वचन.... भाग 8

एका मुलीच्या वचनाची कथा


©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )


वाचकहो काही कारणास्तव कथेचा भाग टाकण्यास विलंब झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे. यापुढील भाग वेळेवर पोस्ट होतील ?

वचन... भाग 8

मागील भागात आपण पाहिले...

सायलीने ऑफिस पुन्हा जॉईन केले. समरच्या जागी नवीन बॉस आले. सायलीच आयुष्य पुन्हा समर येण्या पूर्वी होतं त्या स्थितीतं सुरू झालं. पण एक जखम खोलवर कुठे तरी नक्कीच झाली होती ज्याच्या वेदना सायली आणि समर दोघांनाही सहन कराव्या लागणार होत्या.

आता पुढे....

सायलीने आपलं वचन पाळण्यासाठी समरला आपल्या पासून कायमचं दूर केलं.सायलीचा हा निर्णय तिच्या कुटुंबातील इतर व्यक्तीसोबतच चाळीतल्या इतर घरातही पोहचला होता. काहीजण सायलीच्या निर्णयाचं,तिच्या धाडसाच कौतुक करत होते तर काहीजण सायलीच्या मूर्खपणावर हसत होते पण सायलीला यातल्या कोणत्याच गोष्टीने फरक पडत नव्हता.

मालती सुदेश मात्र आपल्या लेकीच्या निर्णयाने फारच दुःखी झाले होते.सुदेश तर स्वतः लाच दोष देतं होता की हे सगळं त्याच्या मुळे झालंय. ना त्याचा अपघात झाला असता ना सायलीवर कुटुंबाची जबाबदारी पडली असती. आणि ना आज तिच्या आयुष्याची अशी वाताहत झाली असती.

समर गेल्यानंतर सायली मध्ये झालेला बदल आणि कोणाला आपलं दुःख कळू नये म्हणून रात्री अपरात्री रडणारी सायली मालतीने पाहिली. वरवरून सायलीने समर बद्दल आपल्या मनात काहीच नाही असं दाखवलं असलं तरी समर तिच्या मनात घर करून गेलाय हे समजायला आई म्हणून मालतीला फार वेळ लागला नाही.

आपल्या लेकीला सावरावं की रडून तिला मोकळं होऊ द्यावं हाच प्रश्न मालतीला सतावत होता. सायली मात्र आपलं दुःख सगळ्यापासून लपवून ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत होती.

आपलं दुःख बाजूला सारून सायलीने आपलं सगळं लक्ष आपल्या भावांचं स्वप्नं पूर्ण करण्यावर केंद्रित केलं.

सुरजने सिपीटी आणि आयपिसीसी दोन्ही परीक्षा क्लिअर केल्या. आणि तीन वर्षांसाठी त्याची आर्टिकलशिप सुरू झाली.C. A ची फायनल परीक्षा क्लिअर करून त्याने स्वतः चं आणि आपल्या बहिणीचं स्वप्नं साकार केलं.

सूरजच्या C. A होण्याच्या आनंदात सायलीने सगळ्या चाळीत पेढे वाटले.सुरजला एका खाजगी कंपनीत नोकरी ही मिळाली.

त्याच्यापाठोपाठच राजेशनेही डॉक्टरकी मध्ये फिजिओथेरपीस्ट होण्याचा निर्णय घेतला. BPT म्हणजेच Bachelor of Physiotherapy चा चार वर्षांचा कोर्स पूर्ण करून सहा महिन्यांची इंटर्नशिपचा प्रवासही सुरू झाला.

हा सगळा सायलीच्या त्यागाचा तिच्या मेहनतीचाच परिणाम होता.

सायली आपल्या दोन्ही भावांसाठी खूप खुश होती . तिचं स्वप्नं प्रत्यक्षात उतरत होतं. सूरज आणि राजेश आपल्या स्वप्नांची एक एक पायरी यशस्वीरित्या चढत होते. पण त्या प्रत्येक पायरीवर सायलीच भविष्य अधिकाधिक अंधारातं जात होतं.

मालतीसुदेशच्या लग्नाचा वाढदिवस होता . सायलीने आज ऑफिसमधून सुट्टी घेतली आईबाबांसाठी तिने खास आमरस पुरीचा बेत आखला होता आणि जोडीला बाबांचा आवडता मसालेभात. सूरज आणि राजेशलाही ताकीद दिली की संध्याकाळी घरी लवकर या आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस मिळून साजरा करूयात.

दोघेही लवकर येण्याचं आश्वासन देऊन बाहेर पडले खरे पण सूरज वेळेच्या आधी म्हणजे दुपारीच घरी आला.त्याला असं अचानक लवकर आलेलं  पाहून सायलीला आश्चर्य वाटलं पण सुरजचा चेहरा सांगत होता त्याला सायलीशी काहीतरी बोलायचं आहे.

सायली सूरज जवळ जाऊन म्हणाली, काय रे काही टेंशन आहे का. संध्याकाळी येतो म्हणालास आणि दुपारीच घरी आलास. आल्यापासून गप्प गप्पच आहॆस. काही झालंय का? मला नाही का सांगणार?

"सांगायचं तर आहे ताई पण कसं सांगू कसं बोलू तेच कळत नाही आहे " सूरज म्हणाला

"अरे तुझ्या ताईला सांगणार नाहीस का? "

"ताई कॉलेज मध्ये असताना माझी चारुशी ओळख झाली. ओळखीचं रूपांतर प्रेमात झालं. आमच्या बद्दल आम्ही कोणालाच काही सांगितलं नाही कारण मला आधी माझ्या पायावर उभं राहायचं होतं. तिचे वडील बिल्डर आहेत. चारू त्यांची एकुलती एक मुलगी.त्यामुळे खूप लाडाकोडात वाढली आहे. फार नाही पण तिला पोसण्या इतकं तरी मी कमावतो याची खात्री त्यांना पटली तरच ते लग्नाला होकार देतील.तिच्या घरचे लग्नासाठी तिच्यामागे लागलेत.त्यामुळे चारूने आता तगादा लावलाय की मी घरात तुम्हांला सगळं सांगून लग्नासाठी तुमचा होकार मिळवायचा आणि तिच्या आई बाबांशी लग्नाची बोलणी करायला त्यांच्या घरी जायचं." सूरज ने सगळी हकीकत सांगितली.

"काय रे बदमाश मुलगी पसंद केलीस आणि मला कानोकान खबर सुद्धा लागू दिली नाहीस होय " सायलीने सुरजचा कान पिरगाळत म्हटलं.

"सॉरी गं ताई माफ कर मला " सुरजने हात जोडले.

"अरे पण मग तुझी अडचण काय आई बाबांना सांगूयात सगळं आणि जाऊयात या रविवारीच तुझी दुल्हन पहायला "

"पण हे कसं शक्य आहे ताई "

"का शक्य नाही बरं काय अडचण आहे मला सांगशील का तू "

"ताई तुझं लग्न होण्याआधी मी कसं लग्न करणार, लोकं काय म्हणतील "

"तू नको लोकांचा विचार करुस. तुझं चारुवर आणि चारूच तुझ्यावर प्रेम आहे न मग झालं तर आयुष्य आपलं आहे ते कसं जगायचं त्याचा निर्णय पूर्णपणे आपला आहे. मुलगी म्हटली की प्रत्येक आई वडिलांना तिचं लग्न व्हावं. योग्य वर मिळावा हीच इच्छा असते. चारूचे आई बाबा तिच्या मागे लग्नासाठी लागले असतील तर त्यात काही चूक नाही. आणि चारू जी तुझ्यावर विश्वास असल्याने शांत बसली होती तिचाही विचार आपण करायला हवा. आणि माझ्या लग्नाचं म्हणशील तर आता मी लग्नच करणार नाही आहे.(मनाच्या कोपऱ्यात आज ही समर नावाचं पान सायलीने जपून ठेवलंय )त्यामुळे माझ्या लग्नासाठी माझ्या भावांची लग्न मुळीच अडणार नाहीत त्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोसं. सगळं नीट होईल "

"पण ताई......" सूरज काही बोलणार तोच सायलीने त्याला टोकलं

"आता पण नाही आणि बिन नाही."

"आणि आई बाबा ते तयार होतील का लग्नाला " सूरज ने प्रश्न उपस्थित केला.

"आई बाबांचं मी पाहून घेते. एक कामं कर चारूला संध्याकाळी घरी बोलावं. आई बाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे.होणाऱ्या सुनबाईला आशीर्वादासाठी समोरच उभं करूयात मग पाहू कसे नाही म्हणतायत." सायली म्हणाली.

सुरजने लागलीच चारूला फोन केला. त्याचं आणि सायलीचं झालेलं बोलणं सायलीचा प्लॅन सगळं काही सांगून संध्याकाळी आपल्या घरी येण्याचं आमंत्रण दिलं

सायली स्वयंपाकाला लागली. मालती तिला मदत करू पहात होती पण सायलीने मालतीला स्वयंपाक घरापासून लांबच ठेवलं. आज सगळं मी पाहणार तू फक्त आराम कर म्हणत. सायलीने आवरायला सुरुवात केली. जेवण तयार होताच. हॉल नीटनेटका केला. सगळं व्यवस्थित आहे ना चार वेळा तरी चेक केलं.

"सायू काय गडबड आहे मला सांगशील का? आज मला कोणत्या कामाला हात लावू देत नाही आहेस. आणि घर पण आवरते आहॆस. आपण नेहमीची चार माणसं तर आहोत मग कशाला धावपळ करत आहॆस बरं " सायलीची चाललेली लगबग पाहून मालती म्हणाली.

"आज की नाही तुझ्या साठी एक सरप्राईज येणार आहे."
सायली म्हणाली.

"सरप्राईज!!! आता ते कशाला तू जे आमच्या साठी केलंस ते काही कमी आहे का? आता त्यात ह्या सरप्राईजची भर कशाला?"

"आई,आई आधी ऐकून तर घे. सरप्राईज माझ्या कडून नाही सूरज कडून आहे. संध्याकाळी केक कापायच्या वेळी मिळेल " सायली हसत म्हणाली.

मालतीला आश्चर्य वाटलं की सूरज नक्की काय सरप्राईज देणार आहे. पण जाऊ दे विचार करत बसण्यापेक्षा संध्याकाळीचं पाहुयात काय आहे ते असं मालतीने ठरवलं.

वाढदिवसाची सगळी तयारी झाली. राजेशही आज लवकर आला. सायलीने आई साठी छान जांभळ्या रंगाची आणि सोनेरी काठाची बुट्ट्या बुट्ट्याची साडी घेतली होती तर सुदेश साठी मरून रंगाचा जरदोसी वर्क केलेला कुर्ता.

मालतीसुदेश तयारी करून बाहेर आले. सूरजचं सगळं लक्ष दाराकडेच होतं. कधी एकदा चारू घरी येतेय असं त्याला झालेलं.सायलीने दोघांच औक्षण केलं. तेवढ्यात दारावर टकटक झाली . केसांचा बॉबकट असलेली टाईट जीन्स आणि शॉर्ट ती शर्ट परिधान केलेली एक तरुणी दारात उभी होती. सुरजने पुढे जाऊन तिचं स्वागत केलं.

अचानक आलेल्या पाहुणीला पाहून सायली आणि सुरजला सोडून सगळेच चकित झाले. मालतीने नजरेनेच सायलीला विचारले ही कोण?

सायली पुढे होतं चारुची सगळ्यांना ओळख करून दिली.

"आईबाबा ही चारू.सुरजची कॉलेजची मैत्रीण आहे. मीच सुरजला म्हटलं आज आईबाबांच्या लग्नाचा वाढदिवस आहे तर बोलावं तिला घरी तेवढीच आपल्या सगळ्यांशी तिची ओळख होईल."

सायलीने औक्षणाचं ताट चारू कडे देऊन तिला आईबाबांचं औक्षण करायला सांगितलं. चारूने औक्षण केले आणि ती सूरजच्या बाजूलाच खुर्चीवर जाऊन बसली.

मालतीसूदेशला चारुचा तो हेअर कट, तिचा पोशाख आणि आता सूरजच्या अगदी जवळ जाऊन बसणं अजिबात आवडलं नाही.पण बोलणार कोणाला?पाहुणी आहे म्हणत दोघेही गप्प बसले.

केक कटिंग झाल्यावर सगळ्यांची जेवणं आटोपली.चारू जेवण करून निघाली तिचा ड्राइवर गाडी घेऊन चाळीतच्या बाहेर रस्त्यावर उभा होता सूरज चारूला गाडी पर्यंत सोडायला आला.

"कशी वाटली चारू माझ्या घरातील सर्व माणसे " सुरजने चारूला प्रश्न विचारला.

"माणसांचं ठीक रे पण एवढाश्या घरात लग्नानंतर कसं अड्जस्ट करणार आपण " चारू नाक फुगवत म्हणाली.

"मी करेन काहीतरी तू नको टेंशन घेऊ. सायलीताई आईबाबांना काही झालं तरी मनवेल. पण तुझ्या घरातल्याना तुलाच तयार करावं लागेल."

"तुला माहीत आहे ना मॉम डॅड मला कोणत्याचं गोष्टी साठी नाही म्हणत नाही. मी पसंत केलेल्या मुलाला त्यांना होकार द्यावाचं लागेल. इतके दिवस ते माझ्यासाठी स्थळं शोधत होते पण मी कसबसं त्यांना टाळत होते ते फक्त तुझ्या जॉब साठी. आता तुझ्या कडे जॉब आहे तर काही अडचणच नाही. मला खूप कंटाळा आलेला प्रत्येक वेळी त्यांना कारण सांगून आता हे सगळं संपणार फायनली मी आपल्या बद्दल त्यांना सांगणार. सूरज मी जाम खुश आहे" चारू आनंदून म्हणाली

सुरजने चारुचा निरोप घेतला आणि तो घरी आला तेव्हा सगळे निवांत गप्पा मारत बसले. मध्येच सायलीने चारुचा विषय काढला.

"कशी वाटली आईबाबा चारू तुम्हांला?" सायलीने प्रश्न केला.

"कशी वाटली म्हणजे आम्ही नाही समजलो " इति मालती

"आईबाबा मी आणि चारू एकमेकांना पसंत करतोय आम्हांला लग्न करायचं आहे पण तुमची परवानगी असेल तर " सूरज मालतीसुदेशला उद्देशून म्हणाला.

"तू आधीच सगळं ठरवलं आहॆस तर मग हा परवानगीचा देखावा कशाला " सुदेश चिडून म्हणाला.

मालतीने सुदेशला शांत केलं आणि सुरजला उद्देशून म्हणाली " अरे तुझ्या मोठया बहिणीचं अजून लग्न झालं नाही आणि तू बोहल्यावर चढायची तयारीही केलीस. आमचा नाही पण ज्या बहिणीने तुमच्या साठी एवढा मोठा त्याग केला तिचा तरी जरा विचार करायचा "

सायली मालतीसुदेशला समजावू लागली. " आई बाबा काय फरक पडतो मोठ्या बहिणीच्या आधी लहान भावाचं लग्न झालं तर असं कुठे लिहून ठेवलंय का की आधी मोठ्याच आणि मगच लहाण्याचं लग्न व्हावं. सूरज आणि चारू एकमेकांना पसंत करतात बिचारी चारू आपल्या सुरजला नोकरी लागेपर्यंत तिच्या आई वडिलांना कशी बशी थोपवत आली आहे. आपण तिचा विचार नको करायला का? आणि माझ्या लग्नाचं उगाच टेंशन घेऊ नका ते जेव्हा व्हायचं आहे तेव्हा होईलच. "


मालतीसुदेश चारू सुरजच्या लग्नाला होकार देतील का? चारूच्या रूपाने सायलीच्या कुटुंबात वादळ तर प्रवेश करत नसेल? जाणून घेऊयात लवकरच पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा ?

©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )