आज विज्ञानातील अद्भुत प्रगती पाहून मन अगदी थक्क होऊन जातं. आपण कोणी राजे महाराजे तर नाही ना! अस क्षणभर वाटू लागतं. कारण पूर्वी राजे महाराज्यांना जे शक्य नव्हतं ते आज सामान्य माणसाला शक्य झालेलं आहे. आजचे युग हे संगणकाचे युग आहे. संगणकामुळे संपूर्ण जग जणू जवळ आले आहे. म्हणूनच आज प्रत्येकासाठी संगणका विषयाचे ज्ञान असणे गरजेचे ठरले आहे.
लॅपटॉप हा एक प्रकारचा सूक्ष्म संगणक आहे म्हणजेच संगणकाचा एक सुटसुटीत प्रकार. यात हार्डवेअर चे घटक म्हणजेच माऊस, कीबोर्ड, मॉनिटर सर्व एकत्र केलेले असतात असतात. आणि वजनाने हलका व आकाराने लहान असल्यामुळे आपण तो कुठेही नेऊ शकतो.
सात आठ वर्षांपूर्वी मी आणि माझे मिस्टर मुलाकडे दुबईला गेलो होतो. एक महिना आम्ही तिथे राहणार होतो. वाचनासाठी आम्ही काही पुस्तके सोबत घेतली होती, पण ती लवकरच वाचून झाली. मुलगा व सून आपापल्या ड्युटीवर. ते दोघेही सकाळी निघाले ,की संध्याकाळी घरी यायचे.
मुलगा व सून दोघांनीही बरेचदा सुट्टी काढून आम्हाला दुबईतील सर्व महत्त्वाची ठिकाणे दाखवली. आजूबाजूला राहणारी, सर्व माणसे अपरिचित आणि अमराठी. मग दिवसभर काय करावे हा यक्षप्रश्न. त्यामुळे मुलाला सांगून गावी परत येण्याच्या विचाराने मनात घर केले. आणि हिम्मत करून संध्याकाळी जेवता जेवता यांनी मुलापुढे गावी परत जाण्याचा विचार बोलून दाखवला.
मुलगा म्हणाला, बाबा काय प्रॉब्लेम आहे मला तर सांगा. असं कसं मध्येच जायचं म्हणता तुम्ही? मी नाही तुम्हाला जाऊ देणार. तुम्हीच तर एक महिना राहणार असं बोलला होता. मग आता हे काय? एवढ्यातच कंटाळलात की काय? "नाही रे बाबा, तुम्ही दोघेही आपापल्या कामावर निघून जाता. आम्ही घरी काय करावे? इथे साधे मराठी वर्तमानपत्र सुद्धा मिळत नाही. मग मी वेळ कसा घालवणार."बाबांनी त्यांची खरी खरी अडचण सांगितली.
"अरेच्चा एवढेच ना! बाबा, मराठी वर्तमानपत्र तुम्हाला रोज वाचायला मिळेल अशी मी व्यवस्था करतो, तर मग झालं? यांना खूप आनंद झाला. मुलाने लगेच लॅपटॉप काढला. त्याचे बाबा आश्चर्याने पाहू लागले. बाबा, तुम्हाला पाहिजे ते वर्तमानपत्र रोजच्या रोज यावर वाचायला मिळेल. "ते कसे शक्य आहे? बाबा म्हणाले. आता सगळं शक्य आहे बाबा. संगणकाचे युग आहे आता आपण काही सेकंदातच जगातील कुठलीही माहिती घरबसल्या उपलब्ध करून घेऊ शकतो.
चला मी तुम्हाला प्रत्यक्षच दाखवतो. असे म्हणून त्याने लॅपटॉप उघडला. नेट सुरु केले. आणि त्याच्या बाबांना म्हणाला सांगा बाबा तुम्हाला कोणतं वर्तमानपत्र वाचायचं आहे. बाबांनी सांगितलेल्या वर्तमानपत्राचे नाव मुलाने लगेच इंटरनेटवर लिहिले. आणि क्षणात पडद्यावर तशी अक्षरे दिसू लागली. यांचा चेहरा एकदम खुलला. मुलाने त्या वर्तमानपत्राचे एक एक पान उघडून दिले. अगदी आनंदात यांनी पटापट सर्व बातम्या वाचून काढल्या आणि विचारले, काय रे रोज सकाळी मला ताजं वर्तमानपत्र वाचता येईल कां? अवश्य, मुलगा म्हणाला.
मुलाने लॅपटॉप चालू करण्यापासून ते वर्तमानपत्र कसे वाचायचे ते सर्व शिकवले. आता त्याचे बाबा रोज न चुकता वृत्तपत्र वाचू लागले. सहाजिकच गावी परत जाण्याचा विचार ते विसरले. दुसऱ्या दिवशी मुलाने पुन्हा आणखी बरीच माहिती बाबांना सांगितली. बाबा, यावर कॉलेजचा प्रवेश अर्ज सुद्धा भरता येतो बरं. कॉलेजच्या प्रवेश अर्ज? बाबांनी आश्चर्याने विचारले. आणि त्यांना त्यांचा भूतकाळ आठवला.
पूर्वी निकाल जाहीर झाला की प्रवेशासाठी कॉलेजवर गर्दी दिसायची. प्रवेश अर्ज घेण्यासाठी एक रांग, भरलेला प्रवेश अर्ज तपासण्यासाठी दुसरी रांग, आणि प्रवेश अर्ज जिथे द्यायचा ती वेगळी रांग. असे दोन-तीन दिवस चालायचे. बाबा भूतकाळात हरवले. "आमच्या काळात असं काहीही नव्हतं, संगणकाच्या शोधामुळे खरंच किती सुविधा झाली आहे. बाबा म्हणाले.
बाबा, संस्थाप्रमाणेच व्यक्तींची ही संकेतस्थळे (वेबसाईट) तयार करता येतात. एखाद्या संस्थेविषयीची किंवा व्यक्तीची माहिती त्याच्या विशिष्ट संकेतस्थळावर जाऊन घेता येते. घरी बसून तुम्ही ऑफिसची कामे करू शकता. विमान, रेल्वे तिकीट बुक करणे, टेलिफोन, विज बिल आपण घरबसल्या भरू शकतो. ई-मेल द्वारे आपण पाठवलेलं पत्र क्षणात दुसऱ्या देशात पोहोचतं.
धन्य आहे या मायक्रो संगणकाची. खरंच तुमची पिढी खूप भाग्यवान आहे. आणि तुमच्या सोबतच आम्ही भाग्यवान ठरलो आहोत. बाबा म्हणाले. आणि आता रोज मुलगा घरी आल्यावर गमतीने बाबांना विचारायचा. "बाबा मग कधी करायची तिकिटे गावाला जाण्याची?"आणि आम्ही सर्वजण खळखळून हसायचो.
आणि बरेच दिवस राहिल्या नंतर आम्ही आता गावाला जाण्यासाठी निघालो. निघायच्या वेळी मुलाने त्याच्या बाबांसाठी एक नवीन लॅपटॉप सुद्धा घेऊन दिला. आणि म्हणाला बाबा, आता तुम्हाला केव्हाही यायचं असेल किंवा आणखी कुठे बाहेरगावी फिरायला जायचे असेल तर यावरूनच तुम्ही तिकीटे बुक करा बरं कां. आणि हो, आईलाही सोबत नेत चला, नाहीतर एकटेच फिरालं. आणि पुन्हा एकदा हास्याची कारंजी उडाली.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा