Jan 23, 2022
वैचारिक

व्यावहारिक दिवाळी

Read Later
व्यावहारिक दिवाळी

 

व्यावहारिक दिवाळी
------------------------------

" अनघा, कधीपासून सुट्टी आहे तुझी. फक्त पंधरा दिवस राहिलेत दिवाळीला. वाणसामान आणायचंय, साफसफाई करायचीय. कधी करणार सगळं?"

" सासूबाई, खरं तर या वर्षी सुट्टी घेणं नाही जमणार मला. नवीन आहे ना जॉब. वाणसामानाची लिस्ट काढलीय का? मी ऑनलाईन ऑर्डर देते वाण्याला. साफसफाई आपण आपल्या मावशींना सांगू ना. त्या करतील. आणि फराळ पण सोप्पा घरी करू, बाकीचा बाहेरून आणू म्हणजे दळवी काकूंना देऊ ऑर्डर. चालेल का? फक्त या वर्षी. आरव पण लहान आहे आणि माझा जॉब पण नवीन आहे." अनघा जरा घाबरतंच सासूशी विनवणीच्या सूरात बोलत होती.

" बाई, बाई ! ऐकलंस का संदेश. असं कधी केलंय का आपण. मी पण करायचे जॉब पण मुलांचं, ऑफिसचं सगळं करून मी सगळं काही एकट्याने हाताळायचे. आणि आपल्या घरात नाही चालत हो बाहेरचं. कुणी तोंडात सुद्धा घालणार नाही बाहेरचा फराळ. ते काही नाही, तू तुझ्या सुट्टीचं बघ नाहीतर आहे मी खमकी, करेन मी सगळं" असं बोलत सासूबाई निघून गेल्या.

अनघाला रडू आवरेना. ती संदेशला म्हणाली, " दरवर्षी तर मी सगळं करते, या वर्षी आरव लहान आहे आणि नाही मागू शकत मी सुट्टी म्हणून जर अॅडजस्ट करायला सांगितलं आणि एक वर्ष जर केलं अॅडजस्ट तर काय होईल रे? त्या दळवी काकू घेतात ऑर्डर. एरवी तर त्या दिवाळीला फराळ घरी पाठवतात तो घरात सर्वांनाच आवडतो. मग त्यांना ऑर्डर दिली तर काय होईल? आणि सर्व पदार्थ तर मी बोलतंच नाही आहे." अनघा रडत रडतंच बोलत होती. तिचं डोकं सुन्नं झालेलं. होणारच! सगळं काही ती छान सांभाळत होती. पण आजच्या सासूबाईंच्या बोलण्यामुळे तिला एका क्षणात परकं झाल्यासारखं वाटत होतं.

" मी बोलतो आईशी." असं म्हणत संदेश आईच्या खोलीकडे वळला.

" आई, मागव ना एक वर्ष फराळ. काय होईल. आणि दळवी काकूंकडचा फराळ खरंच खूप छान असतो. तुझ्या वयाप्रमाणे तुला झेपणार आहे का एकटीला सगळं करायला. तळणीच्या त्या पदार्थांनी तुला असाच त्रास होतो. आणि आपले वाणी काका पण तर विश्वासातलेच अाहेत. ते देतील बाकीचं काय सामान हवं ते. "

" बायकोची बाजू घेऊन माझ्याशी बोलू नको. तिला नाही जमत तर माझा काही राग नाही आणि हट्टही नाही की तिने सगळं करावं मी बघेन काय करायचं ते". असं म्हणत आईने तिचा मोर्चा किचनकडे वळवला.

" अनघा तू लक्ष नको देऊस. तू काही मुद्दाम करत नाही आहेस. काही गोष्टी आपण या जुन्या लोकांना नाही पटवून देऊ शकत." संदेश अनघाला म्हणाला.

अनघाला खूप वाईट वाटत होते पण या कोवीडच्या काळात एक तर नवीन जॉब मुश्कीलीने मिळालेला त्यामुळे सुट्टी घेणं तिला अशक्य होते आणि आरव पण फक्त दोन वर्षाचाच होता. सुट्टीच्या दिवशी तो तिला चिकटलेला असायचा. तरी संदेशचं वर्क फ्रॉम होम होतं त्यामुळे तिचा इतर दिवशीचा प्रश्न सुटला होता. तो त्याला खेळवत खेळवत काम करायचा. या वर्षी तर दिवाळी शॉपिंग पण अॉनलाईनच करायचे ठरवलेलं तिने.

अनघा ठरल्याप्रमाणे ऑफिसला जात होती आणि इथे सासूबाईंनी एकदम जोरो शोरो में फराळाला सुरूवात केलेली. तरी अनघाने सुट्टीच्या दिवशी जमेल तेवढी मदत त्यांना केली. संदेशही त्यांना आरव झोपलेला असताना मदत करायचा. असं करत करत साफ सफाई आणि फराळाचा कार्यक्रम पार पाडला. आता दिवाळीला फक्त तीनच दिवस बाकी होते.

आज सकाळपासून आई थोडी मलूल आहे हे संदेशला कळत होते. त्याने आईच्या डोक्याला हात लावून बघितला तर अंग थोडे गरम होते. एकतर बाहेर कोरोना नावाचा भितीदायक पाहुणा यंदा दिवाळीलाही थांबलेला आणि त्यात आईचं अंग गरम. संदेश घाबरलाच. आरवला थोड्या वेळासाठी शेजारच्या आज्जींकडे ठेवून तो आईला डॉक्टरकडे घेऊन गेला. काम जास्त केल्याने अंगदुखी आणि ताप आहे, अौषधांनी बरे वाटेल हे ऐकल्यावर त्याचा जीव भांड्यात पडला. आपणही उगीच हट्टीपणा केला हे आईलाही आता मनोमन पटले होते.

वाचकांनो, कथा वास्तववादी आहे. बर्‍याच ठिकाणी रुढी परंपरा पाळल्याच पाहिजेत हा अट्टाहास असतो. संस्कृती, परंपरा निश्चितच जपा पण त्यामुळे आपल्याला त्रास होत नाही ना याचा विचार नक्की करा. सण आनंद साजरा करण्यासाठी येतात. त्याचा आनंद घरात खर्‍या अर्थाने सर्वांना घेता येईल याची काळजी घ्या. व्यावहारिक वागा, BE PRACTICAL !!

- आरती शिरोडकर

------------------------- समाप्त -----------------------

माझी कथा आपणास कशी वाटली हे नक्की कळवा.आवडल्यास लाईक आणि कमेंट करायला विसरू नका. आपला अभिप्राय माझ्तासाठी महत्वाचा आहे. माझं ईतरही साहित्य आवडलं तर मला फॉलो नक्की करा. माझा लेख माझ्या नावासकट आपण शेयर करू शकता. धन्यवाद ????????

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Aarti Shirodkar

Business Analyst

साहित्य माझा आवडीचा विषय. असंच काही साहित्य, माझ्या मानातलं, माझ्या लेखणीतून.