वृक्षवल्ली आम्हा सोयरी??

कथा निसर्गदेवाची
वृक्षवल्ली आम्हा सोयरी??


" मला हवी तशी एकही जागा नाही का या शहरात?" शहरातला प्रसिद्ध बिल्डर प्रताप खूप चिडला होता.

" सर, तुम्हाला आसपास गर्द झाडी, त्यामधोमध छोटा पाण्याचा तलाव इतके सगळे हवे आहे. आजकाल लोकं एक झाड लावू देत नाही. गर्द झाडी कुठून आणायची?" प्रतापचा सहकारी विनय बोलला.

" ते मला माहीत नाही. शहरात असो, शहराच्या आजूबाजूला असो. मला अशी जागा हवी म्हणजे हवी. विचार कर माझा रिसॉर्ट किती चालेल? जंगलातून जाणारा रस्ता.. त्यामधोमध आलिशान रिसॉर्ट.. त्याच्या भोवताली असलेले ते तळे. कसला व्ह्यू असेल माहिती तरी आहे का?"

" हो सर.. पण.."

" पण नाही आणि बिण नाही. जागा शोध नाहीतर नोकरी सोड." प्रतापने निर्वाणीचे सांगितले.

" सर, तशी एक आणि एकच जागा उरली आहे आता." नाईलाजाने विनय बोलू लागला.

" मग इतका वेळ का सांगत नव्हतास?" प्रतापने रागाने विचारले.

" सर, ती जागा जंगल म्हणून राखीव आहे. तिथे फक्त आणि फक्त आदिवासीच जाऊ शकतात." विनय सांगत होता. पण आता तो कशाला तरी घाबरलेला दिसत होता.

" मग हे तुला कसे माहित?"

" सर, मी तिकडचाच राहणारा आहे. लहानपणी कधीतरी तिकडे गेलो होतो. ते लक्षात आहे. बोलताना विनय चाचरत होता."

" मग आपण ती जागा बघायला जाऊ. लगेच.. मी माझ्या ड्रीम प्रोजेक्ट साठी आता थांबू शकत नाही." उत्साहाने प्रताप बोलला.

"सर, सरकारी अडकाठी आली तर?" विनयने विचारले.

" आपली माणसे कशासाठी आहेत? आरक्षित भाग बदलायला किती वेळ लागतो?" प्रताप हसत म्हणाला.

" ते ही आहेच.." विनय कसनुसं हसत बोलला.

प्रतापच्या आग्रहाने लगेचच विनय त्याला घेऊन शहराजवळच्या जंगलात गेला. जाताना लागणारं जंगल बघून प्रताप खुश होत होता.

" इतके दिवस ही जागा माझ्या नजरेला का नाही पडली?" प्रताप स्वतःलाच विचारत होता.

"इथे जर माझा प्रोजेक्ट झाला ना तर तुला हवे ते तू माग.." प्रताप विनयला बोलला.

" सर, मला जे हवे ते तुम्ही न मागता द्याल." विनयच्या चेहर्‍यावर गूढ हास्य होते. दोघे त्या जागेवर पोहोचले. ते बघूनच प्रताप आनंदाने वेडा झाला.

" हेच आहे माझे ड्रिम प्रोजेक्ट.. या इथे असणार माझे फाईव्ह स्टार रिसॉर्ट.. इथे मुलांचा खेळायचा एरिया.. तिथे स्विमिंग पूल.. आणि तिथे.. एका जागेकडे बोट करत प्रताप बोलला. तोपर्यंत गाडीचा आवाज ऐकून तिकडचे स्थानिक आदिवासी तिथे जमा झाले होते. त्यांच्याकडे दुर्लक्ष करत प्रताप बोलला.

" ती समोर जागा आहे ना, तिथे आपण मोकळी जागा करून घेऊ.. आणि तिथे ना घोडे ठेवू. मस्त हॉर्स रायडिंग वगैरे करायला." प्रतापचे बोलणे ऐकून ते आदिवासी कुजबुजायला लागले. प्रतापने प्रश्नार्थक नजरेने विनयकडे बघितले.

" सर, ते त्यांचे देवाचे स्थान आहे.. आणि यांच्या म्हणण्यानुसार आपण इकडची झाडे काय पानही तोडू शकत नाही. त्यांच्या देवाचा कोप होतो."


खरंच होत असेल का कोप देवाचा? प्रताप बांधू शकेल का त्याचे रिसॉर्ट इथे? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all