स्त्रीला समजून घेणं खरंच अवघड असतं का हो?

What Is Women

स्त्री 'दीड' अक्षरांचा एक परिपूर्ण शब्द, पण या शब्दातील "त्री " शोधायला पूर्ण बाराखडी चाळावी लागते.

मग विचार करा, जिथे फक्त एक उपमा शोधायला पूर्ण बाराखडी चाळावी लागते; तेव्हा तिचे मन, तिचे अस्तित्व शोधणं तर खूपच कठीण असणार ना!

तुम्ही म्हणणार हो ,हो, खूपच कठीण आहे!

आणि यात वर्षानुवर्षांपासून चित्रपट, मालिका यातून तर जणू असे दाखवले की, एक स्त्री चे मन ओळखणे म्हणजे एक चक्रव्यूह सोड्यवण्याइतपण अवघड आहे.

काय तर, "स्त्रीचा नकार तिचा होकार असतो."

काय तर ती कोणाशी खुलून बोलली तर, "तिला तुमच्यामध्ये रुची आहे." काय तर, "ती बोललीच नाही तर खूप शिष्ट आहे" काय तर, "हि तर खूपच चरचर करते; हिला संस्कार आहे की नाही!"...काय तर, "बघा कशी नवऱ्याला बोलून दाखवते." काय तर, "कसे कपडे घालते."

आणि अशा असंख्य गोष्टी, या मालिका,चित्रपट यातून दाखवल्या जातात. पण खरंच सांगा एवढं अवघड आहे का तुमच्या आईला ओळखणे. तुमच्या बहिणीला ओळखणे. तुमच्या प्रेयसीला ओळखणे. तुमच्या पत्नीला ओळखणे. आणि सर्वात महत्वाचे तुमच्या पोटच्या पोरीला ओळखणे. खरंच अवघड आहे का?

  स्त्रीला समजून घेणं खरंच अवघड असतं का हो?

   मी स्वतः ही एक स्त्री आहे. आणि मी साहजिकच म्हणेल,

नाही! नाही! नाही!

एक स्त्रीचं मन ओळखनं मुळीच अवघड नाही.

आजपर्यंत स्त्री केंद्रित कित्येक चित्रपट आणि वेब सीरिज प्रकाशित झाल्या, आणि त्या प्रत्येका मधून आपल्याला एक नवीन बाजू दिसते.

जशी आता काल - परवाच मी तो मराठी चित्रपट बघत होते.

काय बरे त्याच नाव. हा. काकस्पर्श!

या पूर्ण चित्रपटाचा जो संदर्भ आहे तो शेवटच्या प्रसंगातून कळतो पण शेवट पर्यंत पोहचता पोहचता कित्येक लोकांनी हा चित्रपट मध्येच सोडून दिला असणार.

मुळात या चित्रपटात अनादी काळापासून चालत आलेल्या असंख्य प्रथांचे भीषण रूप दाखवले आहे.

जसे विधवेने कसे आयुष्य जगावे. तिने कोणते नियम पाळावे. अर्थात नवरा नसेल तर स्त्रीचे अस्तित्व काही खास नाही. या परिस्थितीचे त्या काळातली वर्णन.

यानंतर आता तो कोणता भुल भुलय्या हा चित्रपट पण प्रदर्शित झाला होता त्यात सुद्धा दोन बहिणीचे मन, त्याची भावना, त्यांची इच्छा आकांक्षा दाखवली आहे.

यांनतर एक वेब सिरीज येऊन गेली "शी" म्हणून.

ज्यात नायिका तिचे अस्तित्त्व शोधण्यासाठी या समाजात स्वतःला सिध्द करण्यासाठी खूप प्रयत्न करते. किंवा समाजात आपल्या अटीवर जगणाऱ्या चार मैत्रिणींची कथा "फोर मोर शॉट्स" म्हणून एक वेब सिरीज मध्ये दाखवली आहे...

यानंतर मराठी मध्ये "मोकळा श्वास" म्हणा किंवा प्रियंका चोप्राचा "मेरी कोम" घ्या. आलिया भट्टचा "गंगुबाई काठीयावडी" किंवा दीपिका पदुकोनचा "छपाक" घ्या. सोनम कपूरचा "नीरजा", का श्रीदेवीचा "इंग्लिश विंगलिश" घेता तसा तापसीचा "पिंक" पण आहे, आणि राणी मुखर्जीचा "मर्दानी" तो तर विसरूच नका.

               असे अनेक चित्रपट आपण बघतो. आणि या प्रत्येक चित्रपटामधून एक नवीन छवी देखील आपण बघतो. जसे शिवर्धांगिनी पार्वतीचे नऊ रूप आहे. तसेच आपल्या सोबत वावरणाऱ्या प्रत्येक स्त्रीचे, वेगवेगळे रूपे आहेत, पण वेगवेगळे रूपे असले तर वेगवेगळे मन थोडीच असणार.

गुलाब सुद्धा लाल, पिवळा, पांढरा, गुलाबी, काळा, निळा, अश्या अनेक रुपात असतो पण गुलाबला काटे हे प्रत्येक रुपात असतातच. पाकळ्या या प्रत्येक रुपात असतातच.

त्याचप्रमाणे स्त्री कुठलीही असो, कोणीही असो तिच्यात मन मात्र सारखेच असते.तुमच्या घरात वावरणारी ओळखीची असो किंवा काम करण्यासाठी आलेली अनोळखी. मुलांसाठी घरात थांबणारी गृहिणी असो किंवा स्वतःची ओळख निर्माण करणारी, पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारी ऑफिस मधली कर्मचारी असो. ती रस्त्यावरची भिकारीण असो, नाहीतर या पुरुषांची भूक भागविणारी कोठ्यावरची वेश्या असो. ती वडीलानभोवती फिरणारी लहान मुलगी असो, किंवा उतारवयात प्रेमात खुळी झालेली तरुणी असो. ती परिपूर्ण स्त्री असो किंवा अर्धनारी नटेश्वरचे साक्षत रूप एक उभायलिंगी असो. ती उंच असो वा बुटकी, ती सावळी असो वा गोरी, ती जाड असो वा बारीक, ती बोलकी असो की मुकी. स्त्री कोणतीही असो पण तिला एकदा जर तुम्ही आदरणे वागवले ,तर आयुष्यभर ती तुमच्यासाठी तुमची गुलाम ही बनेल. तिचं एकदा प्रेमाने कौतुक केलं ना, तर पुढची कित्येक जन्म ती तुमच्या त्या प्रेमापोटी तुमच्यासाठी वाट्टेल ते करेल.

             असं म्हणतात एका पुरुषाच्या मनापर्यंत जायचा मार्ग त्याच्या आवडीतून अर्थात त्याच्या उदरातून जातो. परंतू एका स्त्रीच्या मनापर्यंत जाण्यासाठी तुम्हाला एवढे कष्ट सुद्धा घ्यावे लागणार नाही. फक्त प्रेमाने तिला एकदा तुमच्या बरोबरीने वागवलं, घरातल्या महत्त्वपूर्ण निर्णयांमध्ये तिचं मत घेतलं, कधी अचानक तिला एक नवीन साडी किंवा दहा रुपयाचा गजरा पण घेऊन आले, किंवा ती योग्य असताना फक्त तिच्या बाजूने उभे जरी राहिले, किंवा ती जशी आहे तशीच तिला स्वीकारलं ना. तरी ती स्त्री इतकी आनंदी होते की तिच्या आनंदाला माप नसतं.

        जसे एक पुरुष त्याच्या भावना, त्याचं मन, त्याच्या इच्छा या समाजासमोर निर्भिड पणे ठेवतो ना. का त्याप्रमाणे स्त्री ला नसेल वाटत की मी पण माझे विचार, माझ्या इच्छा, निर्भिड मनाने या समाजासमोर ठेवाव्या.

              आज आपण बघतो, अनेक क्षेत्र आहेत जिथे पूर्वी स्त्रियांना येणं सुद्धा मनाई होती. तिथे आज त्या विलक्षण कामगिरी गाजवता. का? कारण त्यांना तो पाठींबा भेटला. तो विश्वास भेटला.

        एक स्त्रीच मन ओळखणं सर्वात सोप्प असतं. फक्त ओळखताना तिचं विश्लेषण नका करू की, "ही तर 'आई' तिला का वाईट वाटेल कशाचं! ही तर ' बहीण', हीला तर जायचच आहे; ही तर परकं धन आहे! ही तर माझी ' प्रेयसी'. हिच्यावर फक्तं माझा हक्क आहे! हिच्या कडे कुणी बघू कसं शकतं, ही तर माझी 'बायको 'आहे. ती त्याच्याशी कशी बोलू शकते! मूळात ती बाहेर कामाचं कसं करू शकते! ही तर माझी' मुलगी' माझ्यासारखीच हुशार असणार!

        रावनासारखा दहा डोक्यांनी दहा विचार करून दहा वेगवेगळी मते करण्यापेक्षा महादेवासारखा दहा रुपांना एकच शरिरामध्ये बघून एकच रुपात आणि एकाच व्यक्तीत बघा ना.

       स्त्री सुद्धा एक मनुष्ययोनीतील व्यक्ती आहे. तिच्या इच्छा, तिच्या आकांक्षा, यांचे मन राखायला काही वेगळे प्रयत्न नाही करावे लागत किंवा पुस्तक वगैरे नाही वाचावी लागत, खरे पाहता तुमच्या आयुष्यात ती स्वतः ला इतकी रमवून घेते की तिचं स्वतः च अस वेगळं मन, वेगळं मत, ती मांडतच नाही म्हणून तिचं मन ओळखायला फक्त एकसमान विचार गरजेचा आहे की "ती कोणीही असो ती पहिले एक मनुष्य आहे."

                                धन्यवाद

लेखिका: वर्षा गिते

इरा टीम: नाशिक

लघुकथा/लेख

सब कॅटेगरी - स्त्रीला समजून घेणं खरंच अवघड असतं का हो?

स्पर्धा: ईरा राज्यस्तरीय करंडक