व्याख्या स्वातंत्र्याची. .. प्रत्येकाची..

देशासाठी काही करू इच्छिणाऱ्या अप्पांनी कथा..


व्याख्या स्वातंत्र्याची. प्रत्येकाची..
गोष्ट छोटी डोंगराएवढी..
व्याख्या स्वातंत्र्याची..


" कर चले हम फिदा जानेतन साथियों, अब तुम्हारे हवाले वतन साथियों.." बाजूच्या लाऊडस्पीकरवर जोरजोरात गाणे चालू होते. ते ऐकून अप्पांना गहिवरून आले.
" पंधरा तारीख जवळ आली वाटते." ते स्वतःशीच पुटपुटले.. " हो. असे कसे विसरता अप्पासाहेब तुम्ही. कालच तर मुले बाहेर गेली ना चार दिवसांची लागून सुट्टी आली म्हणून. स्वातंत्र्यदिनाला लागून आलेल्या सुट्ट्या. मग काय तिरंगा फडकवायचा, देशाचे, स्वातंत्र्यसैनिकांचे आपण काही देणे लागतो हे विसरून उठायचे आणि बाहेरगावी जाऊन मद्यधुंद व्हायचे, धिंगाणा घालायचा. छे.." अप्पांना विचारच करवत नव्हता. ते आठवत होते जुने दिवस. " अरेच्चा पंधरा ऑगस्ट म्हणजे आपलाही वाढदिवस आलाच की. कसले भाग्य आपले की ज्या दिवशी देशाला स्वातंत्र्य मिळाले त्याच दिवशी आपला जन्म झाला." अप्पा स्वतःशीच हसले.
" म्हणूनच असेल कदाचित आतली देशप्रेमाची ज्योत सतत जळतच राहिली. काहीच खास करता आले नाही या आयुष्यात आपल्याला. अठरा पूर्ण झाल्या झाल्या सैन्यदलात भरती होण्याची खूप इच्छा होती. पण घरातल्या जबाबदाऱ्यांमुळे ती ही अपूर्णच राहिली. सुरू होते एका सामान्य माणसाचे आयुष्य. मुले, संसार आणि घरदार. देश या सगळ्यात कधी पाठी पडला ते जाणवलेच नाही. आता आयुष्याची सांजवेळ जवळ आली तर या मातृभूमीसाठी काहीतरी करावेसे वाटते. काय करावे? काय करायला हे म्हातारे शरीर साथ देईल?" अप्पा विचार करत खिडकीशी आले. समोरून रोजचा तो दुर्गंध आला. अप्पांनी नकळत त्यादिशेने पाहिले. समोरच्या मोठ्या मोकळ्या जागेचे रूपांतर आता पूर्णपणे डंपिंग ग्राउंड मध्ये झाले होते. अप्पांना आठवले , जेव्हा त्यांनी ही जागा घेतली तेव्हा इथे काहीच नव्हते. समोर मोकळे माळरान. मुले तिथे खेळायला जायची. कधीतरी एक कचरापेटी आली. आणि आता.. कितीतरी केलेल्या तक्रारी. त्यावर कधीच न झालेले उपाय. तिथेच बाजूच्या झोपडपट्टीतली खेळणारी मुले. अप्पांना तिकडे बघवेना. ते आत जायला वळले. तोच त्यांच्या डोक्यात एक विचार आला. त्यांना आपल्या उरलेल्या आयुष्याचे प्रयोजन मिळाले.
दुसर्‍याच दिवशी अप्पांनी दुकानात जाऊन आपल्याला हव्या त्या वस्तू घेतल्या. ते त्या मैदानाजवळ आले. तिथे अनेक कचरावेचक आत जायच्या तयारीत होते. अप्पांनी त्यांना थांबवले.
" काय झाले काका? काही हवे आहे का तुम्हाला?" तो बहुतेक त्यांचा नेता होता.
" तुमची जरा मदत हवी आहे."
" आमची?" त्या सगळ्यांना आश्चर्य वाटत होते.
" हो.. तुमचीच." त्यातल्या काहीजणांना म्हातार्‍याच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असे वाटायला लागले. ते हसत पाठच्या पाठी कामाला लागले. अप्पांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले. जे थांबले होते त्यांना त्यांनी आणलेले ग्लोव्हज आणि रबरी शूज दिले.
"तुम्ही इथे काम करता. मग हे वापरायला हरकत नसावी." ती माणसे खुश झाली.
" पण या बदल्यात माझे एक काम करायचे." अप्पा म्हणाले.
" काय काम?"
" तिकडचा न कुजणारा कचरा एका बाजूला करायचा.."
" बस. एवढेच?"
" हो.."
" लवकरच करून टाकतो." दिवसभर अप्पा त्या लोकांसोबत होते. त्यांनी खरेच सगळा न कुजणारा कचरा एकाबाजूला आणून ठेवला. तो बघून अप्पा समाधानाने तिथून निघाले. दुसर्‍या दिवशी अप्पा परत त्या डेपोजवळ होते. त्यांना बघून त्या माणसांना आश्चर्य वाटले.
" आज काय काम काका?"
" आज ही जी काही माती आहे. ती त्या कुजणार्या कचऱ्यावर टाकायची.." अप्पा समोर उभ्या असलेल्या मातीच्या ट्रककडे हात दाखवत म्हणाले.
" त्यासाठी मी प्रत्येकाला तीनशे रूपये देईन चालेल?"
सगळे आनंदाने माती पसरवायला गेले. मैदानाचा एक कोपरा मातीने भरून गेला.
मुलाने अप्पांचे चालू असलेले काम पाहिले. पण अनुभवांती काही न बोलणे योग्य असा स्टॅन्ड घेतला. अप्पांच्या कामाचा तसाही त्याला काहीच त्रास नव्हता. अप्पांच्या कामाचा गवगवा हळूहळू आजूबाजूलाही व्हायला लागला होता. आतापर्यंत अर्धे मैदान मातीने आच्छादित झाले होते. येणारी कचऱ्याची दुर्गंधी कमी झाल्यामुळे अप्पांचे कौतुक होत होते. कौतुकापासून निरपेक्ष अप्पांचे काम सुरूच होते. एके दिवशी अप्पा खाली असतानाच कचऱ्याची गाडी तिथे कचरा टाकायला आली.
" तुम्हाला यापुढे इथे कचरा टाकता येणार नाही.."
" का? आम्ही इतके वर्ष टाकतो आहोत. कोण अडवते तेच बघतो.." तो कामगार मिजासीत बोलला.. तो गाडी पुढे नेणार तोच अप्पा गाडीच्या पुढे उभे राहिले. त्यांचे बघून आजूबाजूचे लोकही त्या गाडीला अडवायला उभे राहिले. एवढे लोक आपल्या विरुद्ध आहेत हे बघून तो तिथून निघाला. पण रात्री येऊन त्याने तो कचरा टाकलाच. ते बघून तिकडच्या एका माणसाने आपल्या पत्रकार मित्राला याची माहिती दिली. या घटनेचे वेगळेपण लक्षात घेऊन तो अप्पांना भेटायला आला. अप्पांनी आपल्यासोबत काम करणाऱ्यांचे कर्तृत्व सांगितले. पण बिटवीन द लाईन्स ओळखणाऱ्या त्याने सगळ्यांचे उचित वर्णन केले. अनेक बिल्डर्सच्या नजरेत तशीही ती जागा आली होतीच. त्या निमित्ताने त्यांच्या अप्पांच्या घरच्या वार्या सुरू झाल्या. ते बधत नाहीत हे बघून नगरसेवकांनीही जनसामान्यांच्या कल्याणासाठी उडी घेतली. जसजसे मैदानाचे रूपांतर पूर्ण व्हायला लागले तसतसे हे प्रमाण वाढायला लागले. हे सगळे चालू असतानाच एक दिवस पंतप्रधान कार्यालयाकडून अप्पांना एक पत्र आले. हि बातमी ऐकून काहीजण खुश झाले तर काही नाराज. पंतप्रधानांचा दौरा ठरला त्यात अप्पांसाठी एक तास ठेवला होता. पंतप्रधानांनी तिथे येऊन ती जागा एका निसर्गउद्यानासाठी घोषित केले. जमलेल्या सगळ्यांनी टाळ्यांचा कडकडाट केला. अप्पा आजही शांतच होते. मे महिन्याच्या सुट्टीत त्यांनी आजूबाजूच्या मुलांना हाताशी धरून बिया जमवल्या. त्यांचे सीडबॉल्स बनवले. त्या मुलांनाच ते बॉल्स त्या मातीत टाकायला सांगितले. पहिला पाऊस पडताच त्या मातीला अंकुर फुटले. आत जिरलेल्या कचर्‍याने खत पुरवले. त्यावर भराभर रोपे वाढू लागली. पंधरा ऑगस्टला अप्पांच्या हस्ते ध्वजारोहण करायचा निर्णय तिकडच्या नागरिकांनी घेतला. अप्पांना निमंत्रण गेले. सगळेच यासाठी उत्सुक होते अप्पा सोडून.
"नमस्कार.. सगळ्यात आधी माझ्या या सहकाऱ्यांचे आभार. " व्यासपीठावर बसलेले नगरसेवक मान ताठ करून बसले. अप्पांनी पुढे बोलावले त्या कचरावेचक मदतनीसांना आणि बाजूला खेळणाऱ्या झोपडपट्टीतल्या मुलांना.
" या कार्यात यांचा सिंहाचा वाटा आहे. मी काय केले तर फक्त दिशा दाखवली. आज आपला स्वातंत्र्यदिन आहे. पण त्याच्या व्याख्या मात्र प्रत्येकाच्या वेगळ्या आहेत. काहीजणांसाठी हे स्वातंत्र्य आयत्या पीठासारखे असते. रेघोट्या ओढायला सोपे. आपण ब्रिटिश पारतंत्र्यातून तर स्वतंत्र झालो पण अनेक गोष्टींचे पारतंत्र्य अजून संपलेले नाही. एक साधे मोकळे माळरान होते हे. त्याचे रूपांतर आपल्याच शासनाने कचराडेपोत केले होते. चौर्याहत्तर वर्षाच्या एका म्हातार्‍याला काहीतरी करावेसे वाटले. साधीशी गोष्ट.. त्याचे रूपांतर परत मैदानात करायचे. पण किती अडथळे? किती धमक्या? कशासाठी? तर या जमिनीच्या छोट्याश्या तुकड्यासाठी , जो आधी कोणाच्या खिजगणतीतही नव्हता. त्यासाठी मला अनेक पत्रव्यवहार करावे लागले. त्याची दखल जेव्हा पंतप्रधान कार्यालयाने घेतली त्यानंतर तो त्रास थांबला. आपला देश आपली जागा, जास्तीत जास्त सुंदर, कशी होईल हे बघायचे, आधीच्या पिढीने दिलेला स्वातंत्र्याचा वसा जोपासायचा की फक्त पुढाऱ्यांना, शासनाला नावे ठेवत देश कुरूप करायचा शेवटी निर्णय आपला आहे. प्रत्येकजण सीमेवर लढू शकत नसला तरी या दुष्ट प्रवृत्तींविरूद्ध नक्कीच लढू शकतो हे माझे मत..यातूनच सुजलाम सुफलाम भारत नक्कीच पुढच्या पिढ्यांना बघता येईल हा माझा विश्वास. स्वच्छ, सुंदर, हरित भारत ही माझी स्वातंत्र्याची व्याख्या. तुमची व्याख्या तुम्ही ठरवा आणि ती अनुसरता येईल ते बघा." अप्पांनी सगळ्यांना हात जोडले..