वचन... भाग 10

एका मुलीच्या वचनाची कथा


©®शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )

वचन.... भाग 10

मागील भागात आपण पाहिले...

नव्या जोडप्याचा नवा संसार सुरू झाला. पण सतत घरात माणसांची लगबग असल्याने चारू आणि सूरजला हवा तसा एकांत मिळत नव्हता. पण तरीही दोघे खुश होते. कारण दोघेही सोबत होते. चारूच्या माहेरच्या वातावरणात आणि इथे सासरी सगळ्याच गोष्टीत जमीन आसमानचा फरक होता. पण चारू अड्जस्ट करण्याचा प्रयत्न करत होती. त्यात तिला साथ होती सायलीची. सायली चारूला सांभाळून घेत होती. चुकलं माकलं की समाजावून सांगत होती त्यामुळे दोघींची छान गट्टी जमली.

आता पुढे...

सूरजचारूला म्हणावा तसा एकांत मिळतं नव्हता. सायलीच्या हे समजत होतं. तिने सुरजकडे चारूला चार दिवस बाहेर घेऊन जाण्याबद्दल सांगितलं. पण सुरजचा त्याला नकार होता.

नवीन नोकरी, लग्नात झालेला खर्च यामुळे फिरायला जाण्यासाठी नव्याने खर्च करण्याची आता तरी मुळीच तयारी नाही म्हणत सुरजने सायलीचा प्रस्ताव नाकारला.
चारूलाही ते पटतं होतं.

पण स्वस्थ बसेल ती सायली कसली तिने ऑफिसमधून गुपचूप महाबळेश्वरचं पाच दिवसांचं हनिमून पॅकेज बुक केलं. चारूला जेव्हा हे समजलं तिने सायलीला घट्ट मीठी मारली.

"सायली ताई मला ना बहीण ना भाऊ पण माझी मोठी बहीण असती तर कदाचित तुमच्या इतकीच प्रेमळ असती. किती करता हो तुम्ही घरातल्यांसाठी. तुम्हाला पाहिलं की भीती वाटते तुमच्या सारखं वागायला नाही जमलं तर. मी या घरात माझी जागा कशी निर्माण करेन "चारू म्हणाली

"ए वेडाबाई अगं माझ्या सारखं वागायची काही गरज नाही. तू जशी आहॆस तशीच चांगली आहॆस. पण आता इथेच बोलत बसणार आहॆस का? पॅकिंग कोण करणार पळ लवकर. "सायली म्हणाली.

चारू आणि सुरजने आपलं पॅकिंग केलं. दुसऱ्या दिवशी सकाळीच ते महाबळेश्वरला निघाले.

-------------------------------------------------------------------
"सायू बाळ मी काय म्हणतेय. सूरज चं लग्न झालं. त्याला आणि राजेशलाही नोकरी लागलीय. दोघंही आपापल्या पायावर उभी आहेत. तू तुला दिलेलं वचन पूर्ण केलंस. पण आता तू तुझ्या आयुष्याचा विचार कर. तुला असं एकट्याने आयुष्य जगताना पाहून आम्हांला किती यातना होतं असतील ह्याची कल्पना तुला आई झाल्याशिवाय नाही यायची.आता तरी लग्नाचा विचार कर " मालती सायलीला समजावत म्हणाली.

"आई मला सगळं समजतंय पण खरं सांगू नाही जमणार गं मला असं कोणाच्याही गळ्यात माळ घालायला "

"मला माहीत आहे सायू बाळ समर आजही मनाच्या एका कोपऱ्यात जिवंत ठेवला आहॆस तू. पण अगं त्याचं लग्न झालेलं असेल. तू नकार दिल्यावर तो का बसेल तुझी वाट बघत.त्यालाही आयुष्य सुखाने जगायचा अधिकार आहेचं की. तू ही आता आयुष्यात पुढे जाण्याचा निर्णय घे."मालती म्हणाली.

आई आपण या विषयावर नंतर बोलूयात का? अरे हो आज सुरजचारू परत येतायत. काय बनवूयात जेवायला"  सायली विषय बदलत म्हणाली.

सूरज आणि चारू महाबळेश्वरून परत आले. महाबळेश्वरच्या गमतीजमतीच्या गप्पा चांगल्याच रंगल्या. रात्र खूप झाली झोपा म्हणतं मालतीने सगळ्यांनाच झोपायला पाठविले.

तेवढ्यात सुरजचा फोन वाजला. एवढ्या रात्री कोण फोन करतंय म्हणत सुरजने फोन हाती घेतला. फोन चारूच्या मॉमचा होता. रात्री एक वाजता आलेल्या फोनने सगळेच चिंतीत झाले. सुरजने फोन उचलला पलीकडून रडतच चारुची मॉम बोलू लागली.

"सूरज तुम्ही चारूला घेऊन ताबडतोब इकडे या "

"मॉम पण झालंय काय मला काही सांगाल का तुम्ही प्लीज"

"चारूच्या बाबांना पॅरालिसिस चा अटॅक आला आम्ही त्यांना हॉस्पीटल मध्ये घेऊन आलोय. मला एकटीला काहीच सुचत नाही आहे. प्लिज माझ्या चारूला घेऊन लवकर या."

"हो मॉम आम्ही निघतोच तुम्ही काळजी करू नका. होईल सर्व ठीक."

सुरजने फोन ठेवला. काही तरी घडलंय याचा अंदाज सगळ्यांनाच आला होता. त्यामुळे सगळे आतुरतेने वाट पाहत होते की नक्की सूरज आता कसली बातमी देतोय. चारूच्या डॅड बद्दल सांगितल्यावर सगळ्यांनाचं धक्का बसला. चारू तर रडायलाच लागली. सगळ्यांनी तिला कसंबसं शांत केलं. राजेशने ola बुक केली.

अर्ध्या तासातच सूरज आणि चारू हॉस्पिटलमध्ये पोहचले. चारूला पाहून तिची मॉम आपल्या लेकीच्या गळ्यात पडून रडू लागली.

चारूने आपल्या मॉमला धीर दिला. थोडं शांत झाल्यावर चारुची मॉम बोलू लागली. " तुझ्या डॅड ने आयुष्यात कधीच कोणाचं वाईट केलं नाही की कधी कोणाला दुखावलं नाही.मग त्यांच्या बाबतील का बरं असं व्हावं "

"मॉम काळजी नको करू डॅडला काही नाही होणार " चारू म्हणाली.

डॉक्टरांना भेटण्याविषयी नर्स कडे निरोप दिला.डॉक्टरांनी चारू आणि सुरजला आपल्या केबिन मध्ये बोलावले व सगळं सविस्तर समजावून सांगितले.

"हे पहा, मिस्टर माणिकशेठला अर्धांगवायुचा अटॅक येऊन गेलाय.त्यामुळे त्यांची शरीराची उजवी बाजू तोंडापासून ते पाया पर्यंत लुळी पडली आहे. ते ना नीट बोलू शकतात. ना स्वतःचं कामं स्वतः करू शकतात. ते आपल्या प्रत्येक कामासाठी दुसऱ्यावर अवलंबून आहेत. तुम्ही त्यांची काळजी घ्या. कदाचित त्यांना वेळेवर हॉस्पिटल मध्ये आणलं असतं तर ही वेळ आपण टाळू शकलो असतो.पण आता त्यांची खूप काळजी घ्यावी लागेल."

"पण डॉक्टर माझे डॅड बरे होतील नां "

"त्यांना रिकव्हर व्हायला किती वेळ लागेल नाही सांगू शकतं. पण तुम्हाला धीर धरायला हवा."

चारूने आपल्या मॉमला विचारले की हे सगळं असं अचानक कसं काय घडलं.

तेव्हा चारूच्या मॉमने तिला सांगितले. तुझे डॅड आपल्याला त्यांच्या कामापासून सतत लांब ठेवत आले हे तर तुला माहीतच आहे. त्यांनी आजपर्यंत मोठ्या कष्टाने आणि प्रामाणिकपणाने हे यशाचं शिखरं गाठलंय पण यश म्हटलं की त्याबरोबर शत्रूही आलेच. तुझे डॅड एका मोठया प्रोजेक्टवर काम करणार होते. त्यासाठी त्यांनी मार्केटमधून पैसेही उचलले. पण जी व्यक्ती तुझ्या डॅड कडे प्रोजेक्टची ऑफर घेऊन आलेला तो एक फ्रॉड माणूस होता तो सगळे पैसे घेऊन पसार झाला आहे.

तुझ्या डॅडला जेव्हा हे समजलं त्यांना तो धक्का सहनच झाला नाही. हे जेव्हा समजलं तेव्हा ते ऑफिसमध्ये होते. त्रास व्हायला लागला तसं त्यांनी ड्रायव्हरला घरी सोडायला सांगितलं. ड्रायव्हर त्यांना दवाखान्यात जाण्यासाठी विनंती करत होता पण ह्यांनी काही ऐकलं नाही.मी ठीक आहे म्हणत घरी निघून आले.
घरी आल्यावर जास्तच त्रास सुरू झाला तेव्हा कुठे मी त्यांना तातडीने हॉस्पिटलला हलवलं.पण आम्हांला यायला थोडा वेळच झाला नाहीतर तुझे डॅड आज या अवस्थेत नसते गं चारू " म्हणत चारू ची मॉम रडू लागली.

"पण मॉम तुला हे सगळं कसं समजलं."

"तुझ्या डॅडच्या ऑफिसमध्ये फोन केल्यावर त्यांच्या सेक्रेटरीने सगळं सांगितलं "

खरं तर हा सगळा माणिकशेठच्या हितशत्रुंचाच बनाव होता. माणिकशेठला आधी फायद्याचं आमिष दाखवायचं आणि मग त्याच्याकडून पैसे लुबाडून त्याला कंगाल करायचं. त्याचं नाव एकदा का मार्केट मध्ये खराब झालं की कोणीही त्याच्या बरोबर काम करायला तयार होणार नाही. आणि झालंही अगदी तसंच.

पण माणिकशेठला तो धक्का सहन झाला नाही आणि त्यांची ही अवस्था झाली.

माणिकशेठला घरी आणलं पण आपल्या मॉम आणि डॅडच्या आधारासाठी काही दिवस इथेचं राहायचा विचार चारूने केला तशी तिने मालती आणि सायलीकडून परवानगीही घेतली. सूरज सुद्धा आपल्या या परिस्थितीत चारू ला आधार देण्यासाठी आपल्या सासुरवाडीत राहिला.

माणिकशेठला बिझनेस मध्ये झालेला लॉस भरून काढणं खूप आवश्यक होतं. पण माणिकशेठची ही अवस्था असताना हा सगळा डोलारा सांभाळणार कोण असा प्रश्न निर्माण झाला? कारण चारूच्या मॉमला ही या बिझनेस मधलं काही माहीत नव्हतं. चारूनेही आजवर आपल्या डॅडच्या बिजनेसकडे ढुंकून पाहिलं नव्हतं आणि तिला त्यात इंटरेस्ट ही नव्हता.

त्यावेळी चारूच्या मॉमने सूरजच नाव सुचवलं या क्षणी आपला बिझनेस सांभाळणारा कोणी केपेबकल पर्सन असेल तर तो सूरजच आहे.असं म्हणत सूरजच्या नावावर शिक्कामोर्तब केलं.

पण सूरज या सगळ्याला तयार होईना. त्याला माणिकशेठच्या बिझनेसमध्ये काडीचा इंटरेस्ट नव्हता.आपलं काम भलं मी भला असं म्हणत त्याने हात जोडले. तेव्हा सुरजला मनवण्याची जबाबदारी चारूच्या मॉमने सायलीवर टाकली.

सायली सुरजला राजी करू शकेल का? माणिकशेठच्या आजारपणामुळे सायलीच्या घराची सुरळीत चाललेली घडी विस्कटेल का? जाणून घेऊयात पण पुढच्या भागात तोपर्यंत सायोणारा ?

©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )