(छोट्या बाल दोस्तांनो मी आज तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे. या गोष्टीचा जो नायक आहे , त्याचं नाव आहे "ठणठणपाळ", त्याला आपलं हे विचित्र नाव अजिबात आवडत नाही, म्हणून तो त्याच्या आईवर रागावून घरातून निघतो, एका छानशा नावाच्या शोधात. चला तर बघूया त्याला एक छानसं नाव मिळतं का?)
छोट्या बाल मित्रांनो ! ही गोष्ट आहे फार फार जुनी, म्हणजे किती जुनी? तर तेव्हा आत्ता सारखे मोठे मोठे शहर नव्हते, उंच उंच इमारती ही नव्हत्या, रस्तेही अगदी कच्चे होते, रात्र झाली तर घरात कंदील किंवा चिमणी किंवा टेंभ्याचा उजेड करायला लागायचा आणि घरात आई गॅस वर नाही तर चुलीवर स्वयंपाक करायची अशी ही फार फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आणि त्या काळी मुलामुलींची नावही जरा विचित्रच असायची म्हणजे मुलांची नाव दगडू, धोंडू, गोट्या किंवा मुलींची नावं झिपरी, विठी किंवा असंच काहीतरी.
आपल्या या गोष्टीचा नायक आहे "ठणठणपाळ". तो आहे मोठा चुणचुणीत आणि हुशार . "ठणठणपाळ" ला त्याचं नाव अजिबात आवडत नव्हतं, कारण त्याचे मित्र त्याला ठण् ठण,ठण्या, किंवा इतर विचित्र नावाने हाक मारायचे आणि खूप चिडवायचे. ठण ठण गोपाला या सगळ्यामुळे खूप त्रास व्हायचा आणि तू त्याच्या आईवर सारखा चिडत राहायचा."आई तू माझं नाव इतकं विचित्र का ठेवलं ग?"ठण ठण पाळ त्याच्या आईला म्हणायचा. त्याची आई त्याला वारंवार समजून सांगायची की , "अरे बाळ नावात काहीच नसतं! माणसानं नावानं नाही तर कर्तृत्वाने मोठं व्हावं!"
पण एकदा काय होतं ठण ठण पाळच, त्याच्या मित्रांशी कुठल्यातरी गोष्टीवरुन खूप भांडण होतं आणि ते ठण ठण पाळला त्याच्या नावावरून खूप चिडवतात, तो रागारागात घरी येऊन आईला म्हणतो "आई मी आता घर सोडून चाललो आहे, परत येईल ते एखादं छानसं नाव शोधूनच आणि मग तू मला त्याच नावाने हाक मारायची ठिक आहे?" त्याची आई होकारार्थ फक्त मान हलवते.
ठण ठणपाळ घरातून निघायची तयारी करतो, आई त्याला शिदोरी बांधून देते. तर घरातून निघाल्यावर थोडसं चालल्यावर एक छोटे मैदान लागतं त्या मैदानात एक बाई गवऱ्या वेचत असते, ठण ठण पाळ तिला म्हणतो "ये तू हे काय करते आहे?" तर ती बाई उत्तर देते "अरे माझ्या घरी स्वयंपाकासाठी जळतण गोळा करते आहे, माझ्या घरी स्वयंपाक का करिता लाकडं वगैरे नसल्याने मला असंच रानावनात गवर्र्या आणि वाळलेल्या काड्या शोधत फिरावं लागतं". ठणठणपाळ मनात काहीतरी विचार करतो आणि तिला विचारतो, "तुझं नाव काय आहे ग? ती त्याला म्हणते ,"अरे नावात काही नाही आहे .म्हणजे बघ, माझं नाव आहे लक्ष्मी पण माझ्याकडे एक रुपया सुद्धा नाही आणि दोन वेळच्या जेवणा करता मला किती वणवण भटकावे लागते". ठण ठणपाळ मनात काहीतरी विचार करतो आणि पुढचा रस्ता चालू लागतो.
चालता चालता तो दुसऱ्या गावात पोहोचतो, तिथे रस्त्याने एक माणूस त्याला भीक मागताना दिसतो. तो त्या म्हाताऱ्या आजोबांना म्हणतो म्हातारबाबा तुम्ही भीक का मागता? आता तुमचे मुलं तुम्हाला सांभाळत नाही का? तुम्ही आजारी आहात का? तो म्हातारा माणूस त्याला म्हणतो की ,"अरे मला मूलबाळ नाही आणि मी आता म्हातारा झाल्याने काही कामही करू शकत नाही ,म्हणून मला अशी भीक मागून गुजराण करावी लागते". ठण ठण पाळ त्यांनाही त्यांचं नाव विचारतो. ते म्हातारबाबा म्हणतात, " अरे माझं नाव विचारून तू काय करशील?". तरीही ठण ठण पाळ त्यांना नाव सांगण्याचा आग्रह करतो, ते म्हातारबाबा म्हणतात, "माझं नाव आहे धनपाल पण, माझ्याजवळ धन काय पण एक साधा रुपया सुद्धा नाही आणि आयुष्यभर मला धना साठी खूपच कष्ट करावे लागले आहेत". ठण ठण पाळ काहीतरी मनात विचार करतो आणि पुढचा रस्ता चालू लागतो.
त्यानंतर तो नंतरच्या गावात पोहोचतो. त्या गावात त्याला कुठलीच वर्दळ किंवा लोकांची घाईगडबड दिसत नाही ,सगळ्यांचे चेहरे एकदम उदास, भकास. तो गावात आत मधे गेल्यावर एका व्यक्तीला विचारतो ,"या गावात कोणीच काहीच काम करत नाही का? सगळ्यांचे चेहरे इतके पडलेले आणि रडवेले का झाले आहेत?". तेव्हा तो माणूस उत्तर देतो की या गावात एक अति उदार आणि मोठ्या मनाचा सावकार राहत होता. त्याने पुष्कळ दानधर्म केला आणि गोरगरिबांची खुप मदतही केली. भुकेल्यांना अन्न आणि गरिबांना वस्त्रदान, ज्याला जे जे पाहिजे ते ते त्याने दानात दिले होते. पण आज सकाळी अचानकच त्यांना छातीत दुखू लागले आणि त्यांचे देहावसान झाले. तो माणूस इतका चांगला होता की या गावातल्या प्रत्येकासाठी त्यांनी काही ना काही केलेच आहे, त्यामुळे आम्ही सर्व गावकरी इतके उदास आणि खिन्न झालो आहोत". ठणठणपाळ अगदी सगळं समजल्या प्रमाणे मांन डोलावतो आणि न राहून त्या गावकऱ्यास, त्या उदार मनाच्या सावकाराचं नाव विचारतो.गावकरी उदासवाण्या आवाजात म्हणतो बाळा आता नाव विचारून काय करशील ? ती महान व्यक्ती तर आमच्यातून निघून गेली ना! तरीही तुझी इच्छा असेल तर, मी त्यांचं नाव तुला सांगतो त्यांचं नाव होतं "अमरचंद".
आता ठणठणपाळ त्याच्या घराचा परतीचा रस्ता पकडतो आणि मनातल्या मनात विचार करतो, "लक्ष्मी तर गवऱ्या वेची , भीक मागे धनपाल ,अमरचंद जी मर गये ,तो भले बिचारे ठणठणपाळ".
संध्याकाळी घरी परतल्यावर ठण ठणपाळ आपल्या आईला गच्च मिठी मारतो आणि रडायला लागतो आणि म्हणतो "आई माझी खरंच चूक झाली, नावात खरंच काही नसतं जे काही असतं ते माणसाचं कर्तृत्व, आता यानंतर कधीच मी तुला माझ्या नावासाठी बोल लावणार नाही आणि तुझ्यावर चिडचिडही करणार नाही".
छोट्या दोस्तांनो मजा आली ना! मित्रांनो खरंच आपल्या नावात काहीच नसतं त्यामुळे तुम्ही तुमच्या मित्रांना त्यांच्या नावावरून चिडवणार नाही ना! . आणि चांगल्या सवयी , संस्कार आणि छान अभ्यास करून मोठे व्हा.
(सदर लिखाण हे मोबाईल मधून केलेले असल्याने शुद्धलेखनाच्या काही चुका असल्यास क्षमस्व)
(मंडळी तुम्हाला जर माझं लिखाण आवडत असेल तर तुमचे अभिप्राय आणि कमेंट नक्कीच शेअर करा आणि मला फॉलो करा)