विश्वास (बोधकथा)

एका गावात पाऊस पडेना......


एका गावात पाऊस पडेना. सगळे गावकरी चिंतीत झाले. पाणी टंचाईने कावले. उन्हाळ्याने भाजले. बिच्चारे काकुळतीला येऊन देवाचा धावा करू लागले. पण काहीही होईना. रोज सकाळी उठून कपाळावर हात ठेवून आकाशाकडे आशेने पाहून कंटाळले. पण वरुण राजाला त्यांची दया येईना. ते आशेने गावातल्या चर्चमध्ये जमले. चर्चचे मुख्य उपदेशक त्यांना म्हणाले, " हीच प्रभूची इच्छा असावी. आपण प्रभूच्या इच्छेचा मान राखला पाहिजे. " पण त्याने गावकऱ्यांचे समाधान होईना. शेवटी उपदेशक म्हणाले, " आपण फादर पॅट्रिकना साकडे घालू या. आपल्यापैकी ज्येष्ठ गावकरी आणि मी असे मिळून त्यांच्याकडे जाऊ या. ते नक्कीच आपल्याला मार्ग दाखवतील. " असे म्हणून ते फादर पॅट्रिक यांच्याकडे गेले. त्यांनि त्यांना गावात येऊन प्रभूची प्रार्थना करण्यास मदत करण्याचे आश्वासन दिले. ते एक फार मोठे संत होते. गावकऱ्यांना समाधान वाटले.


दुसऱ्याच दिवशी फादर आले. त्यांचा तेजः पुंज चेहरा पाहून गावकऱ्यांना आनंद झाला. मग फादर आपल्या गंभीर आवाजात बोलू लागले. प्रवचन संपले, व प्रार्थनेची वेळ झाली. फादर म्हणाले, " चला आपण प्रार्थना म्हणू या. " प्रार्थनेला सुरुवात झाली. ती पूर्णही झाली. अतिशय काकुळतीने गावकऱ्यांनी प्रभूची करूणा भाकली. पण पाऊस पडला नाही. ते पाहून गावकरी निराश झाले. तशी फादार म्हणाले, " प्रभूवर तुमचा विश्वास आहे ना ? " सगळेच एकासुरात "होय" म्हणून ओरडले. पण फादर गंभीर झाले . ते म्हणाले, " तुमची जर प्रभूवर भक्ती आणि विश्वास असता तर तुम्ही सगळ्यांनी येताना सोबत छत्री आणली असती. ही छत्री फक्त मी आणली आहे , प्रभूवर सगळ्यांचाच विश्वास दृढ असायला हवा. उद्या परत प्रार्थनेला या . पण कसे ? " गावकरी ओरडले, " छत्री घेऊन" दुसऱ्या दिवशी प्रार्थना झाली. प्रार्थना संपताक्षणीच पावसाने बरसण्यास सुरुवात केली. सगळ्यांनी मग छत्र्या उघडल्या. फादर तर प्रभूच्या मायेने रडू लागले. गावावरचे संकट अशारितिने टळले.
थोडक्यात , परमेश्वर पण तुमचा विश्वास किती दृढ आहे ते पाहत असतो, हेच खरे.

संपूर्ण