वृक्षवल्ली आम्हा सोयरी?? अंतिम भाग

कथा निसर्गदेवाची


वृक्षवल्ली आम्हा सोयरी?? भाग ४

मागील भागात आपण पाहिले की शेवटी प्रतापचे रिसॉर्ट बांधून होते पण ती जागा भुताटकीची आहे असा समज पसरल्यामुळे तिथे उद्घाटनाला यायला सुद्धा कोणी तयार नसते. आता बघू पुढे काय होते ते.


" प्रताप, जागा तर मस्त आहे रे.." मंत्रीसाहेब बोलत होते.

" साहेब, तुमचीच कृपा.. तुम्ही जर इकडचे आरक्षण हलवले नसते तर हे कधीच शक्य नव्हते." प्रताप लीनतेने बोलत होता.

" आपल्या लोकांची काळजी घ्यावी लागते रे.." मंत्रीसाहेब त्याच्या खांद्यावर हात ठेवत बोलले. प्रतापच्या ऑफिसमधले तसेच ओळखीचे बरेचसे लोक समारंभासाठी आले होते. एक प्रकारची उत्सुकता होती सगळ्यांना. विनय सगळ्यांना काय हवं नको ते बघत होता. फीत कापायची वेळ झाली. सगळे रिसॉर्टच्या दरवाजाबाहेर उभे राहिले. फीत कापणार तोच अचानक एक आवाज झाला. सगळीकडून झाडांची मुळे बाहेर आली. एवढ्या मेहनतीने तयार झालेले रिसॉर्ट, आजूबाजूला असलेली सगळी माणसे यांना पोटात घेऊन ती जमिनीच्या पोटात गडप झाली. उरला फक्त प्रताप आणि विनय.. माणसांचा कोलाहल थांबला. थोड्याच वेळात तिथे परत छोटी छोटी झाडे उगवली. प्रताप हे बघून अक्षरशः वेडा झाला. त्याच्या डोळ्यासमोर त्याचे सर्व कुटुंब, रिसॉर्ट, त्याची ऑफिसची माणसे सगळं, सगळं गायब झालं होतं. विनयने कसेबसे त्याला त्याच्या घरी पोहोचवले. झालेल्या घटनेचे फार मोठे प्रतिसाद उमटले. पर्यावरणप्रेमींच्या मते प्रतापने डोंगर पोखरला होता म्हणून भूस्खलन होऊन ते सगळं गुडूप झाले होते. त्यामुळे प्रतापवर केस चालू झाली.

प्रताप डोक्याला हात लावून ऑफिसमध्ये बसला होता. विनय येताच त्याला बघून तो भडकला..

" तुझ्यामुळेच माझी ही अवस्था झाली आहे.. तू रस्त्यावर आणलंस मला." प्रतापने अंगावर टाकलेला हात विनयने सहजपणे काढून टाकला.

" अगदी बरोबर.. पण याला कारणीभूत तूच आहेस." विनय अशी सहजासहजी कबुली देईल असे वाटले नसल्याने प्रताप थोडा गडबडला.

" मी? मी काय केले?"

" तुला आठवतं प्रताप, तुझे पहिले प्रोजेक्ट. एक छोटी चाळ होती. त्या चाळीच्या पटांगणात एक मोठं पिंपळाचं झाड होतं. ते तुझ्या बिल्डिंगच्या मध्ये येत होते म्हणून तू , ते दोनशे वर्ष जुने झाड दोन दिवसात तोडलंस.."

" पण त्याचा इथे काय संबंध?" प्रतापने विचारले. त्याचे बोलणे ऐकूच न आल्यासारखे विनय बोलत राहिला.

" त्यानंतर तुझी कामे वाढत गेली. ती कामे करताना त्या जुन्या घरांच्या आसपास असलेली अनेक झाडे तू तोडायचास. छोटी मोठी रोपे तोडून टाकायला लावायचास. मोठी झाडे तोडली की दाखवायला म्हणून एखादं छोटंसं रोप लावायचं. ते कधी जीव सोडायचं समजायचं देखील नाही.. "

" तू हे काय सांगतो आहेस?" प्रताप बेचैन होत होता.

" आज तुझे नातेवाईक गेले तर तुला एवढं वाईट वाटते आहे.. विचार कर ती झाडे मेल्यावर त्यांच्या नातेवाईकांना काय वाटलं असेल?" विनय बोलतच होता.

" झाडांना नातेवाईक? तुझ्या डोक्यावर परिणाम झाला आहे बहुतेक.." प्रताप हसण्याचा प्रयत्न करत बोलला. विनयने एकदाच त्याच्याकडे बघितले. ती नजर बघून प्रताप थिजला.

" हो.. झाडांनाही नातेवाईक असतात. आमच्यासारखे.. तुम्ही मानव जसे एकमेकांशी नात्यांनी जोडलेले असता. तसेच आम्हीही जोडलेले असतो एकमेकांशी मुळांनी.. एक नात्याची वीण आमच्यामध्येही असते. राग, लोभ जसे तुम्हाला असतात, तसेच ते आम्हालाही असतात."

" अरे पण तू मानवच आहेस ना?" घाबरलेल्या प्रतापने विचारले. विनय प्रतापकडे बघत असतानाच त्याचे रूपांतर हळूहळू झाडामध्ये व्हायला लागले. त्याच्या पायाचे रूपांतर मुळांमध्ये झाले, हाताचे रूपांतर फांद्यांमध्ये.. प्रतापला इथून बाहेर जायचे होते पण त्याचे पाय जणू शिश्याचे झाले होते. तो हलूच शकत नव्हता.

" तू हसलास.. मला, माझ्या भक्तांना.. मीच आहे माझ्या साध्या भोळ्या भक्तांचा देव हिरवा.. ते बिचारे निसर्गाला पूजणारे. तू त्यांचा देव या भिंतीत बंद करायला निघालास? तुला खरेतर मी आधीच एकदा सूचना दिली होती. पण तुला तुझा सर्वनाश करून घ्यायचा होता म्हणून तू पाठी फिरला नाहीस. आम्ही निसर्गाची लेकरे खूप सोशीक असतो पण जेव्हा अति होते तेव्हा याचा सूड नक्की घेतो. मी सूड घेतला माझ्या अनंत भावांच्या हत्येचा, मी सूड घेतला माझ्या भक्तांना विस्थापित करण्याचा.. कधीतरी तुम्हा मानवांना पण हे समजणे गरजेचे आहे.." विनयचे पूर्णपणे झाडामध्ये रूपांतर झाले होते. त्याची मुळे हळूहळू पसरून पूर्ण खोलीभर पसरली आणि अदृश्य झाली. ते बघून प्रतापला हृदयविकाराचा तीव्र झटका आला..


झालेल्या आर्थिक नुकसानामुळे प्रतापला टेन्शन येऊन त्याचा मृत्यू झाला असावा, असा निष्कर्ष पोलीसांनी काढला. "हिरवा" देवाचे जंगल पुन्हा बहरले. सगळे पशुपक्षी त्यांच्या मूळ जागी परत आले. त्याच्या भक्तांनी त्यांच्या देवाची परत मूळ जागी स्थापना केली.. झाडाच्या ढोलीत..



निसर्ग आणि मानव. वर्षानुवर्ष चालत आलेला संघर्ष.. स्वतःच्या फायद्यासाठी निसर्गाच्या राखीव जागेवर सतत होत असलेले मानवाचे अतिक्रमण. निसर्ग कधी ना कधी त्याचे रूप दाखवून देतोच. मानवाप्रमाणे झाडेही एकमेकांशी संपर्क साधतात. मूळाद्वारे एकमेकांना स्पर्श करतात. त्यांनाही भावना असतात. ते मांडण्याचा केलेला हा प्रयत्न. कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all