टीवायएसएम कथा १ वेट

Short Story
टीवायएसएम कथा १ वेट

त्याने तिला जवळ बोलवलं. ती धडधडत्या अंत:करणाने त्याच्याजवळ गेली.

‘काय म्हणेल हा? ओरडेल? बोलेल? दूषणं देईल? की तिरस्कार करेल?...’ विचारांचं थैमान उठलं होतं तिच्या मनात! ‘तो’... तिच्या मनात कधीकाळी घर करून राहिलेला, कधी तो आपला व्हावा म्हणून केलेल्या खटाटोपाचा धनी!... कधी स्वत:ला उसवून ज्यावर जीवापाड प्रेम केलं तो...

तिने कोरड्या ओठांवरून जीभ फिरवली. त्याच्याकडे पाहिलं, नजरेत एक ओळखीची खूण दिसली, नि तिला पाहताच तिची जागा अपरिचित नजरेने घेतली.

“बसू या जरा, इथल्या हॉटेलमध्ये. रस्त्यावर उभं राहणं बरं दिसत नाही!...” आणि ती मागून येतेय की नाही, हे न पाहताच तो झपझप पुढे चालायला लागला. आजही ती खेचल्यासारखी त्याच्या मागून चालत होती, थोडेसे पाय खेचत, जायचंही आहे, आणि जायचंही नाही असा वेग होता पायाला! त्याच्यात आणि तिच्यात थोडं अंतर पडलं. नि ती चपापली.

‘आपण का भेटायला आलो ह्याला? हा आपल्याला सात वर्षांपूर्वी भर रस्त्यात असाच सोडून गेला होता. आता ‘आरव’ आहे आपल्या आयुष्यात-आपला नवरा! दोन वर्षांचा चिकू आहे!... पण आपण इथे का आलोय? का भेटायचं आहे ह्याला?...’ विचार करत करत ती हॉटेलच्या पायरीवर पोहोचली.

हॉटेलचं नाव ‘आराम’ असलं तरी, ती आतून अस्वस्थ झालेली होती.

तो तिच्याआधी टेबल अडवून बसला होता.

“इकडे रशिता!...” तो जरा जोरात म्हणाला. ‘राशी’ या नावाने हाक मारायचा आधी. ती जरा टेबल पुढे सरकून आडव्या सीटवर बसली नि तिने हातातली पर्स बाजूला ठेवली. आधीच्या ऑर्डरनंतरची बडीशेपची वाटी टेबलावर होती, त्या वाटीतून हात घालून त्याने बडीशेपचे चार-दोन दाणे उगाचच म्हणून तोंडांत टाकले. उगाचच!... आपण त्याच्याबरोबर नात्यात असताना किती गोष्टी केल्या याने!... आणि नंतर त्याच त्याला निरर्थक वाटल्या!...

“फार वेळ वाट पहावी लागली का?” त्याने बोलायला सुरुवात केली.

“नाही, तुझ्याआधी दहा मिनिटंच झाली असेल मला येऊन!...” तिने त्याच्याकडे ओझरतं पाहून समोरचा पाण्याचा ग्लास उचलला. तोंडाला ग्लास लावला. ‘कसली तहान होती ही!’ ती मनातल्या मनात म्हणत घटाघटा पाणी प्यायली.

तो मेनुकार्ड बघत होता. पाणी पिता पिता ती त्याला न्याहाळत होती. त्याचे केस थोडे मागे गेले होते, त्यामुळे कपाळ जरा आणखी रुंद झाले होते. केस विरळ झाले होते. गुलाबी रंग ह्याला आवडत नाही, पण आजचा शर्ट गुलाबी होता. थोडा वयस्कर... नाही, प्रगल्भ दिसत होता तो! उजव्या हाताच्या अनामिकेत प्लॅटीनियमची रिंग होती... याला तर रिंग्स, ब्रेसलेट्स, चेन्स आवडत नाहीत!... पण आता बोटात होती. त्याचवेळी त्याची-तिची नजरानजर झाली.

“काय घेतेस रशिता?” त्यानं मेनूकार्ड टेबलावर ठेवत विचारलं.

“काहीही!...” ती पटकन म्हणाली.

“अशा नावाची डिश कोणत्याही हॉटेलमध्ये मिळत नाही! बोल लवकर स्नॅक्स विल डू? साऊथ इंडियन?” मेनूकार्डच्या प्लास्टिकशिटशी चाळा करत त्यानं म्हटलं.

“हो चालेल, रवा मसाला डोसा!”

“ओनिअन उत्तपा आवडतो नं तुला? आय मीन आवडायचा ना तुला?” त्याच्या आवाजात क्षीण कंप होता, आत दुखावल्यासारखा.

“तुझ्या प्रश्नातच उत्तर आहे बघ!...” तिच्या आवाजात थोडा जिंकल्याचा आनंद होता. एव्हाना तीही सावरली होती. ‘गुलाबी शर्ट, रिंग तुझाही बदललाच की चॉइस!...’ तिच्या मनातआलं.

“म्हणजे?...उत्तर?” तो चक्क गोंधळला.

“हो, आवडायचा!... पण आता मला रवा डोसा खायचाय, आवडतो मला! आणि मुख्य म्हणजे ओनिअन उत्तप्याला पीठ आंबवतात, तसं रवा डोशाला आंबवत नाहीत. इंन्स्टंट-फ्रेश पीठ!...” ती आणखी तोऱ्यात म्हणाली.

त्याच्या चेहऱ्यावर आधी आठी, मग काहीतरी अचानक टोचल्याची भावना स्पष्ट दिसली.

“पण पूर्वी तर तू म्हणायचीस की ओनिअन उत्तप्पा म्हणजे-पफी, इंडियन पिझ्झा! विथ ओनिअन टॉपिंग! आणि आंबवल्यामुळे तर तो पफी होतो!...” आता मात्र ती विजयानंतरच्या समाधानाने हसली.

“अरे व्वा!... माझी वाक्यंची वाक्य लक्षात आहे तर तुझ्या!... जस्ट जोकिंग!... पण कोणतीही गोष्ट आंबवणं म्हणजे वाईटच! इट्स हार्मफूल टू बॉडी! सो आता नाही मी खात तसं!... फुगणं म्हणजे फसवंपण... सूज असते ती! दॅट्स नॉट हेल्दी!...” ‘ऑफ स्पिन बॉलवरही आपण छक्का मारू शकतो तर!...’ ती मनात म्हणाली.

“तुला असं वाटतं की, आपलं नातं आंबलं होतं? आंबलं नव्हतं राशी... आय मीन रशीता, मुरलं होतं!...” त्याचं वाक्य संपता संपता वेटर त्यांच्या टेबलाशी येऊन उभा राहिला. तो ऑर्डर देईपर्यंत तिला या वाक्यावर विचार करायला वेळ मिळाला. वेटर ऑर्डर घेऊन गेला. तिनं ग्लास मधलं पाणी प्यायलं.

“मुरलं होतं?...” खोचकपणे तिनं विचारलं, त्याने नजर खाली वळवली. दोनतीन सेकंद अशीच गेली.

“तुझ्यात काहीच बदल नाही! तशीच दिसतेस तू!...”

“तशीच म्हणजे? शेवटचं भेटलो होतो, तेव्हा दिसलेली तश्शी! वाक्य पूर्ण करावं... अक्षय!” ती केसांशी चाळा करत म्हणाली.

“आपण शेवटचं भेटलो त्याला सहाएक वर्ष झाली असतील ना?...” तो म्हणाला.

“सात वर्षे तीन महिने... आणखी थोडं मोजलं तर, दिवसही पुढचे सांगू शकेन!...” ती म्हणाली.

“नको... नको... म्हणजे स्टील यू आर थिंकिंग...” तो अस्वस्थपणे म्हणाला.

“आय एम थिंकिंग...? व्हॉट?... येस्स आय एम थिंकिंग अबाऊट माय पॅशन, सेन्सीटीव्हीटी!...आणि तुझं बेदरकार जाणं... अरे! अॅक्सीडेंट होतानाही कितीही रुथलेस असलेला माणूस, गाडीचा वेग थोडा कमी करतोच!... पण तू? ठोकर मारून निघून गेलास!... माझा त्यानंतरचा लोळागोळा उचलला आरवने!... सांभाळलं त्याने मला!... आरव माझा नवरा!...” ती कुत्सितपणे बोलली.

“माझी चूक होती ती, असं वाटतं!...” तो खाली मान घालून म्हणाला.

“असं वाटतं तुला?... अच्छा, म्हणजे पापक्षालन का? म्हणून बोलवलंस मला इथे? व्वा... अक्षय! किती वेगळा आहेस रे तू? असा नव्हतास... की होतास नि मला कळला नव्हतास? गोंधळ झालाय माझा!” ती ओठांच्या कडेत निर्जीव हसू ठेवून म्हणाली.

“राशी, मला मान्य मी तुझा हात मध्येच सोडला!... पण तसं नाहीये, माझे तुझे खटके, तुझं मला पझेस करणं, तुझे विचार, तुझी मतं, तुझे कमेंट यालाच महत्त्व होतं, मी नव्हतो त्यात... उबग आलेला मला आपल्या नात्याचा! कोळ्याने जाळं टाकावं भर समुद्रात, तसं मी भिरकावून दिलं नातं! मला माहीत आहे तू तडफडत राहीलीस!... त्यावेळी ते बरंही वाटलं... एक असूया निर्माण झालेली की... जगू शकतो मी तुझ्याशिवाय!...” तो भराभर बोलला, नि थांबला!

“चूक!... आता तरी खोटं बोलू नकोस रे! मी असतानाच तुझ्या आयुष्यात सानिया आली. तुम्ही कोडाईकॅनलला ‘फोर डेज पॅकेज’ वर गेला होतात! अर्थात मला ते नंतर कळलं!... पण सानियाचं तुझ्याबरोबर असणं मला पझेसिव्ह करून गेलं. तुला तेच अव्हॉइड करावसं वाटलं.” ती म्हणाली.

“ती मला सावरायला होती. मी खूप आपल्या नात्यात इरीटेट झालेलो होतो. तिने मला त्यावेळी नात्यातून बाहेर पडायला खूप मदत केली!...आपलं ब्रेकअप झाल्यावर गेलो मी कोडाईकॅनलला!...”

“नात्यातून बाहेर पडायचं होतं, तर मला सांगायचं होत ना!... मी सोडला असता तुझा हात!... माझ्या परिणामांची फिकीर न करता!... पण तुझ्याही मनाला हे स्वच्छ माहीत आहे की तू मला सानियासाठी सोडलं... मला उत्तर दिलं नाहीस तरी चालेल, स्वत:च स्वत:ला दे!... एनी वे, जे तुला हवं होतं ते तुला मिळालं ना!... सानियाबरोबर लग्न, लाईफ पार्टनर...” तिने डोसाचा तुकडा काट्याने सांबारच्या वाटीत मस्त बुडवला, नि तोंडात टाकला. त्याच्यासमोर ओनिअन उत्तप्पा होता. “ए अक्षय काय विचार करतोयेस? खा की!... थंड झाल्यावर मजा येत नाही!...”

“हे वाक्य माझं असायचं!...” तो भानावर येऊन म्हणाला. ती थोडीशी हसली.

“मी चूक केली राशी!... आय मीन रशिता!...”

“राशी चालेल! आरवही राशीच म्हणतो!...”

“तू... तू सांगितलं त्याला ‘राशी’ म्हणायला?... हे बरोबर नाही!...”

“हो मीच सांगितलं, आधीतर त्याने तशी हाक मारल्यावर मला वाटायचं तूच हाक मारतोयेस!... तुमच्या आवाजातला फरकही जाणवायचा नाही मला! पण मजा बघ, माझं लग्न झाल्यावर फक्त त्याचा आणि त्याचाच आवाज येत गेला, तुझा कुठेतरी मागेच विरून गेला!... मग मी एफबीला तुझे-सानियाचे फोटो पहिले नि मग तुझा आवाज येईनासाच झाला रे!...” ती जरा नाराजीने म्हणाली.

“सॉरी... सॉरी राशी!...” त्याने तिच्या हातावर हात ठेवला. “धिस इज ग्रेटेस्ट मिस्टेक आय एव्हर मेड!... सानियाने तुला, आमच्या नात्यात जिवंत ठेवलंय! सारखा तुझाच विषय!... ते टोमणे, सरकॅस्टिकली बोलणं, तुझा पाणउतारा!... मी तिला म्हटलं तेव्हा, जे नातं संपलय त्याचा तू विषय का काढते?...” रशिताच्या डोळ्यांत पापणीच्या कडेला हलकेच पाण्याची धार चमकली.

“सॉरी राशी!... आय मीन मी तिला बोललो. पण ती जितका तुझा तिरस्कार करत गेली, तितका मी तुझ्याजवळ खेचला गेलो. मी यावर तू काय रीअॅक्ट झाली असतीस? तू ही सिच्यूएशन कशी हॅन्डल केली असतीस? असा विचार करत राहिलो. ...आणि मी आणि सानिया आणखी लांब जात राहिलो!... मला चार वर्षांची सोआ नावाची मुलगी आहे, सानिया तिच्यावरही काढते!... स्वत:चं फ्रस्ट्रेशन!... नात्याचा गुंता झालाय! तिला वाटतं आपण चोरून भेटतो. अजूनही आपण आवडतो एकमेकांना!...”

त्याने थंड झालेला उत्तप्पा हातानेच खायला सुरुवात केली. शेवटच्या वाक्यावर रशिताला ठसका लागला. ती पाणी प्यायली. अक्षयचे डोळे क्षणभर चकीत झाले. मग त्यानं सावरलं स्वत:ला

“अगं हळू... माझं जाऊ दे!पण तुझ्या नवऱ्याचं नाव काय? हं आरव... तो कसा आहे? तुमचं कलरफूल लव्हबर्डस् सारखंच जुळत असेल! तू आर्टीस्ट तो इंटीरिअर डिझायनर! कलाकाराचं घर!...” तिने त्याच्या वाक्यांना उत्तर द्यायचं म्हणून मोठा घास भराभर चावला.

“अक्षय, कलाकार मनस्वी असतात!... आपल्याच तंद्रीत असतात ते!... जगाचा विसर पडावा इतके ते स्वत:च्या, स्वत:च्या माणसांच्या प्रेमात असतात!... कला आहेच ना माझ्याकडे, पण कलेतला रसरशीतपणा तू सोडून गेलास ना तेव्हास उडून गेला. तेव्हाचे वाळलेले कलर्स तसे ओले चिंब झालेच नाहीत!... आरव माझ्यावर मेहरबानी केल्यासारखा वागतो. मला त्यावेळी संभाळलं ते प्रेम म्हणून नाही, त्याला मी हवे होते त्याच्या आयुष्यात म्हणून! सतत सहानुभूती, अनुकंपा!... मला माणसं ओळखता येत नाही, म्हणून हिणवणं! माझ्या सगळ्या मित्रांना घरीच भेटायला बोलावलं पाहिजे, हा अट्टाहास!... मखमली दुपट्यात फुलपाखराला गुंडाळून ठेवलं तरीही ते गुदमरतंच रे!... मी पूर्वी ‘पॅशन’ म्हणून चित्र काढायची!... आता काम म्हणून काढते!... आणि त्याचे पैसे घेते!... मी तुझ्या डोळ्याचं काढलेलं चित्र अजूनही आहे माझ्याकडे!... मोस्ट वॅल्यूएबल पेंटिंग... ती कशीश, तो दर्द उतरत नाही आता ब्रशमधून!... आता नीटनेटकी होतात चित्रं!... झाडूनपुसून रॅकमध्ये ठेवलेल्या कोऱ्या करकरीत पुस्तकांसारखी!... दुमडलेले कोपरे, पेन्सिलीच्या खुणा... थेट हृदयावर उमटाव्यात असं चित्रच बनत नाही हल्ली!...” रवा डोसा संपत आला होता. तिने मनगटावरच्या घड्याळाकडे पाहिलं. हा अजून तो थंड चिवट झालेला उत्तप्पा खात होता.

“राशी!... मी तुला ओळखायला चुकलो! तू जिवंत होतीस!... रसरशीत... खळाळती... ओल्या कलरसारखी!... वाळल्यावरच्या तुझ्या शेडस् भयानक आहेत!...”

“अक्षय, शेड्सनी मूळ कलर सोडू नये म्हणतात!... नाहीतर इंटरप्रिटेशन चुकतं!... आता फक्त रंगवत राहायचं... आतलं सुकलेलंपण घेऊन!...” तिने टिश्यूने ओठ टिपले, आणि तो चुरगळून डिशमध्ये ठेवला. त्याने तो उचलला, नीट केला. त्यावर तिच्या लिपस्टिकचे मार्क होते.

“अक्षय, खाली ठेव तो!...” तिने हलकेच आजूबाजूला बघितलं.

अक्षयचं टिश्यूकडेच लक्ष होतं!...

“काही कलर्स मला कळलेच नाहीत!... काही आकार मी आपलेसे केले नाहीत!... मला नाही आवडला हा टीश्यू! ह्याने तुझ्या ओठांना शोषून स्वत:ला कलर लावून घेतला! सेल्फीश!... सानिया सेल्फीश... आरव सेल्फीश!... मी चित्र अर्धवट सोडून गेलो!... आणि तू स्वत:ला सुकवत राहीलीस!... राशी आय एम रिअली सॉरी!... मी तुझ्या ड्रायनेसला जबाबदार आहे!... काय करू या? पुन्हा रंगवशील? पुन्हा माखून घेशील स्वत:ला ओल्या रंगात?” त्याने तिच्या डोळ्यांत पाहत म्हटलं.

“असे कॅनव्हास बदलता येत नाही! अक्षय... फारतर मी कलरमध्ये टर्पेनटाइन, पाणी घालू शकते!...” ती थकलेल्या स्वरात म्हणाली. त्याने बील पे केलं.

“का?... का तुझ्या अस्तित्वाने तडजोड करायची? पॅलेटमधल्या रंगांना मोकळं कर! ओसंडू देत! ओघळू देत! पसरू देत! माखून घे स्वत:ला!... भिंती, कोपरे, तावदानं, गॅलरी, दरवाजे... सारं काही रंगवून टाक! आतून-बाहेरून... रंग-त्यांची उर्जा तुझं अस्तित्व आहे!... तुझ्या चित्रांसाठी लागेल तो ओलाकंच, रसरशीत कलर मी कुठूनही आणून देईन तुला!... पण सुकलेल्या रंगांशी सलगी करू नकोस!... त्यातून विटलेलाच इफेक्ट येणार!... अजूनही वेळ गेलेली नाही. मी तुझ्या दोन वर्षाच्या मुलासकट तुला स्वीकारायला तयार आहे!...” तो उठला. ती त्याच्या मागे निघाली.

“अक्षय... आणि सानिया आणि तुझ्या चार वर्षांच्या मुलीचं काय?” ती कातर स्वरात म्हणाली.

“माझा जीव आहे माझ्या मुलीवर, पण सानिया ती मला देणार नाही!... चार वर्षाची मुलगी बापाच्या डोळ्यांतलं पाणी पुसते! इतकी समजदार आणि ओल्याचिंब भावनांची आहे ती!... तू माझ्यापासून लांब होतीस, पण वाळले का तुझे भावनांचे रंग? तसंच आहे बघ हे!... काहीजण ओलेच रंग घेऊन जन्माला येतात, आणि तसेच राहतात कायम!... तेवढेच आपले रंग... कलर्स ऑफ वेटनेस...”

“मला वेळ हवाय!...विचार करायला!” ती हलकेच म्हणाली.

“नक्की घे!... पण इतकाही घेऊ नकोस की सारे रंग वाळून कोरडे ठक्क होतील!...”

त्याने तिला टॅक्सी करून दिली. तिने त्याला हात मिळवला. त्याच्या तळव्याची ओल, तिने आपल्या हातात जपून घरी नेली.

रात्री आरव आणि चिकू झोपल्यावर तिने किड्स रुमच्या आडव्या भिंतीखाली पेपर टाकले. खुर्चीवर चढून तिने त्या भिंतीवर कलर्स ओतले. चार दिवस-रात्री ती भिंत रंगवत होती. चिकूचे छोटे हातही रंगानी बरबटले. आरवने चार दिवस धुसफूस केली, आदळआपट केली. त्याची इंटीरिअर केलेली भिंत त्याच्यामते ऑड झाली होती. रशिताने त्यावर कन्टेम्परी आर्ट केली. वाहणारे रंगाचे ओघळ, एखाद्या रंगीत नदीसारखे दिसत होते, किंवा भिंतीवर अनेक रंग पिऊन नदी वाहत होती... प्रवाही, खळाळती...

आरव भिंत रंगवून झाल्यावर कितीतरीवेळ त्या भिंतीसमोर उभा राहिला. मग तोंड वाकडं करून म्हणाला, “मला तर काही अर्थ लागत नाहीये याचा!... डिझायनल लुक डिस्टर्ब झालाये!...”

रशिता त्याच्या समोर उभी राहून म्हणाली, “चित्राच्या खूप जवळ उभं राहून चित्र समजलं असतं, तर आपण ते छातीशी लावून, वा गळ्यात अडकवूनच फिरलो असतो. अंतर महत्त्वाचं... त्याशिवाय चित्र कळूच शकत नाही!... आणि चित्रकार कोणाला कळावं म्हणून चित्र काढत नाही! त्याच्या आतल्या ओलाव्यासाठी स्वत:ला ओल्या रंगात माखून घेतो. एका कलाकाराला दुसरा कलाकार कळायला, आधी कलाकाराने स्वत:ला तर ओळखलं पाहिजे!... एनी वे! मला तुझ्याकडून डायव्होर्स हवाय! नसलेल्या नात्याची पुटं सुटायच्या आत वेगळे झालेलं चांगलं!...”

या वाक्यावर आरव चिडला. “जायचंच होतं, तर ही भिंत रंगवून का चाललीयेस?”

ती शांतपणे म्हणाली, “तुला रंगांची ओळख पटावी म्हणून इतकी मेहनत घेतली मी!... आपण कोणाचे ओहळ सुकवू नयेत, वा त्याचा ओलावा शोषून घेऊ नयेत... एखाद्याचं अस्तित्व पिऊन टाकणे याला ‘विकृत भूक’ म्हणतात!... ‘चिकू’ची कस्टडी मी घेणार आहे, त्याला तू हरकत घेणार नाहीस, जितकं मी तुला ओळखते त्यावरून!...” आरवने ओल्या भिंतीला हात लावून पाहिलं. ओलेकंच कलर्स होते ते!!... त्याच्या बोटांना लागले ते...

तो ओरडून म्हणाला, “हे बोटांचे कलर्स काढायचे कसे, ते पण सांगून जा!...”

ती हसली. “रॉकेलने घासून निघतील ते!...”

...आणि ती त्याच्या आयुष्यातून निघून गेली...

-उर्मी