May 15, 2021
नारीवादी

जेंव्हा ती आई होते

Read Later
जेंव्हा ती आई होते


सिद्धी भुरके ©®

     निशाच्या अचानक पोटात दुखायला लागलं, तिच्या आई वडिलांनी तिला लगेच हॉस्पिटलमध्ये नेलं आणि तसं तिच्या सासरकडच्यांना पण फोन करून कळवलं.
"अहो पण तिचे अजून नऊ महिने भरले नाहीयेत ना?? असं कसं अचानक दुखायला लागलं?? "निशाच्या सासूबाई म्हणाल्या.
"फक्त 10 दिवस तर बाकी आहेत महिने भरायला.. आणि आता ते काय आपल्या हातात आहे का?? तुम्ही या हॉस्पिटलमध्ये.. " निशाची आई फोनवर तिच्या सासूबाईंशी बोलत होती.

       निशा आणि समीर यांच्याकडे गोड बातमी होती. निशा नुकतीच ऑफिसमधून सुट्टी घेऊन नववा महिना लागल्यावर आईकडे राहायला आली होती. आणि आज तिला पोटात दुखायला लागलं होतं. सासर आणि माहेर एकाच शहरात असल्याने तिच्या सासरकडच्या लोकांना कळवण्यात आलं होतं.

     इथे डॉक्टरांनी तिला ऍडमिट करून घेतलं.. थोड्या वेळानं तिच्या पोटात दुखणं बंद झालं. म्हणून डॉक्टरांनी तिला कळा सुरु होण्याचं इंजेक्शन दिलं..पण काही वेळानं तिच्या पोटातलं पाणी कमी झालं.. बाळ खाली सरकत नव्हतं.. तिच्या घरच्यांच्या संमतीने तिचं सी सेक्शन करायचा निर्णय घेतला आणि काही वेळात निशाने एका गोंडस मुलीला जन्म दिला. बाळाचा आवाज ऐकून बाहेर उभ्या असलेल्या सगळ्या मंडळींना आनंद झाला. थोड्या वेळातच निशाला रूम मध्ये आणलं. समीर आणि बाळाला बघून निशा खुश झाली. ती अजूनही थोडी ग्लानीतच होती. तितक्यात तिच्या सासूबाई येऊन म्हणाल्या ,
"अभिनंदन निशा..  लक्ष्मी आलीये आपल्या घरात.. खूप गोड आहे ग बाळ.. पण मला एक सांग तू काही निष्काळजीपणा केलास का माहेरी जाऊन?? असं कसं 15 दिवस आधी डिलिव्हरी झाली?? " ग्लानीत असणाऱ्या निशाला काय बोलता पण येईना आणि सासूचे हे बोलणे ऐकून तिच्या आई वडिलांचे पण चेहरे पडले.. समीरच्या ते लक्षात आले आणि विषय बदलायला त्याने पटकन सगळ्यांना मिठाई भरवली... थोड्या वेळाने निशाच्या सासरकडचे लोक निघाले. त्या रात्री निशाची आई तिच्या सोबत थांबली होती.

       दुसऱ्या दिवशी सकाळीच निशाची सासूबाई  तिथे हजर झाल्या . "निशाची आई.. तुम्ही आता घरी जा.. तुम्ही जेवून वगैरे  या.. मी थांबते इथे.. " सासूबाई म्हणाल्या.
"अहो नको.. तिची मावशी येणार आहे.. मग मी निघेन.. उगाच तुम्हाला कशाला त्रास.. " निशाची आई म्हणाली.
"अहो त्रास काय त्यात.. माझी सून आणि माझी नात आहे.. तुम्ही तिच्या मावशीला संध्याकाळी बोलवा.. मी थांबते.. " आता सासूबाईंपुढे निशाच्या आईचं फार काही चाललं नाही आणि त्या घरी गेल्या.

    आज निशा जागी होती...पण सीझर झाल्याने तिला उठून बसायची परवानगी नव्हती आणि  हाताला सलाईन होते.. त्यामुळे तिला बाळाला अंगावर नीट पाजता येत नव्हते.तिची धडपड बघून सासूबाई म्हणाल्या, "उगाच बाई तुझं सीझर झालं.. आयुष्यभराचं दुखणं मिळालं बघ तुला.. हे सीझर बाईच शरीर अधू करतं.. डॉक्टर काय पैसा कमवायला करतात हे सगळं.. आता आयुष्यभर पाठदुखी आणि कंबरदुखी तुला सहन करावी लागणार बघ.. " सासूबाईंचं बोलणं ऐकून निशाला फार वाईट वाटलं. सीझर म्हणजे कोणता तरी मोठा गुन्हा केल्यासारखं वाटलं तिला. थोडया वेळानं निशाची आई आली आणि निशाला जरा बरं वाटलं.
तिसऱ्या दिवशी निशाचं सलाईन काढलं.. तिला हळू हळू उठायला सांगितलं डॉक्टरांनी. पण उठताना असंख्य काटे टोचत आहेत आपल्याला असं तिला वाटलं.. तिचा जीव कळवळला. पण बाळाकडे बघून ती उठून बसली. आजपासून निशाला सर्व खायची परवानगी दिली डॉक्टरांनी. दुपारी निशाची आई डबा घेऊन आली तिच्यासाठी, तितक्यात सासूबाई आणि समीर सुद्धा तिला भेटायला आले. निशाचे जेवण बघून तर सासूबाई चिडल्याच, "अहो निशाची आई.. तुम्हाला काही माहित नाहीये का बाळंतिणीच्या आहाराबद्दल?? तिला मेथीची भाजी आणि भाकरी आणायची.. हे काय चपाती भाजी आणली आहे तुम्ही?? "
"अहो पण सकाळीच डॉक्टरांनी येऊन सांगितले कि तिने सगळा व्यवस्थित सकस आहार घ्यायचा आहे..  सगळं खायचं आहे.. "निशाची आई म्हणाली.
"अहो पण भाकरी पचायला हलकी आणि मेथीच्या भाजीने दूध वाढतं.. तिला आता रोज भाजी भाकरीच द्या.. "सासूबाई म्हणाल्या. निशाच्या आणि तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. निशाला भाकरी आणि मेथीची भाजी अजिबात आवडत नसे पण कसंबसं बाळाकडे बघून ती खाऊ लागली.

    चौथ्या दिवशी निशाला घरी सोडले.. माहेरी तिचं आणि बाळाचे खूप छान स्वागत करण्यात आले. निशाला आता जरा बरं वाटत होतं. आता सारख्या सासूबाई येणार नाही आणि त्यांचे सल्ले ऐकून दडपण येणार नाही यामुळे ती खुश होती. दुसऱ्यादिवशी पासून निशा अन बाळाची छान तेल मालिश, अंघोळ सुरु झाली. एक दोन दिवस जरा चांगले गेले कि परत निशाच्या सासूबाई बाळाला भेटण्यासाठी येऊ लागल्या, येताने कोण कोण पाहुणे सुद्धा असायचे त्यांच्या सोबत... बाळ आणि निशा सुखरूप घरी परतले आहेत हे कळताच निशाच्या माहेरकडचे  पण नातेवाईक तिला भेटायला येऊ लागले. भेटायला येणारे सगळे लोक हे फक्त आणि फक्त बाळाचचं कौतुक करत होते .. आणि निशावर सूचनांचा भडीमार करत होते.त्यामुळे निशाला वाटायला लागलं, " मला कोणी आपुलकीनं विचारत नाहीये.. मी सुद्धा त्रास सहन करून बाळाला जन्म दिलाय.. पण येणाऱ्या पाहुण्यांना सीझर झालं कि नॉर्मल.. बाळ अंगावर पितंय कि बाटलीने या गोष्टीतच रस आहे.. " तिची आता चिडचिड होऊ लागली. कोणी तिला भेटायला येऊच नये असं तिला वाटू लागलं.

       असंच एके दिवशी दुपारी सासूबाई येऊन बसल्या होत्या. निशा बाळाला पाजत होती. पण बाळाला पुन्हा पुन्हा दूध प्यावंसं वाटत होतं.. त्यामुळे ती बराच वेळ बाळाला पाजत बसली होती. हा सगळा प्रकार बघून सासूबाई पटकन म्हणाल्या, "अगं बाळाचं पोट भरत नाहीये.. तुझं दूध अपुरं पडतंय.. म्हणून त्याला वारंवार पाजायला लागतंय.. सीझर झालं कि दुधाचा प्रॉब्लेम होतोच.. वरच दूध सुरु कर.. " सासूबाईंनी येऊन बाळाच्या पोटाला हात लावला आणि म्हणाल्या, "हे बघ.. बाळाचं पोट अजून आतच आहे.. अजिबात पोट भरलं नाहीये.. " हे सगळं बघून निशाला फार वाईट वाटलं. सासूबाई गेल्यावर ती आरशा समोर उभी राहिली. तिने स्वतः कडे पाहिलं.. आणि बोलू लागली "कोणतच काम मी नीट करू शकत नाही.. माझी चूक कि माझं सीझर झालं, माझी चूक मला दूध येत नाहीये.. काय करू मी??  नको वाटायला लागलंय मला हे.. असं वाटतंय जावं कुठेतरी पळून... " आणि निशा आता रडू लागली.

      तितक्यात तिची आई जेवणाचं ताट घेऊन आली.. ती भाकरी आणि मेथीची भाजी पाहून तर तिला अजून राग आला, "मी काय आजारी आहे का?? फक्त बाळाला जन्म दिलाय.. मग का रोज मला हे आजारी माणसाचं जेवण देतीयेस?? आई तू तरी मायेन माझी विचारपूस कर.. सगळ्यांना फक्त बाळाची काळजी आहे.. मला आता नाही सहन होत..डिप्रेशन यायला लागलंय... " निशा म्हणाली.
निशाच्या आईला काही समजेना तिला काय झालंय.. "अगं काय डिप्रेशन?? वेडी आहेस का? सोन्यासारखं पोरगी दिली आहे देवाने.. आणि डिप्रेशन कसलं आलं आहे तुला??  आता बाळाची नाहीतर कोणाची काळजी करणार आम्ही?? तुझंच बाळ आहे ना.. आणि ही भाजी भाकरी खायचा सल्ला तुझ्या सासूने दिलाय.. आता त्यांची बोलणी कोण ऐकणार?? चिडचिड करू नकोस उगाच.. बाळंतपणात आधीच डोकं हलकं झालेलं असतं.. मुकाट्यानं जेवून घे.. " निशाची आई बोलली.
आईचं बोलणं ऐकून निशाला चांगलंच समजलं कि आई सुद्धा आपल्याला समजून घेणार नाहीये.. म्हणून तिने काही महिन्यापूर्वीच बाळ झालेल्या आपल्या मैत्रिणीला फोन केला..तिच्याजवळ मन हलकं केलं.. निशाचं बोलणं ऐकून मैत्रिणीने तिला डॉक्टरांशी बोलायचा  सल्ला दिला. निशाला तो पटला सुद्धा.

       तिने समीरला सगळं काही सांगितलं आणि ते दोघे डॉक्टरकडे  गेले. निशाने तिला काय होतयं.. काय नाही.. कसं वाटतय सगळं सांगितले त्या डॉक्टरांना.. निशाचं बोलणं शांतपणे त्यांनी ऐकून घेतलं आणि त्या म्हणाल्या, "अगं हे पोस्ट पार्टम डिप्रेशन आहे.. खूप कॉमन आहे गोष्ट आहे ही नवीन आईला वाटणारी..  मला खूप आनंद आहे तू पुढे येऊन.. स्वतःहून या मुद्द्यावर बोलत आहेस.. नाहीतर मुली तशाच कुढत बसतात. आई झाल्यावर खूप बदल होतात मुलीमध्ये..  तिला अचानक या बदलांना स्वीकार करणं अवघड जाते. शिवाय नऊ महिने अगदी त्या होणाऱ्या आईचे लाड कौतुक केले जातात आणि बाळ झाल्यावर तिला कोणी विचारत नाही.. सगळे बाळाकडे लक्ष देतात त्यामुळे आईला वाईट वाटणं साहजिक आहे. बाळ झाल्यावर सगळं आयुष्य त्याच्यात गुरफटून जातं त्यामुळे तिला बाहेर जाता येत नाही.. पूर्वी सारखं काम करता येत नाही.. करिअर मध्ये ब्रेक येतो या सगळ्या गोष्टी एखादी मुलगी कशी पटकन स्वीकारेल?? म्हणून मग तिला डिप्रेशन येत.. आणि आलं तरी तिला दोष देणं चुकीचं आहे.
        आता तुझ्या दुधाच्या प्रॉब्लेम वर बोलूया.. बाळाचं वजन वाढत असेल.. बाळ दिवसातून कमीत कमी 6 ते 7 वेळा शु करत असेल तर बाळाचं पोट भरत आहे. प्रत्येक आईचं दूध हे बाळाच्या गरजेनुसार बनत असतं.  आणि सध्या सारखं बाळाला पाजायला लागतंय त्याला 'क्लस्टर फिडींग ' म्हणतात.. म्हणजेच सुरवातीच्या काही आठवड्यांमध्ये बाळाची वाढ झपाट्याने होत असते.. त्यामुळे ते सतत आईकडून फीड घेते.. काही दिवसात हे सगळं थांबेल.. त्यामुळे काही गरज नाहीये बाळाला वरच दूध सुरु करायची.
      आता मी सांगते तसं करायचं.. लोकांकडे दुर्लक्ष कर..  त्यांचे सल्ले ऐकू नको.. बाळाला काय हवय ते आईशिवाय कोणाला चांगलं कळणार.. आणि बाकी मदतीसाठी आम्ही डॉक्टर आहोत इथे.. स्वतःसाठी दिवसभरात अर्धा तास काढ.. त्यात तू तुला आवडतं ते कर.. गाणी ऐक.. टीव्ही बघ..पुस्तक वाच.. अगदीच जमलं तर वॉकला जा.. आणि बाळंतीण आहेस म्हणून असं अवतारात राहायची गरज नाहीये..स्वतःकडे बघून तुला बर वाटलं पाहिजे..
       आणि महत्वाचे म्हणजे सीझर म्हणजे आता तू जाडच राहणार किंवा आयुष्यभर पाठदुखी सहन करावी लागणार असं नाहीये.. पूर्ण सकस आहार घे.. तुझ्या शरीराची झीज भरून काढणं तुझ्या हातात आहे.. "

      डॉक्टरांचं बोलणं ऐकून निशाला खूप सकारात्मक वाटू लागले. तिने ठरवलं स्वतःसाठी वेळ देणं महत्वाचं आहे.. त्यानुसार ती वागू लागली.. त्यामुळे आता ती  आनंदी राहू लागली.. नको ते सल्ले एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडू लागली..आपल्या बोलण्याचा निशावर काही परिणाम होत नाहीये हे बघून सासूबाईंनी तिला प्रत्येक गोष्टीत टोकणं कमी केलं. समीरसुद्धा त्याच्या आईशी बोलला.त्यामुळे सतत निशाच्या माहेरी जाणं  सासूबाईंनी कमी केलं.  आता कुठे  निशा  आईपण एन्जॉय करू लागली होती. तिला पटलं होतं हे दिवस पंख लावून उडून जातील त्यामुळे आत्ता या आईपणातील प्रत्येक क्षण ती आनंदाने जगत होती..
   
     वाचकहो कथा कशी वाटली ते नक्की सांगा मला. मला वाटतं पोस्ट पार्टम डिप्रेशन या विषयावर मुलींनी खुलून बोललं पाहिजे. आणि अशा नवीन मातांवर सगळ्यांनी सूचनांचा भडीमार करण्यापेक्षा त्यांची आपुलकीने चौकशी केली तर त्यांना बरं वाटेल.. धन्यवाद...

सिद्धी भुरके ©®

Circle Image

Siddhi Gautam Bhurke

Interior designer

Hello everyone.. My self Mrs.siddhi Bhurke. I'm an interior designer and a co owner at studio intelize. I'm a trained bharatnatyam dancer. And a proud mommy of two years old daughter.. Recently I've started writing blogs..