विस्मृती भाग - 1

विस्मृती... भावनांची गुंतागुंत...

                 विस्मृती

                        भाग - १ 
 

      संध्याकाळचे ७ वाजत आले होते. तशी 'विधीता अजून कशी आली नाही ?' ह्याची विधीताच्या आईला काळजी वाटत होती. तेवढ्यात विधीताचा फोन आला कि ती आणि तिच्या मैत्रिणी बाजारात खरेदीला जाणार आहेत त्यामुळे तिला यायला १ तास उशीर होईल. आईने फोन ठेवला तशी ती पुस्तक वाचत बसलेल्या विधीताच्या बाबांना बोलली, "अहो! ऐकता का? मी म्हणते काय गरज होती तुम्हाला तिला ट्रीपला जायची परवानगी द्यायची?"  बाबांनी लक्ष न दिल्यासारखं केल्यावर आई अजुनच भडकून बोलली, "अहो ऐकताय ना मी काय बोलतेय ते??' बाबा शांतपणे म्हणाले ,"अग जावुदेत कि तिला. अजुन किती वर्ष तु तिला अशी सांभाळून ठेवणार आहेस. सांग मला? आता डॉक्टरही म्हणालेत तिची तब्बेत सुधारतेय. पण तु आहेस कि.."  "अहो मलाही वाटत तिने बाहेर जाव. पण तिला परत काही झाल तर. त्यात ते गाव ती जातेय त्या ठिकाणापासून काही लांब नाहीयेय. ती चुकून तिथे जाणार तर नाही ना??? मला फार टेंशन आलय हो…! नको बाई नकोच.(घाबरून म्हणते)  मी ना उद्या ती जायच्या वेळेला चक्कर येवूनच पडते. म्हणजे ती मला अशा अवस्थेत सोडूनच जाणार नाही." ,आई मनाशी ठरवत बाबांना बोलते." "अग हा काय वेडेपणा लावलयंस? हे बघ तुला विधिताची शप्पथ आहे. तु असं अजिबात करणार नाहीयेस. आज ना उद्या तिला हे सगळ कळणारच आहे ना? डॉक्टर पण आता म्हणालेत ना आता ती बरी होतेय. तिचा भुतकाळ तिला आठवावा म्हणून आता आपल्याला ट्रीटमेंट पण करता येईल. तरीही तु का एवढी टेंशन घेतेस?",बाबा हातातलं पुस्तक बाजूला ठेवून थोडे भडकूनच तिला बोलतात. आई डोळे पुसत म्हणते, "अहो कशाला तुम्ही शप्पथ घातलीत. मी काय तिची वैरिण आहे काय? तिची काळजी वाटते म्हणून बोलते ना हो मी. ती गेल्या ५ वर्षांनी एकटी अशी कुठे लांब गेलेली नाहीयेय त्यात आता तिला अचानक काही कळलं - बिळलं, काय झालं तर केवढ्यात पडेल हो. आपण ना काही ट्रीटमेंट करायची नाहीयेय. जर तिला आठवल ना सगळं तर माझी पोर कोसळून जाईल हो." "अग आपण आहोत ना तिला सांभाळायला",बाबा तिला धीर देत म्हणतात. "आपण आहोत तोपर्यंत ठिक आहे. पुढे काय? तुम्हाला काय वाटत तिला खर कळेल तेव्हा आता हसतेय तशी हसेल का? एकट्याने आयुष्य घालवेल. स्वतःच्या संसाराचे स्वप्न बघेल का? ते काही नाही आपण तिला तिचा भुतकाळ कळूच द्यायचा नाही. मी तिच लग्न अशा मुलासोबत लावीत जो तिला तिच्या भुतकाळासकट स्विकारेल तेही तिला कळू न देता." आई म्हणते. "अग पण तिच्या आयुष्यातलं  जवळजवळ १ वर्ष विसरलीय ती. ते क्षण तिच्या आयुष्यातला एक भाग आहेत. हे  तिला आठवले नाहीत हा तिच्यावर अन्याय असेल. कसं समजत नाहीयेय तुला. तुच तिला लहानपणापासून शिकवत आलीस कि संकटापासून पळायचं नाही लढायचं असतं. आता तुच पळतेस बघ." बाबा तिला आठवून देत म्हणतात. ही वाक्य ऐकताच आईला तिची चूक लक्षात येते. ती म्हणते, "तुम्ही बरोबर बोलालात हो. माझचं चुकलं. गेल्या ५ वर्षात खूप काही बघितलय मी. त्यामुळेच कदाचित संकटांची भीती वाटायला लागली मला. आता मी लढणार. मग पुढे काहीही परिणाम होवू देत. विधीताला तिच सत्य, तिचा भूतकाळ कळलाच पाहिजे."  "आता कसं! पण ट्रीपवरुन जावून येवू देत. तिला छान फ्रेश वाटेल. मग आपण डॉक्टरांकडे ट्रिटमेंटसाठी जावू. (तेवढ्यात दाराची बेल वाजते.) बहुतेक विधीताच आली असेल. आता हा विषय इथेच थांबवूया." बाबा बोलतात. आईही मान हलवते. डोळे पुसते आणि दरवाजा उघडते. 

       समोर विधीता उभी असते. ती खूप खुश असते. ह्या ४-५ वर्षांनी  ती एकटी अशी आपल्या मैत्रिणींबरोबर ट्रीपला जाणार असते. नाहीतर घर, डॉक्टर, तिचा फॅशन डिझायनिंगचा क्लास ( तोही आता ६ महिन्यापूर्वीच तिने लावला होता) आणि कधीतरी बागेच किंवा देवळात एवढच तिच जाणं होत असतं. तिने घरात शिरताच सगळ्या खरेदीच्या पिशव्या बाजूला टाकत आईला मीठी मारली. मुलीचा चेहऱ्यावरचा आनंद बघून आईही खूप खुश झाली. "अगं काय हे लहान मुलांसारख आपल तुझ. आजकाल खूप प्रेम उतू चाललयं तुझ आईवर. चल पहिल्या त्या पिशव्या उचलं." आई तिची मिठी सोडवत म्हणाली. "हो ग आई. पण तु बाबांच्या सांगण्यावरून मला जायला परवानगी दिलीस ना म्हणून." विधीता खट्याळपणे म्हणाली. "आता खुश ना स्वारी?" बाबांनी विचारलं. "हो बाबा एकदम खूश…!" विधीता बाबांचे गाल ओढत म्हणाली. "चलं आता जेव आणि आवर सगळं. उद्या जायचयं ना सकाळी लवकर" बाबा म्हणाले. "हो बाबा. उद्यासाठी मी खूप एक्साईटेड आहे." विधीता म्हणाली. आज नेहमीपेक्षा घरच सगळ लवकरच आटपलं. घरचे दिवेही लवकर मालवले.

क्रमशः

🎭 Series Post

View all