बायको माहेरी जाते तेंव्हा .......

थोडा वेळ तसाच गेला, कायम भोवती भोवती करणारी ललना घरात नाही हे अजूनही त्याच्या पचनी पडत नव्हतं.

बायको माहेरी जाते तेंव्हा ....

वैशाख ऑफिसला गेल्यावर ललनानी जरा निवांतपणे बसून पेपर वाचायला घेतला. तशी तिची ही रोजचीच धावपळ होती, वैशाख ऑफिससाठी सकाळी आठ वाजताच बाहेर पडायचा. सकाळी लवकर उठून त्याचा डबा तयार करायचा, कपड्यांना इस्त्री करायची, आणि वेळेवरची धावपळ, तिचं काय करायचं ? ललना, माझा रूमाल सापडत नाहीये, ललना मोजे कुठाय ? ललना चाव्या कुठे ठेवल्यास का तू ? आणि असंच, धुण्यासाठी बाजूला ठेवलेला शर्ट घालायचा आणि मग आरशात पाहिल्यावर आरडा ओरडा. ललना जाम वैतागून जायची. वैशाखला अनेकदा सांगून झालं, भांडून झालं, पण वैशाखमध्ये  काडीचाही फरक पडला नाही.

तिच्या मैत्रिणीनी एकदा सल्ला दिला. “अग तुझं माहेर गावातच आहे. जा दोन दिवस, आईची आठवण येते म्हणून. आणि संध्याकाळी जा. मग बघ दुसऱ्या दिवशी तो सगळं स्वत:च करून ऑफिसाला जाईल.” ललनाला पण ती आयडिया पटली आणि ती खरंच एकदिवस संध्याकाळी माहेरी गेली. डायनिंग टेबलवर तशी चिठ्ठी पण लिहून ठेवली.

ऑफिस मधून आल्यावर वैशाखने घराला कुलूप बघितलं, त्याला वाटलं की गेली असेल शेजारी कुठे तरी. तो यायच्या वेळेस सहसा ती कुठे जात नाही, वैशाख स्वत:शीच विचार करत होता. येईल ती पांच दहा मिनिटांत असं म्हणून तो फ्रेश होऊन बाहेर  सोफ्यावर येऊन बसला. त्याला काही सुचत नव्हतं. रोज ऑफिस मधून आल्यावर फ्रेश होऊन येईपर्यन्त चहा आणि नाश्ता टेबल वर तयार असायचा. आज मात्र सगळं थंडगार होतं. काय प्रकार आहे हा ? उठून त्यानी पाणी पिण्यासाठी  डायनिंग टेबल वरचा जग उचलला तर त्याला खाली ललनाची चिठ्ठी दिसली.

चिठ्ठी वाचल्यावर वैशाखला भयंकर राग आला. ‘अशी कशी न सांगता गेली, अरे आमचा काही विचार करायचा की नाही ? नवऱ्याला वाऱ्यावर सोडून चालली गेली. अरे काय चाललंय काय हे ? आता एवढं थकून भागून  आल्यावर चहासुद्धा नाही म्हणजे काय ? इतके कष्ट करून कोणासाठी कमावतो मी, तिच्यासाठीच ना, तरी पण ही अशी पळून जाते म्हणजे काय ?’ वैशाखची जाम चिडचिड होत होती. त्याला चहा पण करता येत नव्हता. लग्नाआधी त्याची आई नेहमी कानी कपाळी ओरडायची “वैशाख, अरे थोडं शिकून घे अडी अडचणीला बरं असतं.” तेंव्हा त्यांनी आईला उडवून लावलं होतं. आई पुन्हा म्हणाली होती “अरे, तुझी बायको जर आजारी पडली तर दोन दिवस तिला उपाशी ठेवणार आहेस का ? शिकून घे मी आहे तोपर्यन्त.” तेंव्हा म्हणाला होता “आई, तू काळजी करू नकोस, मी MBA आहे. परिस्थिती कशी मॅनेज करायची ते मला चांगलं ठाऊक आहे.” आईनी त्यानंतर त्याला सल्ले देणं बंद केलं होतं. आत्ता हे आठवल्यावर त्यांची चिडचिड अजूनच वाढली. थोडा वेळ तसाच गेला, ललना घरी नसल्यामुळे टीव्ही पाहायचा सुद्धा कंटाळा आला. मग नुसताच बसून राहिला. आता पोटात कावळे कोकलायला लागले होते, किचनमधे जाऊन पाहीलं तर काहीच कळेना. ललना रोज काही तरी  वेगळं देते, मग आज काहीच कसं आपल्याला दिसत नाही, तो हैराण झाला. त्यानी एक डबा उघडला, तांदूळ, दूसरा उघडला, डाळ, आता डाळ म्हणजे कोणची ? तुरीची, हरबर्‍याची की उडीदाची ते ही कळेना. शेवटी त्यानी तो प्रयत्न सोडून दिला.

बाहेर जायचा  पण कंटाळा आला होता. बाहेर हॉलमधे येऊन बसला. ‘ललना ला फोन करावा का ?’ त्याचं एक मन म्हणालं. पण लगेच दुसरं मन म्हणालं ‘मुळीच फोन करायचा  नाही, कोण समजते कोण ती स्वत:ला ? तिला काय वाटतं, तिच्याशिवाय जगू शकणार नाही ? ती यायच्या अगोदर पांचवर्ष एकटाच होतो, तिचं तर नाव सुद्धा माहीत नव्हतं. गेली खड्ड्यात.’ पण नंतर त्यालाच त्याच्या विचारांची लाज वाटली. एवढी लाडकी बायकोच डायरेक्ट खड्ड्यात म्हणजे काय ? तो व्याकुळ  झाला.

थोडा वेळ तसाच गेला, कायम भोवती भोवती करणारी ललना घरात नाही हे अजूनही त्याच्या पचनी पडत नव्हतं. शेवटी, न राहवून त्यानी त्याच्या मित्राला कांताला फोन केला. “ कांता, लेका तू अनुभवी आहेस म्हणून तुला विचारतो आहे.”

“बोल, काय प्रॉब्लेम आहे ?” कांता म्हणाला. मग वैशाखने  त्याला काय झालं आहे, ते सांगितलं.

“बरं मग ?” – कांता.

“अरे, बरं मग काय ? मला ललना घरात नाहीये तर काही सुचत नाहीये. इतकी सवय झाली आहे ना तिची, पण ती बघ, न सांगता चालली गेली.” – वैशाख तक्रारीच्या सुरात बोलला.

“अरे, प्रॉब्लेम सांग न, उगाच फापट पसारा का सांगत बसलाय ?” – कांता.

“बायको न सांगता माहेरी गेली, फक्त एक बोटभर चिठ्ठी सोडून गेली, हा तुझ्या मते प्रॉब्लेम नाहीये ?” – वैशाख.

“छ्या, अरे खुशिया मनाव. तुला सांगतो, मागच्याच आठवड्यात  माझा एक मित्र दुबई वरून आला, त्यांनी खास माझ्यासाठी डबल ब्लॅक लेबल आणली आहे, तुझी बायको नाहीये, मग आता मीच येतो बाटली घेऊन, येतांना काही चकणा घेऊन येतो, मंग्या आणि शऱ्या ला पण फोन करतो. अरे मस्त मौका है, मिलेंगे, बैठेंगे, एंजॉय करेंगे.  तू फक्त जेवण ऑर्डर करून ठेव. मस्त, तांबडा रस्सा पांढरा रस्सा, मटण आहाहा ” कांता एकदम फसफसला.

“अरे पण, तुझ्या बायकोनी तर बॅन घातलाय ना? मग ?”  वैशाखची भाबडी शंका.

“हम किसीसे कम नहीं, जानी ! वो एक, तो मैं सात हूँ, समझे मास्टर.” – कांता, आता त्याचा उत्साह उतू चालला होता.

“अरे पण स्टफ ठेवला कुठे ?” – वैशाख.

“अरे यार, आपला तुषार आहे ना. त्याला दिली नीट पॅक करून. तो साधा  आहे बिचारा, त्यामुळे आपल्याला धोका नाही.” – कांता.

“कांता, हे काही बरं केलं नाहीस, तू त्याला कशाला अडकवलं, उगाचच दोघांमध्ये भांडणं होतील” – वैशाख

“ऐसा कुछ नहीं होगा. त्यानी घरी सांगितलं आहे की पार्सल साहेबांचं आहे आणि ते घरी ठेवू शकत नाहीत म्हणून आपल्याकडे आणली. आता साहेबांना नाही म्हणता येत नाही म्हणून. आता मी त्याला बाहेर बोलावीन आणि बाटली घेऊन येईन. कोणाला कसलाच पत्ता लागणार नाही.” – कांता.

“तू काय सांगणार आहेस संध्या वहिनींना ?” – वैशाख.

मी सांगणार “आमच्या ग्रुपचं नाइट आउट आहे. गप्पा टप्पा, पत्ते वगैरे, नंतर छान मटणाचं जेवण, खूप दिवसांनी आम्ही सगळे भेटणार आहोत, त्यामुळे रात्री खूप उशीर होईल, पण आमचं असं ठरलं आहे की तुम्हा बायकांना रात्री त्रास द्यायचा नाही म्हणून एकदम सकाळीच येऊ.” कांता म्हणाला. त्याचं सगळं प्लॅनिंग तयार होतं. “कोणाला भनक पण लागणार नाही. तू निश्चिंत रहा. मी मंग्या आणि शऱ्याला पण घरी हेच सांगायला सांगतो.”

वैशाख, या संवादा  नंतर ललनाला विसरून गेला. गेली दीड वर्ष तो ललना मधे  इतका गुंतून गेला होता की दारूची आठवण पण झाली नव्हती. पण आजची गोष्ट वेगळी होती, ललना घरी नव्हती आणि कांता पण सर्व तयारीनिशी येणार होता. ग्रुप मधल्या सर्वांचीच आगे मागे लग्न झाली होती म्हणून सगळेच उपाशी होते. आज इतक्या दिवसांचा उपास सुटणार म्हणून आनंदाला उधाण आलं होतं.

कांता, वैशाखचा फोन आला तेंव्हा बाल्कनीत जाऊन बोलत होता इतक्या उत्साहात होता की त्याचा आवाज जरा मोठाच होता. पुरुषांचा चेहरा पाण्यासारखा असतो, छोटे छोटे तरंग सुद्धा चेहऱ्यावर उमटतात. आणि बायकांच्या नजरेची रडार सिस्टम नासाच्या शंभरपट पावरफुल असते. संध्या, त्याची बायको, समोरच्याच खोलीत चहा पित होती, तिच्या नजरेने कांताच्या चेहऱ्यावरचे मायक्रोवेव फेरफार पकडले. तिच्या लगेचच लक्षात आलं की काही तरी भानगड दिसते आहे. मग तिने जरा कान देऊन ऐकायला सुरवात केली. लवकरच तिच्या लक्षात सर्व प्रकार आला.

संध्यानी मग ललनाला फोन लावला. तिला सांगितलं की तिला जी माहेरी जायची आयडिया सांगितली होती, ती फसली आहे आणि हे लोक भलताच उपद्याप करण्याच्या मागे आहेत. मग तिने मंगेश आणि शरद दोघांच्याही बायकांना कॉन्फरन्समधे घेतलं. सर्वानुमते एक प्लॅन  ठरला.

कांता, शरद आणि मंगेश वैशाखच्या घरी पोचले. सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा होता, इतक्या दिवसांनी का होईना, पण डबल ब्लॅक लेबल ! वा: मजा येईल. मग सेंटर पीस वर डीशेस मांडल्या गेल्या, खारे काजू, दाणे, सिख कबाब आणि भजी यांनी प्लेटा सजल्या. चार ग्लासेस स्थानापन्न झाले, फ्रीजमधून आइसक्यूब आणल्या गेले, आणि आइस ट्रे आठवणीने परत भरून ठेवले. सोड्याच्या बाटल्या, ठेवल्या गेल्या. विल्सची पाकीटं आणि लायटर, अशी सगळी जय्यत तयारी झाली.   

मग पिशवी मधून कांतानी ब्लॅक लेबल जॉनी वॉकर ची बाटली काढून टेबलावर ठेवली. सगळे त्या बाटलीकडे अनिमिश नजरेने पहातच होते की डोअर बेल वाजली. “तू आणखी कोणाला बोलावलं होतं का ?” शरदनी कांताला विचारलं. “नाही बुवा, वैशाख तुझ्याकडे कोणी येणार होतं का ?” – कांता.

“नाही, पण आत्ता या वेळी कोण आलं असेल ?” वैशाख आता भांबावला होता.

“चला भराभर हे सगळं उचलून ठेवू, उगाच पंचाईत नको” मंगेशच्याही चेहऱ्यावरचे भाव बदलले होते.

“अरे हट, आपण आपल्या घरात आहोत, रस्त्यावर नाही, आणि आपल्या खर्चानी पिणार आहोत. घाबरता काय असे. थांबा मीच उघडतो दार” असं म्हणून कांता दार उघडायला गेला. आणि उघडल्यावर जागच्या जागीच थिजला. समोर चौघांच्याही बायका उभ्या होत्या. कांताची  काटो तो खून नहीं, अशी अवस्था. तो नुसताच आ वासून उभा राहिला. त्याची बायकोच समोर आली. म्हणाली “अहो मी आहे संध्या, तुमची बायको, असे भूत बघितल्या सारखे काय बघता आहात माझ्याकडे ?”

“प पण तू इथे कशी ? आणि ह्या सगळ्याजणी कश्या आल्या इथे ?” कांताच्या तोंडातून कसे बसे शब्द निघाले. कांताला काय बोलावं हेच कळत नव्हतं.

“अहो आपण लग्नात देवा ब्राह्मणांच्या साक्षीने वचन नव्हतं का दिलं एकमेकांना, की एकमेकांच्या सुख दु:खात बरोबर असू, नातीचरामी नातीचरामी असं.” संध्या म्हणाली. “म्हणून. आम्ही आलो.”

“पण आम्ही दु:खात आहोत असं तुम्हाला कोणी सांगितलं ?” कांता, आता जरा सावरला होता.

“आम्ही कुठे म्हणतो आहोत, की तुम्ही दु:खात आहात म्हणून, आम्ही तर तुमच्या सुखातच सामील व्हायला आलो आहोत. आम्ही पण ब्लॅक लेबल एंजॉय करू, नंतर तांबडा रस्सा पांढरा रस्सा वा वा, आपण सगळेच आनंद डोही तरंगू. चला ललना यांच्या बरोबरीने अजून चार खुर्च्या घे आपल्या साठी. अरे वा खारे काजू ! मस्त.” असं म्हणून संध्यानी चार काजू उचलून तोंडात टाकले. आणि कांताला सोफ्यावर ढकललं आणि शेजारी आपण बसली. “ चार ग्लासेस पण आणशील ग” तिने ललनाला आवाज दिला.

मंडळी, पुढचा प्रसंग अतिशय रम्य असला तरी वाचकांनी आपापल्या परीने रंगवावा  असं मला वाटतं.   

***** पूर्णविराम****

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com     

माझ्या ब्लॉग ची लिंक देत आहे माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा. 

https://www.irablogging.com/profile/dilip-bhide_4187

धन्यवाद. 

🎭 Series Post

View all