वचन.... भाग 1

एका मुलीच्या वचनाची कथा

©®शितल ठोंबरे (हळवा कोपरा )

वचन

दुपारची कामं आवरून मालतीबाई खोलीत आल्या तोपर्यंत सुदेशराव झोपेच्या अधीन झाले होते. आपणही जरा अंग टाकावं, एक डुलकी काढली की जरा बरं वाटेल असा विचार करून बेड वर पहुडणार तोच फोनची रिंग वाजली.त्यांनी घड्याळाकडे पाहिले दोन वाजले होते. या वेळी कोणाचा फोन असेल बरं.

सायलीने तर फोन केला नसेल?तिला समजलं असेल का सगळं? काय निर्णय असेल बरं तिचा?या वेळी तरी ती माझं ऐकेल का?

मालतीबाईंच्या डोक्यात विचारशृंखला सुरू झाली. तोपर्यंत फोनची रिंग कट होऊन दुसरी रिंग वाजू लागली. त्या आवाजाने सुदेशराव जागे झाले फोनची रिंग वाजत असताना फोन न उचलता फोनकडे एकटक पहात राहणाऱ्या आपल्या बायकोला मालतीला त्यांनी जोरात आवाज दिला.

"मालती अगं काय हे तो फोन केव्हाचा वाजतोय. आणि तू फोन उचलायचा सोडून नुसती पहात काय बसली आहॆस" सुदेशराव झोपमोड झाल्याने चिडून म्हणाले.

त्यांच्या आवाजाने मालतेबाईंची विचारशृंखला खंडीत झाली.

"हो हो उचलते फोन तुम्ही झोपा शांत "असं म्हणतं मालतीबाईंनी फोन हाती घेतला.

सायलीचाच फोन होता. त्यांनी फोन कानाला लावला.

पलीकडून आवाज आला.

"आई काय आहे हे? मी कित्येकदा सांगितलं मला लग्नचं करायचं नाही. पण तुझं आपलं राहून राहून तेच. यापुढे जर तू माझ्या लग्नासाठी प्रयत्न केलेस तर मी सुद्धा हे घर सोडून जाईन मग रहा तू आणि बाबा दोघेच."

आपण रागाच्या भरात चुकीचं बोलून गेलोय हे सायलीच्या लक्षात येताच. तिचा चढलेला आवाज कमी झाला.

"सॉरी आई अगं लंच ब्रेक मध्ये सुलु मावशीचा फोन आला आणि पुन्हा तेच सांगू लागल्या की त्यांनी माझ्या साठी मुलगा पाहिला आहे आणि उद्याच ते लोक आपल्या घरी येतायत. बरं मी काही बोलायच्या आतच फोन ठेऊन दिला".

इतका वेळ सायलीचं बोलणं शांतपणे ऐकून घेणाऱ्या मालतीबाईंनी आपले मौन सोडले.

"सायू बेटा सुलुचा मला सकाळीच फोन आलेला. माझ्यासारखीच तिलाही तुझ्या लग्नाची चिंता आहे गं. चाळीशीला पोहचलीस आता. नातेवाईक चर्चा करतात. माझा पण जीव तुटतो गं. तुझा फुललेला संसार पहिला की आम्ही त्या भगवंताला तोंड दाखवायला मोकळे. " डोळ्यातून ओघळणारे अश्रू पदराच्या कोण्याने पुसत मालतीबाई म्हणाल्या

"हेच तुझं नेहमीच मला इमोशनल ब्लॅकमेल करायचं आणि येणाऱ्या प्रत्येक मुलासमोर उभं करायचं पण प्रत्येकवेळी हाती काय लागतं. नकार नकार आणि फक्त नकार. मग कशाला हव्या या सगळ्या खटाटोपी.  माझी अट ऐकून उद्याही पुन्हा नकारच येणार." सायली चिडून म्हणाली.

"कश्यावरून नकार येईल. उगाच अभद्र काही बोलू नकोसं.माझं मनं सांगतय यावेळी नक्कीच होकार मिळणार . तुझ्या लग्नाचे सनई चौघडे वाजणार." मालतीबाई पूर्ण आत्मविश्वासाने आणि तितक्याच उत्साहाने बोलत होत्या.

"मी कितीही आदळआपट केली तरी शेवटी तू, बाबा आणि सुलु मावशी तुमचंच म्हणणं खरं करणार हो ना करा काय करायचं आहे ते. पण माझ्या मनाची पूर्ण तयारी आहे नकार ऐकायची. कारण माझी अट पूर्ण करणारा मुलगा या जगातच नाही " सायली म्हणाली

"सायू बाळ प्रत्येकवेळी नकारात्मक विचार नाही करायचा गं. तू आम्हांला जगायचं बळ दिलंस. आणि स्वतः मात्र ते काही नाही  उद्या नक्कीच काहीतरी चांगलं घडणार बघ माझं मनं मला सांगतंय " मालतीबाई म्हणाल्या.

आपल्या आईचा आत्मविश्वास पाहून सायलीला आईची दया आली कारण तिला माहीत होतं. उद्याही तेच होईल जे नेहमी होतं.

"बरं उद्याच उद्या पाहूयात. गोळ्या घेतल्यास का तू? आता आराम कर जरा .बाकी आपण मी घरी आल्यावर बोलू. ऑफिसमध्ये भरपूर काम आहे. ठेवते मी आता." असं म्हणत सायलीने फोन ठेवला.

इकडे फोन ठेऊन मालतीबाई बेड वर डोळे बंद करून झोपण्याचा प्रयत्न करू लागल्या. पण नजरे समोर सायलीचाच चेहरा येतं होता. किती सोसलंय माझ्या सायू ने आता तरी तिच्या नशिबात सुख दे रे देवा. त्यांनी मनोमन देवाला हात जोडले. आणि मालतीबाई भूतकाळात पोहचल्या.

बावीस तेवीस वर्षापूर्वीचा काळ मालतीबाईंच्या डोळ्यांसमोर झरझर आला. मालती आणि सुदेश या उभयंतांची तीन मुलं मोठी लेक सायलीने बारावीची नुकतीच परीक्षा दिली होती. तिच्या पाठीवरचा सूरज नववीला गेला होता तर धाकला मुलगा राजेश सातवीत शिकत होता.

सुदेश एका खाजगी कंपनीत क्लार्क  होते. मालतीही शिवणकाम काम करून आपल्या संसाराला हातभार लावत होती .चाळीतलं छोटसं दोन खोल्याचं घर त्यांचं.एकीकडे मुलांचं शिक्षण तर दुसरीकडे घरखर्च. दोन्ही भागवता भागवता थोडी फार ओढाताण सुरू होती. त्यामुळेचं आपण जे आयुष्य जगतोय, जी गरिबी अनुभवतोय त्याची झळ आपल्या मुलांना कुठेही लागता कामा नये यासाठी मालती आणि सुदेश झटत होते. मुलांच्या शिक्षणात कुठेही कमतरता राहू नये म्हणून वाटेल तितके कष्ट करण्याची दोघांची तयारी होती.

तिन्ही मुलांना आपल्या आईवडिलांच्या कष्टांची जाणीव होती. अभ्यासात तिघेही अव्वल ना कुठे मोठे क्लासेस ना कसली घरगुती शिकवणी. तिघेही भावंडं एकमेकांच्या मदतीने अभ्यास करत. शाळेत टॉप करत. शाळेत, चाळीत सगळेच त्यांच्या बुद्धिचं कौतुक करीत. त्यामुळे मालती आणि सुदेश अजूनच हुरूप येई. आपलं भविष्य उघड्या डोळ्यांनी ते या मुलांच्या माध्यमातून पाहत होते.

पण म्हणतात न कधी कधी आपल्या सुखाला आपलीच दृष्ट लागते तसंच काहीसं मालती आणि सुदेशच्या सुखी संसारा बाबत झालं.

त्यादिवशी सुदेशला कामावर निघायला थोडा उशीरच झाला. बसस्टॉपवर पोहचला तो तिथेही आज नेमकी गर्दी होती. बसच्या रांगेत सुदेश उभा राहिला खरा पण बसमध्ये चढायलाही मिळेल की नाही याची शंकाच होती. बस आली तीच खचाखच माणसांनी भरून. सुदेश बसमध्ये चढेपर्यंत बस सुरू देखील झाली. रांगेतून कशीबशी वाट काढत धावत पुढे जाऊन तो बस मध्ये चढण्याचा प्रयत्न करू लागला. बसचा दांडा हातात आला आणि आपला एक पाय बसच्या पायरीवर ठेवत सुदेश बसमध्ये चढला. बस थोडी पुढे गेली पण गर्दी काही आता शिरेना बसच्या दाराला लटकलेला सुदेश स्वतःचा तोल सांभाळण्याचा केविलवाना प्रयत्न करत होता. पण एका क्षणाला सुदेशचा दांड्यावरचा हात निसटला आणि सुदेश खाली पडला मागून येणाऱ्या कारच्या चाकाखाली सुदेशचे दोन्ही पाय आले.

लोकांनी धावत पळत येऊन सुदेशला हॉस्पिटलला पोहचवले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू झाले. पण दोन्ही पायांच्या हाडांचा चुरा झालेला. सुदेशचा जीव तर वाचला पण त्याने आपले पाय कायमचे गमावले.

मालती आणि सुदेश साठी हा धक्का पचवणं मुळीच सोप्प नव्हतं. सुखी भविष्याची स्वप्न पहात असताना इतकं भयाण वास्तव समोर आलेलं पाहून दोघेही खचून गेले. पुढे कसे होणार. सारं काही संपलं असा विचार करून दोघेही हताश झाले. मालतीची तर रडून रडून फार वाईट अवस्था झाली होती. जगण्याची सगळी आशाचं संपली होती. मुलांकडे पाहून जगावं की नशिबाला दोष देतं रडावं काहीच समजत नव्हतं.

आईला रडताना पाहून सायलीला वाईट वाटे.

"मी आहे ना आई कश्याला काळजी करतेस "असं म्हणून सायली आईला धीर देई.

मालतीची दोन्ही मुलं सूरज आणि राजेश त्यावेळी अश्या वयात होते की सारं काही समजूनही त्यांना काहीच करता येतं नव्हतं. अश्यावेळी खंबीरपणे उभी राहिली ती सायली. आई, बाबा आणि आपल्या दोन्ही भावांची जबाबदारी सायलीने आपल्या खांद्यावर घेण्याचा निर्णय घेतला.

सायलीचा बारावीचा निकाल लागला 85%मिळवून सायली पास झाली होती. दुःखातही आनंदाचा क्षण सायलीने आपल्या आई बाबांना दिला.

आपला निकाल लागल्यावर सायली सुदेशच्या ऑफिसमध्ये गेली सुदेशच्या साहेबांना अजयला भेटायला.

सुदेशची मुलगी भेटायला आली म्हटल्यावर अजयने लगेच सायलीला आपल्या केबिनमध्ये बोलावलं.

\"कशी आहॆस बेटा \"

\"मी ठीक आहे सर \".

\"बाबा आणि घरची बाकी मंडळी कशी आहेत. जे झालं ते खूपच वाईट होतं \"

\"आता सर्वजण ठीक आहेत सर .हळूहळू सगळेच सावरण्याचा प्रयत्न करतोय.\"

"बरं मला सांग तू कशी काय आज अचानक अशी इकडे आलीस. काही काम होतं का? काहीही मदत लागली तर अगदी निसंकोच पणे सांग." अजय म्हणाला.

"हो त्यासाठीच मी तुम्हाला भेटायला आले आहे. मी सगळ्यांना धीर तर देते आहे सगळं ठीक होईल म्हणून आश्वासन पण देतेय पण मलाच माहीत नाही पुढे काय होणार आहे कसं सावरणार आहे मी माझ्या कुटुंबाला कारण मानसिक आधार तर मी देते आहे पण आर्थिक आधार तो ही देता आला पाहिजे मला माझ्या कुटुंबाला ." सायली म्हणाली

अजय सायलीकडे पाहतच राहिला.

एवढीशी मुलगी पण किती समजूतदारपणे बोलत होती. परिस्थितीने वयाच्या मानाने खूप लवकर शहाणपण तिच्या पदरात टाकलं होतं.

"सायली बाळा मी समजू शकतो तुम्ही सगळेजण सध्या कोणत्या परिस्थितून जातं आहात. त्यामुळे मला जमेल ती मदत मी करेन. काही पैसे हवेत का बाळा तुला?"

"सर मी पैश्यांच्या मदतीसाठी इथे नाही आले. आणि फुकटची मदत किंवा दया म्हणून केलेली मदत तर मला नकोच आहे. आई बाबांनी स्वावलंबनाची शिकवण दिलीय. ती अशी वाया नाही जाणार.आईची मनस्थिती अजूनही ठीक नाही त्यामुळे पूर्वीसारख शिवणकाम करणं तिला आता शक्य नाही. असं म्हणतात की सर्व सोंग करता येतं पण पैश्यांचं सोंग नाही करता येतं."

"बाबांची जी काही सेविंग होती ती त्यांच्या उपचारासाठी खर्च केली. ऑफिस मधून आणि बाबांच्या मित्रानीही काही मदत केली पण त्यावर किती दिवस काढणार एक दिवस ती ही मदत संपणार. म्हणूनच मी बाहेर पडले आहे.
हा माझा बारावीचा निकाल 85%मिळाले आहेत. मला समजलं की बाबांच्या जागी अजून कोणी रुजू झालं नाही. म्हणूनचं त्या नोकरी साठी मी आले आहे. लाचारी म्हणून मला ही नोकरी नकोय माझा निकाल पाहून त्या जागेसाठी मी जर योग्य वाटतं असेन तरच मला ही नोकरी द्या."सायली आत्मविश्वासाने बोलली.

अजयने सायलीचा निकाल हाती घेतला. त्या निकालापेक्षा सायलीचा आत्मविश्वास, स्पष्टवक्तेपणा, कुटुंबाबद्दल वाटत असलेली तळमळ या सगळ्या गोष्टी त्याला अधिक भावल्या.

सायलीच्या निकालाकडे एक कटाक्ष टाकून अजय सायलीला म्हणाला ," सायली बाळ तुझ्या सारखी हुशार क्लार्क आमच्या ऑफिसला मिळाली तर मला नक्कीच आवडेल. त्यामुळे आज आणि आत्ता पासून ही नोकरी तुझी.

पण माझी एक अट आहे तुला ती मान्य असेल तरच मी तुला ही नोकरी देईन "

"अट... तुमची कोणतीही अट असली तरी ती मला मान्य आहे. कारण या नोकरीची मला आणि माझ्या कुटुंबाला गरज आहे. तुम्ही सांगा सर काय अट आहे तुमची "

"तू हुशार आहॆस. तुझी हुशारी अशीच वाया जाऊ देऊ नकोसं. ही नोकरी जरी तू गरज म्हणून करत असलीस तरीही नोकरी बरोबरच तुला तुझं शिक्षणही पूर्ण करायचं आहे. त्याचा पुढे जाऊन नोकरीत तुलाच फायदा होईल. नोकरी करता करता बाहेरून परीक्षा दे. काही झालं तरी तुझ्या शिक्षणात खंड पडू देऊ नकोसं. मला वाटतं तुझ्या आई बाबांनाही याने आनंदच होईल. "

"धन्यवाद सर तुम्ही माझ्या बद्दल इतका विचार केलात. मी नक्कीच माझं शिक्षण पूर्ण करेन.बाबा नेहमी तुमचं कौतुक करत. आज समजलं त्यांचं तुमचं कौतुक करण्या मागचं कारण. सर तुमच्या सारखी माणसं फार क्वचित पहायला मिळतात या समाजात आणि तुम्ही तर अगदी देवदूतासारखे धावून आला आहात माझ्या कुटुंबासाठी." सायली अजयच कौतुक करत म्हणाली

अजय हसत म्हणाला "पुरे पुरे सायली बेटा सगळं कौतुक आजच करणार आहॆस का? उद्यासाठीही काही राखून ठेव कारण तुला उद्याच जॉईन करायचंय "

अजयचे आभार मानून सायली घरी परतली. आपल्या आईबाबांना तिने ही आनंदाची बातमी दिली. मालती आणि सुदेश दोघांनाही आपल्या लेकीचं कौतुक वाटलं. कालपरवापर्यंत लहान वाटणारी सायली अचानक इतकी मोठी  झाली. मालतीने सायलीला आपल्या छातीशी धरलं.

त्यारात्री सगळं घर खूप दिवसांनी शांत झोपी गेलं. फक्त सायली जागी होती. एकीकडे नोकरी मिळाल्याचा आनंद तर होताच पण कुठेतरी मनात भीती वाटत होती की मी माझ्या कुटुंबाची जबाबदारी व्यवस्थितरित्या पेलू शकेन का? माझ्या कर्तव्यात मी कुठे कमी तर पडणार नाही ना?

त्या रात्री सायलीने स्वतः लाच एक वचन दिलं.जोपर्यंत दोन्ही भावंड स्वतः च्या पायावर उभी राहत नाहीत. त्यांचं आयुष्य मार्गी लागत नाही तोपर्यंत ती स्वतः च्या सुखाचा मुळीच विचार करणार नाही. माझ्या कर्तव्यात मी कुठे ही तसूभर देखील कमी पडणार नाही. माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत माझे आई बाबा माझं कुटुंब याला मी कधीच अंतर देणार नाही.


काय घडेल पुढे सायलीच्या आयुष्यात? स्वतःलाच दिलेलं वचन ती पाळू शकेल का? की कुटुंबापेक्षा स्वतः चा आनंद तिच्या साठी महत्वाचा असेल जाणून घ्यायचंय ना मग लवकरच भेटूयात पुढच्या भागात तोपर्यंत सायोनारा. ?

©® शितल ठोंबरे (हळवा कोपरा )