Mar 29, 2023
गोष्ट छोटी डोंगराएवढी

वारी...

Read Later
वारी...


काय ती झाडी आणि काय तो डोंगर,
काय ती वारी आणि काय ती गर्दी,
काय ती हिरवळ आणि काय तो आनंद,
काय ते वेळ आणि काय तो छंद.

वारी म्हटलं की एक चैतन्य सळसळतं. एवढी पायपीट करून जाणारी लोक आणि त्यांची ती गर्दी बघितली की मन कसं प्रसन्न होऊन जातं, खरंच काय असते वारीत म्हणजे नक्की काहीतरी असावं ना, तेव्हाच एवढे सारे लोक जातात, वेडे नसतील ते तर काहीतरी असावंच की.

असं म्हणतात एकदा वारीला गेलं की त्या व्यक्तीला वारीची आवडच लागते. तो दर वेळी ओढल्यासारखा वारीला जातो.

हा अनुभव मी माझ्या घरी घेतला, माझे आजोबा जायचे आता ही काही नातेवाईक जातात.
हे लोक शेवटपर्यंत म्हणतात की,

'नाही या वेळी शक्य नाही, या वेळी जमणारचं नाही' आणि मग शेवटच्या क्षणी आपली बॅग भरून निघतात विठुरायाचे दर्शन घ्यायला. एवढी उत्सुकता असते जायची.
मला नेहमी आजोबांकडे बघून प्रश्न पडायचा, वयाच्या सत्तराव्या वर्षी कोणती एवढ्या गर्दीत जायची ख़ुशी असते यांना?

पेरणी संपली की लोक बिनधास्त विठ्ठलावर सगळा भार सोपवून वारीला जातात.

लग्नानंतर जेव्हा मी जेव्हा पहिल्यांदा पंढरपूरला गेले तेव्हा अनुभव घेतला, ते मंदिर आणि त्या मंदिरातली शांतता अनुभवली.
काय होतं तिथे ते नाही माहिती पण त्यानंतर मी सलग चार वर्षे गेले त्या मंदिरात, वारीमध्ये नाही पण तरीही जाते अधेमधे.

एवढी मोठी रांग बघताना वाटतं की कसे वारीतले लोक हे एवढं सगळं करत असेल आणि एवढी पायपीट करुन जेव्हा ते लोक तिथे पोहोचतात ते दर्शनाच्या ओढीने मग दर्शन घेऊन त्यांना किती आनंद होत असेल ना?
असं म्हणतात वारी म्हणजे समर्पण पण मला वाटतं,

वारी म्हणजे अफाट उत्साह
वारी म्हणजे ज्ञान व माणुसकीचं चैतन्य
वारी म्हणजे पुंडलिकाचा फुलोरा
वारी म्हणजे दरवळणारा मोगरा

वारीत भरभरून जगतो प्रत्येक वारकरी, पायाला बयेगा पडलेल्या असतात कंगळून तरी नाचतो वारकरी.

वारी म्हणजे स्वतःवरचा विश्वास
वारी म्हणजे देहभान विसरवणारा प्रवास
वारी म्हणजे सत्य आणि निष्ठेचा सागर
वारी म्हणजे सम्यकतेची नवी घागर

वारीत कुणीच आपला नसतो, कुणीच परका नसतो, सगळेच असतात भक्तीत वेडावलेले वेडे.

वारी म्हणजे संसारातुन संसाराची वजाबाकी
वारी म्हणजे भगवंतासमीप तेवणारी पणती
वारी म्हणजे स्वागत भक्तिभावाचे
वारी म्हणजे गणित प्रेमसुत्राचे

त्या वारीत रुसवे फुगवे, हेवेदावे सगळं विसरून माणूस रंगतो विठूनामात.


वारी म्हणजे नभांगण औदार्याचे
वारी म्हणजे जीवन सौंदर्याचे
वारी म्हणजे केवळ ध्यास भगवंताचा
वारी म्हणजे पर्वकाळ अनुभवे अनुभवण्याचा...

असं म्हणतात आयुष्यात एक वारी करावी, स्वतःला स्वतःची नवी ओळख करून द्यायला...


!!जय हरी विठ्ठल!!

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Pallavi Charpe

Housewife

Always ready to help