Mar 03, 2024
गोष्ट छोटी डोंगराएवढी

इच्छा तिथे मार्ग

Read Later
इच्छा तिथे मार्ग

गोष्ट छोटी डोंगराएवढी

विषय:- माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग.

आयुष्यात भूतकाळात जायचं असलं तर शक्यतो आपल्याला गोड आठवणींतच रमायला आवडत. आणि जीवनाचा सकारात्मक दृष्टिकोन बाळगायचा झाला तर त्यात काही वावगं नाहीच.पण कधी काही प्रसंग असे असतात की ते भले कटू असले तरी आपल्या मनाच्या कोपऱ्यात कायमच दडून बसलेले असतात आणि वेळ येताच विकट हसत आपल्याला डीचवायला समोर येतातच.

२००४ साली आम्ही सहकुटुंब श्री तिरुपती बालाजी दर्शनाला गेलो होतो. आठ दिवसाच्या त्या आठवणी खूप छानच होत्या. पण एक ओरखडा उमटला तोही आमच्या यात्रेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात. आम्ही सकाळी नाश्ता करत होतो, दक्षिणात्य इडली, डोसा सारखे पदार्थ मनोसोक्त हादडत होतो आणि तितक्यात कानावर आवाज आला.

'आण्णा, इडली. यक इडली. आण्णा.'- एक वयोवृद्ध व्यक्ती आमच्याकडे आशाळभूतपणे याचना करत होती. आमच्या काही बोलण्याआधीच दुकानदाराने त्याला स्थानिक भाषेत शिवीगाळ करत तिथून निघून जाण्यास सांगितले. घाबरलेला ते आजोबा जाता जाता माझ्या ताटातल्या इडलीकडे पाहतच होते तसे दुकानदाराने परत आवाज वाढवला होता.

'आण्णा, इडली.'- माझ्या ताटातल्या इडलीकडे बोट दाखवत, माझ्याकडे पाहत तो पुनः पुनः बोलत होता. मला तेव्हा काय करावं ते सुचतच नसल्याने मी तसाच उभा होतो. काही वेळाने ते आजोबा तिथून निघून गेले होते पण माझ्या मनात खोल  वादळ निर्माण करून.

आताही तो प्रसंग जसाच्या तसा आठवतोय आणि स्वतःवरचा रागही आजही तितकाच जास्त आहे. अजूनही इडली खाताना डोळ्यात आपसूकच पाणी तरळतेच.

नंतर पश्चात्ताप करण्यापेक्षा लोक समोर असतानाच त्यांची सेवा करण्याच्या उद्देशाने पुढे जाऊन आम्ही मित्रांनी 'सोबत प्रतिष्ठान' नावाने एक ग्रुप बनवला. या ग्रुपच्या माध्यमातून आम्हाला खूपवेळा मानसिक समाधान मिळाले पण अंतर्मन हेलावलं ते करोना काळात.सर्वांनाच माहिती आहे की लॉकडाऊन मुळे कित्येक कुटुंबे पार उघड्यावर पडली होती. संचारबंदीमुळे कोणत्याच सामाजिक संस्थेलाही बाहेर पडणे शक्य नव्हते. 

एकदिवस माझ्या शाळकरी मित्राचा, कमलेशचा माझ्या मोबाईलवर फोन आला.

'मयु. तुला पटकन सुचतं ना सगळं? आपल्याला काहीतरी करावंच लागेल. लोकांवर खूप वाईट वेळ आली आहे. काहीतरी उपक्रम सुचतो का बघ.'- फोन कट.

शासकीय निर्बंधामुळे मला काहीच सुचत नव्हतं. अर्ध्या तासाने मला माझ्या दुसऱ्या मित्राचा, सुशांतचा फोन आला.

'काय रे साल्या, आता काय झालं? एरव्ही कसं सगळं पटापट सुचतं. तुझं तोंड आणि डोकं कधी थांबत नाही ना? मग आज गरज असताना काय धाड भरली रे?'- शाळकरी मित्राने शेलक्या शब्दात टिका केली होती.

माझी चलबिचल सुरूच होती की फोन वाजला होता. पलीकडून तिसरा मित्र हृषीकेश आणि कॉन्फरन्स कॉलमध्ये कमलेश आणि सुशांतही.

 'मयु, काहीपण कर यार पण आपल्याला आजच फायनल करावं लागेल. इकडे कांजुरमार्गला एका घरात छोट्या मुलाला पाण्यात पार्ले बिस्कीट बुडवून भरवताना पाहिलं रे. घरात एका कोपऱ्यात गर्भवती बाई बसून रडत होती.चौकशी केली तर घरातली मोठी माणसं मागचे दोन दिवस फक्त पाण्यावरच तग धरून आहेत असं कळलंय.'- हृषिकेशचा स्वर जडावलेला झाला होता. 

'आमच्या बिल्डिंगमध्येही एक फॅमिली म्हणजे अगदी ते काकाही रडताना दिसले. त्यांना इकडून तिकडून लोकांनी धान्य आणून दिलीत, फोटो घेऊन गेलेत पण कोणी त्यांना नेमकी गरज काय ते विचारलं नाही. त्यांच्याकडे धान्य आहे पण जेवण करायला लागणारा गॅस सिलेंडर घेण्यासाठी पैसेच नाहीत. कच्ची धान्य खाऊन भूक जाते का ते पाहत असताना काकींना जोराचा ठसका लागला आणि त्यांचा प्रॉब्लेम आम्हाला कळाला. आम्ही बिल्डिंगवाल्यांनी त्यांना आता मदत केलीय. पण असे अजून किती असतील रे?'- कमलेश भडाभडा बोलत होता.

माझं मन सुन्न पडलं होतं.

'बघू, काहीतरी. आपला संपर्कही झाला नाही पाहिजे आणि लोकांपर्यंत मदतही पोहचली पाहिजे असं काहीतरी बघुयात.'- एवढं बोलून फोन बंद करायचाच होता की देवाने माझ्या डोक्यात प्रकाश पाडला होता.

'०% संपर्क, १००% मदत', उपक्रम निश्चित झाला होता. या उपक्रमांतर्गत आम्ही १६७ कुटुंबांना मदत पुरवली होती. गरजू व्यक्तींना एका वेळी प्रत्येकी दोन हजार रुपयांचे आवश्यक सामान घेण्याची मर्यादा होती आणि त्याच बिल आम्ही थेट दुकानदारांच्या खात्यात जमा करत होतो. त्यावेळेस कित्येक दात्यांनी आणि दुकानदारांनी चौकट सोडून आम्हाला साथ दिली होती ते कधीही विसरणे शक्यच नाही. आजही त्या साऱ्या  सहृदयी व्यक्तींना शतशः नमन. विशेषतः लॉकडाऊनचे निर्बंध हटवल्यानंतर आम्ही मदत केलेल्या कुटुंबांपैकी ७ कुटुंबांनी आम्हाला देणगी देत नवा आदर्श मांडला होता. सोबत प्रतिष्ठानचा संपर्क क्रमांक म्हणून दिलेला फोन हृषिकेशजवळ होता. कित्येक कुटुंबीयांनी मदत मिळताच व्यक्तीशः फोन करून धन्यवाद दिले होते. काही वेळा तर घरातल्या प्रत्येक सदस्यांनी फोन हाती घेत आशीर्वाद दिले होते.

या लेखाच्या माध्यमातून वाहवा मिळवण्याचा हेतू नसून आपल्याला काहीही साध्य करायचं असेल तर आपल्या साचेबद्ध विचारांची चौकट मोडली तर मार्ग नक्कीच सापडतो, एवढंच अधोरेखित करायचं आहे. आपल्यालाही समाजाच ऋण फेडायचं असतं पण नेमकी दिशा सापडत नसते. अशावेळेस कधी कधी शांतपणे विचार करता आपण समाजासाठी बरंच काही करू शकतो. बघा विचार करून. वाटलं तर एक उदाहरण देतो-' आता काही दिवसांत नवीन वर्षासाठीच्या दिनदर्शिका विक्रीसाठी येतील. तेव्हा त्या आवर्जून अंध व्यक्तींकडून घ्या.'

-समाप्त.
मयुरेश तांबे.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
ईराच्या कथांचे कुठलेही भाग मिस करू नका, आजच जॉईन करा ईरा वाचनालय. व्हाट्सएप: व्हाट्सएप:
Circle Image

Mayuresh G. Tambe

Service

नमस्कार मंडळी.. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि नोकरी.. त्यामुळे नट आणि बोल्ट भोवती फिरणाऱ्या आयुष्यात विरंगुळा म्हणून जस जमतं तसं लिहितो.. आवडलं तर दाद द्या आणि नाही आवडलं तर नक्कीच हटका..

//