वाघेश्वराचा डुख

So what if it's an animal? Even a mighty tiger can feel rage.

अष्टपैलू लेखक महासंग्राम

पहीली फेरी - लघुकथा

कथा - वाघेश्वरचा डुख

वाघेश्वरचा डुख

अरे बापारेऽऽमाया जीव घ्याले टपला रे बावाऽऽमले वाचवारे कोनीऽऽबईनचे कुट हात काय मायीत बापाऽऽअरे बापारेऽऽ

''कोन होय बेऽऽआँ कोन होय म्हन्तो म्या...''

''अबे डोम्याऽऽचुप राय नां बेऽऽ थो आयकन नांऽऽ''

''तू कोन हासऽऽ आँ..''

''डोम्या लेका धीम्यान बोल नां, म्या हरी हावो..वळखत नायी का बे आवाज'' फुसफुसत हरी म्हणाला.

''अब्बा कावून बा तू असा कुथत हायेस..कावून तुले काय झालं हाये...कोन मारल तुले हरीभाऊ?''

घाबरुन त्याच्या जवळ येत. डोम्या हळूच म्हणाला.

''काय सांगू तुले. थो 'वाघ्या' नायी का...त्यान पार घोयसल{जमीनीवर पाडून मारणे}मले."

"'कोन्ता रे भाऊ वाघ्या..?''

''अबे, का तुयी मती गोट्या खेळाले गेली का बे...

थो नायी का, वासुदेव भाऊचा बैल 'वाघेश्वर...' मारकुट्या भोकाचा...थ्यान मले लय घोयसल बाप्पाऽऽमाया जीव रायते का नायी, कायी मायीत नायी बापाऽऽ तू गोठी काय करत बसला बाप्पाऽऽचाल मले घेवून चाल गावात...''

हरी त्याच्याकडे हात करत म्हणाला.

''ओ भाऊ तुले कसा नेवू बाप्पा मी येकला, आन थो वाघ्याऽ डुख{टपून} धरुन बसला आसन तं मंग आली मायवाली...लय खुनशी हाये बाप्पा थो...मानसापरिस खतरनाक...'' डोम्या घाबरुन म्हणाला.

''मंग मले का मर्‍याले सोडत का बे इथऽऽ" हरी रागाने म्हणाला.

''अरे भाऊ, म्या अस करतो. पयत जातो गावात. लोकायले उटवतो. आन घेवून येतो तुले न्या साटी..." डोम्या.

''येशीन ना रेऽऽ का चाट {गुंगारा} मारशीन..?'' हरी.

''अब्बा काय भाऊ..येवढच ओळखल का रे...मानुसकी हाये म्हटल मानसाले. ह्या गेलो का ह्या आलो पाह्य..'' डोम्या म्हणाला आणि सुसाट पळत सुटला गावाकडे.

थोड्या दूरवर डोम्या पळाला आणि थांबला. त्याने इकडे तिकडे कानोसा घेतला. मनात म्हणाला. 'माया धावाचा आवाज आयकू तं नाई जाईन त्या वाघ्याले...बाप्पा खायापीया कुच नयी आन गिलास तोडा बारा आना...कोन सांगतले हे खाली धंदे...हा हर्‍या, कायी धुतल्या तांदुयाचा नायी हाये. जवा पायले तवा लोकायचे खेटे{कुरापती} घेत रायते. काल तं त्यान मायवाल्या समोर माया शेवंतीले रट्टा हानला होता...बाप्पा काय बोंबलली मायी शेवंतीऽऽकुयीऽऽकुयीऽऽरडू का पडू केलं तिन...आन हा अजून दंडुका घिवून तिच्या मांग लागला व्हता. काय तं म्हने. त्याच्या थालीतली भाकर नेल्ली म्हने बापा...मंग कावून थाली आंगनात येकटी ठिवून जाचं होत यान भाजी आनाले घरात...मंग बिचारी मायी शेवंती कुत्री काय करीन. भुकेजली होती नां बाप्पाऽऽ बरं झाल याले वाघ्यानं घोयसल. माया शेवंतीचा बदला घेतला त्यान...'

मनोमन खुश झाला डोम्या.

तेव्हढ्यात त्याला हंबरण्याचा आवाज आला.

'अरे बाप्पाऽऽवाघ्या होय का बेऽऽपय डोम्या पय लेकाऽऽ नायीत इथच तुया मकबरा बनन...बीबी, वानी...!'

पाय घासत जाणार्‍या डोम्याला वाघेश्वरच्या हंबरण्याचा आवाज आला होता. तसा तो पळत सुटला.

गावात आल्या बरोबर हरीच्या घरी गेला.

जोरजोरात त्याने दार वाजवले. 

''वैनी ओ वैनीऽऽदार उगडा जराऽऽवैनी ओ वैनीऽऽ''

''बाप्पा, अर्ध्यारातच कोन आल बाप्पा..कोन हो बाप्पा येवढ दार वाजवाले काय झालं...डोमा भाऊ होका..?'' वहीनी.

''हाव वैनी, डोमा हाव..कवाड उगडजा जरा..''

''इकड कुकड वाट चुकले तुमी? आन् कावून बाप्पा कवाड उगडू? तुमच्या घराकड जाना बापा भावू.

इथ कावून आले बा? चंम्पीचा बाबा, वावरात हाये. 

सकाडच्यान या.'' वहीनी घाबरुन म्हणाली.

''आवो ध्रुपदा वैनी..म्या हरीभावूचा निरोप घिवून आलो. त्याले थ्या वाघ्यानं लय घोयसल हाये. लय मार लागला हाये. रस्त्यावर पडला हाये थो..'' डोम्या.

''काय म्हणता भावू? कोन्त्या वाघ्यानं मारलं त्यायले?'' वहिनीने घाबरुन दार उघडले आणि विचारले. 

''अवो, म्या तुरीच्या पेंड्या बराबर लावल्या वावरात. कंदीलातल राकेल सब्बन खतम झाल्त. मंग म्या घराकड निंगालो. रस्त्यात मले कोनी कुथल्या सारख वाटलं. मंग म्या पायलं. तं हरीभावू ह्या रक्तबंबाळ होवून पडला होता...बाप्पा लयच घोयसल त्या मारकुट्या वाघ्यानं..!''

ऐकून ध्रुपदा तर मोठ्याने रडायलाच लागली. 

''आस कस झाल वो मायऽऽ'' 

''ओ वैनी..हाये थो हाये आजून. इतच रडत बसान. तं त्याले खपाले टाईम लागणार नायी.''

''कायी बोल्ता का भावू, थ्या भावराव भावूले उटवजा बरं. त्यायच्या बंडीत टाकून आना बाप्पा त्यायले. 

माया मांग घोर लावला ह्या माणसानं.

येक काम बराबर करत नायी. मोठ्ठा तनकार्‍याचा{शीघ्रकोपी}हाये बाप्पा मानुस. जरा सुखान रावू देत नायी. रोजच्याले कायी ना कायी घोर लावते माया जीवाले...!'' 

कपाळावर हात मारत ध्रुपदा म्हणाली.

डोम्याने शेजारच्या घराची कडी वाजवली. आतून काहीच हालचाल नव्हती. मग मोठ्यांने दार ठोठावले.

आणि आवाज दिला, ''ओ भाऊराव भावू...उटजा बरं, ओ शालूवैनी उटजा बरं, ओ सरु काकीऽऽ बाप्पा..येवढे मेल्यावानी झोपते का कोनी...''

''कावून बाप्पा अर्ध्याराती उटवत हास, मेहनत केल्यावर, रातच्याले मेल्यावानीच झोप लागते. घुबडावानी, तुयासारखे

लोक रातचे घुमत असते....'' सरुकाकी दार उघडत म्हणाली.

''कावून, कवाड तोडत का काय? काय म्हंन्त बोल..?'' भाऊराव काकीच्या मागून उठून बाहेर आला. सोबत शालुवहिनी पण पदर सावरत बाहेर आली. ''कावून बा, काय म्हन्ता...?'' तिच्या चेहर्‍यावर प्रश्न चिन्हं होते. 

सोबतच आजूबाजूच्या घराचे दारपण उघडलेत.

सगळेच काय झाले म्हणून विचारु लागले.

मग पुन्हा एकदा डोम्याने सगळा वृतांत त्यांना ऐकवला.

तेव्हढ्यात द्वारकाबाई म्हणाली.

''बाप्पा येवढी मोठ्ठी गोठ झाली. आन इथ बाताच मारुन राह्यले. जाईन का कोनी त्याले आनाले..फटकन? का त्याले तिथच खपू देता? ओ पोट्ट्या डोम्या, काढ रे मायं खाचर, आन जां बैलाची जोडी आन, जोत {जुंपणे} थ्या खाचराले, जा पोट्टे हो आना त्याले...येळ नका घालवू.''

लगेच डोम्या, भाऊराव, महादेव आणि रामूने बैलबंडी दामटली.

आता मोहल्ल्यातील सगळ्यांना जाग आली होती. सगळे उत्सुकतेने तिथल्या स्र्टिटलाईटखाली द्वारकाबाईच्या घरासमोर बसलेत. तसाही त्यांचा नेहमीचा कट्टा होता बसण्याचा. तिथून येणारे जाणारे सगळेच दिसायचे. 

वेटाळाच्या मधोमध रिकामी जागा होती.

गप्पाटप्पा करायला सगळे तिथेच जमायचे.

दहाबारा घरांचा पाळा गावातील वेटाळ. 

भावकीतलेच सगळे होते.

''काय झाल अशीन व काकी?'' डोळे चोळत मीना म्हणाली.

''मले काय मायीत वं माय...आल्यावर समजन सारं...ह्या लोकायच्या हाती लागला हर्‍या तं बरं होईन मायऽऽ'' द्वारकाकाकी पदराने डोळे पुसत म्हणाली.

''ओ काकी कावून बाॅ माया मालकाच्या जीवावर उटले ओ तुमी? नायीतरी बाई सब्बन माया मानसाले पान्यात{राग करतात}पायते...मले का ठावूक नायी का..काय?'' मुसमुसत 

हरीची बायको ध्रुपदा म्हणाली.

''कावून वो पोट्टे, मेल्यावानी कावून रडत हास रातच्या टायमाले..? कायी नायी होत बाई त्याले. 

लय जब्बर जीव हाये त्याचा. 

मले मारल्या बिगर मरनार नायी थो...!'' 

हरीची रोहिणी मावशी म्हणाली. 

तिने हरीला दत्तक घेतले होते.

''कावून वो सासूबाई अस बोल्ता? कावून तुमचा जीव घेईन वो...कायी बोल्ते माय बुढी..चांगली बसून खाते, आन बयनीच्या पोरासाटी अशी म्हन्ते..!'' हरीच्या बायकोला आता रोहिणी मावशीचा राग आला होता.

मावशीची चार एक्कर शेती तिने हरीच्या नावावर केली होती. म्हातारपणामुळे रोहिणी मावशी चिडचिडी झाली होती. मग ती विनाकारण बडबड करायची. आताश्या हरीपण तिच्यावर चिडायचा. मग दोघांमध्ये एक दोन दिवसाआड खडाजंगी ठरलेलीच.

आज्जीला माहीत होते. शेत नावावर झाल्यापासून हर्‍या निश्चिंत झाला होता. त्याआधी तो तिच्याशी नम्रपणे वागायचा.

त्याचा मतलबीपणा तिच्या नजरेस आला होता.

गदारोळ ऐकून, शेजारच्या सुंदरा आज्जीची झोपमोड झाली. 

''काय कटकट हाये वं माय, आता कुट डोया लागला होता. आन यायची मयफील आता चालु झाली वाट्टे..!''

सुंदरआज्जी म्हणजे, वेटाळाची जान...

आपल्या बोलण्याने ती सगळ्यांचे मनोरंजन करायची.

एकटी असल्यामुळे झोप येत नव्हती तिला. 

आता कुठे डोळा लागला. 

आणि एकच कलकलाट झाला. 

''दिनभर गमज्या करो

रातभर कल्ला करो

बुढ्ढी को नींद ना आती

पोट्टेहो कायतरी कदर करो'' सुंदरा आज्जी.

आणि एकच हास्य कल्लोळ उडाला.

''आली वं बुढीऽऽ 

येळ काळ कायी पायत नायी

वाघ्यानं हर्‍याले मारलं 

तुले कायी मायीत नायी''

द्वारकाआज्जी तिला पाहून म्हणाली.

''अवं माय थो त्याच लायकीचा हाये वं माय. येता जाता त्या वाघ्याच्या खोड्या काढे...बर झाल्ल !" बोलली खरे...

पण हर्‍याच्या बायकोला बघून चपापली आणि,

"मायऽऽ पन कस झाल वंऽऽहर्‍यान वाघ्याले मारलं का वाघ्यानं हर्‍याले मारलंऽऽआँ'' 

सुंदरा आज्जी हसत म्हणाली.

''माय बुढी लयच खोडेल हाये....दोघायनही एकमेकाले मारलं तं काय फरक हाये म्हन्तो मी...'' हरीची बायको ध्रुपदा म्हणाली.

आपल्याच बोलण्यावर ती पण मोठ्यांने हसली.

इकडे कलकलाट सुरुच होता.

तिकडे, डोम्या, भाऊराव, महादेव, रामू बैलगाडी घेवून हर्‍या जिथे पडला होता तिथे गेले. तो तसाच निपचीत पडला होता. डोम्याने त्याला हलवून आवाज दिला. त्याने प्रतिसाद दिला नाही. ''बाप्पा..मेला का काय हर्‍याऽ'' भाऊराव रडक्या आवाजात म्हणाला. 

''माया उन्यावरच {वाईटावर} बसले हात इथ सारे. सार्‍याले वाट्टे, गेला पायजे हा हर्‍या मसनात...येवढा बेक्कार हावो का

लेक म्या...आँ म्हादेव भाऊ...?'' कण्हत दुःखी स्वरात हरी म्हणाला. वेळ निभावून नेत रामू म्हणाला, 

''कोनी कायी बोलू नका. थो वाघ्या आयकन तं येईन बाप्पा इकडं...मंग ढुंगणाले पाय लावून पया लागन...चाल हरीभावू, खाचरात बस..!'' म्हणत, हरीला आधार देत त्यांनी बैलगाडीत बसवले आणि गाडी दामटली गावाकडे.

दहा मिनीटात ते स्र्टीटलाईट खाली होते. 

लगेच हरीला घरात नेले. त्याच्या मागोमाग सारा वेटाळ घुसला घरात. ''बाप्पा काय पंगत बसवली का रे इथं...पाय ठेवाले जागा नायी घरात आन सारे च्या सारे घुसले मारे घरात..!''

रोहिणी मावशी म्हणाली.

अर्ध्यारात्री कुणी तरी वैद्यांना घेऊन आले होते.

तात्पुरता लेप आणि काढा देऊन सकाळी गावातील डाॅक्टरकडे जायला वैदूने सांगितले. वैद्य निघून गेले. 

पण सगळे हरीच्या बोलण्याची वाट बघत होते. 

नक्की काय झाले जाणून घ्यायचे होते त्यांना.

हरी शीघ्रकोपी होता. त्याला राग आला की, 

जवळपास जे दिसेल ते उचलून मारायची सवय होती त्याला. गावकरी जरा वचकून असायचे हरीला. 

कुत्रे, मांजरी, बकर्‍या, बैल त्याच्या अंगणातून गेले की, 

हा त्यांना काठीने मारायचा. नाहीतर दगड धोंडा उचलून मारायचा. 

असेच एक दोनदा मोकाट सुटलेला वाघ्या, हरीच्या शेतात गेला आणि तुरीची झाडे त्याने खाल्ली होती. हरीने हे पाहिले. जेव्हा वाघ्याच्या मालकाने वाघ्याला बांधून ठेवले दावणीला. तेव्हा हरी तिथे गेला आणि काठीने त्याने वाघ्याला मारले. वाघ्या त्याच्या अंगावर यायचा प्रयत्न करत होता. पण त्याला साखळदंडाने बांधले होते. म्हणून तो सुटू शकला नाही. वाघ्याला मारल्यावर हरी त्याच्या समोर बसून त्याला शिव्या देऊ लागला. काठीने टोचू लागला. एवढे करुन त्याचे भागले नाही. परत तो दुसर्‍या दिवशी रात्री वासुदेवच्या शेतात गेला.

आणि वाघ्यासमोर जाऊन उभारीने{खिळा असलेला बांबू}त्याला टोचू लागला. वाघ्याने गळ्याला हिसका दिला...आणि खुंटी उपटल्या गेली. तसाच तो हरीकडे धावला. हरीला पळता भुई थोडी झाली. हरी प्रतिकार करत होता. पण हिसडा देवून वाघ्या हरीला शिंगावर घेत होता आणि मातीत पाडत होता. हरी रक्तबंबाळ झाला होता. थकून गेला होता. तरी वाघ्या शांत होत नव्हता. तो त्याला मारतच होता. आता हरीने पळायचे ठरवले. सर्व ताकदी निशी वाघ्याचे दोन्ही शिंग पकडून त्याने वाघ्याला खाली पाडले. आणि जेवढ्या वेगाने पळता येईल तेवढ्या वेगाने तो वाघ्याला गुंगारा देऊन पळाला. लपत छपत, सरपटत तो शेताच्या कुंपनाच्या बाहेर आला. बाजूलाच डांबरी रस्ता होता. गाव लांब होते. कुणी ना कुणी इकडून येईलच. हरीला खात्री होती. म्हणून तो तसाच निपचीत पडून राहिला. तेव्हढ्यात डोम्या तिकडून आला.

वाघ्या बराच वेळ हंबरत होता. जणू तो कुठे आहेस हर्‍या, म्हणत होता. नंतर त्याचे हंबरणे बंद झाले होते. थकून तोही कुठे तरी शेतात बसला होता.

हरीने सुस्कारा सोडत सगळे सांगितले होते.

''याच्या साटी सगड्यासोबत चांगल राहा लागते बाबू...जनावर झाल म्हनून काय झालं? त्याले साऽर समजते. पाय बरं कसा सापावानी डुख धरुन राह्यला. आन काढला ना वचपा...''

सरु आज्जी म्हणाली.

आज उठल्या पासून वेटाळात कुजबुज सुरुच होती. 

ज्याला माहीत नव्हते. त्याला दिसताक्षणी रात्रीची बाब सांगण्यात येत होती. जो तो हरीची विचारपूस करत होता.

हरीच तो, त्याला लोकांचा राग येऊ लागला.

''म्या काय भावल{बाहूली}होका? पायासाटी येत हाये जो थोऽऽ ईच्याबीन, पया इथून कायी गरज नायी पाहाले याची...वरतुन

इचारता. आन आतून हासता. मले काय मायीत नायी का...?'' त्याची विचारपूस करायला आलेल्या भावकीतल्या लोकांना हरीने हाकलूनच दिले. 

तसेही त्याचे काम झाले होते. आणि आता तो त्याच्या मुळ स्वभावात आला होता. हर्‍या सगळ्यांनाच माहीत होता. पण तरी सुद्धा संकटकाळी भावकीतले लोक मदतीला आलीत. "इच्याबिन थ्या वाघ्याले याच्या घरचा पत्ता देजो रे डोम्याऽऽघोयसुदे अजुन येक डाव. इथच बसुन याचा तमाशा पावु, नायी कारे रामु...? हा कायी सुधराचा न्हायी...हर्‍यान डुख धरला होताऽऽका त्या वाघ्यानं डुख धरला होताऽऽहाहाहा"

त्याला मदत करून पश्चातापदग्द झालेले हसत म्हणू लागले.

संगीता अनंत थोरात

28/01/23

०००