वृक्षवल्ली आम्हा सोयरी?? भाग ३

कथा निसर्गदेवाची


वृक्षवल्ली आम्हा सोयरी.. भाग ३

मागील भागात आपण पाहिले की प्रताप आदिवासींच्या देवाची थट्टा करतो आणि तिकडची झाडे कापायला सांगतो. आता बघू पुढे काय होते ते..


" हो.. हो.. मंत्रीसाहेब तुम्हाला तर खास आमंत्रण आहे समारंभाचे.. अहो तुम्ही नसता तर हे रिसॉर्ट तरी झाले असते का?" प्रताप हसत फोनवर बोलत होता. तिथे उभा असलेला विनय ऐकत होता.

" हो.. छोट्या मोठ्या अडचणी येतच असतात. आपण त्यावर मात करायलाच पाहिजे.. नाही ओ.. तिथे कसली भुताटकी असणार? तिथे तर आदिवासींचे एक मंदिर होते.. हो.. आम्ही ते नवीन बांधून दिले आहे. याल तेव्हा बघा ना.. हो.. पुढच्या महिन्यात आहे उद्घाटन. तुमच्याच हस्ते करायचे आहे. तुम्ही बिझी माणसे, म्हणून आधी तुम्हाला सांगितले.. बोलावणार आहे पण फक्त जवळच्याच लोकांना. सगळेच आपले जवळचे. हो.. या ना. नक्की या.." बोलून प्रतापने फोन ठेवला. त्याच्या चेहर्‍यावर टेन्शन दिसत होते.

" ही बातमी कशी गेली बाहेर?" प्रतापने विचारले.

" कोणती बातमी सर?" विनयने विचारले.

"आपल्या साईटवर झालेल्या अपघातांची. दर अमावस्या पौर्णिमेला कोणीतरी मजूर तिथे मरायचा ही.. ते ही शरीराचे दोन भाग झालेल्या स्वरूपात.. त्याच भितीने रात्री कोणीही त्या साईटवर रहायचे नाही." प्रताप बोलत होता.

" सर, कितीही लपवायचे म्हटले तरी या बातम्या लपत नाहीत ना. कोणी ना कोणी बोलले असेल." विनय बोलला.

" अरे पण बाहेर बातमी पसरली आहे की ती जागा पछाडलेली आहे. उद्घाटनाला यायला सुद्धा लोकांना मस्का मारायला लागतो आहे. बुकिंग होईल की नाही इथपासून सुरूवात आहे." यावर विनय काहीच बोलत नाही म्हटल्यावर प्रताप अजूनच चिडला.

" अरे, बोल ना काहीतरी.."

" सर, यावर मी काय बोलणार?"

" एक काम कर.. आपल्या ऑफिसमधल्या सगळ्या एम्प्लॉईजना सांग, उद्घाटनाला येणे कंपल्सरी आहे म्हणून. कोणतेही कारण चालणार नाही. तिथे लोकांची गर्दी ही दिसलीच पाहिजे. आणि हो.. तिथे एक मंदिर बांधून घे.. ताबडतोब."


" सर..."

" हो.. तिथे कसलीही भुताटकी नाही.. हे त्यांना कळले पाहिजे."

विनय गूढ हसत तिथून निघाला. विनयने साईटवर जाऊन नवीन मंदिर बांधून घेतले. तिथे काम सुरू झाल्यापासून तिकडचे आदिवासी तसेही तिथून गायब झाल्यासारखेच होते. त्यामुळे तिकडचे साईटवरचे मजूर त्यांच्या पद्धतीने पूजा करत होते. त्याला जुन्या मंदिराची शोभा नव्हती पण मनाला शांती म्हणून रोज साईटवर आल्यावर ती पूजेची सवय त्यांनी स्वतःला लावून घेतले होती. बघता बघता उद्घाटनाचा दिवस जवळ आला होता. सगळी तयारी झाली होती. आता फक्त फीत कापली की रिसॉर्ट सुरू होणार होते.


काय वाटते होईल का रिसॉर्ट सुरू? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all