वृक्षवल्ली आम्हा सोयरी?? भाग २

कथा निसर्गदेवाची
वृक्षवल्ली आम्हा सोयरी.. भाग २

मागील भागात आपण पाहिले की प्रताप त्याच्या रिसॉर्टसाठी अशी जागा शोधतो जी तिकडच्या आदिवासी लोकांच्या देवाची असते. आता बघू पुढे काय होते ते.


" सर, आपण इकडची झाडे नाही तोडू शकत. यांच्या देवाचा कोप होतो म्हणे." विनय बोलत होता.

" विनय, तू पण या लोकांच्या बोलण्यात आलास? अरे ही आदिवासी लोकं. त्यांचे देवही त्यांच्यासारखेच. काय नाव या देवाचं?" प्रताप उपहासाने बोलत होता.

" हिरवा.." विनय बोलला.

नाव ऐकून प्रताप जोरात हसला..

" हिरवा हे काय नाव आहे? काय घाबरता या नावाच्या देवाला. काही कोप वगैरे होत नाही. विनय तुमच्या भाषेत यांना समजावून सांग. त्यांना म्हणावं ही जागा लवकरात लवकर रिकामी करा. हाकलू नकोस त्यांना. नाहीतरी रिसॉर्टवर काम करायला माणसे लागतीलच." प्रतापमधला व्यावसायिक जागा झाला होता. विनय त्या लोकांशी कोणत्यातरी भाषेत बोलत होता. ती भाषा जरी प्रतापला समजत नव्हती तरी त्यांच्या आविर्भावावरून त्यांना हे मान्य नाही हे त्याला कळत नव्हते. प्रताप बेचैन होऊ लागला होता. त्याला ही जागा सोडायची नव्हती.

" सर, त्यांचं म्हणणं आहे, त्यांची ही झाडं म्हणजेच त्यांचा देव आहे. त्यांच्या देवाला मारून ते सुखी कसे होणार?"

" मूर्ख माणसे.. झाडात देव नसतो.. सांग त्यांना तसे. त्यांना हवे तेवढे पैसे दे आणि निघायला सांग इथून." प्रताप रागाने बोलला. विनय त्यांच्याशी बोलत होता. नकारार्थी मान हलवत ते तिथून गेले. प्रताप स्वतःशीच हसला. तो त्या मंदिरापाशी गेला. मंदिर कसलं? एका झाडाच्या ढोलीत काही दगड ठेवले होते. त्यांनाच पानेफुले वाहिली होती.

" या देवासाठी मला घाबरवत होते.. अडाणी.. माझं प्रोजेक्ट होणार म्हणजे होणारच.." गाडीकडे जात प्रताप बोलला.

म्हटल्याप्रमाणे प्रतापने ओळख लावून त्या जंगलातल्या भागावरचे आरक्षण हटवले. त्यासाठी त्याला भरपूर पैसा खर्च करावा लागला होता. पण त्याला विश्वास होता की यातली पै न पै वसूल होईल. त्याने माणसांना बोलावून कामाला सुरुवात केली. एकही आदिवासी झाड तोडायला तयार नव्हता म्हणून नाईलाजाने त्याला हे करावे लागत होते. त्या माणसांनी पहिल्याच झाडावर कुर्‍हाड चालवली आणि त्या झाडातून रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या. आणि दबलेला हुंदक्यांचा आवाज आला. झाडावरचे पक्षी घाबरून उडाले. आलेली माणसे खूप घाबरली. प्रतापलासुद्धा थोडी भिती वाटली पण तो या अशा गोष्टींना घाबरणारा नव्हता.

" ही त्या लोकांची चाल आहे. त्यांनी काय काय लावलं असेल झाडाला. तुम्ही घाबरू नका. पुढे चला. जो जास्त झाडे कापेल त्याला जास्त पैसे." प्रताप बोलत होता. त्याच्या बोलण्याने हुरूप येऊन कामगारांनी झाडे कापायला सुरुवात केली. तो हुंदक्यांचा आवाज वाढतच गेला. त्या आवाजाने घाबरू नये म्हणून प्रतापने आणलेले मोठे मोठे लाऊडस्पीकर चालू गेले. त्या आवाजात त्या हुंदक्यांचा आवाज दबून गेला. संध्याकाळपर्यंत तिथे उरला तोडलेल्या लाकडांचा आणि विखुरलेल्या पक्ष्यांच्या घरट्यांचा खच. सकाळपर्यंत सूर्यकिरणांना अटकाव करणारी ती जागा पूर्ण उजाड झाली होती. आणि आदिवासींचा तो हिरवा देव हतबलपणे बघत होता..


काय करतील आता ते आदिवासी? कुठे विस्थापित होतील ते? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all