Jan 26, 2022
नारीवादी

विटाळ...? की आनंदाची अनुभूती...?

Read Later
विटाळ...? की आनंदाची अनुभूती...?

विटाळ ....? की आनंदाची अनुभूती ...

मधू आणि जय एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले एक अनुरूप असेच होते...त्यांच्या प्रेमाची अखेर जित झाली आणि दोघेही प्रेमबंधात बांधले गेले ! लग्न झाले , घरचे सगळे देवदर्शन झाले आणि आज घरात सत्यनारायाच्या पूजेची तयारी सुरू होती...
मधूच्या सासूबाईंनी या निमित्ताने जवळच्या नातेवाईकांना आणि मैत्रिणींनासुद्धा आमंत्रण दिले होते...इतकी सुंदर , हुशार सून मिळाल्यामुळे स्वारी तशी स्वतःवर खुश होती... सगळ्यापुढे टेंभा मिरवण्याची आयती संधी सोडून कसे चालणार होते....गीताने सुंदर पैठणी सुनेला भेट म्हणून दिली आणि बरेच दागिनेही दिले..." मस्त तयार हो ! मी गाजरे सुद्धा आणले आहेत..." असे म्हणून तिच्या पाठीवरून हात फिरवून त्या निघून गेल्या...
मधू तयार व्हायला गेली आणि ....गडबड झाली होती...आता काय करावे ? मधूने हळूच राधिकाला , तिच्या नणंदेला झालेली घडबड सांगितली...राधिका सुद्धा घाबरली ! आईचा स्वभाव तिला माहीत होताच ... "आईला सांगू
नकोस " असे सांगणार होती ती पण तितक्यात गीताबाई तिथे आल्या आणि झाला प्रकार समजताच त्यांनी अकांड तांडव केले...
" तुला कळत नाही का ? इतक्या साध्या गोष्टी समजत नाहीत ? गोळ्या घ्यायला काय झालं होतं ? एका अक्कल शून्य मुलीशी लग्न केलस रे जय ....आता सगळ्यांना काय सांगायचं ? इतक्या वर्षांची इज्जत तुझ्या या अती हुशार बायकोने धुळीत मिळवली...." गीता बाईंच्या तोंडाचा पट्टा काही केल्या थांबत नव्हता...
" अहो आई माझी डेट पंधरा दिवसांनी आहे... असं कसं झालं मलाही माहीत नाही....आधी माहीत असतं तर मी सांगितलं असतं ना तुम्हाला " मधुने रडत रडत आपली बाजू सांभाळण्याचा प्रयत्न केला...
जय नुसताच उभा होता...आई आणि बायको दोघीही त्याच्याकडे आशेने पाहत होत्या...कोणाची बाजू घ्यावी त्याला काहीच कळत नव्हते !
राधिकाने मधुला सावरण्याचा प्रयत्न केला " लग्नाच्या धावपळीत झालं असेल ग ..."
" राधे तू गप्प बस...तुझ्याकडे ही परिस्थीती आली असती तर तुझ्या सासूबाईंनी काय केलं असतं ग ..."
राधिकाने एक मोकळा श्वास घेतला आणि म्हणाली , " अगं आई आमच्याकडे तर तर कोणी काहीच पाळत नाही.आई तर या चार दिवसात मला पूर्ण आराम देतात.पूजा सुद्धा करते ग मी पाळीच्या दिवसात.आई म्हणतात की हे तर देवाचे वरदान आहे तर देवाला याचा विटाळ कसा होईल ?फक्त स्त्रीला मिळणारी मातृत्वाची ही अनुभूती ह्यामुळेच तर मिळते हे तर तू मान्य करतेस ना...अगं आई ही वेळ तिच्यावर ओरडण्याची नाही तर तिची काळजी घेण्याची आहे .आणि प्रत्येक स्त्री यातून जातच असते त्यात लाज कसली ग ? तू तर इतकी मॉडर्न विचाराची आहेस आणि नेमकी याचं बाबतीत इतके बुरसटलेले विचार का ग तुझे ? तीच्याजगी मी असते तर ...?"
राधिकाच्या बोलण्याने गीताबाईना स्वतःच्या विचारांची लाज वाटते आहे असे जाणवत होते पण सासू पणाचा इगो आणि आता सगळ्यांसमोर होणारी आपली नाचक्की यामुळे त्या अजूनही राग धरून होत्या. लेकीचं बोलणं खरंतर मनाला लागलं होतं पण सुनेची इतकी मोठी चूक माफ कशी करायची ? आतापासून असे वागलो तर डोक्यावर बसेल सून ...अश्या बुरसटलेल्या मनोवृत्तीचे काय करणार ?
तितक्यात पूजेच्या पूर्व तयारीसाठी गुरुजी आले...आता काय करायचे ? सूनेकडे एक जळजळीत कटाक्ष टाकून गिताबाईनी गुरुजींना हळूच बाजूला बोलावून परिस्थीती सांगितली...
साने गुरुजी अत्यंत विद्वान आणि आयुर्वेदाचार्य होते...केवळ स्वतःची आवड म्हणून काही जवळच्या लोकांकडे पूजा सांगायला ते जायचे.राधिकाला ते लहानपणापासून ओळखत होते त्यामुळे तिने मागून केलेल्या खाणा - खुणा त्यांना कळत होत्या...
गुरुजी हसले ," गीता ताई काय हो हे ? अहो लक्ष्मी नारायणाचा जोडा म्हणतो ना आपण ...मग लक्ष्मी ला तिच्या या रुपात विटाळ कसा होईल ? आपली मधू लक्ष्मी बनून या घरात आली आहे तिच्या स्वागताला हा विटाळ पाळणार का तुम्ही ? पूर्वीच्या काळी स्त्रियांना आराम मिळावा म्हणून या चालिरीती होत्या पण आता आपण सगळे किती प्रगल्भ विचारांचे आहोत.यामागचे कारण तर आपण सगळेच जाणतो ना मग त्यासाठी इतकी कुत्सित भावना कशाला ? स्त्री ला देविस्वरुप मानले आहे आपल्या संस्कृतीत ! मग देवीला विटाळ कसा होईल... चला लवकर या सगळे...पूजेला विलंब नको..."
गुरुजींच्या बोलण्याने मळभ दूर झाले... मधुला जवळ घेऊन गीता बाईंनी तिची माफी मागितली आणि तिला तयार व्हायला सांगून त्या स्वतःही तयारीला गेल्या...!
मधुने राधिकाला मिठी मारली." ताई तुमचे आभार कसे मानू मी ? आज तुमच्यामुळेच सगळं छान झालं .तुम्ही किती भाग्यवान आहात तुम्हाला असं समजून घेणारं सासर मिळालं..."
राधिकाच्या डोळ्यात पाणी आलं ..." मी खोटं बोलले मधू ...माझ्याघरी खूपच जुन्या विचारांची माणसे आहेत...पाळीच्या वेळी मला आंधाऱ्या खोलीत राहावं लागतं...घाणेरडी गादी , चादर वापरावी लागते...नीट खायला प्यायलाही देत नाहीत...आणि धुणी , भांडी यासारखी अनेक कष्टाची कामे करावी लागतात...आणि आणि माझ्या पिल्लूलाही माझ्याजवळ येऊ देत नाहीत ग... त्याचं माझ्यासाठी रडणं जीव हेलावून टाकत ....माझी तर या नरक यातनेतून सुटका नाही निदान तुला तरी हा त्रास भोगावा लागू नये यासाठी हा सगळा खटाटोप..." रधिकाचा बांध फुटला होता.
मधू ला काहीच सुचेना...
जय चा पारा खूप चढला..." ताई अगं इतके दिवस का सांगितलं नाहीस तू हे ...थांब आत्ता जातो तुझ्या घरी आणि चांगली समज देतो...माझ्या ताईला असा त्रास देणाऱ्या लोकांना मी सोडणार नाही..."
" काही उपयोग नाहीये...मी खूप प्रयत्न केला पण त्यांचे विचार नाही बदलू शकले.तू कोणाला काहीच बोलणार नाहीस.माझी शपथ आहे तुला..." राधिकाने जय कडून वचन घेतले.
मधूला एक कल्पना सुचली " ताई , साने गुरुजींना सांगुया आपण ....तुमच्या एनिवर्सरीला पूजा ठेऊया आणि तेव्हा आपण सगळे मिळून इनडायरेक्टली समज देऊया...आम्ही दोघे आहोतंच आणि आईना सुद्धा सामील करूया ...नक्की आईकतील बघा सगळे..."
राधा ने मधुला मिठी मारली.
मधूचा प्लॅन यशस्वी झाला आणि राधिकाच्या घरातली मंडळी सुद्धा बदलली...
अजून एका देवीच्या रूपातल्या स्त्रीची या विटाळ नामक अत्याचारातून सुटका झाली...!


पण खरंच सगळ्यां स्त्रियांना हा आनंद मिळण्यासाठी किती वाट पाहावी लागेल ....??

ईरा वाचनाचा आनंद घ्या आता app मधून, आजच download करा. Download App Now
Circle Image

Smita Bhoskar Chidrawar

Home maker

Like to Be Positive And Make Others Happy With My Writing