व्यक्त व्हायचं राहून गेलं भाग 3 जलद कथामालिका स्पर्धा

वेळोवेळी आपल्या जोडीदारासोबत बोलून व्यक्त होत चला, नाहीतर गैरसमज होतील


 व्यक्त व्हायचं राहून गेलं भाग 3
जलद कथामालिका लेखन स्पर्धा
सौं तृप्ती कोष्टी ©®
         
    "व्यक्त व्हायचे राहून गेले, खर तर सुरुवात कुठून करु हे कळत नव्हते म्हणून हेच म्हटले आधी."

"व्यक्त व्हायचे दरवेळी माझे राहूनच जाते, सॉरी सरीता.. तु जे काही करतेस माझ्यासाठी ते सगळे आवडते मला, खूप आवडते. तू सगळं अगदी मनापासून करत असते माझ्यासाठी, मला जाणवत ते तुझ्या प्रत्येक गोष्टीतून."

"त्यादिवशी पार्टीला जाताना खरंच तु खुप सुंदर दिसत होतीस, पण तेव्हा तुला काही बोललो नाही मी."

"आणि माझ्या वाढदिवसाच्या दिवशी सुद्धा तु इतके काही केलेस माझ्यासाठी, खुप आवडले मला ते ही. पण तेव्हा सुद्धा तुला काहीच बोललो नाही मी ."

"एक विचारू तुला?"

"बोला ना सागर"

"मी असा नेहमीच शांत राहतो, याचा तुला त्रास होत असेल ना!
कारण तु इतकी बोलकी आहेस आणि मी मात्र तुला साधा प्रतिसाद ही देत नाही."

"कधीकधी माझ्यावर चिडतही असणार तू, मला माहितीये."

"अस काही नाहीये सागर."

"खरंच सॉरी सरु, मला ना समजतच नाही बघ."

"प्लिज अस नका ना बोलू सागर तुम्ही."

"हे बघ, आजही तू मलाच सांभाळून घेतेस. आणि स्वतः मात्र शांत शांत राहतेस, मला कळतंय सगळं. तू इतकी बडबडी मुलगी, फक्त आणि फक्त माझ्यामुळे शांत झालीस."

"खरंच आज खूप बोलावसं वाटतंय मला तुझ्याशी, लग्न झाल्यापासुन आपण एकांतात असे बसून कधी मनसोक्त मनमोकळेपणे कधी बोललोच नाही ना!"

"खर तर मला आज स्वतःचीच लाज वाटतेय, की मी कसा इतका रुक्ष वागत होतो तुझ्याशी. तु प्रत्येक गोष्टीत माझा आनंद शोधत होतीस आणि मी मात्र तुझ्यासाठी काहीच करत नव्हतो."

इतक्यात सरीताने सागरच्या तोंडावर हात ठेवला, "काहीही काय बोलताय, आणि मला खरचं काही वाईट वैगरे नाही वाटते. तुम्ही जसे आहात तसेच खुप छान आहात."

सरीताने त्याच्या तोंडावर ठेवलेला हात काढत सागर बोलला,
"नाही तु माझ्यासाठी इतक्या रात्रीपर्यंत जागी राहतेस आणि जेवणासाठी सुद्धा थांबतेस. पुन्हा नको ग असे करत जाऊ. मला होतो उशीर कधीकधी, तु मात्र जेवून घेत जा आणि झोपत जा. हवे तर मी आल्यावर वाढून देत जा मला, पण अशी उशीरापर्यंत जागून न जेवता नको वाट बघत जाऊस, मला नाही आवडणार ते."

"बरं ठीक आहे."

"तुला मी सरु म्हटलेलं आवडेल का?"

"खूप आवडेल" सरीता अगदी आनंदून गेली.
 
   "तु इतकी सुंदर, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींत आनंद व्यक्त करणारी, मनमुराद खळखळून हसणारी आणि मी तुझ्या एकदम विरूध्द. माझ्यामुळे तु ही एकदम शांत राहायला लागलीस."

"माझ्यासाठी तु स्वतःला बदललेस, पण आता नाही.  तुझ्यासाठी मी ही काही तरी केले पाहिजे ना!"

"म्हणजे एकंदरीत बघता माझ्यामुळे तु शांत झालीस पण तुझ्यामुळे मला मात्र बडबडायची सवय लागलीच नाही. तु जे काही करतेस, ती तुझी प्रत्येक गोष्ट आवडायची मला. पण मी कधी बोलून दाखवलेच नाही तुला. आणि ह्या गॅलरीत पण बघ ना, तू इतकी सुंदर फुलझाडे तुला आवडतात म्हणून लावलीस पण कधी ते मलाही आवडू लागले समजलेच नाही!"

"कधी तुझी बडबड सतत ऐकावी असे वाटायला लागले समजलेच नाही, तुझे ते सजणे सवरणे. तु खुप सुंदर दिसतेस असे मी कधी बोललोच नाही. तुझे डोळे खुप सुंदर आहे आणि काजळ लावल्यावर तर अजुन सुंदर दिसतात. हे मी तुला कधी सांगितलेच नाही, पण आता नाही. आता आपण दोघांनी एकमेकांसोबत रोज थोडा तरी वेळ घालवला पाहिजे, एकमेकांसोबत बोलल पाहिजे, व्यक्त झाले पाहिजे."

"असे काही नाही सागर, बास्स तुम्ही माझ्यासोबत कायम असेच रहा अजून काही नको मला, आणि तुम्ही तुमच्या वागण्यातून नजरेतून दाखवत होताच की. मग बोलून नाही दाखवले म्हणून काय झाले. प्रेम तर कमी नाही ना झाले!"

"म्हणजे मी असाच अबोल आवडतो का तुला",असे म्हणून सागर तिच्याकडे बघून हसायला लागला.

"नाही तस नव्हतं म्हणायचं मला."

"मग कस म्हणायचं होत तुला?"
सागर तिच्या आणखी जवळ येत बोलला, तशी ती अंग चोरून बसली.

"तुम्ही जसे आहात तसेच आवडतात मला."

"असे कसे, मी जरी बोलून नाही दाखवले तरीपण प्रेम कमी नाही होत. पण त्याचा आनंद व्यक्त करायचा राहतोच की. कधी कधी बोलून दाखवणे ही गरजेचे असते नाहीतर गैरसमज होऊ शकतात."

"आजपासून मी ठरवले आहे, प्रत्येक गोष्ट व्यक्त केल्यावर त्याचा आनंद द्विगुणीत होत असतो. म्हणून मी सुद्धा अगदी तुझ्या इतकं नाही पण व्यक्त होत राहणार, तुझ्याचसाठी."

असे म्हणून सागरने सरीताच्या कपाळावर हलकेच ओठ टेकवले, आणि ती लाजून त्याच्या कुशीत शिरली.

सागर आणि सरीता तसेच गॅलरीत झोपाळ्यावर बसून होते, बोलता बोलता एकमेकांच्या मिठीत त्यांना कधी झोप लागली कळलेच नाही..!

म्हणून सांगते, वेळोवेळी आपल्या जोडीदारा सोबत मनातलं बोलून व्यक्त होत चला. छान वाटतं एकदम, समोरच्याला ही आणि आपल्याला सुद्धा.


समाप्त

🎭 Series Post

View all