©® शितल ठोंबरे (हळवा कोपरा )
वचन.... भाग 4
मागील भागात आपण पाहिले....
सायलीला खूपच टेन्शन आलं होतं. समरला वारंवार सामोरं जाणं. कानावर पडलेलं अर्धवट सत्य. त्याने तर तिची झोपच उडाली होती. ती स्वतः लाच समजविण्याचा प्रयत्न करीत होती की समर सरांच्या मनात तिच्या बद्दल नक्कीच काही नसेल. पण दुसऱ्याच क्षणी मनात विचार येई जर श्वेता म्हणतेय तसं काही असलं तर म्हणजे मी समर सरांना आवडतं असेन तर. नाही नाही हे शक्यच नाही. सायली स्वतःच्याच विचारांच्या गुंत्यात अडकत चालली होती.
आता पुढे....
गोल्डन ज्यूबली सेलिब्रेशनच्या निमित्ताने आठवडाभर ऑफिस मध्ये नुसती धावपळ सुरू होती. प्रत्येकजण आपली जबाबदारी चोख पार पाडत होतं.ऑफिसच्या गोल्डन ज्यूबली कार्यक्रमात कुठेचं काही कमी पडू नये म्हणून ऑफिसमधील सगळीच मंडळी प्रयत्न करीत होती.
या आठवडाभरात सायलीही सतत समरच्या संपर्कात येतं होती. समरचं तिला उगाच हसवण्याचा प्रयत्न करणं. ती दमलेली दिसली की तिची स्पेशल कॉफी मागवणं. चोरून चोरून तिच्याकडे पाहणं.सायलीची नजर जाताच आपली नजर चोरणं.हे सगळंच सायलीच्या नजरेतून सुटलं नव्हतं.
पण सायली आपल्या वागण्यातून समरला मुळीच जाणवू देतं नव्हती की समरच्या मनात जे सुरू आहे त्याबद्दल तिला आधीच कल्पना आली आहे.
समरला मात्र सायलीच अबोल राहणं अधिकच त्रास देतं होतं. पण तिच्या शांत सालस स्वभावामुळे तो तिच्याकडे अधिकच ओढला जाऊ लागला.
सायली क्षणभरही नजरेआड गेली की तिला पाहण्यासाठी आता त्याचा जीव कासावीस होतं असे.
आपण सायलीच्या प्रेमात पुरते वेडे झालो आहोत हे आता समरच्या लक्षात आलं.
"सायली माझ्याबद्दल काय विचार करतेय हे जाणून घ्यायला हवं. पण कसं ती तर जराही ताकास तूर लागू देतं नाही. मग कसं समजेल मला तिच्या मनात काय आहे. " समर स्वतःशीच पुटपुटला.
---------------------------------------------------------------------
गेली आठ दिवस ज्याची जय्यत तयारी सुरू होती. अखेर तो दिवस उजाडला. ऑफिसचा गोल्डन ज्यूबली डे. सायली आणि श्वेताने आज साडी नेसण्याचा प्लॅन केला होता.
सायलीने गडद निळ्या रंगाची काठपदराची साडी नेसली, त्याच्यावर मॅचिंग ब्लाउज,गळ्यात मोत्यांची माळ अन कानात छोटेसे मोत्यांचे टॉप्स,केसांची सैलसर वेणी घालून त्यावर तिच्या आवडीचं लालचूटुक गुलाबाचं फुल माळलं.
श्वेताने खास आग्रह करून सायलीसाठी पहिल्यांदा लिपस्टिक खरेदी केली होती. तेही सायलीला आवडत नाही म्हणून अगदीच फिकट गुलाबी रंगाची लिपस्टिक घेतली होती. श्वेताने सायलीला खास बजावलं होतं.
"साडी नेसणार आहॆस तर लिपस्टिक तुला लावावीच लागेल. मी नेहमीच तुझं ऐकते की नाही या वेळी तू माझं ऐकायचं. छान दिसशील बघ."
"ठीक आहे तुम्ही म्हणताय तर नक्की लावेन मॅडम आता तरी खुश आहात ना " असं म्हणत सायलीने लिपस्टिक बॅग मध्ये टाकली होती.
पण आता या क्षणाला सगळी तयारी झाली पण मन काही लिपस्टिक लावायला धजेना. इतर मुलींसाठी साधीशी वाटणारी गोष्ट सायलीसाठी फारच मोठं दिव्य असल्यासारख होतं. कारण याआधी ना तिने ना कधी लिपस्टिक खरेदी केली होती ना कधी ती लावली होती. आपल्या साधेपणातच सायली खुश होती. आणि याचं तिच्या साधेपणाची समरला भुरळ पडली होती.
शेवटी श्वेताचं मन राखण्याकरता सायलीने हलकीशी लिपस्टिक लावली.
सायली तयार होऊन बाहेर आली तो मालती आणि सुदेश आपल्या लेकीकडे पहातच राहिले. आज पहिल्यांदाच ते तिला या रूपात पहात होते.
मालती सुदेशकडे पहात हसत म्हणाली " काय हो ही नक्की आपलीच सायली आहे ना. "
"फार विचित्र दिसतेय का गं आई तरी मी श्वेताला म्हटलं होतं हे सगळं मला नाही जमणार. थांब मी चेंज करून
येते. "
येते. "
"ये वेडाबाई काही चेंज वगैरे करायची गरज नाही. खूप सुंदर दिसते आहॆस. ऑफिसवरून आलीस की आधी दृष्ट काढते तुझी. "
"काहीतरीच असतं आपलं तुझं आई. चल मी निघते . संध्याकाळी कदाचित मला थोडा उशीर होईल. "असं म्हणत सायली घराबाहेर पडली.
सायली नजरेआड झाली तरी दाराकडे बराच वेळ एकटक पाहणाऱ्या सुदेशला पाहून मालती त्याच्या जवळ गेली.
"काय झालं? काय पाहताय एवढं सायली केव्हाच गेली "
"काही नाही गं असंच "
"मला माहितेय तुम्ही कसला विचार करताय "
"कसला विचार करतोय सांग बरं "
"बायको आहे मी तुमची. इतक्या वर्षाच्या संसारानंतर तुमचा चेहरा जरी नुसता पाहिला तरी समजतं की तुमच्या मनात काय सुरू आहे. तुम्ही जो विचार करताय तोच विचार माझ्या पण मनात आलाय.
लेक मोठी झाली आपली आपल्या दुःखात आपण तिच्या सुखाचा विचार कधी केलाच नाही. हसण्या बागडण्याच्या दिवसात सगळ्या घराच्या जबाबदारीचं ओझं तिने आपल्या खांद्यावर घेतलं. कधी एका शब्दाने बोलून दाखवलं नाही. ती होती म्हणून तर आपण पुन्हा उभे राहू शकलो. पण आता आपण आपली जबाबदारी पार पाडायला हवी. आजच सुलुशी बोलून घेते माझ्या सायूसाठी चांगलं स्थळ शोधायला सांगते. लाखात एक आहे माझी लेक तिला मुलगा ही कसा लाखात एकच
हवा "
लेक मोठी झाली आपली आपल्या दुःखात आपण तिच्या सुखाचा विचार कधी केलाच नाही. हसण्या बागडण्याच्या दिवसात सगळ्या घराच्या जबाबदारीचं ओझं तिने आपल्या खांद्यावर घेतलं. कधी एका शब्दाने बोलून दाखवलं नाही. ती होती म्हणून तर आपण पुन्हा उभे राहू शकलो. पण आता आपण आपली जबाबदारी पार पाडायला हवी. आजच सुलुशी बोलून घेते माझ्या सायूसाठी चांगलं स्थळ शोधायला सांगते. लाखात एक आहे माझी लेक तिला मुलगा ही कसा लाखात एकच
हवा "
"अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ पोरीनं खूप कष्ट झेललेत आपल्यासाठी आता तरी तिच्या पदरात सुख पडू देतं रे देवा " सुदेशने देवाला हात जोडले.
---------------------------------------------------------------------
ऑफिसमध्ये नुसती लगबग सुरू होती. पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी सायली आणि श्वेतावर होती.
ऑफिसमध्ये नुसती लगबग सुरू होती. पाहुण्यांच्या स्वागताची जबाबदारी सायली आणि श्वेतावर होती.
समर आपल्या केबिन मध्ये हेड ऑफिसमधून आलेल्या पाहुण्यांसोबत बसला होता. गेल्या काही दिवसात ऑफिसमध्ये झालेले नवीन बदल, कामाचा चढता आलेख, कर्मचाऱ्यांचं प्रामाणिक पणे कामं करणं या सगळयांच बाबत चर्चा सुरू होती.कंपनीची अजून प्रोग्रेस कशी करता येईल,काय फॉर्मुले वापरले तर यशाचा हा आलेख असाच चढता राहिलं.
समर प्रत्येक पॉईंट अगदी सविस्तरपणे आपल्या वरिष्टाना सांगत होता.
कार्यक्रमाची सगळी तयारी झाली. समरला निरोप मिळताच तो पाहुण्यांना घेऊन स्टेजकडे रवाना झाला. टाळयांच्या कडकडाटात सगळ्यांनी समरचं आणि पाहुण्यांचं स्वागत केलं.
समोरून येणाऱ्या समरकडे सगळे पहातच राहिले ब्ल्यू ब्लेजर मध्ये काय हँडसम दिसत होता समर. पण समरची नजर सायलीला शोधत होती. आणि सायली त्याला कुठेच दिसत नव्हती. समर आणि पाहुणे स्टेजवर येणार त्याचवेळी पाहुण्यांना आणलेल्या गिफ्ट ची काहीतरी गडबड झाली आणि सायलीला बॅकस्टेज जावं लागलं.
सगळे गिफ्ट आणि बुके व्यवस्थित आहेत हे चेक करून सायली पुन्हा पोडीयम जवळ आली. स्टेजच्या बाजूने आधी श्वेता उभी असल्याने सायलीला पाहण्याचा कितीही प्रयत्न केला तरी समरला सायली दिसत नव्हती.
बुके आणि गिफ्ट्स देऊन पाहुण्याचं स्वागत झालं. आलेल्या पाहुण्यांनी समरचं आणि ऑफिसमध्ये काम करणाऱ्या स्टाफचं खूपच कौतुक केलं. कार्यक्रम खूपच छान पार पडला.
सायलीची अधून मधून दिसणाऱ्या झलकेने समर आता चांगलाच अस्वस्थ झाला होता. कधी एकदा सायलीला डोळे भरून पाहतोय असं त्याला झालेलं. पण सायली आपल्याच कामात व्यस्त होती किमान तसं भासवत तरी होती.
पण समर मात्र इंतेहा हो गई इंतजार की आई ना कुछ खबर मेरे यार की म्हणत आतल्या आत सायलीला पाहण्यासाठी जल बिन मछली सारखा तडफडत होता.
कार्यक्रम संपल्यावर सगळयांच्या जेवणाची सोय कँटीन मध्ये करण्यात आली होती.
समर पाहुण्यांसोबत बसला होता. सायली आणि श्वेताही समरचा टेबल सोडून दोन टेबल पुढेच बसल्या होत्या. मधे दुसरा टेबल आल्याने सायली काही समरला दिसत नव्हती.सायलीला पाहण्यासाठी समरने आपली चेअर ऍडजस्ट केली. आता सायली समरच्या अगदी नजरेसमोर होती.
निळ्या रंगाच्या साडीत सायलीचा गोरा रंग अधिकच खुलला होता. गुलाबी लिपस्टिक सायलीचं सौन्दर्य अधिकच खुलवत होतं.इतर मुलींच्या मानाने ना कसला भडक मेकअप ना उगाच कसला नखरा.
किती साधी आहे ही मुलगी. माझ्या आयुष्याची जोडीदार हिचं असेल. बस झालं आता हा लपाछपीचा खेळ मला सायलीला माझ्या मनातलं सांगायलाच हवं. माझं तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे सायली,समरचं मन जणू काही ओरडून ओरडून सायलीला सांगू पहात होतं.
श्वेताने पाहिलं समरचं सगळं लक्ष सायलीवरच आहे. कोपराने हळूच इशारा करत श्वेता सायलीला म्हणाली,
" आज समर सरांचं काही खरं नाही.तुझ्यावरून त्यांची नजर काही हटत नाही. "
" आज समर सरांचं काही खरं नाही.तुझ्यावरून त्यांची नजर काही हटत नाही. "
"गप गं कितीवेळा सांगायचं असं काही नाही "
"अच्छा असं काही नाही मग जरा एक नजर बघ समर सर तुलाच पाहतायत "
सायलीने समोर पाहिलं तर समर तिच्याकडेच पहात होता. अचानक सायलीने समोर पाहिलं अन दोघांची नजरानजर झाली. काही न सुचल्याने समरने पटकन सायलीला स्माईल दिली.
समरला स्माईल देऊन सायलीने आपली नजर वळवली.
पण श्वेता हा चान्स कसा सोडणार ती सायलीला मुद्दाम चिडवू लागली. " हाय!! मैं मरजावा तेरी वो नजर और उनकी वो किलर हँसी.जान ना ले हमारी. "
"तू परत सुरू झालीस " सायली श्वेतावर रागवून म्हणाली.
"किती वेडी आहॆस गं ऑफिस मधला सगळ्यात हँडसम मुलगा तुला लाईन देतोय आणि तू आहॆस की तुला काही फरकच पडत नाही " श्वेता नाक मुरडत म्हणाली.
तेवढ्यात समर उभा राहिला आणि सगळ्यांना उद्देशून बोलू लागला, "प्लीज सगळ्यांनी जरा इकडे लक्ष द्या.आपल्या ऑफिसच्या गोल्डन ज्यूबली सेलीब्रेशनच्या निमित्ताने आणि आपलं सक्सेस सेलिब्रेट करण्यासाठी हेड ऑफिसकडून आपल्याला 2दिवसांच्या ट्रिपची परवानगी मिळाली आहे. त्याचा सर्व खर्च ऑफिस करणार आहे त्यामुळे तुम्हाला खर्चाचं काहीच टेन्शन नाही. परवाचं आपण ट्रिपसाठी अलिबागला जाणार आहोत त्यामुळे सगळयांनी तयारीला लागा.
ट्रिप ची बातमी ऐकताच सगळयांनी आवाज करून एकच गलका केला. कामाच्या ताणापासून थोडं रिलॅक्स व्हायला मिळेल म्हणून सगळेच खुश झाले.
समरमात्र आपल्या ट्रिप ला जायच्या आयडिया वर जाम खुश होता कारण स्टाफ ला ट्रिपला न्यायची आयडिया त्याचीच होती. सायली सोबत वेळ घालवता यावा. तिच्या समोर आपलं प्रेम व्यक्त करता यावं यासाठी यासारखी दुसरी संधी कुठली असणार. असा विचार करून त्यानेच हेडऑफिस कडून ट्रिप ची परवानगी घेतली होती.
--------------------------------------------------------------------
मालतीने आपली कामं आटपली आणि शुभश्च शीघ्रम म्हणतं आपली धाकटी बहीण सुलूला फोन लावला.
"हॅलो सुलु अगं मी बोलतेय मालती, कशी आहॆस गं?"
"मी ठीक आहे पण तू असा अचानक फोन केलास सगळं ठीक आहे ना "
"हो गं सगळं ठीक आहे. मी तुला एका महत्वाच्या कामासाठी फोन केलाय. तुला तर माहीतच आहे यांच्यामुळे मला फारसं घराबाहेर पडता येतं नाही. म्हणून ही जबाबदारी मला तुझ्यावर सोपवायची आहे बघ. ह्या कामासाठी तूच योग्य आहे "
"सगळं रामायण सांगत बसलीस पण मूळ मुद्दा कोण सांगणार ताई. काम काय आहे ते तर बोलशील की नाही "
"अरे हो की माझं हे असं होतं बघ बोलायचं असतं एक आणि भलतंच बोलत बसते "
"हो ना मग आता मूळ मुद्द्यावर ये पटकन उगाच माझा पण जीव टांगणीला लावला आहॆस. "
"सुलु अगं आपली सायू आता मोठी झाली. तिच्या लग्नाचं नको का बघायला? तिने आमची जबाबदारी उचलली खरी पण आई बाप म्हणून आमची पण जबाबदारी आहेच की तिच्याप्रती. सायू साठी एखादं चांगलं स्थळ शोधशील का गं सुलु "
"हे काय विचारणं झालं का? सायू काय फक्त तुमचीचं लेक आहे का? मावशी आहे मी तिची लाखात एक मुलगा शोधते बघ मी सायू साठी. गुणाची पोर आहे आपली जोडीदार पण अगदी तिला शोभेल असाच असायला हवा बघ."
"अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. आता सायूला शोभेल असा मुलगा शोधायची जबाबदारी तुझी."
"अगं पण ताई तू सायूशी ह्याबद्दल काही बोललीस का? तिला कसा मुलगा हवाय? नाहीतर ती कोणाच्या प्रेमाबिमात नाही ना पडली.आजची पिढी प्रेमाविवाहालाचं जास्त प्राधान्य देतेय."
"सुलु तू आपल्या सायूला ओळखत नाही वाटतं. प्रेमाबीमाच्या भानगडीत ती नाही पडणार आणि तसं काही असलंच तर ती सगळ्यात आधी मला सगळं सांगेल "
तसं असेल तर आजच लागते बघ कामाला म्हणत सुलुने फोन ठेवला.
मालतीला तर आपण सायूच्या लग्नाची अर्धी लढाई जिंकल्यासारखं वाटू लागलं.
समर की मालती कोणाची इच्छा आधी पूर्ण होईल? समर सायलीला प्रपोज करू शकेल का? मालतीचा लग्नाचा प्रस्ताव सायली स्वीकारेल? काय होईल बरं पुढे लवकरच कळेल. पण पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा ?
कथा तुम्हाला कशी वाटली हे तुमच्या प्रतिक्रियांच्या माध्यमातून कळू देतं. तुमच्या प्रतिक्रिया लिखाणाचा उत्साह अधिकच द्विगुणित करतात.
©® शितल ठोंबरे ( हळवा कोपरा )
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा