Oct 21, 2020
Poem

विठू सावळा

Read Later
विठू सावळा

पंढरीच्या वाटे जाऊ,विठू सावळयाला पाहू

भिवरेच्या तिरी सारे ,भक्तिरंगी न्हाऊ।।धृ।।

टाळ चिपळ्यांच नाद,होई नामाचा गजर

दिंड्या पाताकांची साद,मनी भक्तीचा जागर

धाव घेई मन वेडे,सारी आळंदी सजली

विठू भेटेल सांगे, माझी ज्ञानाई माउली

टाळ गळा लेऊ, सारे अभंगही गाऊ।१।

भिवरेच्या तिरी सारे भक्तिरंगी न्हाऊ

भाळावर शोभे टिळा, अबीर बुक्क्याचा

वारीमध्ये लागे लळा, विठुच्या नामाचा

विठाई माउली शोधू,डोई तुळस सजली

निवृत्ती ज्ञानाला भेटू,होई गजर राऊळी

चंद्रभागा तिरी राहू,वाळवंटी सारे नाचू।।२।।

भिवरेच्या तिरी सारे,भक्तिरंगी न्हाऊ

एकादशी दिन आला,पहा भिवरा समोर

नामाची पायरी माझ्या,आहे राऊळा बाहेर

संतांचा मेळा जमला, आज विठुच्या भेटीला

सोडून संसार सारा,जीव पंढरी रमला

दर्शन विठुचे घेऊ,रखुमाई डोळा पाहू।।३।।

भिवरेच्या तिरी सारे,भक्तिरंगी न्हाऊ