शिक्षणाचा काय उपयोग?

What is use of education?

  शिक्षणाचा काय उपयोग? 

  संध्याकाळी ५ वाजले, संध्याची ऑफिस मधून निघण्याची वेळ झाली असल्याने तिने आपली पर्स घेऊन खुर्चीतुन उठली तोच मागून तिची ऑफिस मधील सहकारी निलिमाने संध्याला आवाज दिला.

निलिमा--- संध्या घरी जायची घाई नसेल तर कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी घेऊया का?

संध्या--- ठीक आहे, चालेल पण मला जास्त वेळ थांबता येणार नाही, घरी श्रेया वाट बघत असेल.

निलिमा--- हो मॅडम, फार नाही फक्त अर्धा तास, जास्त वेळ घेणार नाही.

संध्या व निलिमा ऑफिस पासून जवळच असलेल्या कॉफी शॉपमध्ये जातात, कॉफीची ऑर्डर देतात.

निलिमा--- अगं खूप दिवस झाले, आपण कॉफी पीत निवांत गप्पाच मारल्या नाहीत.

संध्या--- हो ना, पण काय करणार, श्रेया माझी वाट बघत असते, थोडा जरी उशीर झाला तरी रुसून बसते.

निलिमा--- बोलता बोलता श्रेया 6 वर्षांची झाली ना.

संध्या--- हो ना, मुली किती पटकन मोठ्या होतात. श्रेया खूपच हुशार झाली आहे, तिच्यासमोर एखादा विषय निघाला की त्यावर १० वेगवेगळे प्रश्न हजर असतात, तिच्या प्रश्नांची उत्तरे देतादेता नाकी नऊ येतात. हल्ली तिचे बाबा आणि मी व्हॉट्सअप वर बोलतो.

निलिमा--- असे काय प्रश्न विचारते?

संध्या--- अगं आता कालचीच गोष्ट घे, रोजच्या सवयीप्रमाणे आई हॉलमध्ये टीव्ही बघत होत्या, श्रेया त्यांच्याच बाजूला बसून खेळता खेळता टीव्ही बघत होती, मी किचन मध्ये स्वयंपाक करत होते. टीव्हीवर एक सिरिअल चालू होती, त्यात असे होते की लग्नाच्या ऐन मुहूर्ताच्या वेळी मुलीच्या वडिलांनी हुंड्याचे पूर्ण पैसे दिले नाही म्हणून मुलाच्या वडिलांनी लग्न मोडले व मुलाला लग्न मंडपातून घेऊन गेले. सिरिअल बघून झाल्यावर श्रेया माझ्याकडे आली त्यावेळी तिचे बाबाही तिथेच होते, तिने मला विचारलं की, आई लग्नात मुलाला हुंडा का द्यावा लागतो? तुमच्या लग्नात बाबांनी हुंडा घेतला होता का? तिचे असे प्रश्न ऐकून तिच्या बाबांना शॉक बसला, त्यांनी सर्वप्रथम आईंना सांगितले, टीव्हीवर अशा सिरिअल श्रेयासमोर नको बघत जाऊस, तिच्या मनावर वाईट परिणाम होतील. श्रेयाच्या प्रश्नांचे उत्तरे देण्याची जबाबदारी माझ्यावर आली. मी तिला सांगितले की तुझ्या बाबांनी आमच्या लग्नात हुंडा घेतला नव्हता, हुंडा देणे घेणे हे फक्त टीव्हीतच दाखवतात, फार पूर्वी लोक अशिक्षित होते तेव्हा लग्नात हुंडा घेण्याची प्रथा होती, पण आता अलीकडे परिस्थिती बदलली आहे, लोक शिकले आहेत, हुंडा कोणीच घेत नाहीत. तु यावर जास्त विचार करू नकोस.

निलिमा--- तुला कोण म्हणाले की हुंडा घेण्याची प्रथा बंद झाली? सुशिक्षित लोकही हुंडा घेतात, हुंडा घेण्याचा व शिक्षणाचा काहीही संबंध नसतो. हुंडा देणे घेणे हे सर्व ज्याच्या त्याच्या मानसिकतेवर अवलंबून आहे.

संध्या--- माझ्या बघण्यात अस एक पण लग्न नाहीये ज्यात हुंडा घेतला असेल.जे काही दिल घेतलं असेल ते मुलीच्या घरच्यांच्या इच्छेनुसारच झाले आहे.

निलिमा--- माझी एक मैत्रीण आहे, ती डॉक्टर असून तिचे स्वतःचे मुंबईत क्लिनिक आहे, काही दिवसांपूर्वी तिचा मला फोन आला होता, तिने तिचे लग्न जमल्याची बातमी सांगितली, मुलगा डॉक्टर होता, त्याचे स्वतःचे गावाकडे हॉस्पिटल होते, त्याचा मोठा भाऊ व वहिनी डॉक्टर असून मुंबईत हॉस्पिटल आहे, थोडक्यात काय तर सर्व फॅमिली सुशिक्षित होती. मुलगा दिसायला ठीक ठाक होता, फक्त प्रॉब्लेम एकच होता की मुलगा माझ्या मैत्रिणीपेक्षा 10 वर्षांनी मोठा होता. सगळंच मनासारखे भेटत नाही म्हणून तिने मुलाच्या वयाकडे दुर्लक्ष केले. ती फोनवर बोलताना खूप आनंदात होती, ती आनंदी आहे हे ऐकून मलाही चांगले वाटले, एका आठवड्यात तिचा साखरपुडा होणार होता, साखरपुडयाचा कार्यक्रम घरगुती होता. मी एका आठवड्याने तिला मॅसेज केला, साखरपुडयाचे फोटो पाठव, मला तुझा होणारा नवरा कसा आहे ते बघायचंय. त्यावर तिचा रिप्लाय आला, लग्न मोडले. तिचा मॅसेज वाचुन मला धक्काच बसला. मी लगेच तिला फोन केला तेव्हा मला सर्व सत्य परिस्थिती कळाली, मुलाकडच्यांनी 20 तोळे सोनं, घरातील प्रत्येकाला 5 ग्रॅम सोन्याची अंगठी एवढा हुंडा मागितला होता. आता मला सांग सुशिक्षित घर असून हुंडा मागताना त्यांना काही कसे वाटले नसेल, त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा काय उपयोग? मुलीला डॉक्टर करायच वरून एवढा हुंडा द्यायचा ही कुठली पद्धत आहे. एवढे श्रीमंत, सुशिक्षित लोक असूनही त्यांचे विचार जर असे असतील तर त्यांनी घेतलेल्या शिक्षणाचा काय उपयोग?

संध्या--- बापरे किती भयंकर आहे हे सगळं, मला तर अस काही असेल याची कल्पनाही नव्हती. 

निलिमा--- अगं समोरच्याने हा तरी विचार करायचाना की मुलगा जर दर महिन्याला एक लाख कमवत असेल तर मुलगीही महिन्याला पन्नास हजार तर कमवते ना. एवढे असूनही हुंड्याची काही गरजच नाहीये ना.

संध्या--- हो ना, पण त्या लोकांची मानसिकता तशी असेल त्याला आपण काय करणार?

©®Dr Supriya Dighe