व्यथा ..पुरूषांची !

About Problems Of Men


 
"पवार ताई, तुमच्या ओळखीत कोणी मुलगी असेल तर सांगा हो, आमच्या योगेशसाठी. "

योगेशची आई पवार ताईंना सांगत होती. योगेशची आई आपल्या मुलाच्या लग्नासाठी मुलगी मिळावी यासाठी खूप प्रयत्न करत होती. अनेकांना विचारत होती,सांगत होती . 
 
मुली सांगूनही येत होत्या. पण त्यांना गाव नको होते. प्रत्येकीला शहरात राहणारा नवरा हवा होता.काही लग्नासाठी तयारही होत्या पण योगेशने शहरात राहवे या अटीवर.
योगेश गावात राहत असला तरी, चांगले शिक्षण घेतलेले होते, दिसायलाही चांगला होता. गावात वडिलोपार्जित शेती,जमीनजुमला व किराणा चे  मोठे दुकान होते आणि त्यापासून चांगले उत्पन्नही मिळत होते. घरचा चांगला व्यवसाय असताना नोकरी करणे योगेशला पटत नव्हते.
सर्व सुखसोयी असलेले घरही गावात बांधलेले होते. 

सर्व काही चांगले होते फक्त प्रतिक्षा होती , चांगल्या जीवनसाथीची!
आपले घर, व्यवसाय व आईवडील यांना सोडून योगेश शहरात जायला तयार नव्हता. त्यामुळे त्यानेही अनेक मुलींना नाकारले होते.


आज योगेशसारखे अनेक मुले असतात, ज्यांना लग्नासाठी मुली मिळण्यास अडचणी येतात.
कारण का, तर ते शहरात नाही तर गावात राहतात म्हणून.
पूर्वी मुलींच्याही व मुलांच्याही बाबतीत, लग्नासाठी इतक्या  अडचणी येत नव्हत्या,जितक्या आता येत असतात.
मुलगा कसा आहे? शिक्षण वगैरे या गोष्टींपेक्षा मुलगा कमवता हवा हे पाहिले जात होते व मुलीला घरकाम करता येते का ? एवढे पाहिले जात होते.
आईवडिलांनी ठरविलेल्या मुलामुलीशीच लग्न होत होते..

पण आता काळ बदलला, मुलींची शिक्षणात प्रगती झाली. सर्व क्षेत्रात मुली मुलांपेक्षा सरस ठरू लागल्या.मुली परावलंबी न राहता स्वावलंबी बनत गेल्या.
पुरूषांकडून स्त्रियांवर वेगवेगळ्या प्रकाराने होणारा अन्याय, अत्याचार, छळ रोखण्यासाठी स्त्रियांच्या रक्षणासाठी कायदे निघाले, महिला आयोगाची स्थापना झाली. वेगवेगळे NGO स्त्रियांच्या अधिकारांसाठी काम करू लागल्या. त्यामुळे स्त्रियांना अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्याची प्रेरणा मिळत गेली.त्या  अबला न राहता सबला होत गेल्या. व प्रत्येकीत आत्मविश्वास निर्माण होत गेला.

\"स्त्री- पुरुष समानता\" असे करता करता बाजू पलटू लागली. अगोदर स्त्रिया पीडित, शोषित होत्या व पुरूष शोषण करणारे होते. आता काही ठिकाणी पुरूष दुःखी,पीडित होऊ लागले.

खूप प्रयत्नानंतर योगेशला लग्नासाठी मुलगी मिळाली जी त्याच्याबरोबर गावात राहण्यास तयार होती.
योगेशबरोबर त्याच्या घरातील सर्वांना खूप  आनंद झाला. व योगेशचे लग्न धुमधडाक्यात पार पडले. लग्नाचा सर्व खर्च योगेशच्या घरच्यांनी केला होता, त्या अटीवरच लग्न ठरले होते. 

योगेशची पत्नी जया, ही तीन बहीणीतील तिसरी व तिच्या नंतर  एक  भाऊ. वडिलांची परिस्थिती साधारण होती . मुलींना जास्त शिकवू शकले नाही. कॉलेजला असतानाच दोन्ही मुलींचे लग्न केले .
समाजात मुलांना लग्नासाठी मुली मिळत नसल्याने,मुलाकडील परिस्थिती चांगली असली की, मुलींचे आईवडील लग्नाचा काहीही खर्च न करता मुलींचे लग्न लावून देतात. जयाच्या दोन्ही बहिणींचेही असेच लग्न झाले होते. 

पूर्वी मुली म्हणजे हुंडा, लग्नाची जबाबदारी यामुळे मुलीपेक्षा मुलगाच  हवा असे आईवडिलांना वाटत होते.
पण आता सर्व चित्र पालटले आहे. मुली म्हणजे जबाबदारी असे न राहता मुली म्हणजे जीवनाचा आधार! असे झाले आहे.

\"आपले लग्न झाले म्हणजे आपले आयुष्य आता सुखाचे होईल \" या विचाराने योगेश आनंदाने बायकोचे लाड पुरवित होता. सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थित पार पाडत होता. आईवडिलांचा चांगला मुलगा, भाऊबहिणींचा  चांगला भाऊ व जयाचा चांगला नवरा . या सर्व भूमिका उत्तम रीतीने निभावत असताना , त्याला आपल्या व्यवसायातही लक्ष द्यावे लागत होते.वेगवेगळ्या अडचणींना सामोरे जावे लागत होते.
आपल्या कुटुंबाला काही त्रास होऊ नये, त्यांना सर्व प्रकारचे सुख मिळावे यासाठी खूप कष्ट करत होता.

स्त्री पेक्षा पुरूष कठोर वाटत असला तरी , त्याला मन असते..भावना असतात..त्यालाही सुखदुःख असतात. स्त्रीच्या भावना तिच्या अश्रूरूपात प्रकट होतात, ती बोलून मन मोकळे करते. पण पुरूषाच्या डोळ्यात अश्रू शोभत नाही. पुरूष म्हणजे लाचार नाही, कमजोर नाही तर पुरुष म्हणजे धैर्यशील, पराक्रमी !  या दृष्टीने पुरुष वर्गाकडे पाहिले जाते.
यामुळे पुरूषाला रडणेही शक्य नाही व आपल्या भावनांना शब्दरूप देणेही जमत नाही. तो फक्त जबाबदारीच्या ओझ्याखाली जगत असतो. 


जयाला घरात सर्व सुखसोयी होत्या. प्रेमळ सासूसासरे होते. जीव लावणारा ,समजून घेणारा नवरा होता. कशाचीही काही कमतरता नव्हती. पण जयाची सारखी काहीतरी कुरकुर सुरू असायची. थोडेसेही तिच्या मनासारखे नाही झाले तर रडायची, अबोला धरायची. 
योगेशचे आईवडील तिला वडीलकीच्या नात्याने चांगल्या गोष्टी सांगायचे तर ते तिला आवडत नव्हते. 
योगेशला आईवडिलांचेही ऐकावे लागायचे आणि जयाचेही मन सांभाळावे लागायचे. एकाच्या बाजूने बोलले तर लगेच दुसऱ्याला राग ..असे होऊन जायचे. काय करावे ? या प्रश्नाने योगेशचा कोंडमारा व्हायचा.
जया रडून आपले दुःख व्यक्त करायची. आईवडील बोलून आपल्या भावना व्यक्त करायचे. पण योगेश आपले दुःख ,मनातच ठेवायचा.
पुरूष कितीही पराक्रमी असला तरी , काही वेळेस हतबल होऊन जातो,स्वतः ला दुर्बल समजू लागतो. जीवनात हताश होऊन जातो. 
परिस्थितसमोर हात टेकून देतो.
असेचं योगेशच्या बाबतीत होत होते.

गावात त्याला खूप मान होता. एक यशस्वी व्यक्तिमत्त्व म्हणून त्याची ओळख होती पण घरातील गोष्टींनी तो व्यथित असायचा.

योगेश मनातल्या मनात रडायचा.पुरुष असलो म्हणून काय झाले.. मला ही भावना आहे, मला ही दुःख होते.क्या 
\"मर्द को दर्द नहीं होता ?\"असे मनात यायचे. आपल्या मनाची व्यथा कोणाला सांगू ? असे त्याला वाटायचे.

घरात जास्त वाद होऊ नये म्हणून तो जयाच्या सर्व इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत होता. तिचे  नेहमी माहेरी येणे जाणे, कपडे,दागदागिने, हौसमौज सर्व काही तिच्या मनासारखे! जेणेकरून ती आनंदी राहील व घरात शांतता राहील. पण दिवसेंदिवस तिच्या इच्छा वाढतच होत्या. आईवडिलांपासून वेगळे राहण्याचेही तिने योगेशला सांगितले.
पण आपले आईवडील खूप चांगले आहेत व आपल्या सुखासाठी ते आपल्याला वेगळे राहण्याचा सल्लाही देतील . पण योगेशला हे पाऊल उचलायचे नव्हते. आतापर्यंत नवरा म्हणून जयाचे सर्व ऐकत होता. तिच्या सुखाचा विचार करता सर्व आनंदाने करत होता. पण ती त्याच्या चांगुलपणाचा जास्त गैरफायदा घेत होती, तेव्हा योगेशला आपला पुरषार्थ दाखवावाच लागला. 
त्याने जयाला स्पष्टपणे सांगितले होते, \"एकत्र राहयचे असेल तर रहा नाही तर तू माहेरी राहू शकते.\"

जया आई होणार होती. गरोदरपणात घेण्याची काळजी व बाळतंपणाचा खर्च  आपल्या आईवडिलांकडून होणार नाही. या विचाराने तिने  सासरी राहण्याचा विचार केला. पण तिच्या  कुरबुरी सुरू असायच्या.


योगेश रूद्र चा बाबा झाला होता. त्याला वडील झाल्याचा खूप आनंद झाला होता. आपली जबाबदारी अजून वाढली ,आपल्याला अजून खूप मेहनत घ्यावी लागेल .आनंदाबरोबर हे ही विचार त्याच्या मनात येऊ लागले. 
आईची माया पटकन दिसून येते,
पण वडिलांचे कष्ट, त्यांचे प्रेम हे ही तितकेचं महत्त्वाचे असते !


आपल्या  वहिनीच्या वागण्याने  आपले आईवडिल किती दुःखी असतात. आपला भाऊ  वहिनीचा किती त्रास सहन करत असतो. हे जेव्हा जयाला भावाचे लग्न झाल्यावर कळाले, तेव्हा योगेशच्या व्यथांची तिला जाणीव झाली. 
आपण किती चुकीचे वागत आहोत हे कळायला लागले. स्त्री असल्याचा जास्तच दुरूपयोग करत होतो. हे समजायला लागले. 
आपल्या आयुष्यात नवरा आहे म्हणून तर आपल्याला किती महत्त्व आहे. आपल्यापर्यंत दुःखाची झळही येऊ नये याची तो काळजी घेत असतो. 
स्त्री व पुरुष या दोघांमुळे तर जीवन आहे. दोघांचेही जीवन एकमेकांवर अवलंबून आहे. कोणीही श्रेष्ठ नाही कोणीही कनिष्ठ नाही. दोघेही महत्त्वाचे! 
दोघांनीही एकमेकांचा आदर केला पाहिजे. मानसन्मान ठेवला पाहिजे. तरच नाते टिकते.असा विचार करून ती योगेश बरोबर सुखाने संसार करण्याचे स्वप्न रंगवू लागली.


समाप्त


नलिनी बहाळकर