वचन... भाग 7
मागील भागात आपण पाहिले...
मालती काही उत्तर देणार तोच सायली म्हणाली " सर तुम्ही काही बोलण्याआधी मला तुम्हां सर्वांशीच बोलायचं आहे. मला माहित होतं माझं रेजिग्नेशन पाहून तुम्ही मला भेटण्यासाठी नक्की याल. आज जे काही बोलायचंय, जे काही व्हायचंय ते सगळ्यांसमोरचं होऊ देतं. "
मालतीला उद्देशून सायली म्हणाली " आई बाबांनापण बाहेर घेऊन ये मला तुम्हां सर्वांशीच बोलायचं आहे. "
मालती सुदेशला घेऊन आली. समर सह त्या दोघांनाही उत्सुकता होती की नक्की सायली काय बोलणार आहे.
आता पुढे....
"सायली अगं बोल लवकर आमचा जीव नुसता टांगणीला लागलाय. काय झालंय नक्की काही बोलशील का " मालती अक्षरश:काकूळतीला येऊन म्हणाली.
"सायू बेटा काय झालंय सांग बरं आम्हांला" सुदेश सायलीला म्हणाला.
समरलाही सायली काय बोलतेय याची तीव्र उत्सुकता होती. त्याच्या आयुष्याचा प्रश्न जो होता.
मला माहीत आहे तुम्हां तिघांनाही खूप उत्सुकता लागून आहे की मला तुमच्याशी काय बोलायचं आहे. तुमच्या मनात अनेक प्रश्नही आहेत.आज मी त्या सगळ्यांचीच उत्तरे देणार आहे.
"आई तुला आठवत असेलच गेल्याच आठवड्यात तू माझ्या लग्नाचा विषय काढलास. सुलु मावशीला स्थळ ही सुचवायला सांगितलंस. तुला अपेक्षा होती त्यावर मी काहीतरी बोलावं. पण मी शांत राहिले.तुला काहीच उत्तर दिलं नाही. "
"हो पण त्याचा आता इथे काय संबंध सायू "
"तेच सांगतेय आई आम्ही अलिबागला ट्रिपला गेलो. तिथून आल्यावर मी शांत शांत होते तू मला त्याचं कारणही विचारलंस पण त्यावेळी खरं काय ते मी तुला सांगू शकले नाही.
आम्ही ट्रीपला गेलो तेव्हा समरसरांनी त्यांचं माझ्यावर असणारं प्रेम व्यक्त केलं. त्यांना अपेक्षा होती मी त्यांना हो म्हणेन पण तसं काही झालं नाही." सायली म्हणाली.
मालती आणि सुदेश एकमेकांकडे पाहतच राहिले.
"समर सर तुम्ही खूप चांगले आहात. तुम्हांला माझ्यापेक्षाही चांगली मुलगी भेटेल. जी तुम्हांला जीवापाड जपेल. तुमच्यावर प्रेम करेल."
"मिस सायली जर मी इतकाच चांगला असेन तर दुसरी मुलगी का म्हणून? ते ही माझं तुमच्यावर प्रेम असताना. माफ करा आई बाबा मी असं स्पष्टचं तुमच्या समोर बोलतोय. पण माझं तुमच्या मुलीवर खूप प्रेम आहे. आणि मी तिच्याशीच लग्न करू इच्छितो." समर म्हणाला
"पण मी ना तुमच्यावर प्रेम करू शकते ना लग्न "
"पण का मिस सायली माझ्या कडून काही चूक झाली आहे का? की माझ्यात काही कमी आहे "
"नाही सर तुमच्यात काही कमी नाही. पण मी तुमचा प्रस्ताव नाही स्वीकारू शकतं "
"मला कारण जाणून घेण्याचा पूर्ण अधिकार नक्कीच आहे मिस सायली की तुम्ही मला का नकार देत आहात "
मालती सुदेश तर या सगळ्या चर्चेने गोंधळूनच गेले होते.
सायलीने समरला सुदेशच्या अपघाता पासूनची सर्व हकीकत सांगितली. सुदेशचा अपघात, सायलीचा निकाल, त्या जोरावर मिळालेली नोकरी, कोलमडलेली घराची आर्थिक घडी व्यवस्थित करण्यासाठी मालती आणि सायलीने घेतलेले कष्ट, सूरज आणि राजेशचं अल्लड वय, त्यांचं शिक्षण, सूरज राजेशची स्वप्नं.सुदेशच अपंगत्व आणि या सगळ्यांची सायलीने आपल्या खांद्यावर घेतलेली जबाबदारी.
"समर सर मी स्वतःलाच एक वचन दिलंय. जोपर्यंत माझ्या भावांचं शिक्षण त्यांचं करिअर घडत नाही. तोपर्यंत मी स्वतःचा आणि स्वतःच्या सुखाचा विचार देखील करणार नाही. दुसरं म्हणजे माझे आई बाबा त्यांची साथ मी आयुष्यात कधीही सोडणार नाही. ते माझी फक्त जबाबदारी नाहीत तर एक मुलगी म्हणून त्यांना आयुष्यभर साथ देणं माझं कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी माझ्या शेवटच्या श्वासा पर्यंत पाळेन."
"सायू बाळ वेडी आहेस का कसलं वचन आणि कसलं कर्तव्य घेऊन बसलीस. आयुष्याने इतकी चांगली संधी दिली आहे. समर सारखा मुलगा तुझ्या आयुष्यात आला तर तुझ्या आयुष्याचं सोनं होईल. आणि हे कसलं खुळ घेऊन बसली आहॆस. "मालती सायलीला समजावत म्हणाली
"आई हे फक्त एक खुळ नाही मी मलाच दिलेलं वचन आहे. जे मी मरेपर्यंत पाळेन."
"मिस सायली मी समजू शकतो तुमच्या कुटुंबाबद्दल तुमच्या असलेल्या भावना. आता पर्यंत मी फक्त तुम्हांला पसंत करत होतो तुमच्यावर वर प्रेम करत होतो पण आता या क्षणापासून माझ्या मनात तुमच्या बद्दल आदराची भावना आहे. एक मुलगी असूनही तुम्ही तुमच्या कुटुंबाचा इतका विचार करत आहात . पण तुमच्या या प्रवासात मी सुद्धा तुमच्या सोबत उभा राहून तुमच्या कुटुंबाची जबाबदारी घ्यायला तयार आहे.
आपल्या लग्नानंतरही तुमची पहिली प्रायोरिटी तुमचं कुटुंबच राहिलं याचं वचन मी तुम्हांला देतो "समर सायलीचं मन वळवीण्याचा प्रयत्न करू लागला.
आपल्या लग्नानंतरही तुमची पहिली प्रायोरिटी तुमचं कुटुंबच राहिलं याचं वचन मी तुम्हांला देतो "समर सायलीचं मन वळवीण्याचा प्रयत्न करू लागला.
"सर एकाच वेळी दोन दगडावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तर कधी तरी बॅलन्स जाणारच. लग्नानंतर जर मी माझ्या आई बाबांना माझ्या कुटुंबाला जास्त महत्व दिलं तर तो तुमच्या कुटुंबासोबत अन्याय होईल आणि सासरच्या कुटुंबाची जबाबदारी पार पाडता पाडता माहेरी दुर्लक्ष झालं तर तो माझ्या कुटुंबासोबत अन्याय होईल. मी माझं वचन पाळू शकले नाही तर मी स्वतः लाच कधी माफ करू शकणार नाही.
तुमचे कुटुंब तुमचे आई बाबा यांना तुमच्या कडून व त्यांच्या होणाऱ्या सुनेकडून सासरचं तिची प्रायोरिटी असावी अशी अपेक्षा असणारच. आणि ती अपेक्षा रास्तच आहे लग्नाचा निर्णय घेऊन मी कोणाच्याही अपेक्षा नाही वाढवू शकत. कारण लग्न म्हटलं की एक सून म्हणून सासरच्या लोकांना जपणं माझी जबाबदारी पण आहे आणि कर्तव्य. आणि एका वेळी मी कोणत्या तरी एकाच जबाबदारीला कर्तव्याला न्याय देऊ शकेन.
माझ्या प्रेमाखातर तुम्ही मला साथ द्याल ही पण माझ्या एका वचनासाठी मी तुम्हांला दुसऱ्या वचनात नाही बांधू शकतं. तुमचं स्वतः चही वैयक्तिक आयुष्य आहे. माझ्या मुळे तुम्हांला किंवा तुमच्या कुटुंबाला कोणताही त्रास होतं असेल तर ते मला मुळीच आवडणार नाही.
संसार म्हटलं की त्यात अडकनं आलंच आणि मला तेच नको आहे. माझ्या कुटुंबाची जबाबदारी माझी आहे जोपर्यंत माझे भाऊ त्यांच्या आयुष्यात सेटल होतं नाहीत तोपर्यंत तरी मी माझ्या आयुष्याचा माझ्या आनंदाचा विचार करणार नाही. " सायली ठामपणे म्हणाली.
"ठीक आहे मग मी तुmchyसाठी थांबायला तयार आहे मिस सायली, तुमचं वचन पूर्ण होईपर्यंत मी थांबेन कारण आता इतर कोणत्या मुलीचा विचार सुद्धा मी नाही करू शकत " समर सायलीला म्हणाला.
"नाही सर तुमच्या कुटुंबात तुम्ही एकटेच आहात. तुमचे आई बाबा तुमची पहिली प्रायोरिटी आहे. माझ्यासाठी तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अन्याय नाही करू शकत "
"पण मिस सायली माझं ऐकून तर घ्याल "
"माफ करा समर सर पण माझा निर्णय झालेला आहे. आणि तो आता कोणत्याही परिस्थितीत बदलणार नाही. तुम्ही माझा विचार सोडलेलाच बरा.तुम्ही तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा विचार करा."
"तुमचा हाच निर्णय असेल तर माझा ही निर्णय ऐका मिस सायली माझ्या आयुष्यात तुमच्या शिवाय मी कोणालाही येऊ देणार नाही "
"नाही समरसर तुम्ही तुमच्या आई बाबांचा विचार करा तुमच्या लग्नाबाबत त्यांचीही काही स्वप्न असतील. जर मी माझ्या कुटुंबासाठी इतका मोठा निर्णय घेऊ शकते तर तुम्हांलाही तुमच्या आई बाबासाठी,त्यांच्या आनंदासाठी लग्न केलंच पाहिजे. प्लिज समर सर मला वचन द्या तुम्ही लग्न कराल.तुमच्या कुटुंबासाठी प्लिज मला वचन द्या "
मालती आणि सुदेशने सायलीला खूप समजाविण्याचा प्रयत्न केला पण सायली आपल्या निर्णयावर ठाम होती.
"ठीक आहे सायली तुला जे हवं तेच होईल. तुझ्या वचन आणि कर्तव्यामध्ये मी आड येणार नाही. यापुढे पुन्हा कधीही मी तुझ्या आयुष्यात डोकावणार नाही. पण एक कर तुझं रेजिग्नेशन माघारी घे. तुला या जॉबची सर्वात जास्त गरज आहे. मी तुझ्या आयुष्यातूनच काय पण हा जॉब आणि हे शहर सोडून इथून कायमचा निघून जाईन. पुन्हा कधीही तुझ्या वाटेला येणार नाही. मी लग्न करण्याचं वचन नाही देणार कारण मी ते पूर्ण करू शकेन की नाही ते मला नाही माहीत. मिस सायली माझं तुमच्या वर प्रेम आहे. होतं आणि कायम असंच राहील.
जाता जाता फक्त माझ्या एका प्रश्नाच उत्तर हवंय मला मिस सायली तुमच्या मनात माझ्या बद्दल प्रेमाची भावना कधीच नव्हती का?"
जाता जाता फक्त माझ्या एका प्रश्नाच उत्तर हवंय मला मिस सायली तुमच्या मनात माझ्या बद्दल प्रेमाची भावना कधीच नव्हती का?"
"समर सर काही प्रश्नांची उत्तरे न समजलेलीच बरी असतात त्याने दुःख ही कमी होतं आणि आयुष्य जगायला ही सोपं वाटतं. माफ करा पण या प्रश्नाचे उत्तर नाही देता येणार मला "
समर तिथून निघून गेला. मालतीसुदेशला तर समजेनाच सायलीच्या निर्णयाचा अभिमान व्यक्त करावा की तिने समर सारखा एक चांगला आयुष्याचा जोडीदार गमावला म्हणून दुःख व्यक्त करावं.
त्या रात्री सायलीच्या घरात एक भयाण शांतता होती. सूरज आणि राजेशला जेव्हा सायलीचा हा निर्णय समजला त्यांनीही सायलीला समजवीन्याचा प्रयत्न केला. पण सायली आपल्या निर्णयावर ठाम होती.
रात्री सगळे झोपल्यावर इतका वेळ दाबून ठेवलेलं दुःख सायलीच्या डोळ्यातून अखेर बाहेर पडलंच.
माफ करा मला समर सर मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर नाही दिले कारण तुम्हांला जर समजले असते की मला ही तुम्ही आवडता तर तुम्ही माझ्या साठी आयुष्यभर थांबायची तयारी दर्शवली असती. आणि तेच नको होतं मला. तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी व्हावं हीच अपेक्षा आहे माझी. माझ्या मुळे तुमच्या आयुष्यात गुंता निर्माण झाला असता आणि ते नको आहे मला. माझं वचन ही माझी जबाबदारी आहे आणि त्यासाठी इतर कोणाला वेठीस धरणं मला नाही आवडणार.
--------------------------------------------------------------------
समरने सायलीला तिचं रेजिग्नेशन माघारी घ्यायला लावले. आणि स्वतः मात्र आपले रेजिग्नेशन हेड ऑफिसला पोहचवले. समरचा ह्या तडका फडकी घेतलेल्या निर्णयाने सगळा ऑफिस स्टाफ आश्चर्यचकित झाला. समरने ऑफिस तर सोडलेच पण आपल्या आई बाबा सोबत त्याने हे शहर सुद्धा सोडले आणि कायमचा निघून गेला सायलीच्या आयुष्यातून सायलीला आपलं वचन पाळता यावं म्हणून. तसही यापुढे समरला सायलीचा सामना करणं खूप अवघड गेलं असतं. ती समोर असताना तिला विसरणं शक्यच नव्हतं म्हणूनच समरने हा निर्णयघेतला.
सायलीने ऑफिस पुन्हा जॉईन केले. समरच्या जागी नवीन बॉस आले. सायलीच आयुष्य पुन्हा समर येण्या पूर्वी होतं त्या स्थितीतं सुरू झालं. पण एक जखम खोलवर कुठे तरी नक्कीच झाली होती ज्याच्या वेदना सायली आणि समर दोघांनाही सहन कराव्या लागणार होत्या.
वाचकहो सायलीचा निर्णय जरी कठोर असला तरी आयुष्यात पुढे येणाऱ्या समस्यांचा विचार करून काही निर्णय घ्यावे लागतात. सायलीने फक्त सुखी वर्तमानाचा विचार न करता भविष्यात येणाऱ्या समस्यांचा विचार केला. स्वतःलाच दिलेलं वचन पाळण्यासाठी आपलं आयुष्य पणाला लावलं. खूप कमी लोकं असतात आयुष्यात स्वतः ऐवजी इतरांचा विचार करणारी, परिणामांचा विचार न करता स्वतः च सुख न पाहता आपलं आयुष्य दुसऱ्यासाठी वाहून देणारी.
आजचा भाग तुम्हाला कसा वाटला हे तुमच्या कमेंट मधून नक्की कळवा धन्यवाद ?
सायली आणि समरचे मार्ग कायमचे वेगळे झाले. आता नवीन काय वळण येईल सायलीच्या आयुष्यात जाणून घेऊयात पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा ??
©®शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा