व्यक्त व्हायचं राहून गेलं भाग 2 जलद कथामालिका स्पर्धा

वेळोवेळी जोडीदारासोबत आपल्या भावना व्यक्त करत चला, नाहीतर गैरसमज होतील
व्यक्त व्हायचं राहून गेलं भाग 2
जलद कथामालिका लेखन स्पर्धा
सौं तृप्ती कोष्टी ©®


त्या दिवशी लिपस्टिक जरा भीत भीतच लावली,  सागरला आवडत नाही जास्त मेकअप माहितीये. त्याला साधी राहणी पसंत, त्यामुळे सरीता जितकी साधेपणाने राहते त्याला ती तशीच आवडायची. पण तरी ती एकदम छानपैकी तयार झाली होती. त्यांच्या मित्राच्या मुलीच्या पहिल्या वाढदिवसाच्या पार्टीला जायचे होते. तिला वाटलं मग सुंदर असा ड्रेस घालू. पण त्यावर अस साध जाण शोभल नसतं, म्हणून मग काजळ आणि लिपस्टिक लावली फक्त. तरीही खुप तयारी केलीये असे वाटत होते. पण सागर चक्क काहीच सुध्दा बोलले नाही मला! म्हणजे कशाला इतकी तयारी केली वैगरे, खर तर त्यालाही  आवडले असावे म्हणूनच कदाचित. 
               
       एके दिवशी संध्याकाळी सागरला जरा उशीर झाला ऑफिस मधून घरी यायला, सरीताने खुप वाट बघितली आणि भुक ही लागली होती तिला. पण सोबत जेवू म्हणून ती ही थांबली त्याच्यासाठी. वाट बघता बघता तिला कधी झोप लागली समजलेच नाही.

रात्रीचे दहा वाजुन गेले होते तेव्हा कुठे सागर घरी आला आणि त्याने स्वतःच त्याच्या जवळ असलेल्या चावीने दरवाजा उघडला. त्याने अगदी हळूच दार उघडले पण तरी सुद्धा दरवाजाच्या आवाजाने तिला खाडकन जाग आली. ती दचकून लगेच उठली, पण सागरने तिला सांगितले.
"घाबरू नकोस, मीच आहे."

"तुम्ही हात पाय धुवून या, मी जेवण गरम करून आणते" असे म्हणून ती किचनमध्ये जाऊ लागली. तेव्हढ्यात सागर फ्रेश होऊन बाहेर आला आणि दोघेही जेवायला बसले. 
पण सागरच्या मनात होते की," ही का इतक्या उशीरापर्यंत जागी राहिली आणि जेवायची थांबली असावी माझ्यासाठी" पण त्याने बोलून दाखवले नाही तेव्हा.
   
    अशा छोट्या छोट्या गोष्टी कधी सागर बोलून दाखवत नव्हता, कधीतरी तिला समजेलच म्हणून. पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीच खूप काही सांगून जातात. त्यातच खरा आनंद असतो, हे अजून सागरला समजत नव्हते.
      
        सागरचा आज वाढदिवस होता म्हणून सरीताने खुप तयारी केली होती. त्याला आवडेल अशीच तिने त्यांची रुम सजवली होती. कुठलाच भडकपणा नाही की कुठला बडेजाव पणा नाही.

रूममध्ये हलक्या रंगाचे पडदे आणि बेडशीट घातले, सुंदर ताज्या फुलांचा गुच्छ आणून तिने डायनींग टेबल वर सजवून ठेवला होता आणि जेवणही त्याच्याच आवडीचे बनवले होते. त्याच्यासाठी तर गिफ्ट ही घेतले होते छान, हातातले घड्याळ. त्याला आवडेल सुध्दा आणि पैसे वाया जाणार नाही म्हणून तो ओरडणारही नाही, कारण उपयोगी वस्तू घेतली त्याच्यासाठी.

घरी येताच सागरला जरा वेगळेपणा जाणवला, जेवणही अगदी छान झाले होते. त्याच्या आवडीची बटाट्याची भाजी आणि बासुंदी केली होती सरीताने. सागरच्या खाण्यापिण्याच्या आवडी अगदी साध्याच होत्या, पण सरीताने मन लावून त्याच्यासाठी काही तरी केले होते आणि तो फक्त तिला थॅंक्यू म्हणून मोकळा झाला होता.  मनातून तिला जरी काही वाटले, तरी तिने कशाचेच वाईट  वाटून घेतले नव्हते. असतो एखाद्याचा स्वभाव म्हणून सोडून दिले. 
        
        एकदा सहज कुठेतरी फिरायला जायचे म्हणून सरीताने हट्ट केला. जवळच दोघेही एका व्याख्यानात गेले होते. तिथे बऱ्याच गोष्टी नव्याने समजल्या होत्या. तिकडून घरी आल्यावर सागरचा मुड बराच बदललेला दिसत होता. सरीता मात्र आतल्या रुममध्ये आवरायला निघून गेली आणि बाहेर गॅलरीत येउन बसली झोपाळ्यावर. छान थंड हवा सुटली होती, आणि अचानक सागरने तिच्या मागून येऊन तिला घट्ट मिठी मारली. आधी सरीता दचकलीच,  पण नंतर तिही सागरच्या मिठीत शिरली. खुप दिवसांनी सागर तिच्यासोबत असे स्वतःहून बोलायला जवळ आला होता. सरीताला खुप छान वाटत होते. खुप बोलावेसे वाटत होते, पण आज सागर बोलत होता आणि सरीता फक्त त्याला ऐकत होती.

काय बोलणं झालं असेल त्या दोघांमध्ये? जाणून घेऊया पुढच्या भागात

🎭 Series Post

View all