नव्हते. जवळ आल्यावर काकू म्हणाल्या,

“नेहा, मी केव्हाची हाका मारते आहे. तुझं लक्ष कुठे आहे?”

“सॉरी, काकू मी माझ्याच विचारात होते. बोला ना कुठे चाललात?”

“मी, मार्केटला चालले आहे. कांदा, लसूण सर्वच संपले आहे.” काकू म्हणाल्या.

“मी सुद्धा मार्केटला चालले आहे.” नेहा म्हणाली.

लता आणि नेहा गप्पा मारत चालू लागल्या.

लता काकूंनी विषय काढला.

“नेहा, तुझ्या बाजूला नवीन कोणीतरी राहायला आले आहे. काय म्हणते तुझी नवीन मैत्रीण?”

हे ऐकताच नेहाला मघाशी घडलेला प्रसंग आठवला. तिला त्या बाईविषयी बोलू देखील वाटत नव्हतं. डोक्यात प्रचंड राग होता.

तिला असे वाटले लता काकूंना तिचे वागणे सांगून मोकळे व्हावे; पण ती गप्प बसली.

“त्या कामाला जातात, त्यामुळे बोलणं होत नाही.” नेहा डोक्यातला राग शांत करत म्हणाली.

“असे होय. तसंही  आताच्या पोरी घर आणि नोकरी सांभाळतात त्यामुळे त्यांना वेळच नसतो. तिचे नाव काय आहे?” लता काकूने चष्मा नीट करत विचारले.  

नेहाला तिचे नाव देखील माहीत नव्हतं.

“माहीत नाही काकू.” नेहा.

“कमीत कमी  नाव तरी विचारायचे गं नेहा. आपल्याला माहीत असावं.”

काकू, तुमचं बरोबर आहे. आपल्या शेजारी कोण राहते आहे हे आपल्याला माहिती पाहिजे.”

नेहा मनात विचार करू लागली.

‘इथे तिला संबंध ठेवायचे नाही, नाव तर लांबची गोष्ट. काकू नका तिच्याविषयी काही बोलू.’

नेहाने विषय बदलला.

“काकू, खूप दिवस झाले स्मिता आली नाही.”

स्मिता म्हणजे लता काकूंची मुलगी.

स्मिताचे नाव ऐकताच, लता काकूचे डोळे पाणावले.”

क्रमश:

अश्विनी ओगले.

कसा वाटला भाग दोन? नक्की कळवा. कथेला एक लाईक द्यायला विसरू नका.  

🎭 Series Post

View all