Login

वडा (मला) पाव अंतिम

Wada Pav
"बेसनाचा डब्बा कुठे आहे ?"अजयने किचन मधूनच ओरडून विचारले

"जसा तू वडापाव विसरलास ना तसंच मी किचन मधलं सगळं सामान कुठे ठेवल आहे ते सगळंच विसरले रे"

अजय आता चांगलाच भडकला होता आपण वडापाव काय विसरलो ही तर पूर्ण बदलाच घ्यायला निघाली होती पण मातीही स्वतःच खाल्ली होती म्हणून त्याचा नाईलाज होता शेवटी त्याने कसाबसा बेसनाचा डब्बा शोधून काढला

बेसन शोधेपर्यंत त्याने बटाटे उकडायला घातले होते आलं मिरची लसूण पेस्ट ही करून झाली पण बेसन नेमकं किती पातळ भिजवावं हे काही त्याला समजेना शेवटी त्यांनी युट्युब सुरू केलं बरेच व्हिडिओज पाहिले पण त्याला अंदाज काही येत नव्हता शेवटी कसं बसत पीठ भिजलं बटाटेही उकडले बटाटे चांगलेच गरम असल्यामुळे भाजत होते कसेबसे त्यांनी साल काढले आणि त्याची भाजी बनवली एक एक गोळा करून त्याने पिठात भिजवला आणि गरम तेलात सोडला

पण वडे फुटले त्याला काहीच समजेना मग त्याच्या लक्षात आलं की बेसनाचे पीठ पातळ झालं आहे आता काय बरं करावे शेवटी त्याने त्याचे ब्रह्मास्त्र काढले त्याच्या आईला व्हिडिओ कॉल केला

"आई अग हे बटाटेवडे करतोय मी बेसनाचे पीठ जरा पातळ झाले आता काय करू बघ ना हे वडे असे फुटले"

"अय्या तू बटाटेवडे करतोयस का रे मिनू ला डोहाळे बिहाळे लागले की काय....गुड न्यूज....अग्गोबाई"

"आई तुझ्या सगळ्या स्वप्नांच्या इमल्यांवर पटकन बुलडोझर फिरव असं काहीही नाहीये" म्हणत अजयने थोडक्यात काय झाले आणि का तो बटाटेवडे करतोय हे त्याच्या आईला सांगितले

"अगोबाई म्हणून मिनू ने तुला चक्क बटाटेवडे करायला लावलं? ?"

"हो ना यार आई बघ ना ग कशी करते"

" तुझ्या बाबांनी असं काही केलं असतं ना...तर मी काय त्यांना बटाटेवडे करायला लावले नसते"

"हो ना!!!माझी काळजीच नाही ग मीनूला"

"मग काय चांगला आठवडाभराचा स्वयंपाक करायला लावला असता तुझ्या बाबांना तिने फक्त बटाटे वड्यांवर निभावलं"

आपल्या आईचे हे शब्द ऐकून अजय नकळत म्हणाला
"आई तू माझी आईच आहेस ना की तिची आई आणि माझी सासू आहेस अशक्य आहात बाबा तुम्ही दोघी"

त्या दोघांच्या या गप्पा मिनू हॉलमधून ऐकत होती सासुबाईंचे हे शब्द ऐकून ती पटकन किचनमध्ये आली आणि त्यांच्या हसण्यात सामील झाली पण अजयची रोखलेली नजर बघून तिने आपला हसू आवर्त घेतलं आणि "चालू द्या तुमचं" म्हणत परत हॉलमध्ये जाऊन टीव्ही बघू लागली

शेवटी अजयच्या आईने व्हिडिओ कॉल वर कसं बस त्याला पीठ व्यवस्थित कसं करायचं ते सांगितलं फुटलेले वडे जणू अजयला खिचवत होते आता नेक्स्ट वडे तरी चांगले व्हावेत नाहीतर भाजी संपेल आणि परत बटाटे उकडण्यापासून सगळं साग्रसंगीत करावं लागेल म्हणून अजयने मनातच देवाला हात जोडले आणि दोन वडे तेलात सोडले

पण काय आश्चर्य ...हा हा...वडे अगदी छान जमले खुशीतच त्याने ते दोन गरम गरम वडे पाव मध्ये घालून मिनू समोर धरले मिनुनेही पटकन एक वडापाव घेतला आणि तोंडात घातला चव खरंच अप्रतिम झाली होती पण हे असं सांगितलं तर नवरा शिफारेल म्हणून ती म्हणाली

"बरंय सुखी चटणी तिखट चटणी गोड चटणी नाहीये पण चालेल करते मी ऍडजेस्ट"

अजय तर मारक्या म्हशीसारखा तिच्याकडे बघू लागला

"अजय अरे दोनच वडापाव खाऊन माझं मन भरणार नाहीये आता म्हणजे बघ ना दोन तास ...दोन तास होऊन गेले रे माझ्या वडापाव खायच्या इच्छेला"

"हो मॅडम अजून तळतोय वडे तोपर्यंत हे दोन तरी खा" म्हणत अजय परत किचनमध्ये गेला बाकीचे वडेही छान जमले पण पातळ पीठ जाड करण्याच्या नादात आता पीठ फारच उरलं होतं आता या पिठाचं काय करायचं याच विचारात तो असताना मिनू अचानक मागून आली आणि म्हणाली

"असू दे हे पीठ फ्रीजमध्ये ठेव उद्या याचे धिरडे करून घाल मला"

"हे बघा मिनू आईचं म्हणणं तू अगदी मनावर घेऊ नकोस झालं...तुला वडापाव खायचा होता.. तुला वडापाव बनवून दिला आता बास"

आता मात्र मीनल ला फारच हसू येऊ लागलं कसं बस तिने कंट्रोल केलं आणि म्हणाली

"देवा ...वटवृक्षा...वडा ... पावलास की नाही माहित नाही पण आज माझ्या नवऱ्याच्या कृपेने वडा मात्र पावला" असं अगदी नाटकी स्वरात म्हणत तिने अजून दोन वडापाव फस्त केले आणि एक कटाक्ष ओट्यावर टाकून म्हणाली
"कसा आहे ना अजय रोज जेव्हा मी स्वयंपाक करते ना कट्टा मीच आवरते रे"

"हो हो मॅडम आवरतो हा सगळा पसारा मीच आवरतो मग तर झालं" म्हणत अजय परत किचन आवरायला लागला. मिनूला मात्र फारच हसू येऊ लागलं त्याचं त्याचा तो चिडलेला चेहरा बघून तिला आवरलच नाही आणि तिने पटकन फोन काढून त्याचा एक फोटो काढला आणि थेट आपल्या सासूबाईंनाच पाठवला

अशाप्रकारे हा 'वडा' मिनू ला चांगलाच 'पाव'ला पण वड्याच्या नादात अजयचा जीव मात्र अर्धा....नाही नाही..अर्ध्याने पाव (चतकोर) होऊन गेला

मग कसा वाटला यांचा वडापाव चा किस्सा तुमचेही आहेत का असे छान कॉमेडी किस्से असतील तर कमेंट मध्ये नक्की सांगा आणि कथा आवडली का तेही सांगा

🎭 Series Post

View all