गोष्ट छोटी डोंगराएवढी..
व्याख्या स्वातंत्र्याची..
माझ्या लहानपणी आई १५ ऑगस्टला, स्वातंत्र्यदिना रोजी आम्हा भावंडाना लवकर उठवायची. इस्त्री करून ठेवलेला गणवेश घालायची. सकाळी सातच्या ठोक्याला आम्ही ध्वजारोहण करण्यासाठी शाळेच्या प्रांगणात जमायचो. अतिथीगण यायचे, ध्वजारोहण करायचे. देशभक्तीपर गीते सादर व्हायची. भाषणं व्हायची. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या अमर हुतात्म्यांची कहाणी कानी पडायची. सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे नंतर खाऊ वाटप करून शाळेला सुट्टी असायची पण तेंव्हा मनात एक प्रश्न सतत घोळायचा की हे स्वातंत्र्य म्हणजे नेमकं काय? देश पारतंत्र्यात होता म्हणजे नेमकं कुठे होता? का इतक्या स्वातंत्र्यवीरांनी स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिली? स्वातंत्र्य ही काय एक वस्तू होती? तिला मिळवण्यासाठी इतकं बलिदान? नेमकं काय मिळवलं आपण? तेंव्हा नेमकं कळायचं नाही लहान होते ना!!
हळूहळू मग कालांतराने स्वातंत्र्याचा अर्थ उमगत गेला. नेमकं आपण काय मिळवलं ते उमजत गेलं. खरंतर अजूनही नीटसं उमजलं की नाही ते सांगता येणार नाही. मी माझ्या परीने स्वातंत्र्याचा अर्थ लावत गेले.
देश पारतंत्र्यात होता. इंग्रजांच्या काळात हुकूमशाही राजवट. कोणालाच कोणतेच अधिकार नव्हते. आपली मतं मांडण्याची मुभा नव्हती. स्वतःच्या इच्छेनुसार वागण्याची, जगण्याची सुद्धा अनुमती नव्हती. फक्त पिळवणूक, गुलामगिरी. व्यक्तिस्वातंत्र्य, भाषणस्वातंत्र्य, मानवअधिकार सर्वांवरच घाला.. ना बोलण्याची मुभा होती, ना स्वतःची मतं.. आणि मग या सर्वांतून आपल्या स्वातंत्र्य सेनानींनी आपली सुटका केली. इंग्रजांची सत्ता उलथून टाकली. आपले अधिकार आपल्याला मिळवून दिले. इंग्रजांच्या गुलामगिरीतून आपली सुटका केली आणि याच दिवशी इंग्रज आपल्या देशातून कायमचे निघून गेले आणि आपला देश स्वतंत्र झाला.
खरंतर तेंव्हाही सारेच गुण्यागोविंदाने राहू शकले असते पण दुसऱ्यांचे अधिकार बळकावून समोरच्या व्यक्तीवर अधिकार गाजवणं, त्याला आपल्या तालावर नाचवणं, गुलाम बनवून तुच्छतेची वागणूक देणं स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हणून सिद्ध करणं, कमजोर लोकांवर राज्य करणं हीच वृत्ती उपजत होती. मी सर्वश्रेष्ठ असल्याची भावना प्रबळ होत होती. त्याच भावनेला वृत्तीला समूळ नष्ट करणं म्हणजेच स्वातंत्र्य मिळवणं इतकंच मला उमजत गेलं..
मग खरंच ही वृत्ती नष्ट झालीय का? खरंच आपण स्वतंत्र झालोय का? माझाच मला पडलेला प्रश्न.. प्रत्येकाच्या दृष्टीने स्वातंत्र्याची परिभाषा निरनिराळी, व्यक्तीसापेक्ष..
माझ्यामते, स्वातंत्र्य म्हणजे आपलं आयुष्य आपल्या पध्दतीने जगण्याचं स्वतःचं असलेलं एक तंत्र.. अगदी आपल्याला हवं तसं. मनसोक्त, स्वच्छंद, एक मोकळा श्वास.. आपल्याला हवं ते करता यायला हवं. पण याचा अर्थ स्वैराचार नव्हे. मनाला वाटेल तसं वागण्याची मुभा मुळीच नाही. काहीवेळा स्वातंत्र्यावर उचित बंधनं ही स्वातंत्र्याचा गैरवापर होऊ नये म्हणून गरजेचीच.
नेमकं स्वातंत्र्य कशाचं? विचारांचं स्वातंत्र्य, मनसोक्त जगण्याचं स्वातंत्र्य, मत मांडण्याचं स्वातंत्र्य योग्य अयोग्य ठरवण्याचं स्वातंत्र्य.. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे माणूस म्हणून जगण्याचं, जगू देण्याचं स्वातंत्र्य..
स्वातंत्र्य म्हणजे मानवी नीतिमूल्यांची जपवणूक. दुसऱ्यांच्या शक्तीने प्रतिबद्ध न होता स्वमर्जीने वागण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य. स्वायत्ततेची गरज म्हणजे स्वातंत्र्य, सृजननिर्मिती शोध घेण्याची क्षमता म्हणजे स्वातंत्र्य आणि स्वतःला मुक्तपणे अभिव्यक्त करणं म्हणजे स्वातंत्र्य..
खरंतर स्वातंत्र्य ही एक जबाबदारी प्रत्येकाची. सामाजिक वैयक्तिक वर्तनाचं भान ठेवण्याची. आत्मभान असण्याची.
मला अभिमान आहे मी भारतीय असल्याचा.. या देशात माझा जन्म झाला याचा पण मला वाटतं, स्वातंत्र्याच्या या साऱ्या गोष्टी जेव्हा आपल्याला आत्मसात होतील तेंव्हाच खऱ्या अर्थाने आपण स्वतंत्र झालेले असू. खरा स्वातंत्र्याचा अर्थ आपल्याला उमगू लागेल.. नाही का?
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा...