स्त्रीला समजून घेताना......

Do we ever understand a woman?? We forget that she also has desires and expectations

स्त्रीला समजुन घेताना.{तीला समजून घेणे खरच अवघड आहे का?}


आपल्या समाजात स्त्रीला कायमच दुय्यम स्थान दिलं जातं, पुरुषप्रधान संस्कृतीला स्त्रीने घेतलेले निर्णय, तिने स्वतःचा आधी विचार केलेला आवडत नाही. दरवेळी तिने का दुसऱ्यासाठी बदलायच. तिला स्वतः ला काय हवं तिच्या इच्छा, अपेक्षा असतात हेच आपण समजुन घेत नाही. ती दरवेळी स्वतः पेक्षा दुसऱ्याचा जास्त विचार करते, मग तिचा विचार कोण करणार? आपल्याकडे स्त्री सक्षमीकरण, स्त्री सबलीकरण हे फक्तं बोलण्या पुरतं तर मर्यादित नाही ना?

       कालचीच गोष्ट घ्या. माझ्या मैत्रिणीने मला कॉल केला म्हणे, "अगं घरात कोणी मला समजुन घेत नाही, मला हवं ते करू दिलं जात नाही. तिकडे आई-बाबांना सांगितले तर ते म्हणतात, तू आणि तुझ्या सासरचे बघून घ्या काय ते, सासरचे म्हणतील तसें कर."

 मला नीट समजेना ती नक्की कशाबद्दल बोलतीये, मग म्हंटले,

"अगं नीट सांग काय झाले." तर म्हणाली,

"लग्नाच्या आधीच मी मुलाला (नवऱ्याला) स्पष्टपणे सांगितले होते मला नोकरी करायची तेव्हां `तो` हो म्हणाला आणि आता लग्नाला वर्ष होत आले तरी घराबाहेर पडू दिलं जातं नाही. सासूबाई म्हणतात, घरात एवढं चांगल, तुला काही कमी पडत नाहिये हवं ते मिळतंय ना मग काय गरज नोकरीची, नोकरीचा विषय डोक्यातून काढून टाक. नवऱ्याला बोलले तर तो म्हणतो थांब थोडे बघू नंतर. मी बोलतो आईशी. शेवटी न राहून काल मीच जेवतांना विषय काढला तर सासूबाई म्हणे लग्नाला वर्ष होत आले गूड न्यूज दे आता लवकर. मला ना कळतच नाही लग्न झालं का लगेच यांना गूड न्यूज हवी असते, मला माझ्या आयुष्यात निर्णय घायचे स्वतंत्र आहे की नाही? तसे मी त्यांना म्हंटले की मला नाही एवढ्यात आई व्हायचं ती जबाबदारी घेण्यास मी अजून तयार नाहिये. तर मला बोलल्या आमच्या काळी लहान वयात लग्न व्हायची आम्हाला काय कळत होत तरी दोन- दोन पोरं सांभाळली ना. मी जरा रागातच बोलली, लग्न झाल्यापासून तुमचं सारखं चालू असतं आमच्यावेळी हे, आमच्यावेळी ते. कधी कुठे बाहेर जाऊ देत नाही बाहेर जायचं म्हटले की तुमचं काही तरी निघतं, एखाद्या मैत्रिणीचा फोन आला तर तूम्ही येता जाता ऐकवत असता तासन् तास फोन वर बोलते. आमच्याकाळी नव्हते असले फोन वगैरे आणि त्यात मित्राचा कॉल असला तर घरचं डोक्यावर घेता. काय बाई आजकालच्या पोरी घरात मोठी माणसं अन् मित्रांशी बोलता असं काही तरी. अग त्यांना ही मुलगी ना मग तीही बोलते मुलानं सोबत मैत्रिणीसोबत बाहेर फिरते मग या तिला का काही नाही बोलत. का तर ती त्यांची मुलगी आणि मी सून म्हणून? मला नाही सहन होत ग आता असं रोजचं जगणं माहेरी सांगितले तर ते ही काही ऐकून घ्यायला तयार नाही. आई म्हणते तुमचा संसार त्यात आमची ढवळा ढवळ नको उद्या परत लोक नावं ठेवतील. दादा वहिनी म्हणताय की तू जॉब बघ आणि त्यांना सांग लग्नाच्या वेळी हो म्हंटले होते जॉब ला मग आता करु द्या. कधी कधी वाटतं की लग्न करून चुकी केली की काय मी? तू योग्य काय आहे ते सांगशील म्हणून तुला कॉल केला त्यामुळे तुच सांग काय करु आता?"

 एवढं बोलून तिने फोन कट केला.

   तिचे ही बरोबर आहे, तिने लग्नाच्या आधी तसे स्पष्ट सांगितले होते की मला नोकरी करायची त्यावेळी हो म्हणणारे हे आज तिला बाहेरही पडू देत नाही. आणि तिच्या आई वडिलांनी तिला साथ द्यायला हवी तर ते म्हणताय तुमचं तुम्ही बघा. अरे पण तुम्ही सांगितले म्हणून तिने लग्न केले ना तेही तुम्ही म्हणाल त्या मुलाशी मग तुम्हीच जर असे अंग काढून घेतले तर ती कोणाकडे बघणार हा तरी विचार करा.

कसं आहे ना, आपल्याकडे तिने नोकरी केली तरी प्रॉब्लेम असतो लोकांना वाटतं, नोकरी केली म्हणजे घराला वेळ नाही देणार. तुम्ही तिला एक संधी तर द्या. अरे ती सांभाळू शकते ना घर आणि नोकरी पण काही लोकांना ते पटत नाही. आपण आपली मानसिकता बदलायला हवी ना? तिला ही वाटतं जगावं कधी स्वतःच्या मनाप्रमाणे कायमच जगते की दुसऱ्याच्या मनानुसार, स्वतःचं मन मारून. का तिने समाजाच्या भीतीने अन् आईबापाच्या मान सन्मानासाठी मन मारून जगायचं.

तिलाही कोणी कधीतरी समजुन घ्यावं एवढीच इच्छा असते तिची.

कायम तीला कोणत्या ना गोष्टीवरून बोललं जातं. नोकरी करत असली तरी येता जाता ऐकवलं जात एवढा वेळ बाहेर नको राहू जास्त मुलांशी नको बोलू हे नको करू ते नको करू.

सगळी बंधन तिच्यावरच का म्हणून लादायची! तीने एखादी गोष्ट करायची ठरवली तर आपल्यातले बरेच लोक तिला प्रोत्साहन द्यायचे किंवा सकारात्मक गोष्टी सांगण्या व्यतिरिक्त तू हे करु नको तुला जमणार नाही. कशाला करते. असे नकारात्मक बोलत असतात. तिचे मानसिक खाच्चिकरण केले जाते. अरे तिला थोडा तरी सपोर्ट करून बघा. नाही काही करू शकली तर अनुभव येईल. पण एकदा तिला हवं ते करू द्या. एक चान्स तरी घेऊ द्या. तिला हवं तसं जगु द्या!

तिलाही वाटतं कोणी तरी असावं समजुन घेणारं साथ देणारं.


समाप्त.


लेखिका: रूपाली {r.u.p.a.l.i.22}

लघुकथा/लेख

ईरा टीम: नाशिक 

 विषय: स्त्रीला समजुन घेताना.{तीला समजून घेणे खरच अवघड आहे का?}

स्पर्धा: ईरा राज्यस्तरीय करंडक