व्याख्या स्वातंत्र्याची

---------

व्याख्या स्वातंत्र्याची......

@ आरती पाटील 

" सौं. हे घ्या पेढे आणि देवासमोर ठेवा." अजय शिर्के आपल्या पत्नीला सुमनला पेढ्यांचा बॉक्स देत म्हणाले. 

सुमन," म्हणजे सोनल पास झाली म्हणायचं?" 

अजय ," पास झाली ? ९६ % मार्क्सने पास झालीये माझी लाडुली. मला तिने कॉलेजमधूनच फोन केला होता. म्हणून तर ती येण्याआधीच पेढे घेऊन आलो. बाबा पण कालच गावी गेले नाहीतर माझ्यापेक्षा जास्त आनंद त्यांना झाला असता. " 

सुमन," चला, डोक्यावरच एक ओझं उतरलं. नाहीतर हिचा १२ वीचा रिजल्ट आणि टेन्शन सर्व घराला." सुमन हसत म्हणाली. 

तेवढ्यात सोनल आनंद घरात आली आणि अजयच्या बाजूला बसत आपला रिजल्ट पुढे करत म्हणाली," बाबा हा बघा माझा रिजल्ट." अजयला खूप आनंद झाला होता. त्याने देवासमोरचा पेढ्याचा बॉक्स आणला आणि त्यातला एक पेढा उचलून सोनलला भरवला. अजय आपल्या मुलीचं खूप कौतुक करत होता. मध्येच अजय म्हणाला," सोनल, ही फक्त पहिली पायरी आहे. इथे थांबून जमणार नाही. आता मेडिकलच्या प्रवेश परीक्षेची तयारी करायला हवी. एम. बी. बी. एस. ला ऍडमिशन मिळायलाचं हवं." 

सोनल," पण बाबा मला  एम. बी. बी. एस. ला ऍडमिशन घ्यायचंच नाहीये. मला मेकॅनिकल इंजिनीर व्हायचं आहे. " 

अजय," काय ? मेकॅनिकल इंजिनीर ? अगं तुला ते झेपणार आहे का ? ही मुलांची काम." 

सोनल ," हे कोणी ठरवलं ?"

अजय ," मी... मी ठरवलं आहे. दादा करतोय ना मेकॅनिकल इंजिनीर मग तू हो ना डॉक्टर. काय प्रॉब्लेम आहे त्यात ?" 

सोनल," बाबा , प्रॉब्लेम हा आहे कि मला डॉक्टर होण्यात इंटरेस्ट नाहीये, मला मेकॅनिकल इंजिनीर व्हायचं आहे आणि मी मेकॅनिकल इंजिनीरचं होणार." सोनल ठामपणे म्हणाली.

अजय," हे बघ सोनल, माझी लाडकी लेक म्हणून तुला स्वतंत्र दिलं तर तू त्याचा गैरफायदा घ्यायला लागली आहेस. तुला एवढं शिकवतोय, तुला हवं नको ते बघतोय, तू डॉक्टर होण्यासाठी मी हवा एवढा पैसा लावायला तयार आहे. एवढं स्वतंत्र किती जणांना मिळतं ? " 

सोनल," बाबा स्वतंत्र म्हणजे नेमकं काय ? तुम्ही आणि आजोबा समाजात ढोल वाजवत फिरता की आम्ही आमच्या मुली- सुनांना स्वतंत्र दिलं आहे, खूप शिकू दिलं आहे पण खरं सांगा बाबा, हे खरं आहे का ?" 

अजय चिडून ," खरं आहे का  म्हणजे ? तुझी आई लग्न करून आली तेव्हा फक्त १२ वी झाली होती. आम्ही तिला पदवीपर्यंत शिक्षण दिलं. तुझी आत्या आज कॉलेजमध्ये प्रोफेसर आहे. तुला १२ वीला एवढे महागडे क्लासेस लावले. तरी तू असं म्हणतेस ? ? 

सोनल ," बाबा, आईला शिकू दिलंत कारण समाजात तुम्हाला आणि आजोबांना आम्ही आमच्या सुनांना शिकवतो हे मिरवायचं होतं म्हणून. मला सांगा आईने शिक्षण पूर्ण केलं मग आजपर्यंत तिने जॉब का केला नाही ? कारण तुम्ही आणि आजोबा आईला म्हणायचात ' काय गरज आहे बाहेर काम करायची ? लोकं काय म्हणतील? ह्यांची सून कामाला जाते म्हणजे यांना पैशाचा प्रॉब्लेम असेल ? ' तिला काय करायचं आहे ? हे विचारलंत कधी ? ते स्वतंत्र दिलंत कधी ? तुमच्या लग्नाच्या वेळी नात्यात कोणाचं तरी निधन झालं होतं म्हणून आईच नाव नाही बदलता आलं. ती रीत करायची राहून गेली म्हणून आजपर्यंत तुम्ही आईला ' सौं' म्हणून आवाज देता. आजवर तिच्या माहेरच्या नावाने तिला आवाज दिला नाही कारण आईची माहेरची ओळख , ते स्वतंत्र तुम्हांला कधीच नको होतं. 

आत्याला भरतनाट्यम शिकायचं होतं. त्यातच तिला करियर करायचं होतं. किती हौस होती तिला. पण पुन्हा तेच आजोबांना आणि तुम्हांला समाजाचा फार विचार. मुलगी बाहेर शो करणार हे कसं चालेल ? नाही का ? नाईलाजाने आत्याला शिक्षण क्षेत्र निवडावं लागलं, तिची आवड म्हणून नाही. कारण शैक्षणिक क्षेत्र तुमच्या समाजाच्या दृष्टीने मानाचं. ज्या दिवशी आत्याला 'आदर्श शिक्षिका' पुरस्कार जाहीर झाला, त्या दिवशी तुम्ही आणि आजोबा सर्वांना फोन करून सांगत होतात, आम्ही तिच्यासाठी घेतलेला निर्णय किती बरोबर होता पण आत्या एकदाही काहीही बोलली नाही. तिच्या डोळ्यातली कळवळ त्यावेळी फक्त मला आणि आईला कळत होती. आत्याच्या मनाचा विचार करून जर तुम्ही आणि आजोबांनी आत्याला सपोर्ट केला असता तर आज होणाऱ्या प्रत्येक सत्कारा वेळी  आत्याने अभिमानाने सांगितलं असतं. माझ्यापाठी माझ्या बाबांचा आणि माझ्या भावाचा हात होता म्हणून मी हे करू शकले. आत्याला पुरस्कार जाहीर झाल्यावर तुम्ही सर्वाना सांगत होतात आत्या नाही. आत्यालाही फारसा काही आनंद झालेला नाही. मात्र आत्या आपल्या कामाशी प्रामाणिक आहे. म्हणून तिला 'आदर्श शिक्षिका ' पुरस्कार मिळाला. 

आज माझ्यासोबतही तेच करताय. तुम्ही ठरवणार की मला काय करायचं आहे ? का तर मी एक मुलगी आहे ? मला मेकॅनिकल इंजिनीरचं काम नाही जमणार ? हे तुम्ही परस्पर का ठरवताय ? 

देश स्वतंत्र झाला पण देश अर्धाच स्वतंत्र झाला. देश स्वतंत्र झाला तो फक्त पुरुषांसाठीच. स्त्रीने आजही काय करायचं हे पुरुष ठरवतो. तिला काय जमेल काय नाही हे सुद्धा पुरुष ठरवतो. आई, आत्या, मी खरंच स्वतंत्र आहोत का ? आई, आत्या यांना त्यांच्या मनासारखं करियर नाही करता आलं , कारण तुम्हांला आणि आजोबांना ते मान्य नव्हतं. दादा १२ वी पास झाला तेव्हा तुम्ही आणि आजोबा म्हणालात," तुला हवं ते कर." मग माझ्यावेळी " तुला हवं ते कर." असं का नाही म्हणालात ? नक्की तुमची 'स्वातंत्र्याची व्याख्या' तरी काय आहे ? आणि ती 'व्याख्या' स्त्री - पुरुष नुसार बदलणारी का आहे ?  

बाबा कदाचित तुम्ही मला इमोशनली ब्लॅकमेल करून मला एम. बी. बी. एस. ला ऍडमिशन घ्यायला लावाल पण मी सुद्धा कधी मनापासून असं म्हणू शकणार नाही की माझ्या यशामागे माझ्या बाबांचा हात आहे. " 

असं बोलून सोनल रडत आपल्या रूममध्ये निघून गेली आणि इकडे आईच्या पापण्याही ओलावल्या होत्या. अजय आपल्या ' स्वातंत्र्याच्या व्याख्याचं ' मूल्यांकन करत राहिला. 

समाप्त ......