वारसा असाही भाग २

कथा मधुची आणि तिच्या आईच्या संघर्षाची


वारसा असाही.. भाग २
राज्यस्तरीय कथामालिका स्पर्धा..
विषय: कौटुंबिक
जिल्हा : मुंबई..

मागील भागात आपण पाहिले की मधुला अनेक ठिकाणाहून लग्नासाठी नकार येत असतो. असेच एक स्थळ तिला बघायला येते. ज्याला ती नकार देते. काय असावे या सगळ्या मागचे कारण पाहू आजच्या भागात..

" का वागलीस मधु तू अशी? जरा सामोपचाराने घेता आले नसते का? तुला जर मुलगा पसंत नव्हता तर तसे सांगायचे ना?" सुनिताताई आत येत म्हणाल्या.
" ताई, ती माणसे जर स्वभावाने चांगली असती ना तर त्याचे रूप, नोकरी या सगळ्या गोष्टी दुर्लक्षून मी लग्नाला होकार दिला असता. पण त्याची ती नजर. त्याच्या आईवडिलांचे हे घर बघून फिरलेले डोळे हे बघून मला घृणा वाटली त्यांची. माफ करा. माझे लग्न नाही झाले तरी चालेल पण उगाचच लग्न करायचे म्हणून कोणाच्याही गळ्यात मी माळ घालणार नाही." मधु तशीच आत निघून गेली.
सुनिताताई हताशपणे मालतीताईंकडे बघत होत्या.
" जीव तुटतो हो, माझा या पोरीसाठी. म्हणून करत होते ना प्रयत्न.."
" सुनिताताई, नका मनाला लावून घेऊ. आपली चूक नसताना सतत येणाऱ्या नकाराने कावली आहे बिचारी. त्यात माझी काळजी. देवालाच काळजी आता." मालतीताई निराशपणे बोलल्या.
" तुमचा विश्वास आहे देवावर?" सुनिताताईंनी काहीतरी सुचल्यासारखे विचारले.
" हो. नाहीतर त्याच्याशिवाय कोणाचा आधार होता मला?"
" मग एक सुचवू?"
" सुचवा."
" माझ्या ओळखीचे एक गुरूजी आहेत. त्यांच्याशी बोलाल?"
" ताई, मधुचा विश्वास नाही या सगळ्यावर ."
" म्हणूनच इतके दिवस बोलले नाही. पण एक शेवटचा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे?"
" तुम्ही म्हणता तर नक्की करीन. त्यांची काय आधी भेट ठरवायला लागते का?"
" फोन करून जाणे नेहमीच चांगले नाही का?"
" करते. ताई तुमचे आभार कसे मानावेत तेच समजत नाही."
" आभार नका मानू. एकदा मधुचे लग्न झाले ना की तुमच्या खालोखाल मलाच आनंद होईल.." सुनिताताई गुरुजींचा नंबर देऊन गेल्या. त्या गेल्यावर मालतीताई आतल्या खोलीत गेल्या. आत मधु एकटक बघत कंप्युटरवर गेम खेळत होती.
" मधु, काही खातेस का?"
" नको. मला भूक नाही."
" त्या सुनिताताई ना काही बाही सांगत होत्या."
" आई , तुमचे बोलणे आत ऐकू येत होते." मधु नजर न हटवता म्हणाली.
" मग यायचे जाऊन त्या गुरुजींकडे?" मालतीताईंनी घाबरत विचारले.
" तुझी काय इच्छा आहे?"
" त्या एवढे म्हणत आहेत तर आजच जाऊन येऊ.."
" आई.. तुझ्यासाठी काहिही. चल जाऊया." मधु पहिल्यांदा मालतीताईंकडे बघत बोलली.
" मला समजतंय ग पोरी. हे शेवटचे. यानंतर मी तुला अजिबात लग्नासाठी आग्रह करणार नाही." मालतीताई तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या. मधुचा होकार मिळताच त्यांनी लगेच त्या गुरुजींना फोन लावला. त्यांच्या आवाजातली तातडी जाणवली असेल कदाचित त्या गुरुजींना. मालतीताईंना संध्याकाळची वेळही मिळाली.
संध्याकाळी मधुला घेऊन त्या सुनिताताईंनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचल्या. छोटेसे टुमदार घर. घराच्या आसपास असलेली फुलझाडे, झाडे. जराही कुठे अस्वच्छता नाही. ते बघूनच मधुचे मन प्रसन्न झाले. दोघी कुंपणाच्या आत आल्या. घराचा दरवाजा उघडाच होता. बाहेर बेल ऐवजी एक छोटी घंटी टांगली होती. मधुने ती घंटी वाजवली.
" या आत या." एक खणखणीत आवाज आला. दोघींनी घरात प्रवेश केला. समोरच गजाननाची मध्यम उंचीची बैठी मूर्ती होती. मूर्तीला फुलांची आरास केली होती. मूर्तीच्या बाजूला दोन मोठ्या समया तेवत होत्या. धूप कापराचा मंद वास दरवळत होता. ते प्रसन्न वातावरण पाहून मालतीताई तर मूर्तीपुढे नतमस्तक झाल्याच पण कधीही देवासमोर हात न जोडणाऱ्या मधुनेही पुढे होऊन दर्शन घेतले. त्या दोघी वळल्या. समोर एक तिशीचा तरूण हसतमुखाने प्रसाद घेऊन उभा होता.
" घ्या. प्रसाद घ्या." त्याने हातावर खडीसाखर ठेवली.
" तुम्ही चहा घ्याल की कॉफी?"
" आम्हाला गुरुजींना भेटायचे आहे." मालतीताई चाचरत म्हणाल्या.
" त्यांना भेटालच पण चहा घ्यायला काय हरकत आहे. तुम्ही बसा. मी चहा सांगून आलो." दोघी एकमेकींकडे बघत समोरच्या भारतीय बैठकीवर बसल्या. तोपर्यंत तो तरूण चहा घेऊन आला.
दोघींनी चहा घेतल्यावर तो समोर जाऊन बसला आणि म्हणाला,
"सांगा काय अडचण आहे?"
" ते आम्ही गुरुजींना सांगितली तर?" मालतीताई म्हणाल्या..
" चालेल ना. मीच गुरूजी आहे." दोघींनाही आश्चर्य वाटले.
" पण."
" माझ्या वयावर नका जाऊ. मी खरेच अभ्यास केला आहे." तो हसत म्हणाला. त्याच्या हसण्याने आश्वस्त होऊन असेल कदाचित मालतीताईंचा विश्वास बसला. त्यांनी बोलायला सुरुवात केली.
" ही माझी मुलगी मधु. हिची पत्रिका दाखवायची होती."
" काही खास कारण?"
" तिचे लग्न ठरत नाही अजून." त्या घुटमळत होत्या. आता आश्चर्यचकित होण्याची पाळी गुरूजींची होती.
"पत्रिका बघायच्या आधी हिचे शिक्षण सांगू शकाल?"
" मी पोस्ट ग्रॅज्युएट आहे आणि एका मोठ्या कंपनीत चांगल्या पगारावर कामाला आहे." यावेळेस मधुने उत्तर दिले.
" माफ करा. ही दिसायला सुंदर आहे, शिकलेली आहे, चांगल्या ठिकाणी कामाला आहे, तरीही लग्न ठरत नाही? पत्रिका जुळत नाही म्हणून?"
" नाही.. भूतकाळ जुळत नाही म्हणून." मालतीताई खाली बघत म्हणाल्या.
" काकू, तुम्हाला जर माझ्याबद्दल विश्वास वाटत असेल तर तुम्ही मला सांगू शकता. विश्वास ठेवा ती गोष्ट या खोलीबाहेर जाणार नाही आणि या ताईचे लग्न जुळण्यात जी अडचण असेल ती सोडवायचा मी नक्की प्रयत्न करीन."


गुरूजींची मधुचे लग्न जुळण्यास मदत होईल? भूतकाळात नक्की काय दडले आहे पाहू पुढील भागात.. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा..

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all