Jan 28, 2022
थरारक

वक्रदृष्टी :- भाग दोन

Read Later
वक्रदृष्टी :- भाग दोन
एसीपी भोसले ब्युरोकडे निघालेच होते, की तेवढ्यात फॉरेन्सिक डिपार्टमेंट ची गाडी त्यांना येताना दिसली. फॉरेन्सिक लॅबचे हेड डॉक्टर अजित त्यांचे शाळासोबती होते. डॉक्टर अजितना भेटताच त्यांनी ब्युरोमध्ये जायचा प्लॅन कॅन्सल केला आणि ते सुद्धा अजित बरोबर क्राईम सीन कडे निघाले.

डॉक्टर अजितची समजावून सांगण्याची पद्धत खुप सोपी होती. त्यांना कोणतीही गोष्ट एक्सप्लॅन करणं खूप छान पद्धतीने जमायचं. खर म्हणजे फॉरेन्सिक म्हणजे खुप किचकट काम. पण डॉक्टर अजितमुळे ब्युरोमधील बरीच जण या किचकट प्रकाराला सुद्धा ओळखू लागली होती.

डॉक्टर अजित क्राईम सीन वर पोहोचले. त्यांनी आधी दारावरचे फिंगरप्रिंट उचलण्याचे आदेश दिले. कारण शक्यता असू शकते, की कदाचित दारावर आपल्याला कोणत्यातरी आशा व्यक्तीचे फिंगरप्रिंट मिळतील, जिची भविष्यात खुप मदत होऊ शकेल.

बॉडी अगोदरच फॉरेन्सिक लॅब मध्ये पाठवण्यात आले होती. खाली उभी असलेली गाडीसुद्धा थोड्या वेळात टो करून फॉरेन्सिक डीपार्टमेंटच्या गॅरेजमध्ये जाणार होती.

डॉक्टर अजितने घराची तपासणी करायला सुरवात केली. चित्रविचित्र आकृत्या पाहून तेसुद्धा चक्रावले आधी, मग त्यांनी एका मोठ्या चित्र अभ्यासकाला फोन लावला. पण तो अभ्यासक शहराच्या बाहेर असल्याने आज येऊ शकणार नव्हता. तो उद्या यायला तयार होता. पण अर्जेंसी असल्याने अजितने त्याला फोटो काढून पाठवले. त्याने अर्ध्या तासाचा वेळ मागितला.

अजित आता त्या रूममध्ये आले जिथे खूप सारं रक्त पडलं होत. त्यांनी रक्ताचे काही नमुने घेतले. ज्यामुळे हे समजलं असत, की हे रक्त माणसाचं आहे, की कोणत्या प्राण्याचं आहे, ब्लड ग्रुप बाबत काहीतरी माहिती मिळाली असती.

अजितने ते पत्र वाचलं, आणि काहीतरी विचार करून ते पत्र कोणत्यातरी मानसोपचार तज्ञाला दाखवायचं ठरवलं. कारण पत्र वाचूनच समजत होत, की त्या मुलाच्या मनात प्रचंड उलथापालथ होत होती.

एसीपी भोसलेंशी चर्चा करून ते फॉरेन्सिक लॅबमध्ये जायला निघाले. भोसलेसुद्धा ब्युरोकडे निघाले. जाता जाता त्यांना दिसलं, की विराजची गाडी टो केली जात होती.


इन्स्पेक्टर राणे विराज ज्या कंपनीत काम करत होता, तिथे आले. तो एक सॉफ्टवेअर डिझायनर होता.

" हाऊ मे आय हेल्प यु सर? ", रिसेप्शनिस्ट ने विचारले.

" मला कंपनीच्या मॅनेजरला भेटायचं आहे! "

" ओके सर. पुढे जाऊन पहिला राईट आणि मग दुसरा लेफ्ट. तिथेच त्यांची केबिन आहे सर. "

" ओके थँक्स! "

राणे केबिनपाशी आले. दारावर जतीन गुप्ता असे नाव लिहिले होते. केबिन बऱ्यापैकी मोठी होती. म्हणजे कदाचित कंपनी तशी नावलौकीकास आली होती.

आतमध्ये साधारण चाळीस - पंचेचाळीस वर्षांचा माणूस बसला होता. राणेंना बघून तो उठून उभा राहिला.

" अरे, पोलीस इथे? काय झालं सर, आमचं काही चुकलं का?? "

" अरे नाही, रिलॅक्स. तुमचं काहीही चुकलेल नाहीये. मला काही माहिती हवी होती. "

" कशाबद्दल सर? डिपार्टमेंट साठी तुम्हाला कोणतं अँप बनवून हवं आहे का? तस असेल तर तुम्हाला आमच्याकडून स्पेशल डिस्काउंट सर.. शेवटी तुम्ही आमच्या रक्षणासाठी किती काय काय करता सर.. "

" नाही नाही गुप्ता साहेब, सध्या तरी डीपार्टमेंटचा तसा काही विचार नाही. असेल तर तुम्हाला नक्की सांगू. सध्या मला तुमच्या एका एम्प्लॉयी बद्दल माहिती हवी आहे. त्याच नाव विराज आहे... "

" नाव काढू नका त्याच..", गुप्ता राणेंना तोडत म्हणाले.

" त्याच्यामुळे गेला पूर्ण आठवडा आम्हाला खुप मनस्ताप सहन करावा लागतोय. "

" का हो, अस काय केलंय त्यांनी? "

" अहो काय सांगू साहेब तुम्हाला! एकतर तो गेल्या पूर्ण आठवड्यापासून येत नाहीये. ती गोष्ट वेगळी, तर जाताजाता आमच्या कॉम्प्युटर्स मध्ये काय बग सोडून गेलाय देव जाणे. चालू व्हायला खूप वेळ लागतोय, आणि खूप जास्त गरम होतायत. खर म्हणजे मी त्याला कंट्रोल रूम मध्ये बसायला द्यायलाच नको होतं ", गुप्ताजींनी सांगितले.

" तुम्ही कॉन्ट्रोल रूम मध्ये कोणालाही बसायला परवानगी देता? "

" नाही हो! पण तो म्हणत होता, की त्याच्याकडे असा एक प्रोग्रॅम आहे, जो कॉम्पुटरची सिक्युरिटी वाढवायला मदत करेल. आणि याआधीही त्याने असा प्रोग्रॅम टाकला होता. तेंव्हा तर काही नाही झालं. म्हणून मी त्याला परमिशन दिली होती. त्याला येऊ दे माझ्या समोर. त्याला कंपनीतून हाकलणारच आहे मी! "

" अहो तुम्ही कंपनीतून हाकलायची काय गोष्ट करताय? त्याची या जगातूनच हकलपट्टी झालीये. "

" काय? म्हणजे... "

" म्हणजे आता तो या जगात नाही राहिला. त्याने आत्महत्या केली आहे. "

हे ऐकल्यावर गुप्ता थोड्यावेळ शांत बसून होती. तोपर्यंत राणेंनी केबिनमध्ये नजर फिरवली. केबिनमध्ये अनेक अवॉर्डस ठेवले होते. अवॉर्डसच्या शेजारी " Best Employees Of The Year " अस लिहिलेली एक फ्रेम लटकत होती. त्यातसुद्धा विराजचा फोटो होता.

" तो तीन वर्षांपासून आमच्या कंपनीत काम करायचा. तो अबोल होता. कामाशिवाय कोणाशीही बोलायचा नाही. मी बरा आणि माझं काम बर, असा त्याचा अप्रोच असायचा. जे काम देऊ, त्याबाबत त्याला काहिजज अडचण नसायची. तो सगळं काम व्यवस्थित करायचा. आत्तासुद्धा मी रागारागात बोलून गेलो, की त्याला कंपनीतून काढून टाकेन. पण मी त्याला खरोखर काढलं नसत, हो, त्याला थोडं फायर केलं असत. "

" त्याचा कोणी मित्र.. ज्याच्याशी तो जास्त क्लोज होता.. "

" हो, अविनाश. त्याला बोलावतो थांबा. विराज सर्वात जास्त अविनाशशीच बोलायचा. "

गुप्तांनी इंटरकॉम वर कॉल करून अविनाशला बोलावून घेतलं. अविनाश आला. पोलिसांना बघून तो फार आश्चर्यचकित दिसला नाही. राणेंच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.

" सो, मिस्टर अविनाश, मला बघून तुम्हाला जास्त आश्चर्य वाटलेलं दिसत नाहीये. "

" मला माहितीये सर, तुम्ही विराजबद्दल बोलायला आला आहेत. ", अविनाश शांतपणे म्हणाला.

" म्हणजे तुम्हाला अंदाज होता, की अस काहीस होणार आहे? "

" हो सर! विराज कुठे जायचा, काय करायचा, ते मला माहित नाही. पण तो काही बेकायदेशीर नक्कीच करत नव्हता. तो गेल्या आठवड्यापासून आला नाही, तेंव्हाच मला संशय आला होता, की आता विराज नाही, तर फक्त त्याची बातमी येईल. ", अविनाश जरी हे शांतपणे बोलत असला, तरी त्याचा आवाज कापत होता.

" नक्की तुला काय म्हणायचं आहे? जरा समजेल अस बोल. ", राणे गोंधळून म्हणाले.

" सर विराज सॉफ्टवेयर डिझायनर होताच, पण त्याच बरोबर तो एक एथिकल हॅकर सुद्धा होता. तो समाजातल्या काही घटकांना अडवायचा प्रयत्न करत होता, ज्याची शिक्षा त्याला ही अशी मिळाली. "

" कोणते घटक? काय करत होता तो? "

" सर, तो... ", बोलताना अविनाशचा तोल जात होता. असे वाटत होतं की त्याला चक्कर येत आहे.

" तो.. ड.. ड.. डार्क वेब वर.. "

" अविनाश, अविनाश काय होतंय? "

अचानक अविनाशला डोळ्यासमोरच सगळं धूसर धूसर दिसत होत. त्याच्या कानात फक्त राणेंचा आवाज जात होता, पण मनापर्यंत पोहोचत नव्हता. अविनशाच्या नाकातून आणि कानातून रक्त यायला लागलं होतं. ही लक्षण ब्रेन हॅमरेजची दिसत होती.

" गुप्ताजी, लवकर अंबुलेन्सला फोन करा.. "

" हो.. हो... "

" सर.. मी नाही वाचणार.. मला बोलू.. द्या.. तो.. तो.. डार्क वेबवर.. रेड.. रेड... ", आणि अचानक अविनशाचा श्वास थांबला.

" ऍम्ब्युलेन्स येतेय.. ", गुप्ता म्हणाले.

" काही उपयोग नाही गुप्ताजी. तो आता नाही राहिला. ", राणे त्याचे उघडे डोळे मिटत म्हणाले.

" हॅलो राजू, ऑफिसचे सगळे दरवाजे बंद कर. कोणालाही बाहेर जाऊ देऊ नकोस. ", गुप्तांनी परस्पर ऑर्डर दिली.

" काय, शेखर आत्ताच बाहेर गेलाय.. खुप घाईत होता? ओके, मी बघतो.. "

" सर, मी ऑफिसचे सगळे दरवाजे बंद करायला सांगितले. पण आमचा एक सफाई कर्मचारी आतच बाहेर गेलाय. "

" तो कधीपासून होता इथे कामाला? "

" ५ वर्ष झाली साहेब.. "

" त्याचा काही फोटो वैगरे..? "

" आहे ना साहेब, देतो. "

गुप्तांनी ड्रॉवर मधून फोटो काढला. राणेंनी त्या फोटोचा फोटो काढून कंट्रोल रूम मध्ये पाठवला, आणि या माणसाला कोणत्याही परिस्थितीत अडवायला सांगितलं.

" गुप्ताजी, काय चालू आहे तुमच्या ऑफिसमध्ये? एक माणूस आत्महत्या करतो, दुसऱ्याचा आपल्या डोळ्यादेखत मृत्यू होतो, तिसरा पळून जातो... नक्की चाललंय तरी काय?? "

" मला तर काही समजतच नाहीये. नक्की काय चालू आहे आमच्या ऑफिस मध्ये.. "

" हॅलो, भोसले सर.. इथे.. "

● क्रमशः ●
ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now