वचन..... भाग 5
भाग 4ची लिंक...
https://www.irablogging.com/blog/wachan....-bhag-4_6300
मागील भागात आपण पाहिले....
"अगं पण ताई तू सायूशी ह्याबद्दल काही बोललीस का? तिला कसा मुलगा हवाय? नाहीतर ती कोणाच्या प्रेमाबिमात नाही ना पडली.आजची पिढी प्रेमाविवाहालाचं जास्त प्राधान्य देतेय."
"सुलु तू आपल्या सायूला ओळखत नाही वाटतं. प्रेमाबीमाच्या भानगडीत ती नाही पडणार आणि तसं काही असलंच तर ती सगळ्यात आधी मला सगळं सांगेल "
तसं असेल तर आजच लागते बघ कामाला म्हणत सुलुने फोन ठेवला.
तसं असेल तर आजच लागते बघ कामाला म्हणत सुलुने फोन ठेवला.
मालतीला तर आपण सायूच्या लग्नाची अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटू लागलं.
आता पुढे...
सायली आली की तिचा मूड पाहून तिच्या समोर लग्नाचा विषय काढायचा मालतीने ठरवलं.त्यासाठी आज जेवणात सगळा बेत सायलीच्या आवडीचा होता. आलूमटार ची भाजी, व्हेज पुलाव, फुलके आणि गोडामध्ये बासुंदी.
सायलीला एखाद्या गोष्टीसाठी राजी करायचं म्हटलं की तिचा आवडता मेनू पुढे करायचा मग काय सायली क्षणभरातच विरघळून जायची हे मालतीला चांगलंच ठाऊक होतं.
सायली घरी आली. मालतीने तिला फ्रेश व्हायला सांगितलं तोपर्यंत ताटं करायला सुरुवात केली. सूरज, राजेश, सुदेश, सायली आणि मालती सगळेच एकत्र जेवायला बसले.
ताटात आपले आवडीचे पदार्थ पाहून सायली खुश झाली.
"क्या बात हैं आई आज काय खास आहे बरं. एकदम स्पेशल मेनू बनवला आहॆस."
"काही खास नाही गं बऱ्याच दिवसात तुझ्या आवडीचं काही बनवलं नव्हतं म्हटलं आज वेळ आहे तर करावं." मालती म्हणाली
सूरज राजेशला डोळा मिचकावत म्हणाला " पाहिलंस दादा या घरात आपल्याला कोणी विचारतही नाही. सगळे फक्त ताईचे लाड पुरवण्यात बिझी आहेत. आम्ही जसे या घरात कोणी नाहीच आहोत ".
"गप बसा रे आठवडा भर तुमच्याच आवडी निवडी जपत असते मी. सायलीची तशी ताकीदच आहे. मग एक दिवस तिच्या आवडीचं बनवलं तर तुमच्या पोटात दुखायला लागलं काय रे "
"नाही गं आई सूरज मस्करी करतोय तू कुठे त्यांचं ऐकत बसतेस पण जेवणं खूप छान झालंय " सायली आपल्या भावाची बाजू घेत म्हणाली.
जेवणं आटोपली आणि सगळी आवराआवर करून मालती आणि सायली झोपायला आल्या.
"सायू बाळ आज ऑफिसमध्ये फार दगदग झाली असेल ना. दमली असशील. दे मी तुझ्या डोक्याची मालिश करते. बरं वाटेल तुला " मालती सायलीशी बोलण्यासाठी बहाणाचं शोधत होती.
सायलीच्या डोक्याची मालिश करता करता मालतीने सायलीजवळ हळूच विषय काढला.
"सायू बाळ आज मी तुझ्या सुलु मावशीला फोन केलेला ".
"हो का, काय म्हणतेय मावशी सगळे ठीक आहेत ना "
"हो सगळे ठीक आहेत गं,त्याचं झालं काय सायू सुलुशी गप्पा मारता मारता सहज तुझ्या लग्नाचा विषय निघाला. तर मी म्हटलं सुलूला बघ आपल्या सायूसाठी एखादं चांगलं स्थळं. मी ठीक केलं ना. तसंही आता तेवीसावं लागेल तुला. मुलीच्या जातीचं वेळेतच लग्न झालेलं चांगलं गं. तुझ्या वयाच्या चाळीतल्या सगळ्यां मुलींची लग्न झालीत." मालती एका दमात सगळं बोलून गेली आता प्रतीक्षा होती सायुच्या प्रतिक्रियेची
"आई झालं तुझं बोलून. चल झोप खूप रात्र झालीय. उद्या ऑफिसलाही जायचं आहे मला. " सायली आपला चेहरा अगदीच निर्वीकार ठेवत म्हणाली.
"अगं पण मी इतक्या महत्वाच्या विषयावर बोलतेय. बरं तुला कोणी आवडत असेल तर तसंही सांग आम्ही तयार आहोत तुझी पसंत स्वीकारायला " मालती अगदीच अजिजीने बोलत होती.
"आई झोपुयात का आपण आता. मला सकाळी लवकर उठायचंय" म्हणत सायली पांघरून तोंडावर घेऊन झोपी गेली.
"काय करायचं या मुलीचं? देवच जाणो नक्की हिच्या मनात काय सुरू आहे. लक्ष असू दे रे बाबा "म्हणत मालतीने आपले दोन्ही हात देवापुढे जोडले.
---------------------------------------------------------------------
अलिबागला जाताना ऑफिसमधूनच सगळ्यांना पिकअप करणार असल्याने आज सायलीने सहालाच घर सोडलं.
मालतीने शंभरदा तरी नीट जा,काळजी घे,फोन कर,एकटी इकडे तिकडे जाऊ नको तुझ्या ऑफिसच्या लोकांसोबतचं रहा म्हणून सायलीला बजावले होते.
"आई तू माझी काळजी करू नको मी नीट जाईन आणि नीट परत येईन. तू तुझी आणि बाबांची काळजी घे " असं म्हणून सायली निघाली.
बसमध्ये सगळेच खूप खुश होते. दोन दिवस नुसती धम्माल करायची. नो वर्क नो टेंशन. फक्त एंजॉय. अलिबागला गेल्यावर प्रत्येकजण आपण कशी मजा करूयाची याची प्लॅनिंग करत होते.
बस एक संधी आणि मी माझी दिलं की बात सायलीला सांगणार असा विचार करत समर मनातल्या मनात खुश होता .
सायली मात्र खिडकीतून येणारा वारा आपल्या चेहऱ्यावर घेत एकटक खिडकी बाहेर पहात होती. तिच्या बाजूलाच श्वेता बसली होती.
सायली मात्र खिडकीतून येणारा वारा आपल्या चेहऱ्यावर घेत एकटक खिडकी बाहेर पहात होती. तिच्या बाजूलाच श्वेता बसली होती.
"सायली आपण ट्रीपला जातोय ट्रीपला आणि तू असा सॅड फेस करून काय बसली आहॆस यार. चल चिल मार ना. जे काही टेन्शन असेल ते लांब पळव बरं. आणि चल ही ट्रिप मस्त एंजॉय करूयात "
तेवढ्यात कोणीतरी बस ड्रायव्हरला सांगितलं अरे भाई इतना सन्नाटा क्यों हैं. पिकनिक मूड बनाने के लिये कोई अच्छासा गाणा ही चला दो.
ड्रायव्हरने एफ एम वर गाणं लावलं.
किशोर कुमार आणि लता दिदिंच्या सुरेल आवाजात गाणं सुरु होतं.
"गुम हैं किसीके प्यार मे दिल सुबह शाम
पर तुम्हे लिख नही पाऊ मैं उसका नाम हाय राम
पर तुम्हे लिख नही पाऊ मैं उसका नाम हाय राम
सोचा हैं इक दिन मैं उससे मिलके
केह डालू अपने सब हाल दिल के
और कर दू जीवन उसके हवाले
फिर छोड दे चाहे अपना बना ले
मैं तो उसका रे हुआ दिवाना
अब तो जैसा भी मेरा हो अंजाम "
केह डालू अपने सब हाल दिल के
और कर दू जीवन उसके हवाले
फिर छोड दे चाहे अपना बना ले
मैं तो उसका रे हुआ दिवाना
अब तो जैसा भी मेरा हो अंजाम "
हे गाणं जणू काही समरच्या मनातील भावनाचं व्यक्त करत होतं.
"बस अब और इंतजार नही हॊता" समर पुटपुटला.
सकाळी नऊ वाजता बस अलिबागला पोहचली. समरने आधीच रिसॉर्ट बुक केलं होतं. सगळे आपापल्या रूम मध्ये जाऊन फ्रेश होऊन ब्रेकफास्ट साठी रिसॉर्टच्या हॉटेल मध्ये भेटायचं ठरलं.तिथून पुढे पुढच्या प्रवासाच प्लॅनिंग ठरणार होतं.
साडेदहा अकराच्या सुमारास सगळे ब्रेकफास्ट करून आधी अलिबाग बीचवर जायचं ठरलं.बसने सगळे काही वेळातच अलिबाग बीच वर पोहचले. अथांग असा पसरलेला समुद्र त्याच्या फेसाळणाऱ्या लाटा, शहरातल्या गोंगाटाला लाजवेल अशी निस्तब्ध, निरव दूरवर अशी पसरलेली शांतता, माणसांची वर्दळ असली तरी एक वेगळीच शांतता अनुभवायला मिळत होती.
समुद्रकिनाऱ्यापासून काही अंतरावर असणारा कुलाबा किल्ला आपल्याच दिमाखात उभा होता.
पायाला गुदगुल्या करणारी मऊ मऊ काळी वाळू.समुद्रकिनारी उंचच उंच वाढलेली सुरुची, नारळाची झाडं मन वेधून घेतल्याशिवाय राहतं नव्हती.
वॉटर स्पोर्ट्स ची सुद्धा सोय होती.
किनाऱ्यावर येणाऱ्या लाटा अंगावर झेलत. अलिबाग बिचच्या सौन्दर्याची मजा अनुभवण्यात सगळेच गुंग होते. कोणी नुसतंच समुद्राच्या लाटेत भिजन्याची मजा घेत होतं तर कोणी वॉटर स्पोर्ट्स च्या माध्यमातून समुद्रलाच गवसणी घालत होतं.
किनाऱ्यावर मिळणारं शहाळ्याच पाणी, भेळ, आईस्क्रीम, पॅटिस मुळे खवय्येगिरिंची चांगलीच चंगळं झाली होती.
पण या सगळ्यात सायली तिथे असूनही नसल्यासारखी उगाच कुठेतरी आपल्याच विचारात हरवल्यासारखी वाटतं होती.
श्वेताने तिला पाण्यात भिजायला येण्याचा खूप आग्रह केला. पण माझं मन नाही असं कारण सांगून सायली तिथेच बसून राहिली.
वाळूत बसून दूर क्षितिजाकडे एकटक पाहत बसलेल्या एकट्या सायलीकडे समरचं लक्ष गेलं. कदाचित हीच संधी आहे सायलीशी बोलण्याची असा विचार करून समर सायली जवळ गेला.
"Hi मिस सायली. मी तुमच्या सोबत इथे बसलं तर चालेल ना तुम्हाला " सायली शेजारी बसत समर म्हणाला.
"माफ करा तुम्ही हो म्हणायच्या आतच मी बसलो. मला नाही वाटत तुम्हांला माझ्या इथे बसण्याने काही प्रॉब्लेम होईल. मी तुमच्या साठी एक चांगली कंपनी होऊ शकतो "
सायलीने समर कडे पाहिलं. समरने पटकन आपले शब्द वळवले. " i mean इथे बसण्यासाठी " समर हसत म्हणाला.
"मिस सायली. तुम्ही अश्या एकट्या इथे का बसला आहात? बाकी सगळ्यांना का जॉईन करत नाही. पहा सगळे कसे धमाल करत आहेत. तुम्हाला नाही आवडत का एन्जॉय करायला."
"तसं काही नाही सर माझा मूड नाही बस इतकंच "
"Ohh म्हणजे तुमचा मूड खराब आहे तर. मग मला काहीतरी केलं पाहिजे तुमचा मूड ठीक करण्यासाठी. सांगा मी काय करू की ज्याने तुमचा मूड ठीक होईल "
"त्याची काही गरज नाही सर. आणि तुम्ही उगाच माझ्यासोबत बसून तुमच्या एन्जॉयमेंट वर विरजन नका टाकू. मी ठीक आहे तुम्ही एन्जॉय करा."
"मिस सायली एका बॉसची जबाबदारी असते की त्याचा प्रत्येक कर्मचारी आनंदी असावा. मग तुम्ही अश्या उदास असताना मी कसा एन्जॉय करू शकेन "
"खरंच सर तुम्ही जा एन्जॉय करा.मी ठीक आहे. "
"मिस सायली तुम्हांला स्वतःच्याच कोषात रहायला फार आवडतं ना?"
"असं काही नाही. " सायली वाळूत पायाने उगाच चाळवाचाळव करीत म्हणाली.
"मी जितकं तुम्हांला पाहिलंय. तुम्हांला समजून घेतलंय त्यावरून एक गोष्ट मी नक्की सांगू शकतो की तुम्ही तुमच्या आनंदाला तुमच्या आत कुठेतरी बंदिस्त करून ठेवलंय. आयुष्य खूप सुंदर आहे मिस सायली . एकदा मोकळ्या मनाने जगण्याचा प्रयत्न तर करा. तुमच्या अवतीभवती तुम्हांला पसंत करणारी, तुमच्यावर प्रेम करणारी बरीच माणसे आहेत. फक्त उघड्या डोळ्यांनी बघण्याचा अवकाश आहे.तुमच्यावर प्रेम करणारी तुम्हाला जीव लावणारी व्यक्ती इथेच कुठेतरी तुमच्या प्रतीक्षेत असेल. किमान त्यांचा विचार करून त्यांच्या आनंदासाठी आनंदी राहण्याचा प्रयत्न करा."
"सर मला वाटतं श्वेता मला बोलावत आहे माफ करा तुमचं बोलणं असं अर्धवट तोडलं पण मला जायला हवं." सायली विषय बदलत म्हणाली.
"मिस सायली मला तुमच्याशी खूप महत्वाच्या विषयावर बोलायचं आहे."
"पुन्हा कधीतरी बोलूयात सर पण मला आता जायला
हवं " असं म्हणत सायली तिथून सटकली.
हवं " असं म्हणत सायली तिथून सटकली.
सूर्य जसा मावळतीला निघाला. सगळे पुन्हा रिसॉर्टवर जाण्यासाठी निघाले.दिवसभराच्या थकव्याने रात्रीच्या जेवणानंतर सगळेच गाढ झोपी गेले.
दुसऱ्या दिवशी अलिबागच्या बाजरपेठेत काही खरेदी करायची व जवळपासच्या मंदिरात दर्शनाला जायचं ठरलं. कारण रात्री रिसॉर्टवर तिथल्या पर्यटकासाठी स्पेशल नाईट पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
---------------------------------------------------------------------
मालतीने सुलूला फोन केला.
"सुलु मला काळजी वाटतेय गं सायूची "
"आता सायू काय लहान आहे का ती तिची काळजी घेऊ शकते. तसंही एकटी नाही ती सगळं ऑफिस आणि ते समर सर आहेत सोबत. असं तूच म्हणाली होतीस ना. मग कशाला उगाच काळजी करतेस "
"ते नाही गं. मी सायूच्या लग्नाबद्दल बोलतेय. मी तिला म्हटलं की सुलूला तुझ्यासाठी चांगला मुलगा शोधायला सांगितलं आहे तर काहीच उत्तर देईना. बरं तुला कोणी आवडतं का असं विचारलं तर त्याचही उत्तर नाही दिलं. मग तूच सांग काय समजायचं मी. पोरीच्या मनात काय आहे ते त्या देवालाच ठाऊक "
"ताई कशाला काळजी करतेस. हे बघ सायू आली ट्रिपवरून की मी स्वतःचं बोलते तिच्याशी. मग तर झालं. आता उगाच टेन्शन घेऊ नको आनंदी रहा "
समरला संधी मिळेल का आपलं प्रेम व्यक्त करण्याची? काय कारण होतं ज्यामुळे सायली उदास झाली? अजून काय नवीन वळण येईल सायलीच्या आयुष्यात? जाणून घ्यायचंय ना मग लवकरच भेटूयात पुढच्या भागात. सायोनारा
आणि हो ते कथा वाचल्यावर प्रतिक्रिया द्यायची असते ते आहे न लक्षात ?
©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा