वारस
(टीम : मिळून साऱ्याजणी)
डॉ.रोझी फर्नांडिस,गोव्यातील एक प्रख्यात स्त्रीरोगतज्ञ.. गुलमोहर इमारतीतील पहिल्या दोन मजल्यांवर तिचं सुतिकाग्रुह व्यापलं होतं. गोव्यातील लहानलहान खेडोपाड्यातील बायाही गरोदर राहिल्या की रोझीकडे नाव घालायच्या. रोझीमायच्या हाती आपली लेक दिली की सगळे कशे सुशेगाद जातले असा या माताबहिणींचा विश्वास होता.
साधारण दुपारी दोनची वेळ. रोझीने नुकतीच एक डिलीव्हरी केस हँडल केली होती व थकूनभागून आपल्या चेअरवर बसली होती. रोझीच्या नर्सने तिच्यासाठी आज तिसऱ्यांचं सुकं नि भात आणला होता. रोझी टिफीन उघडणार तोच..नर्स आत आली.
"डॉक्टर, वन लेडी वॉन्ट्स टू मीट यू इगरली. आय टोल्ड हर टू कम इन द इविंनिंग सेशन बट शी इज ...."
"ओके देन सेंड हर"..रोझीने डबा तसाच बंद करुन ठेवला. साधारण पन्नाशीच्या वयाच्या वत्सलाबाई सरदेसाई आत आल्या. डॉ.रोझीने त्यांना न्याहाळलं.. गोरा चेहरा पण वयाने,चिंतेने रापलेला,कपाळावर गोंदण,डोक्यावर पदर,कानाची भोकं मोठी झालेली..त्यात लोंबणारी सोन्याची कुडी,गळ्यात बोरमाळ,हातावरही गोंदण.
"काय त्रास होतोय तुम्हाला..पाळी वगैरे.."
"नाही तसलं काही नाही डॉक्टर. पाळी जाऊन झाली दोनअडीच वर्ष."
"मग?"
"डॉक्टर मी माझ्या सुनेसाठी आलेय हो."
"सून कुठेय?"
"बसलेय बाहेर."
"तिला बोलवा"
..रोझीने नर्सला सांगून सुनेला आत बोलावलं. आता रोझीने सुनेला न्याहाळलं. शिडशिडीत बांधा,सावळीशी पण नाकीडोळी नीटस,डोळेही छान पाणीदार पण का कुणास ठाऊक डोळ्यांत,चेहऱ्यावर अगदी उदासिनता,आत्मविश्वासाचा अभाव. .रोझी अशीच होती. माणसं वाचायला आवडायचं तिला. डॉक्टरी हे प्रोफेशन ती जीझसची एंजल या नात्याने करायची..व्यवसाय म्हणून नाही.
रोझीला अबोलीने तिची फाईल दिली. रोझीने फाईलवरचं नाव वाचलं..सौ. अबोली विश्वासराव सरदेसाई. आतले पेपर्स वाचता लक्षात आलं की अबोलीला मुल होणं शक्य नाही. कितीतरी वेळा तिच्या तपासण्या झाल्या होत्या..रोझीसमोर जणू अबोलीचा देह तिची कैफियत मांडत होता. मुल होणं यातच सार्थक मानणाऱ्या समाजात भयभीत झालेला देह,नावाप्रमाणेच अबोल.
वत्सलाबाई बोलू लागल्या.."रोझीमाय,या कागदांवरून तुम्हाला कळलंच असेल की माझी सून आई होऊ शकत नाही. मग आमच्या इस्टेटीचा वारसदार कोण? एकच मुलगा आहे बघा मला. त्याची बायको ही अशी..भाकड गाय जशी."
रोझी संतापली.."तुम्ही काय बोलताय कळतंय का तुम्हाला!"
वत्सलाबाईंनी वाणीत नम्रता आणत म्हंटलं,"मी अडाणी माणूस. काही चुकलंमाकलं तर माफ करा रोझीमाय. मला माझी सून खूप प्यारी आहे. कुणीबी जीव ओवाळून टाकावा असा स्वभाव आहे माझ्या सुनेचा."
रोझी थोडी शांत झाली नि अबोलीच्या चेहऱ्यावरचा तणावही थोडा निवळला.
वत्सलाबाई बोलू लागल्या,"रोझी माय, आमच्या घरी स्वैंपाकाला एक बाई येते. कमळा नाव तिचं. ती गरोदर आहे. तुमच्याच दवाखान्यात नाव नोंदवलय. दोन दिवसांआधी आलेली तेंव्हा सांगत होती की तुम्ही तपासणीत तिला जुळं आहे म्हणून सांगितलत."
रोझीच्या डोळ्यासमोर आता कमळा उभी राहिली..गोरीपान,हसऱ्या डोळ्यांची,कासेचं नेसणारी,हनुवटीवर बारीक तीळ,केसांचा गच्च अंबाडा,त्यात खोवलेली हिरवीगार माली नि सोबतीला सदरालेंग्यातला तिचा श्रीपत. दोघंही एकमेकांना साजेशी. सोनोग्राफीनंतर रोझीनच त्यांना जुळं असल्याचं सांगितलं होतं.
कमळाचा इथे काय संबंध?.....रोझीने विचारलं...काही क्षण वातावरणात एक शांतता माजली..रोझीला ती शांतता नकोशी झाली..तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने वत्सलाबाईंकडे पाहिलं. ड्रॉवरमधे ठेवलेलं हुनहुनीत तिसऱ्यांचं सुकंही थंड होत चाललेलं पण डॉक्टरचं प्रोफेशन म्हणजेच चोवीस तास आपला वेळ लोकांसाठी अर्पिलेला..चालायचंच..रोझी मनात म्हणाली.
वत्सलाबाई चेहऱ्यावर शक्य तेवढा दीनवाणा भाव आणत म्हणाल्या, "रोझीमाय..कमळाने मला सांगितलं की तिच्या उदरात जुळं वाढतय तेंव्हापासून एक विचार चाललाय मनात. कमळाचा नवरा मजुरी करतो. हातावरचं पोट. कधी काम मिळतं कधी नाही मिळत. कमळा चार घरचं स्वैंपाकपाणी करुन घरखर्च भागवते शिवाय तिच्या गळ्यात चार नणंदांचं लोढणं आहे,ज्यांची लग्न करुन देणं ही तिचीच जबाबदारी आहे. सासू संधिवाताने जखडलेय तिची.."
रोझीला थोडं थोडं लक्षात येत होतं. चेहरा अगदी कोराकरकरीत ठेवत रोझी म्हणाली,"बरं मग.."
वत्सलाबाई म्हणाल्या, "कमळीला दोन मुलं होतील. तिची कुस म्हणजे भुसभुशीत जमीन आहे. देवाने दिलं तर पुढल्या काही वर्षात गोकुळ नांदेल तिच्या घरी. आमच्या घरात सोनंनाणं सगळं आहे पण घरभर रांगणारी, दुडुदुडु धावणारी पावलं नाहीत. या अंधारात एक प्रकाशाचा कवडसा दिसतोय मला."
"कोणता?"..रोझीने विचारलं.
"आम्ही कमळीचं एक बाळ तिच्या उदरात असतानाच दत्तक घेऊ. कमळीने बाळाला जन्म दिला की तिने एक बाळ माझ्या सुनेला द्यायचं..त्याबदल्यात मी तिचं सगळं कर्ज फेडीन. तिच्या नणंदांच्या लग्नाचा,तिच्या कुटुंबाचा सगळा खर्च उचलेन."वत्सलाबाई म्हणाल्या.
रोझी म्हणाली,"वत्सलाबाई, आईच्या उदरातलं बाळ दत्तक घेता येत नाही. कमळाला मुलं झाली की तिच्या व कुटुंबियांच्या संमतीनुसार कायदेशीर बाबी पुर्ण करुन तुम्ही तिचं लेकरु दत्तक घेऊ शकता."
वत्सलाबाई म्हणाल्या,"ते सगळं मी बघते रोझीमाय. कमळीला मी काल दुपारीच विचारलं. तिला मान्य आहे पण घरात एकदा विचारून घेते म्हणाली."
रोझीमाय आता अबोलीकडे बघू लागली,"अबोली,तुझी सासू जे बोलतेय ते तुला मान्य आहे का? लहान मुल हे देवाघरचं फुल असतं. दुसऱ्याच्या मुलाला तू आईची माया देऊ शकशील का?"
अबोलीने नुसतीच मान हलवली. रोझीमायचा निरोप घेऊन त्या सासूसुना घरी जायला निघाल्या. गाडीत बसल्यावर अबोलीच्या मनात आलं..दीडदोन वर्षाचं मुल संस्थेतून दत्तक घेतलं असतं तर..पण वत्सलाबाईंना तसं नको होतं कारण त्या मुलाच्या आईवडिलांची ओळख कळणार नव्हती. कमळी जरी गरीब असली तरी बघण्यातली होती. कमळी नि श्रीपत अगदी लक्ष्मीनारायणाचा जोडा..गरीबीतही सुखी रहाणारा.
कमळी एकदोन दिवस अस्वस्थ होती. तिची ही अस्वस्थता श्रीपतच्या नजरेतून सुटली नाही. रात्री कमळी कुशीत असताना श्रीपतने तिला तिच्या चिंतेचं कारण विचारलं. कमळीने वत्सलाबाईंचा प्रस्ताव त्याला सांगितला.
श्रीपतने कमळीच्या पोटावरून अलगद हात फिरवला व कौलांकडे बघत राहिला. आजही त्याला काम मिळालं नव्हतं. माणसांपेक्षा यंत्रच जास्त ते काम करु लागल्याने मजुरांचा भाव उतरला होता शिवाय परराज्यातून मजुरांच्या झुंडी आल्या होत्या ज्या अत्यल्प मजुरीत काम करुन देत होत्या.
श्रीपतची मोठी बहीण तारा आता सत्तावीसीची झाली होती..वय वाढत होतं तसं तिच्या चेहऱ्यावरचं तेज लोप पावत होतं,जुनपण येत होतं तिला. हल्ली ती पावडरलाली लावून काजूकारखान्यात जायची. तिथेच तिला कोणी गटवली तर....श्रीपत रात्रभर टक्क जागा होता. कुशीत बायको झोपली होती..तो मात्र प्रश्नांच्या मोहजाळात फिरत होता.
पहाटे भिनभिनताना कमळीची सासू मागल्या दारच्या न्हाणीच्या शेजारी ऊबेला बसली होती. तिच्या तळहातावर तंबाखूची मशेरी होती. मशेरीचं बोट ती दातांवर डावीउजवीकडे घासत होती. बाजूला चूळ भरण्यासाठी हुनहुनीत पाणी भरलेला पितळी तांब्या ठेवला होता. श्रीपत तिच्या बाजूला बसला. लेक असा सकाळीच कडेला येऊन बसला म्हणजे कायतरी नड आहे हे त्या अनुभवानं वाकलेल्या कुडीच्या लक्षात आलं.
श्रीपतने तिला वत्सलाबाईंचा प्रस्ताव सांगितला. म्हातारीने शांतपणे सगळं ऐकून घेतलं. आड्याकडे तोंड करुन विचार करत राहिली. श्रीपत तिच्या चेहऱ्यांवरच्या सुरकुत्या पहात राहिला. तिच्या मनात नेमकं काय चाललय याचा तो ठाव घेवू पहात होता. म्हातारीने परत बोटं दाढकानात डावीउजवीकडे फिरवली. माडाच्या मुळात चुळ भरली. आड्याला लावलेली जास्वंद नजरेत भरण्यासासारखी फुलली होती.
"आई..काहीतरी बोलना."श्रीपत तिच्या मागे रेंगाळू लागला.. मांजर दोन पायांत घुटमळते तसा.
म्हातारी म्हणाली,"ही फुलं बघतोयस ना. खुडली तरी परत येतात. तुम्ही दोघं जवान हायसा. एक जीव मालकिणीला दिलात तर सरदेसायांच्या घराण्याला वारस मिळेल. तुझ्या पाठल्या बहिणी..वय झालं म्हणून कोणासोबत पळून जाणार नाहीत. आपल्यावरचं कर्ज फिटेल. सरदेसायांची मेहेरनजर राहील आपल्या कुटुंबावर.
विहिरीवरुन कळशीची दूड घेऊन येणाऱ्या कमळीचे कान सासूच्या बोलण्याकडे लागले होते. म्हातारीने तिला थांबायला सांगितलं,म्हणाली,"बघा,तुम्ही दोघंबी जवान हायसा. एक लेकरु दिल्याने तसा काही तोटा होणार नाही तुमचा. श्रीपतच्या वडलांच्या आजारपणात काढलेलं कर्ज फिटेल. तेवढीच त्यांच्या आत्म्यालाही शांती..लेकीबाळींची लग्न झालेली दिसली की सदानकदा आंब्याच्या फांदीवर उगाचच कावकाव करणारा कावळा निघून जाईल बघा. देह घुटमळतोय त्यांचा इथे या भाटात."
कमळी नि श्रीपत घरात आले. कमळीने चुलीत जाळ घातला. भाकरी थापू लागली. खोलीभर भाकरीचा खरपूस गंध पसरला.
श्रीपत कमळीच्या बाजूला दोन वीत अंतरावर पाट घेऊन बसला. कमळी मधेच चुलीतली लाकडं मागेपुढे करत होती. तिने तांदळाची पांढरीधोप भाकरी नि चहा श्रीपतच्या पुढ्यात ठेवला. न बोलताही एकमेकांच्या मनात काय चाललंय ते त्यांना समजत होतं. लग्न होऊन या घरी आल्यापासनं कमळीला कधी सासूने जाच वगैरे केला नव्हता.
सासूचं म्हणणं हे व्यवहारिकदृष्ट्या तिला पटत होतं तरीही आपल्या पोटचा गोळा कुणालातरी द्यायचा म्हणजे..कुणालातरी?..या विचारावर कमळी थांबली. तिला अबोली आठवली..किती सोसलंय तिने..आजूबाजूच्या बायका लग्नकार्यात, ओटीभरणाच्या,बारश्याच्या समारंभात तिला डावलत नव्हत्या पण पुढेही घेत नव्हत्या. ती मागेच रहायची..दारातल्या पायपुसण्यासारखी. कमळीच्या लग्नाआधीपासून कमळी वत्सलाबाईंकडे कामाला होती. त्यांचं ते माडीचं घर, साताठ होवऱ्या,पुढेमागे पडव्या,धान्याने भरलेल्या कणग्या,दारात बहरलेला देवचाफा,कण्हेर,जाईचा मांडव,ओटीवरचा कुरकुरणारा झोपाळा..काय नव्हतं त्या घरात! वत्सलाबाईंच्या हाताखालीच कमळी लहानाची मोठी झाली होती.
पुढे सून म्हणून अबोली त्या माडीच्या घरात आली. कमळीचं अबोलीशीही सूत जुळलं. अडीचेक वर्षे प्रयत्न करुनही जेंव्हा अबोलीला कळलं की ती आई होण्यास असमर्थ आहे तेंव्हा काही रात्री तिने रडत घालवल्या मग मात्र तिने स्वतःला स्वतःच्याच कोशात गुरफटून घेतलं.
सदा अबोल रहाणारी अबोली कमळीशी मात्र भरभरुन बोलायची. जीवाभावाच्या सख्याच जणू. अबोलीच्या नवऱ्याने,विश्वासरावाने त्याचं सगळं लक्ष आंब्याच्या धंद्यावर एकवटलं होतं.
कमळीचं मतही सासूच्या बाजूनेच पडलं..पण ते पैशासाठी नाही तर अकाली कोमेजलेल्या अबोलीला फुलवण्यासाठी..
कमळी नेमून दिलेल्या तारखांना रोझीमायकडे चेकींगला जायची. तिला पाचवा लागला तशी तिची काया केवड्याच्या पानासारखी सतेज दिसू लागली. आता कमळीसोबत वत्सलाबाईही यायच्या. कमळीच्या बाळांची वाढ जाणून घेण्यात त्यांना विशेष उत्साह असायचा जो रोझीमायला जाणवायचा.
अबोलीच्या नवऱ्यालाही वत्सलाबाईंच म्हणणं पटलं होतं का आई दुसरं लग्न करायला भाग पाडेल त्यापेक्षा हे बरं असं वाटलं होतं ते त्याचं तोच जाणे पण त्यानेही वत्सलाबाईंच्या म्हणण्याला दुजोरा दिला होता.
पाचवा महिना लागला तसं वत्सलाबाईंनी कमळाला त्यांच्या घरी रहायला बोलावलं. तिची इतर घरांतली कामं बंद करायला सांगितली. वत्सलाबाई स्वतः जातीने कमळाची काळजी घेऊ लागल्या. नाश्त्याला तुपातला शिरा,पोहे,थालिपीठ,तांदळाची उकड.... जेवणात भाकरी,दोन भाज्या,वरणभात त्यावर लोणकढं तूप,लसणाची चटणी,लोणची.. कमळाची अगदी बडदास्त ठेवली जात होती. तिचं पोट दिवसेंदिवस वाढत चाललं होतं.
दुपारची, अबोली कमळाच्या शेजारी निजायची. चार पायांचे इवलेसे ठसे तिला कमळीच्या पोटावर इकडूनतिकडे उमटताना दिसायचे. कमळीचा डोळा लागायचा. अबोली त्या इवल्याशा पावलांवर आपली बोटं फिरवायची नि विचार करायची..यातलं माझं कुठचं? दोन्ही सुखरूप बाहेर येतील ना!
विश्वासरावाची नजरही आताशी कमळीच्या पदराआडून दिसणाऱ्या पोटाला न्याहाळायची. त्यालाही वडील होत असल्यासारखं जाणवत होतं. वत्सलाबाईंचं घर शेताभाटात असल्याने या साऱ्या गोष्टींची कुणकुण गावात अजूनतरी झाली नव्हती आणि झाली असती तरी सगळं सांभाळून घ्यायला वत्सलाबाई समर्थ होत्या. त्यांना एकच ध्यास होता तो म्हणजे 'घराण्याचं नाव पुढे लावणारा वारस'. कमळीच्या माध्यमातून त्यांचं हे स्वप्न साकार होणार होतं.
सातव्या महिन्यात अबोलीने जाईचा नि सोनचाफ्याच्या फुलांचा मुकुट,बाजूबंद,कंबरपट्टा करुन कमळीला सजवलं. तिच्यासाठी खास गुलबक्षी रंगाचं लुगडं आणलं होतं,खणाची चोळी शिवून घेतली. अशी सजलीधजली गौर पाटावर बसली तशी अबोलीने तिची फळांनी,खणानारळाने ओटी भरली. श्रीपत तिच्या बाजुला बसला होता. श्रीपतलाही आता सरदेसाईंच्या घरात यथोचित मान मिळत होता. मध्यंतरी कमळीची सासू,नणंदा येऊन तिला पाहून गेल्या.
ग्रीष्माचे दिवस होते. झोपाळ्यावर बसलं की पायवाटेच्या वळणावर फुललेला रक्तरंजित गुलमोहर दिसायचा. अशीच एकदा अबोली आणि कमळी ओसरीवर बसून चिंचा साफ करत होती नि गावातली एक जर्जर म्हातारी तिथे आली. अबोलीने तिला माठातलं थंडगार पाणी आणून दिलं. कर्णोपकर्णी म्हातारीला कमळीचं जुळं आणि वत्सलाबाईंचा प्लान याबाबत कळलं होतं.
म्हातारीच्या जीभेवर काळा तीळ होता. म्हातारी पटकन म्हणाली,"वत्सले,तू म्हणतेस ते सामके खरे पण मलातरी सगळे सुशेगाद होईल का याची शंका येते." वत्सलाबाईंनी मनोमन त्या म्हातारीच्या नावाने बोटं मोडली. तिन्हीसांजा झाल्या तशी सुक्या मिरच्या,मीठ,मोहरी,केस घेऊन कमळीची डोक्यापासून पायापर्यंत तीनदा ओवाळून दुष्ट काढली,तिच्या पापण्यांना पाणी लावलं नि ते नजरेचं साहित्य पेटत्या चुलीत टाकलं. घरभर मिरच्यांचा वास पसरला.
आता कुठे आठव्या महिन्यातले दहाबारा दिवस संपले होते नि एका मध्यरात्री कमळीला वेणा सुरु झाल्या. तिच्यासोबत निजणाऱ्या वत्सलाबाई धास्तावल्या. त्यांनी विश्वासरावाला लगेच गाडी काढायला सांगितली. अबोलीही येते म्हणून हट्ट करु लागली. वत्सलाबाईंनी दोन सुती पातळं फाडली नि पिशवीत कोंबली. गरम पाणी थर्मासात भरुन घेतलं. दोघींनी मिळून कमळीला आत बसवली. दोघी तिच्या दोन बाजूंना बसल्या. रोझीमायला नर्सने कळवताच रोझीमाय तातडीने आली.
डॉ. रोझीने भुलतज्ञाला बोलावून घेतलं होतं. सिझेरियनची सर्व तयारी नर्सने करुन ठेवली होती. रोझीने ऑपरेशन सुरु केलं. ओटीबाहेर श्रीपत,विश्वासराव,अबोली,वत्सलाबाईं..सारे बसले होते. एकेक क्षण युगासारखा वाटत होता. कोपऱ्यात असलेल्या श्रीकृष्णाच्यासमोर वत्सलाबाई बसल्या होत्या.
थोड्याच वेळात दुपट्यात गुंडाळलेलं एक नाजूक गुलाबीसर बाळ नर्सने अबोलीच्या हातात दिलं. अबोलीने तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. वत्सलाबाई म्हणाल्या,"दुसऱ्यालाही घेऊन या." नर्सने खाली मान घातली.
एकच मुल वाचवता आलं होतं. दुसरं पोटातच गेलेलं मुल वत्सलाबाईंच्या हाती आणून दिलं. त्या निष्प्राण बाळाच्या थंडगार स्पर्शाने वत्सलाबाईंचं उभं अंग थरथरु लागलं..काय विचार करत होत्या त्या नि हे काय झालं! श्रीपतने वत्सलाबाईंच्या हातातलं ते अचेतन बाळ घेतलं व काळोखात एकटाच बालदफनभूमीच्या दिशेने चालत गेला. तिथे त्या बाळाला एकदा त्याने डोळे भरुन पाहून घेतलं व मूठमाती दिली.
श्रीपत परत येईस्तोवर वत्सलाबाईंच्या मनात कितीतरी आवर्तनं उमटली होती. त्या स्वतःला समजावीत होत्या,"वत्सले,कसला खेळ खेळत होतीस तू,बुद्धिबळाचा? चालतीबोलती हाडामासाची माणसं म्हणजे सोंगट्या वाटल्या का तुला? तिचं लक्ष कृष्णाकडे गेलं..एक मन म्हणत होतं याला दोष द्यावा..याच्याशी भांडावं तर दुसरं मन म्हणत होतं वत्सले,हा कान्हा नाही का यशोदेच्या घरी राहिला तसंच एखादं मुल दत्तक घे पण वंश वाढवण्यासाठी नव्हे तर त्या अनाथ बालकाचं भविष्य सावरण्यासाठी.
पहाटे चार वाजत आले तशी तिच्या मनातली काळरात्रही मिटत गेली. एका सुंदर विचाराने तिच्या मनात प्रवेश केला. एव्हाना कमळाला शुद्ध आली होती. आपलं एक बाळ गेलं म्हणून ती रडवेली झाली होती तर दुसरं बाळ तिचं स्तनाग्र चोखत होतं,त्याच्या नाजूक पाकळीओठांनी तिचा पान्हा स्त्रवू लागला होता.
भूतकाळातील घटनांमुळे कमळाच्या मनात विचारांचं द्वंद्व चाललं होतं. कमळाला आठवत होती.. वत्सलाबाईंनी तिची घेतलेली काळजी,अबोलीचं तिच्या पोटावरुन हात फिरवणं,त्यांच्या अपेक्षा..
कमळाने श्रीपतला व सासूला आत बोलावलं. तिघांनी मिळून मोठ्या मनाने, सरदेसायांना बाळ देण्याचा निश्चय केला व वत्सलाबाईंना आत बोलावलं.
कमळाने वत्सलाबाईंना बाळ देऊ केलं. वत्सलाबाईंनी त्या इवल्या जीवाचे मुके घेतले व बाळ कमळीच्या सुपुर्द करत तीम्हणाली,"कमळा, तू मोठ्या मनाने तुझं बाळ आमच्या सुपुर्द करत आहेस पण आता माझे डोळे चांगलेच उघडलेत. या कोवळ्या जीवाला मी त्याच्या जन्मदात्रीपासून तोडायचं पातक करणार नाही. हे बाळ तुझं आहे. ते तुझंच राहील.
अबोली व विश्वासला हवं असेल तर ते एखादं बाळ अनाथाश्रमातून आणतील. अबोली वत्सलाबाईंच्या कुशीत शिरली. वत्सलाबाई तिच्या डोक्यावर हात फिरवत राहिल्या. वारसाचा प्रश्न त्यांच्या मनातून गळून पडला होता.
रोझीमायच्या डोळ्यात आनंदाश्रु उभे राहिले. तिने गॉडची प्रार्थना केली. रोझीमाय म्हणत होती,"डियर,यू ऑल आर एंजल्स. मे गॉड ब्लेस यू ऑल."
समाप्त
शितल ठोंबरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा