Jan 27, 2022
सामाजिक

आजी पाहिजे

Read Later
आजी पाहिजे

आजी पाहिजे

मोना, आज बॉसच्या घरी पार्टी आहे. अगदी सुंदर तयार हो. बघताक्षणी सगळ्यांचे डोळे दिपले पाहिजेत.

यस डार्लिंग. 

संध्याकाळी, मोनाने पर्ल व्हाइट कलरचा गाऊन परिधान केला. खांद्यावर रुळणारे कुरळे केस  विंचरले. हलकासा मेकअप केला. गळ्यात एक प्लेटीनमची चेन..जिच्या पेंडंटमध्ये हिरा चमकत होता,त्याच डिझाइनचं ब्रेसलेट व इयररिंग्स.  राजनेही पर्ल व्हाइट कलरची शेरवानी घातली होती व गळ्यात सोन्याचा गोफ शोभून दिसत होता त्याला. लहानग्या ईशाला कामवाल्या मावशीकडे सोपवून दोघंही पार्टीत पोहोचली. 

 मनोज साहेबांच्या आईच्या वाढदिवसानिमित्त सोहळा आयोजित केला होता. मनोज व उर्मी आईला स्टेजवर घेऊन आले. सोबत त्यांची लेक आर्या होती. साहेबांच्या आईकडे पाहिलं नि मोना व राजला वाटलं आता धरती दुभंगावी व तिने त्यांना पोटात घ्यावं. याला कारणही तसंच होतं.

धोत्रे कुटुंब ..दादरच्या चाळीत रहाणारं..श्री.धोत्रे मिलमधे कामाला होते. त्यांच्या बायकोला सगळे जीजी म्हणायचे. या दोघांच्या संसारवेलीवरची फुलं म्हणजेच राज व रंजना. मिलमधे,श्री.धोत्रेंचा हात साच्यात अडकला. हाताची बोटं अपंग झाली. धोत्रेंना कामावरून कमी करण्यात आलं. जीजींपुढे आव्हान होतं,संसाराचा गाडा रेटण्याचं.

 घरात सासूसासरे होते. त्यांचं औषधपाणी पहायचं होतं जीजी पहाटे उठून घरातली सगळी कामं आवरायची,स्वैंपाक करुन ठेवायची. मुलांना शाळेत सोडून एका पोळीभाजी केंद्रात पोळ्या लाटायला जाऊ लागली. तरी हातातोंडाची गाठ घालणं कठीण होऊ लागलं.

 श्री. धोत्रेंनी अगरबत्ती विकायला सुरुवात केली. 
घाऊक बाजारातून अगरबत्तीची पाकिटं आणून गर्दीच्या वेळेला रस्त्यावर उभं राहून विकू लागले. मुलं मोठी झाली. उच्चविद्याविभूषित झाली. वयोपरत्वे जीजीच्या सासूसासऱ्यांनी जगाचा निरोप घेतला.  

दोन्ही मुलांनी प्रेमविवाह केले. रंजनाचा नवरा हा तिचा ऑफिसातला बॉस होता तर राजची मोना त्याच्या मित्राची बहीण होती. मोनाचं माहेर श्रीमंत होतं. वन रुम किचनमधे मोनाचा जीव घुसमटू लागला. शेवटी ती राजला घेऊन उंबरठ्याबाहेर पडली. 

त्यानंतर तिने एकदाही पलटून पाहिलं नव्हतं की सासूसासरे काय करत आहेत. राज दिवसेंदिवस यशाची शिडी चढत होता आणि मोना भरजरी दागिने,महागड्या साड्या,ड्रेसेस घालून त्याच्यासोबत पार्टीत मिरवत होती. 

दसरा,दिवाळी जवळ आली की जीजीला आपली मुलं भेटायला यावीसी वाटायचं. त्यात जीजीवर आणि एक अनिष्ठ कोसळलं. श्री.धोत्रेंना पक्षाघाताचा झटका आला. राज फक्त दोनदा येऊन बघून गेला. पन्नासेक हजार जीजीच्या हातावर टेकवून गेला. त्यानंतर परत त्यांना बघायला गेला नाही. 

जीजीचा फोन गेला की कट करायचा शेवटी शेजाऱ्याकरवी त्याला वडील गेल्याची बातमी कळवावी लागली. बाराव्या दिवशी राज व रंजनाने तिला ते चाळीतलं घर विकून पैसे आम्हाला वाटून दे म्हणून सांगितलं. जीजी तयार होईना. जीजी म्हणाली मला कोण सांभाळणार? तर राज व रंजना दोघांनीही एकमेकांकडे बोट दाखवलं.

जीजीने ठणकावून सांगितलं," मी मरेपर्यंत घर माझ्याच ताब्यात राहिल." जीजीची मुलं जीजीला बघायला येईनासी झाली. 

हल्ली जीजीचा खोकला वाढला होता. सारखी ढास लागायची. सकाळी आजुबाजूची लक्ष द्यायची पण रात्रीचा अंधार अंगावर यायचा तिच्या. जीजीला वाटायचं,'असंच खोकत खोकत ठसका लागून मी मरणार. कुणाला कळणार नाही. शेजारी जाग घेतील तेव्हा मी सताड पडलेली दिसेन त्यांना.' असे विचार मनात आले की तिला जास्तीच भीती वाटायची.

मासिक चाळत असताना जीजीला एक जाहिरात दिसली. एका छोट्या मुलीचा फोटो होता व बाजुला लिहिलेलं,'मला आजी पाहिजे..गोष्टी सांगणारी,माया करणारी,खाऊ करुन घालणारी.' खाली पत्ता दिलेला. मासिक वेतन दहा हजार रुपये,जेवूनखाऊन असंही लिहिलं होतं. जीजीने नवऱ्याच्या फोटोकडे पाहिलं मग तो पत्ता नीट टिपून घेतला. श्री. मनोज संजय इनामदार,समाधान बंगला,सावरकर पथ,मुलुंड पुर्व.

जीजीने मनोजला फोन लावला. मनोज स्वतः तिला न्यायला आला. मनोजची छोटी आर्या तापाने फणफणली होती. महिनाभर झाला,ताप येतजात होता. सगळे रिपोर्ट नॉर्मल होते. तापाचं कारण गवसत नव्हतं. शेवटी मानसोपचार तज्ञांना दाखवण्यात आलं तेंव्हा कळलं की तिची शाळेतली मैत्रीण देवयानी सारखं आजीबद्दल सांगत असते त्यामुळे आर्यालाही तिची हक्काची आजी हवी झाली होती. मनोजचे आईवडील दोघेही हयात नव्हते. उर्मीची आई जावयाच्या घरी रहाण्यास तयार नव्हती.

शेवटी मनोजने एका प्रसिद्ध मासिकात ही जाहिरात छापली. त्याची जाहिरात वाचून साताठ आज्या आल्या होत्या. मनोज व उर्मीने जीजीला निवडलं. 

जीजी घरात रहायल्या आल्यापासनं आर्याच्या तब्येतीत कमालीची सुधारणा होऊ लागली. जीजी आर्यासाठी लाडू वळायची, खीर,श्रीखंड,बुंदीलाडू,थालीपीठ, धपाटे करुन तिला व घरातल्या इतरांना खाऊ घालायची. आर्याला बागेत खेळायला घेऊन जायची,गोष्टी सांगायची.

 घरातली बारीकसारीक कामंही उर्मी नको म्हणत असतानाही स्वतःहून करायची. मनोजने तिला महिन्याचा पगार देऊ केला पण तिने तो घेतला नाही उलट म्हणाली,"पगार तर मी तुम्हाला दिला पाहिजे. तुमच्यामुळे माझा एकटेपणा दूर झाला." मनोजने जीजीचं मानधन तिच्या नावे पोस्टात ठेवायला सुरुवात केली.

वर्षभरात जीजी मनोजच्या कुटुंबाचा एक भाग बनली. मनोज व उर्मी दोघंही उच्चशिक्षित,श्रीमंत..पण त्यांना शिक्षणाचा अगर धनदौलतीचा गर्व नव्हता. मनोजने जीजीच्या डोळ्यातील मोतीबिंदूची शस्त्रक्रियाही करु घेतली. त्याने जीजीला एकदा तिच्या कुटुंबाविषयी विचारलं होतं तेंव्हा जीजीने त्याला दोन्ही मुलांबद्दल माहिती दिली होती पण जीजी स्वतःहून तिच्या मुलांची आठवण काढत नव्हती किंबहुना ती या नवीन कुटुंबात सुखी होती.

त्यादिवशी जीजी स्टेजवर आली. तिने केक कापताच टाळ्यांचा गजर झाला. मनोजने जीजी त्यांच्या आयुष्यात आल्यापासून त्या़च्या कुटुंबाची झालेली भरभराट,जीजीने त्या सगळ्यांना लावलेला लळा याबद्दल सहकाऱ्यांना सांगितलं. जीजीबद्द्ल क्रुतज्ञता व्यक्त करताना मनोजचं अंतःकरण भरुन आलं. मनोजने प्रत्येक कर्मचाऱ्याच्या आईवडिलांच्या औषधपाण्याचा खर्च हा कंपनी स्वतः पे करेल व लवकरच कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी एक सुसज्ज इस्पितळ उभारण्यात येईल असं जाहिर केलं. टाळ्यांचा कडकडाट झाला.

सगळीजणं जीजीला पुष्पगुच्छ व शुभेच्छा देऊ लागली,नमस्कार करु लागली. राज व मोना मुंगीच्या पावलांनी पुढे सरकत होती. जीचं घर ती विकायला निघालेली परंतु तिला आपल्या घरात ठेवण्यास तयार नव्हती अशा त्यांच्या आईच्या नजरेला नजर देण्याची हिंमत त्या दोघा नवराबायकोंत नव्हती. जीजीच्या सख्ख्या नातीला त्यांनी तिच्यापासून दूर ठेवलं होतं. कधी आजीनातीची भेट होऊ दिली नव्हती आणि इथे आर्याला जीजीसारखी प्रेमळ आजी मिळाली होती जी यांनी झिडकारली होती,एक ओझं..लचांड म्हणून..तीने घर विकून पैसे न दिल्याने तो रोष मनात बाळगून.

जीजीने मात्र शस्त्रक्रिया झालेल्या तिच्या डोळ्यांनी लेकाला व सुनेला ओळखलं व तोंड भरुन आशीर्वाद दिला. 

-------सौ.गीता गजानन गरुड.

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now