Login

वक्रदृष्टी :- भाग एक

काय असेल वक्रदृष्टीचे रहस्य..?


【सदर कथा पूर्णपणे काल्पनिक असून तिचा वास्तवाशी काहीही संबंध नाही. आढळल्यास निव्वळ योगायोग समजावा!】

काय होतंय तेच समजत नाहीये. याआधी कधीच अस निगेटिव्ह वाटलं नव्हतं. काय करावं तेच सुचत नाहीये. ना धड जगत येतंय, ना काही एन्जॉय करता येतंय.. आठवड्याभरापासून तर चालू झालय हे सगळं. त्या ठिकाणी जाऊन आल्या पासून... अस वाटतय, माझा सगळं आनंद, सगळी खुशी तिथेच राहिली आहे.. मी परत तर आलोय, पण फक्त शारीरिक रित्या. माझं मन अजूनही तिथेच आहे. एका बंदिस्त खोलीत.. वाट बघतंय, कोणीतरी येईल, आणि बाहेर काढेल.. कंटाळलोय आता अस जगून.. अस अर्धवट जगण्यात काय पॉईंट आहे.. त्या जागेची वक्रदृष्टी माझ्यावर असेपर्यंत मी जगूच शकणार नाही.. मी जातोय, परत कधीच न येण्यासाठी.. माझ्या मृत्यूला केवळ आणि केवळ ती जागाच जबाबदार आहे. माझ्या आत्म्यास शांती लाभो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना...

सुसाईड नोट वाचून एसीपी भोसले बुचकळ्यात पडले. काही वेळापूर्वीच त्यांना फोन आला होता. एका तरुण मुलाने, राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्याच्या घरी काम करणाऱ्या बाईने, सखूने फोन करून माहिती दिली होती.

खोलीत आल्याआल्याच त्यांना हे प्रकरण काहीस विचित्र वाटलं होत. खोलीचे सगळे पडदे बंद होते. विचित्र हे नव्हतं. विचित्र हे होतं, की सगळे पडदे चिकटपट्टी लावून बंद केले गेले होते. ज्या ज्या जागेतून उजेड आत येऊ शकेल, अशा सगळ्या जागा ब्लॉक करण्यात आल्या होत्या.

भिंतीवर, जमिनीवर, सगळीकडे चित्रविचित्र आणि भयानक आकृत्या काढल्या होत्या; पण काळ्या रंगाने. त्या आकृत्यांजवळ काहीतरी लिहिलेलं होत. भाषा कोणती होती, माहीत नाही. पहिल्या दृष्टिक्षेपावरून कोणतीतरी पौराणिक भाषा वाटत होती. चित्रविचित्र आकृत्या, पौराणिक भाषा, अशी गोंधळात टाकणारी सुसाईड नोट.. एसीपी भोसलेंना पार गोंधळात टाकलं होतं या सर्व गोष्टींनी.

अजूनही घराची चेकिंग चालू होती. आश्चर्याची गोष्ट अशी होती, की अगदी संडास बाथरूममधीलही खिडक्यांना काळ्या सेलोटेपने बंद केलं होतं. कोणत्याही जागेतून प्रकाश आत येणार नाही,
याची पुरेपूर काळजी घेण्यात आली होती.

" हा मुलगा विकृत असावा.. ", दोन क्षणांसाठी एसीपी भोसलेंना वाटून गेलं. अर्थातच, पोलिसी अनुभवामुळे त्यांना माहीत होतं, की कोणत्याही गोष्टीचा पहिला अंदाज नेहमी बरोबर असतोच अस नाही, पण मनात येणाऱ्या विचारांना कोण थोपवून धरणार..

" सर, हा नक्की काय प्रकार आहे, तेच समजत नाहीये.. ", इन्स्पेक्टर जाधवच्या बोलण्याने त्यांची तंद्री तुटली.

ते जाधव बरोबर आत रूममध्ये गेले. घरातील कोणताही लाईट चालू होतं नव्हता. खाली जाऊन बघितलं, तर मेन स्विच ऑफ केला होता. तो ऑन केला. रूममधील लाईट लावताच आधी एसीपी भोसले भयंकर दचकले.

रूममध्ये ठिकठिकाणी लाल रंगाचे शिंतोडे उडाले होते. प्रथमदर्शनी बघता ते फारच भयानक दिसत होत. कोणताही माणूस रूममध्ये गेल्यावर त्याला जर जमिनीवर, भिंतीवर रक्त उडालेल दिसलं, तर त्याची जी प्रतिक्रिया येईल, तीच भोसलेंची आली होती. भोसलेंनी त्या मुलाची बॉडी नीट चेक केली होती. त्याच्या अंगावर जखमेची एकही खूण नव्हती. आता हा काय प्रकार होता, ते फॉरेन्सिक डिपार्टमेंट कडून येणाऱ्या रिपोर्ट्स वर अवलंबून होत.

बॉडी पोस्टपोर्टम ला पाठवली गेली. जेवढ्या लवकर भोसलेंना त्या घरातून बाहेर पडता आलं, तेवढ्या लवकर त्यांनी बाहेर यायचा प्रयत्न केला. कोणताही माणूस त्या घरात १० मिनिटांपेक्षा अधिक काळ राहू शकलाच नसता. सुर्यप्रकाशच बंद केल्याने, त्या घराला एका प्रकारचं औदासिन्य आलं होतं. ज्या ठिकाणी प्रकाशाच वास्तव्य नसत, त्या ठिकाणी तुमच्या मनात आनंददायी विचार येऊ शकत नाहीत. अशा ठिकाणी थोडा वेळ जरी गेलो, तरी मनात वाईट विचार यायला लागतात. आणि अशाच ठिकाणी हा मुलगा कसा काय राहिला, याचंच कोडं भोसलेंना उलगडत नव्हतं.

सोसायटीतील लोकांशी बोलावं, म्हणून ते सोसायटीच्या क्लब हाऊस मध्ये आले. सगळ्या लोकांना तिथेच बोलावलं होतं. भोसले आत जाताच अचानक आवाज वाढला. त्यापैकी बहुतांश लोक हे \" आम्हाला उगाचच थांबवलं आहे, आम्ही कुठे काय केलं आहे \" असा सूर आळवताना दिसत होते. कॉन्स्टेबल हरीश त्यांना शांत करताना दिसत होता, पण ते शांत बसतच नव्हते.

भोसलेंनी बोलायला सुरुवात केली, लोक आपोआप शांत बसले. थोडक्यात भोसलेंच्या बोलण्याचा मतितार्थ असाच होता, की जे काही तुम्हाला माहित आहे त्या मुलाबद्दल, ते तुम्ही आम्हाला सांगा. तुम्ही आम्हाला मोकळं करा, आम्ही तुम्हाला मोकळं करू. सर्वात आधी सखूने बोलायला सुरुवात केली.

तीच म्हणणं अस होत, की विराज म्हणजे तो मुलगा, नेहमी घरात असतानाच ती त्याच्याकडे जायची. तो जास्त बोलायचा नाही. तिने तीच भांडी घासण्याचं काम करावं, अन निघावं, अशीच त्याची अपेक्षा असायची. तिने कधी घरातील साफसफाईच्या कामात लुडबुड केलेली त्याला आवडायची नाही. कोणत्याही खोलीचे पडदे, हे आधी लावलेले नसायचे. ही घटना जवळजवळ एका आठवड्यापूर्वी चालू केली असावी त्याने. कारण सखू एका आठवड्याच्या सुट्टीनंतर त्याच्याकडे कामाला गेली होती. पेमेंट बाबत काहीही तक्रार नव्हती. पेमेंट महिन्याच्या ३ तारखेपर्यंत तिच्या खात्यात ऑनलाइन जमा करायचा. सखुला यापेक्षा जास्त काहीच माहीत नव्हतं.

सोसायटीचे सेक्रेटरी श्रीयुत सरवदे यांनी त्यांनाही जास्त काही माहीत नसल्याचं सांगितलं. या मुलाच्या, विराजच्या घरात कधी त्यांनी मित्र येताना तर बघितले नव्हते, पण एकदा, एका शनिवारी त्याच्या घरात काही लोक आले होते. ते दिसायला थोडे विचित्रच होते. म्हणजे ऐन उन्हाळ्यात ते नखशिखांत काळे कपडे घालून आले होते. भोसलेंनी चेहरेपट्टीबाबत विचारणा करताच सरवदे यांचं म्हणणं होत, की त्यांना त्याबाबत जास्त काही आठवत नाही, पण एका व्यक्तीच्या हातावर कोणतातरी विचित्र आकारचा टॅटू गोंदवलेला होता. भोसलेंनी क्राईम सीनचे ते विचित्र आकार असलेले फोटो दाखवताच एका फोटोकडून निर्देश करून सरवदेंनी तो टॅटू ओळखल्याच सांगितलं. भोसलेंनी हा टॅटू लक्षात राहण्याचं कारण विचारताच सरवदेंनी टॅटूच्या विचित्र दिसण्याच कारण दिल. प्रत्येक सेक्रेटरीच्या जिवाभावाचा विषय म्हणजे मेंटेनन्स. विराज मेंटेनन्स बद्दल काहीही कटकट करत नसायचा. म्हणजे या मुलाला पैसाचा काही प्रॉब्लेम नव्हता, असा अनुमान भोसलेंनी काढला.

त्याच्या शेजारी राहणाऱ्या काळे आणि शिंदे यांच म्हणणं होतं, की त्याच्या घरातून कधी आवाज आले नाहीत, पण मागच्या आठवड्याभरापासून त्याच्या घरातून किंचाळण्याचे, चित्रविचित्र बडबडण्याचे आवाज येत होते. चौकशी करण्यासाठी दोघांनी संगनमत करून घराचा दरवाजा ठोठावला, पण रिस्पॉन्स म्हणून एक भयानक किंचाळण्याचा आवाज आला. मग घाबरून दोघांनी नाद सोडून दिला. ते सरवदेंना सांगणार होते, पण त्यांनी \" हा मुलगा त्याच त्याच बघून घेईल \" असा विचार केला.

सोसायटीच्या वॉचमनच म्हणणं होतं, की विराज घरून दुपारी बाहेर निघायचा ते थेट रात्रीच घरी यायचा. तो काय काम करायचा, कुठे काम करायचा, ते माहीत नाही.. पण त्याला पैशांचा काही प्रॉब्लेम नव्हता. त्याने बऱ्याचदा वॉचमनला गाडी फक्त पार्क करायचे १०० - १५० रुपये दिले होते. त्यामुळे वॉचमन त्याच्यावर खुश होता. त्याच्या मते विराजला फिरायची खुप आवड होती. त्याची गाडी पार्क करताना त्याने बऱ्याचदा वेगवेगळ्या डोंगरांचे नकाशे बघितले होते. दर विकेंडला तो कुठे ना कुठेतरी फिरायला जात असायचा. गेल्या आठवड्यातही गेला होता, पण त्यानंतर तो घराच्या बाहेर निघालाच नाही. आणि आता हे असं...

सोसायटीतील लोकांच्या बोलण्यातुन दोन गोष्टी तर स्पष्ट झाल्या. पहिली, विराजला पैशांचा काहीही प्रॉब्लेम नव्हता, आणि दुसरी, गेल्या आठवड्यात अस काहीतरी झालं होतं, ज्यामुळे विराजच्या दैनंदिन जीवनात प्रचंड उलथापालथ झाली होती.

आधी भोसलेंनी पहिल्या पॉइंटकडे लक्ष केंद्रित करायचं ठरवलं. विराज काय काम करायचा, हे सोसायटीतील कोणाला माहीत असणे शक्यच नव्हते. त्यांनी घर चेक केलं, तेंव्हा त्यांना घरात काहीही सापडलं नाही. राहिली होती त्याची गाडी. वॉचमनला विचारून त्यांनी गाडी कुठे पार्क केली आहे, ते बघितलं.

गाडीची अवस्था आतून भयंकर झाली होती. सीट कव्हर विस्कटलेले होते. पाय ठेवण्यासाठी असलेलं रबरच पॅडिंग मातीने भरलेलं होत. गाडीच्या पुढच्या बाजूला डेंट पडले होते. असे वाटत होते, की गाडीची बरीच रॅश ड्रायव्हिंग केली गेली असावी. कोणत्यातरी डोंगराळ प्रदेशातून गाडी काढली होती. कारण डेंटमध्ये सुद्धा मातीचे ट्रेसेस दिसत होते. गाडीसुद्धा फॉरेन्सिक सेंटर मध्ये पाठवावी लागणार होती. मगच समजलं असत की नक्की माती कोणत्या प्रकारची आहे आणि कोणत्या भागात आढळते. त्यामुळे हे समजलं असत, की नक्की विराज कोणत्या भागात गेला होता.

सगळी माहिती गोळा करून एसीपी भोसले ब्युरोकडे निघाले.