वॉर्ड 20A ( भाग 2 )

The last journey before death...
मला ब्रेन स्ट्रोक झाला आहे असे काही तरी सांगितल डॉक्टरने...


मी विचार करू लागलो ब्रेन स्ट्रोक हे काय असत. मला काय माहीत असणार ह्या बद्दल कधी साधी सर्दी नव्हती झाली मला, एकदम धडधाकट होतो मी. नियमित संध्याकाळी चालायला जायचो. फक्त वयोमानानुसार थोडा गुढघ्यांचा त्रास होता मला. जुनी हाड आमची त्यात खायचे - प्यायचे कसले नखरे नाही त्यामुळे हे आजारपणं काय असत हे कधी माहित देखील नव्हत. मग हा स्ट्रोक अचानक कुठून आला काही कळलंच नाही.


मला ह्या हॉस्पिटलमध्ये कंटाळा येत होता. आता इथे येऊन एक आठवडा होत आलेला. रोज त्या नाकातून टाकलेल्या नळीतून ज्यूस देत होते आणि गोळ्या बारीक करून पाण्यात मिक्स करून त्यातूनच देत होते. सलाईन चालू होत अधून मधून पण आता हे ही नको वाटत होत.. ही नाकातली नळी टोचत होती. एकदा माझ्या जवळ कोणी नव्हत औषध आणायला गेलं होत. मी अश्याच वेळेची वाट बघत होतो. मी हळुहळू ती नळी खेचायला लागलो दुखत होत पण माझे प्रयत्न सार्थकी आले काही वेळात नळी अर्ध्याहून जास्त बाहेर आलेली. चला आता थोड तरी बरं वाटतं होत. असं वाटतं होत आता तरी हे लोक पुन्हा काही ही नळी टाकणार नाही पण काही फरक नाही झाला त्याचा. पुन्हा ती नळी टाकली. आता मला फार राग आला होता. मी सारखी ती नळी काढण्यासाठी प्रयत्न करू लागलो. कोणी हात लावला , हात धरला तर हात झटकायचो, सारखं उठून घरी जायचा हट्ट करायचो पण काही उपयोग होत नव्हता. मोठ मोठ्याने ओरडत देखील होतो. शेवटी कंटाळून माझे हात बांधून ठेवले ह्यांनी पण काही वेळाने दया आली म्हणून सोडले हात.


आता मला शरीराच्या डाव्या बाजूला त्रास होऊ लागला होता . माझा डावा हात उचलला जात नव्हता. डावी बाजू रिकामी झाली आहे असे वाटतं होत.पण कळत सगळे होत. ऐकू येत होत सगळे. खरं आहे ते कधीतरी ऐकल होत मी. म्हातारपण हे दुसर बालपण असत. आज तेच अनुभवत होतो. बायकोला जाऊन पाच वर्ष झाली होती. त्यामुळे मुलगा आणि नातवंडं यांच्यासोबत राहत होतो.


मी हालचाल करू शकत नव्हतो पण मला भरवण, मला ओल्या कपड्याने पुसून काढणं, रागाच्या भरात एवढ्या शिव्या दिल्या खूप काही तोडून बोललो पण कोणी मला कधी उलटून बोललं नाही किंवा मला टाकून दिलं नाही. पण ह्या सगळ्यामुळे मीच दिवसेंदिवस तुटत चाललो होतो. हे असे माझे एका जागी असणं आणि माझे सगळेच घरच्यांना करायला लागण. मला हे सगळे बघवल जात नव्हत. हॉस्पिटलमध्ये आता पंधरा - वीस दिवसांच्या वर वेळ झाला होता. माझी प्रकृती सुधारण्या ऐवजी दिवसेंदिवस खालावत चालली होती. आता सुधारणा काही शक्य नव्हती. वय झाले होते.


आज घरी नेणार असे वाटतं होत म्हणून जागा होतो. आनंद पण झाला होता. फक्त व्यक्त करता येत नव्हता. नात बाजूलाच होती तेवढ्यात डॉक्टर आले. त्यांचं बोलणं ऐकलं. हे बघा स्ट्रोक म्हणजे आपल्या डोक्याला रक्तपुरवठा करणारी नस ब्लॉक होण. त्यामुळे आपल्या शरीराला लकवा मारण्याची शक्यता असते. अर्थात ज्या बाजूची नस ब्लॉक झाली आहे. ती बाजू निकामी होते. स्ट्रोक झालं आहे हे वेळेत लक्षात आले तर त्याचं निदान करण शक्य होत. पण काही केसेस मधे आपण घाबरून जातो आणि मग वेळ निघून जातो. तुमच्या केसमध्ये उशीर तर झाला होता पण तरी आम्ही प्रयत्न करणं सोडलं नव्हत. परंतु तुमच्या पेशंटचे वय सुद्धा जास्त आहे. अश्या वेळेस आमच्या उपचारांना योग्य तो रिस्पॉन्स मिळत नाही. त्यामुळे त्यांना इथे ठेवून अजून त्रास होण्यापेक्षा तुम्ही घरी घेऊन जा. घरी ठेवून औषध चालू ठेवा आणि त्यांची काळजी घ्या. त्यांच्यासोबत वेळ घालवा माहित नाही अजून किती वेळ आहे ह्यांच्याकडे ते.


हे सगळे ऐकल्यावर मला आता भीती वाटायला लागली होती. शरीर नाही पण भावना तर जाग्या होत्या ना. मी गेलो तर ह्यांच काय होणार. म्हणतात ना संसारात अडकलेला माणूस कधी सुटू शकत नाही. माझ्या बाबतीत तेच घडत होत. कळत नव्हत अजून काय उरलं आहे. काय बाकी आहे करायचं, काय राहून गेलंय. तसाच पुन्हा विचारात गेलो.


दोन मुलं होती मला. दोघे चांगल्या कंपनीमध्ये कामाला होते. आर्थिक परिस्थितीही छान होती दोघांची. दिसायला सुंदर होते. दोघांना नशिबाने बायकाही चांगल्या मिळाल्या होत्या पण माहित नाही माझा संस्कारात किंवा सांभाळण्यात काय कमतरता राहिली होती की दोघांना दारूच व्यसन होत. मला ज्या गोष्टीची सगळ्यात जास्त चीड होती. तिचं ह्यांना आवडायची " दारू " आणि वाईट संगत. एकत्र कुटुंब सुद्धा नव्हत दोघं वेगळे राहायचे. तरी का दारू लागायची ते मला कधीच कळल नाही. कश्याच दुःख नाही, टेन्शन नाही, तरी रोज दारुमध्ये असायचे. मला स्वतःला दोष देऊ की ह्यांना सुधारू ते कळत नव्हत. पण दोघे सुधारायला सुद्धा तयार नव्हते. अश्यातच एक दिवस जे नव्हत घडायला पाहिजे. ते घडलं. मोठ्या मुलाचा अपघात झाला आणि त्यातच तो गेला. माझ्यावर आणि माझ्या बायकोवर दुःखाचा डोंगर कोसळला होता. तरी त्यात समाधान ह्याच होत की त्याच्या दोन्ही मुलांची लग्न झाली होती. दोघे कमवत होते. त्या दुःखातून ही आम्ही बाहेर पडलो.


असे म्हणतात की विधिलिखित कोणी बदलू शकत नाही. जे घडायचं आहे ते घडणार मग ते आपण थांबवू शकत नाही. त्याला सामोरं जाणं हाच एक पर्याय आपल्यासमोर असतो. मुलाच्या दुःखातून बाहेर पडलो होतो. एक दिवस अचानक बायको झोपेत बेडवरून खाली पडली. तिला उचलून डॉक्टरकडे नेल. डॉक्टर म्हणाले जास्त काही नाही थोड लागलंय होतील बऱ्या. दम्याचा त्रास असल्याने जास्त काळ झोपून असायची एक दिवस असच मला बोलली माझ्या जवळ बसा. मी देखील बसलो. तिने माझ्या मांडीवर डोकं ठेवलं. मी विचारलं काही होतंय का ग? तर काहीच बोलली नाही. काही वेळाने बघतो तर तिने मान टाकली होती. लक्ष घड्याळाकडे गेलं. सात वाजून दहा मिनिट झाली होती अक्षय तृतीया होती. घरची लक्ष्मी जग सोडून गेली होती.....



To Be Continued...

🎭 Series Post

View all