" आई.. वेलकम टू अवर बॅचलर्स होम.." समर दरवाजा उघडत म्हणाला.. आत सुजित हेडसेट लावून नुसता आतल्या कपड्यांवर फिरत होता.. तर साहिल सोफ्यावर लोळत पडला होता.. नाश्त्याची भांडी खाली पसरलेली होती.. दुसरीकडे कपड्यांचा ढिग पडला होता.. हे बघूनच आईला म्हणजे उमाताईंना चक्कर आली..
" अरे.. हे घर आहे कि उकिरडा.." त्यांचा आवाज ऐकून सोफ्यावर झोपलेला साहिल दचकून खाली पडला.. तो पडला हे बघून सुजितचे लक्ष गाण्यांकडून त्याच्याकडे गेले.. तो कुठे बघतो आहे हे बघून तो जोरात किंचाळला.. त्याने समोरच पडलेला टॉवेल कसातरी कंबरेभोवती गुंडाळला..
"समर.. तू.. तुम्ही दोन वाजता येणार होता ना?"
" वाजलेत बघ किती? तीन वाजले आहेत.. गाडी एकतास उशिरा आली." समर वैतागून म्हणाला..
"सॉरी हां.. मला वाटले आताशी एकच वाजला आहे.." सुजित म्हणाला..
" काकू नमस्कार करतो.." साहिल प्रसंगावधान राखून म्हणाला..
" हो.. मी पण.. काकू बसा ना.." सुजित म्हणाला..
" बसू?? कुठे? अरे जरा तरी जागा आहे का बसायला?"
त्या खोलीत मुलांना भरपूर जागाच जागा दिसत होती.. म्हणजे ती खरकटी भांडी थोडीशी तिथे सरकवली कि असलेल्या एकमेव सोफ्याला चिकटून बसता येई.. ती जागा नसेल तर तो कपड्यांचा ढीग ॲडजस्ट करायचा.. आणि मस्त भिंतीला टेकून बसायचे.. आता त्या सोफ्यावर वेफर्स , बिस्किटांचे रिकामे पुडे नसतील तर कोणीही तिथे बसू शकत होते.. पण प्रॉब्लेम स्वच्छतेच्या भोक्त्या असलेल्या उमाताईंचा होता.. तो पसारा पाहून त्यांना गरगरल्यासारखे झाले म्हणून त्या जरा सोफ्यावर टेकल्या. तर हाताला काही ओलेओले लागले म्हणून बघायला गेल्या तर लाल रंग लागला होता..
" ईईई.. रक्त.."
" रक्त नाही काकू.. सॉस असेल.. ते मगाशी साहिल तिथे बसून साबुदाणावडा खात होता.."
" साबुदाणावडा आणि सॉसचा काय संबंध?"
" काकू.. काय लागतो सांगू.." साहिल बोलायला लागला..
" अजिबात नको सांगूस.. आधीच हे बघून मळमळते आहे.. आता तुझे हे नवीन फ्युजन ऐकून उलटी होईल मला.." उमाताई करवादल्या.
"सॉरी काकू.." साहिल तोंड पाडून बसला..
" आई थांब.. मी तुला पाणी देतो.." समरने पाणी आणले. पण त्या ग्लासची अवस्था बघून त्यांना ते प्यायची इच्छाच होईना..
आतापर्यंत तुम्हाला कल्पना तर आली असेलच ना नसेल तर मी सांगते.. समर हा उमाताईंचा मुलगा. नुकतीच कामानिमित्त त्याची दुसर्या शहरात बदली झाली होती.. एकटे रहायचा कंटाळा आणि हॉस्टेलचे नको असलेले नियम.. यावर उपाय म्हणून त्याने फ्लॅटमेटचा पर्याय शोधला.. सुजित आधीपासूनच तिथे रहात होता. समर नंतर काही दिवसांनीच साहिलही आला.. बॅचलर्सच ते. तिघांची लगेचच मैत्री झाली.. समर जेव्हा इथे आला तेव्हा एकामागोमाग एक काही कारणे निघत गेली आणि उमाताईंना इथे येणे जमले नाही. आता एका नातेवाईकाच्या लग्नाचे निमित्त करून त्या आल्या होत्या. त्यांना वाटले होते , आठ दिवस राहू.. मुलाला चांगले खायला प्यायला घालू. तो काय करतो ते बघू आणि समाधानाने घरी येऊ.. पण त्यांचे मनोबल हि खोली बघूनच ढासळले होते. काकूंचा म्हणजेच उमाताईंचा उतरलेला चेहरा बघून मुलांच्या चेहऱ्यावर बारा वाजले.. कारण काकू इथे येणार म्हणजे चार दिवस तरी घरगुती चांगलचुंगले खायला मिळेल असे बेत त्यांनी केले होते. बाहेरचे खाऊन जीभ आणि पोट दोन्ही कंटाळले होते. घराचा अवतार बघून काकू परत जातात कि काय असे त्यांना वाटले..
काय वाटते, काकू परत जातील की थांबतील? नक्की सांगा.. बघू पुढील भागात काय होते ते..
सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
दादर मुंबई
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा