विश्वासघात की नशिबाचा खेळ सारा???

आयुष्य म्हणजे सुखदुःखाचे भागीदारी. सुखपाठोपाठ दुःख नि दुःखा पाठोपाठ पुन्हा सुख, हा नियतीचा नियम असतो ठरलेला. पण दुःखाच्या प्रसंगी खचून न जाता आनंदाने आपल्या कार्यात वाटचाल करत राहिल्यास एक ना एक दिवस सुखाचे द्वार नक्कीच उघडणार यात शंकाच नाही. ह्याच आशयवार आधारित ही कथा.


"लेक माहेराचं सोनं ..

लेक सौख्याचं औक्षण..

लेक बासरीची धून..

लेक अंगणी पैंजण.."


अचानक मोबाईल वाजला तशा सुलेखाताई भानावर आल्या. थोड्या चाचपडतच त्या प्रकाशरावांना म्हणाल्या, "अहो कितीवेळा सांगितलंय मी तुम्हाला, ती मोबाईलची रिंगटोन बदला बरं आधी."

गेले कितीतरी वर्षांपासून प्रकाशरावांच्या मोबाईलची रिंगटोन होती ती. पण आजकाल गाणं लागलं की सुलेखाताई कावऱ्याबावऱ्या व्हायच्या.


"अगं पण सुलेखा,तुला तर खूप आवडतं ना हे गाणं??" प्रकाशराव म्हणाले.


"हो आवडतं हो..पण आता प्रतिमाचं लग्न ठरल्यापासून हे गाणं लागलं की कसंसच होतं बघा. भावनांना आवर घालणं कठीण होवून जातं मग. कधी त्यांचा बांध तुटेल काही सांगता येत नाही बघा. शब्दन शब्द ऐकून अंगावर काटाच उभा राहतो. नाही ओ काळजाच्या तुकड्याला असं दूर करु वाटत. एवढंसं माझ पिल्लू दुडूदुडू धावायचं या अंगणी. तिच्या बोबड्या बोलांनी साऱ्यांच्या ओठी हास्य फुलायचं. हे गाणं कानी पडलं की तिचं सारं बालपण फेर धरुन नाचू लागतं मग डोळ्यांसमोर."


"अगं पण आता आपल्याला मनाची तयारी पण करायला हवीच ना. आतापासूनच तू इतकी हळवी झालीस तिच्याबाबतीत तर पुढे कसं होणार??"


"अगं आई..तू जर म्हणत असशील तर कॅन्सल करते मी सासरी जाणं."आई बाबांची चर्चा ऐकून अचानक प्रतिमा आत आली नि आईच्या गळ्यात पडून मग तिची समजूत काढू लागली. 


"नाही आ वेडाबाई हे असं नाही बोलायचं. कोणत्या मुलीला चुकलंय ग सासरी जाणं.फक्त तुला आमच्यासोबत आणखी काही दिवस राहायला मिळालं असतं तर किती बरं झालं असतं असं वाटतं. अगं शिक्षणासाठी दोन वर्ष बाहेर होतीस. तिकडून आल्यावर लगेचंच नोकरीसाठी बाहेर राहावं लागलं. या घराचा..घरातील माणसांचा सहवास कमी लाभला ग तुला. आणि आता लगेचच हे असं सासरी जावं लागणार. नोकरीसाठी जरी बाहेर आहेस तरी हे असं दर आठवड्याला घरी येता येतं ग. पण यापुढे आता असं नाही ना होणार. म्हणून वाईट वाटतंय बाकी काही नाही."


"काळजी करू नकोस आई..मी सासरच्यांशी भांडून तुम्हाला भेटायला येत जाईल मग तर झालं."प्रतिमा म्हणाली.


" हो आता तेवढंच बाकी आहे. हेच शिकवलं का मी तुला.??"


"आई गंमत केली ग. तुझ्या लेकीला भांडणं तर सोड उलट बोलता तरी येतं का कोणाला."

आईच्या डोळ्यांत क्षणभर अश्रू तरळले.


आई वडिलांच्या कष्टाचे चीज झाले होते आज. दोन भावांची लाडाची आणि एकुलती एक बहिण प्रतिमा. आई वडिलांनी केलेले संस्कार सार्थ ठरवले होते तिने. शिक्षण पूर्ण झाले आणि लगेचच शिक्षिका म्हणून सरकारी नोकरीही पदरी पडली. लग्नाचे वयदेखील झाले होते. नाकी डोळी नीटस, उंच, सडपातळ, गोरापान रंग, सुडौल बांधा, मधुर वाणी, तसेच आता शिक्षिका म्हणून नवीन पिढी घडवणारी प्रतिमा अगदी सहजच कोणाच्याही नजरेत भरायची. वडिलांनी तिच्या लग्नासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली. असे म्हणण्यापेक्षा स्वतःहून तिला स्थळं सांगून येत होती. मुलगा शिक्षकच हवा असा काही तिचा आग्रह नव्हता. नोकरी, बिझनेस काहीही असो फक्त मुलगा कर्तबगार असावा. जबाबदारीची जाणीव असणारा, निर्व्यसनी, थोरा मोठ्यांचा आदर बाळगणारा असावा. अशा सरळमार्गी तिच्या अपेक्षा होत्या. 


दूरच्या नात्यातील मामाने एक स्थळ सुचवले प्रतिमासाठी. कांदे पोह्यांचा कार्यक्रम उरकला. मुलाची आणि मुलीची पसंतीही झाली. पण एकाच भेटीत सगळेच थोडी ना समजते. वरवर तर सगळंच छान वाटत होतं. माणसेही समजूतदार वाटत होती. अगदी प्रतिमाला हवा तसाच होता अजय. अखेर मुलाचा होकार आला. माणसे अगदी साधी दिसत होती. मुलगा अजय एकुलता एक. दोन बहिणी त्यांच्या सासरी सुखात नांदत होत्या. अजय एका खाजगी कंपनीत कामाला होता. घरची परिस्थितीही उत्तम होती. जोडाही अगदी एकमेकांना साजेसा होता. मामाकडून मुलाची सर्व माहितीही मिळाली होती. त्यामुळे प्रतिमाच्या संमतीने होकार कळवण्यात आला. पण पुढे जावून काय होणार याची पुसटशीही कल्पना नव्हती कोणाला.

लग्नाची बोलणी सुरु झाली. मानपान देण्या-घेण्याचे सर्व काही ठरले. आम्ही आमच्या पद्धतीने लग्न लावून देवू. आम्हाला एकच मुलगी आहे. त्यामुळे तिची हौस मौज व्हायला हवी म्हणत प्रतिमाच्या वडिलांनी लग्नाची सर्व जबाबदारी घेतली. ठरल्याप्रमाणे सुट्टीचा दिवस पाहून लग्न करण्याचे ठरले. 


लग्नाचा दिवस अखेर उजाडला. नवीन स्वप्न मनी बाळगून आयुष्यात पुढचे पाऊल टाकण्यासाठी प्रतिमा तयार झाली.भावी जीवनाचे स्वप्न डोळ्यांत सजवून नि मनाच्या गाभाऱ्यात स्वप्नातील काही सुखद क्षणांचे चित्र रंगवत ती त्या सुखी आणि आनंददायी प्रवासाला लागली. आयुष्याचा एक अध्याय संपून आता दुसरा सुरु होणार होता. गुलाबी रंगाची भरजरी पैठणी..हातभार बांगड्या.. बाजूबंद.. नाकात नथ.. गळ्यात ठुशी..तीन पदरी राणीहार..पायात भरगच्च पैंजण...सारा साज शृंगार करुन प्रतिमा लग्न मंडपात हजर झाली नि साऱ्यांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. साखरपुडा नि हळदीचा कार्यक्रम आनंदात पार पडला. पण का कोण जाणे मुलाकडच्यांचे विचार बदलले नि त्यांनी प्रतिमाच्या वडिलांकडे हुंड्याची मागणी केली. मुलीच्या नावावर तिच्या नोकरीच्या ठिकाणी एक फ्लॅट घेवून द्यावा वडिलांनी अशी मागणी करण्यात आली. ठरवून केलेला हा एक प्लॅन असावा बहुतेक. प्रतिमाच्या मामांनाही या गोष्टीची कल्पना नव्हती.  

एकदा का हळद लागली की मग कुठे जाणार आहे ती?? असा विचार करून मुलाकडच्यांच्या जाळ्यात एका साध्या सरळमार्गी घरातील लोक अडकले होते. प्रतिमाचे वडील मोठ्या पेचात सापडले होते. "इकडे आड आणि तिकडे विहीर.."अशीच काहीशी त्यांची अवस्था झाली होती. प्रतिमाच्या मोठ्या भावाला वडिलांनी ही गोष्ट सांगितली. पण बहिणीच्या सुखासाठी त्याने ही अट मान्य करण्याचे ठरवले. कारण बहिणीसाठी हि गोष्ट करणं एवढी काही मोठी नव्हती त्या भावासाठी आणि वडिलांसाठी. पण इथे प्रश्न पैशांचा नव्हताच. प्रश्न होता तो विश्वासाचा, प्रश्न होता तो खरेपणाचा, प्रश्न होता प्रतिमाच्या भविष्याचा. वडिलांचे आणि भावाचे सुरु असलेले बोलणे प्रतिमाच्या लहान भावाने ऐकले. त्याला मात्र हे काहीच पटेना."अशा खोटारड्या माणसांच्या घरात नाही होवू देणार मी ताईचे लग्न. पण मोठ्यांना समजावयाचे कसे??" विचार करायलाही एवढा वेळ नव्हता. "हळदच तर लागली आहे. थोडीच ना लग्न झाले आहे" म्हणत वेळ न दवडता त्याने प्रतिमाला ही गोष्ट सांगितली. तिच्या तर पायाखालची जमीनच सरकली. अचानक जसा त्सुनामी यावा किंवा मग धरणीमातेच्या गर्भातून भूकंप लहरी उठाव्यात नि एका क्षणात सारे उध्वस्त होवून जावे असेच काहीसे झाले त्याक्षणी. काळही थांबला जणू काही काळ. शेवटी पुढाकार घेवून मोठ्या हिमतीने आणि खंबीरपणे तिने स्वतःच या लग्नाला नकार दिला. खूप मोठा विश्वासघात केला होता मुलाकडच्या मंडळींनी त्यांचा. कसे भरुन निघणार होते प्रतिमाच्या आयुष्याचे हे एवढे मोठे नुकसान?? समाजाच्या बुरसटलेल्या विचारांचा कसा सामना करणार होती ती आता?? हळद लागून एखाद्या मुलीचे लग्न मोडणे म्हणजे समाजाच्या नजरेत खूप काही चुकीचे होते. या साऱ्यांत काही गोष्टींची माहिती नसतानाही मुलीलाच दोष देण्याची जणू समाजाची जुनी रीतच. पडद्यामागे काय घडले हे जाणून न घेताच लोक आपापल्या परीने तर्क वितर्क लावून मोकळे होतात. पण एका क्षणात सारे होत्याचे नव्हते झाले होते प्रतिमाच्या आयुष्यात. अचानक पोरीचे नशीब आयुष्याच्या या वळणावर येवून अशी हुलकावणी देईल असे स्वप्नातही वाटले नव्हते कोणाला. 


स्वतःची झालेली फसवणूक आणि झालेला एव्हढा मोठा विश्वासघात. सारे विसरायला नि सर्व पूर्ववत व्हायला थोडा वेळ लागणार होता प्रतिमाला आणि तिच्या घरच्यांनाही. अचानक सोसाट्याच्या वारा यावा नि पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे सारे एका क्षणात उध्वस्त व्हावे तसेच काहीसे प्रतिमा सध्या अनुभवत होती. 


"बघ आई तू म्हणाली होतीस ना अजून थोडे दिवस मी सासरी नकोय जायला. तसेच झाले बघ. देवानेही एका आईच्या मनाची आर्त हाक ऐकली बघ."

काय बोलणार होती आई तिच्या या शब्दांवर. मनातील भावनांचा साठलेला महापूर मग नयनांवाटे रीता झाला.  


पण प्रतिमा मात्र खचून न जाता पुढे वाटचाल करण्यासाठी जणू सज्जच होती. कारण ती एक स्री होती. सहनशक्तीची जणू ती मूर्तीच होती. जे होते ते चांगल्यासाठीच होते असे म्हणत ती आयुष्याची लढाई लढण्यासाठी वारंवार स्वत:ला खंबीर करत होती. मनाच्या कप्प्यातील वेदना भावनांच्या तिजोरीत बंद करुन पुढील वाटचाल करण्यासाठी ती सदैव तत्पर असायची.


बघता बघता दिवस सरत होते. प्रतिमाचेही वय आता वाढत चालले होते. मनासारखी स्थळं येणं तर आता बंदच झालं होतं. आणि जी यायची ती घटस्फोटित किंवा मग विदुराची. खरंच काय दोष होता या साऱ्यात तिचा?? नोकरी, शिक्षण, कुटुंबाचे प्रेम, सर्व सुख अगदी सहजच मिळालं होतं तिला. म्हणून की काय माहित नाही पण "विश्वासघात" हे एक निमित्त होतं फक्त. शेवटी तिचे लग्न मोडणे हा नशिबाचा एक खेळच होता जणू असेच तिला वाटत होते. पण म्हणतात ना निराशेच्या गर्तेतही आशेचा किरण दडलेला असतो. प्रत्येक सुखाला दुःखाची नि दुःखाला पुन्हा सुखाची झालर, नियतीचे हे चक्र ठरलेलेच असते. पुढे जावून प्रतिमाच्याही आयुष्यात सुखाची किनार घेवून अनिकेत नावाचा एक आशेचा किरण उगवला.


अत्यंत प्रामाणिक, कार्यतत्पर, हुशार, चुणचुणीत, भावी पिढी घडविण्यासाठी धडपड करणारी अशी ही प्रतिमा तिच्या शाळेतही सर्वांची लाडकी होती. विद्यार्थ्यांसाठी तर ती त्यांचा आदर्श होती. जे काही करायचे ते मनापासून हे तिचे तत्त्व होते. नव्यानेच प्रतिमाच्या शाळेत शिक्षक म्हणून बदली होवून रुजू झालेला अनिकेत तिच्या या साऱ्या गुणांवर काही दिवसांतच भाळला. तिच्या सौंदर्यावर तर तो फिदा झालाच पण त्याहीपेक्षा जास्त तिच्या कलागुणांवर. तिचे शांत संयमी वागणे बोलणे खूपच भावले अनिकेतला. प्रतिमाला पाहिले नि हीच खरी आपल्या आयुष्याची जोडीदार हे त्याने मनोमन ठरवले सुद्धा. त्याचे ते वयही म्हणा प्रेमात पडण्याचेच होते. आणि त्यातच प्रतिमासारखी मुलगी समोर असेल तर मग तो तरी स्वतःला कसा रोखू शकणार होता?? काही ना काही कारण काढून तो प्रतिमाशी बोलण्यासाठी धडपडायचा. पण त्याची हिम्मत मात्र व्हायची नाही. एक एक दिवस सरत होता. प्रतिमा आजूबाजूला असली की अनिकेतचा दिवस मात्र आनंदात जायचा. पण मनातील भावना व्यक्त करण्याचे धाडस अजून तरी झाले नव्हते त्याचे. आता अनिकेतसोबत प्रतिमाची छान ओळख झाली. सर्व स्टाफमध्ये आता तोही अगदी छान मिसळून गेला होता. गप्पा मारता मारता एकमेकांविषयी आता बरेच काही समजले होते. अनिकेतदेखील एक हुशार आणि आदर्श शिक्षक म्हणून नावारुपाला आला होता. घरची परिस्थिती तशी बेताचीच त्यामुळे जबाबदारीची जाणीव आधीपासूनच होती त्याला. थोरा मोठ्यांचा आदर त्याच्या वाणीतून झळकत होता. वागण्यातील नम्रपणा सर्वांना लवकरच आपलेसे करुन गेला. डॉक्टर व्हायची अनिकेतची इच्छा परिस्थितीअभावी पूर्ण होवू शकली नाही. पण देवाने दिलेली ही हुशारी पुढची पिढी घडवण्याच्या कामी आली तर जीवनाचे सार्थक होईल या हेतूने शिक्षकी पेशाचा त्याने स्वीकार केला. 


एके दिवशी न राहवून त्याने प्रतिमाला प्रश्न केला, " मॅडम..तुम्ही आता पर्मनंट शिक्षिका झालात, देवाच्या कृपेने एक हुशार आणि सुंदर व्यक्तिमत्त्व लाभले आहे तुम्हाला, लग्नाचा विचार का नाही केला अजून??"


क्षणभर प्रतिमा गोंधळली. अचानक एखाद्या सरप्राइज टेस्टचा पेपर हातात यावा नि पुरता गोंधळ उडावा अशीच काहीशी प्रतिमाची अवस्था झाली. काय बोलावे तिला काही समजेना. पण टाळता येत नाही म्हणून काहीतरी उत्तर देवून मोकळे व्हायचे." या हेतूने तिने उत्तर दिले. "मनासारखा मुलगा अजून भेटलाच नाही." त्यामुळे सगळंच लांबणीवर पडत गेलं."


"काय अपेक्षा आहेत तुमच्या भावी पतीबद्दलच्या??"तोंडात आलेला प्रश्न अनिकेतने आवंढा गिळल्यागत पटकन गिळून घेतला.

थांब अनिकेत काय करतोस हे?? वेडा झालास का?? अतिघाई संकटात नेई. इतका उतावीळपणा बरा नव्हे म्हणत त्याच्या मनाने त्याला आवर घालायला भाग पाडले. 


आज पुन्हा एकदा लग्नाचा विषय निघाला आणि प्रतिमा जुन्या गोष्टी आठवून थोडी अस्वस्थ झाली. कसं असतं ना माणसाचं आयुष्य "दात आहेत तर चणे नाहीत आणि चणे आहेत तर दात नाहीत." सगळं काही होतं आज प्रतिमाकडे. शिक्षण,नोकरी, सौंदर्य, आईवडील, भाऊ, सतत पाठिंबा देणारे कुटुंब. पण आयुष्याच्या या टप्प्यावर मनाचा एकाकीपणा हलका करण्यासाठी हक्काचं माणूस अजूनतरी तिच्या नशिबात नव्हतं. पण अनिकेतला कसं सांगणार होती ती झालेला सर्व प्रकार?? आणि तसंही प्रत्येक गोष्टीची योग्य ती वेळ यावीच लागते असे म्हणतात. 


एक एक दिवस जात होता अनिकेत मात्र दिवसागणिक प्रतिमाच्या प्रेमात थोडा जास्तच गुंतत चालला होता. हो पण, अजूनतरी हे प्रेम एकतर्फी आणि निःशब्दच होतं बरं का. माहित नाही कसं आणि कधी तो त्याच्या मनातील भावना प्रतिमापर्यंत पोहोचवणार होता?? त्याला जरी ती आवडत होती पण तरीही त्याचं तिच्यासोबतचं वागणं अगदीच मर्यादेत होतं. कोणाला शंकाही येणार नाही असं. त्याने जर ठरवलं असतं तर सहकारी स्टाफकडून सगळी माहिती काढू शकला असता तो तिची. पण त्याला त्या गोष्टीची गरज वाटली नाही. त्याने तसा प्रयत्नही केला नाही.


दरम्यानच्या काळात प्रतिमाच्या बदलीची बातमी बॉम्ब पडावा तशी येवून धडकली. अनिकेतला मात्र खूप धक्का बसला या गोष्टीचा. अंगात वीज संचारावी तसा तो चमकला. क्षणभर पायाखालची जमीन सरकली त्याच्या. पण दुसऱ्याच क्षणी त्याने स्वतःला सावरले. प्रतिमाही खूप खुश होती. कारण मनासारख्या ठिकाणी तिला बदली मिळाली होती. सगळेच जण तिला शुभेच्छा देत होते. अनिकेत मात्र शांतपणे फक्त विचारांच्या अधीन झाला होता. तिथे असूनही तो नसल्यासारखाच वाटत होता. प्रतिमाचे आसपास वावरणे त्याला आनंदाच्या गावी रोजच घेवून जात होते. आता जेव्हा ती नसेल, तेव्हा कसे होणार.?? याची तो कल्पनाही करु शकत नव्हता. संधी पाहून प्रतिमाला सांगून टाकाव्यात का मनातील भावना.?? पण, काय विचार करेल ती माझ्याबद्दल.?? अरे यार, बोललो तरी प्रॉब्लेम आणि नाही बोललो तरी.?? काय करु?? देवा काहीतरी मार्ग दाखव. त्याच्या मनातील विचारांचे चक्र वायूवेगाने धावत होते. पण अंतिम निर्णयापर्यंत तो पोहोचतच नव्हता. 


तेवढ्यात "सर पेढा घ्या ना" म्हणत प्रतिमाने हात पुढे केला. तेव्हा कुठे अनिकेत भानावर आला. 


"अभिनंदन मॅडम, खुप छान शाळा मिळाली तुम्हाला. मला नव्हतं माहिती, तुमची बदली आहे यावर्षी."नाराजीच्या सुरातच अनिकेत बोलला.


"हो ना, मागच्या वर्षीपासून माझे प्रयत्न सुरु होते या बदलीसाठी. शेवटी पाहिजे ते ठिकाण मिळालं मला. कित्ती आनंद झाला म्हणून सांगू. अहो आता मला असं बाहेर एकटीने राहण्याची गरज नाही. घरापासून जवळच आहे ही शाळा. घरी राहून येवून जावून मी शाळा करु शकते."


"खूप छान. पण अधुनमधून भेट देत जा याही शाळेला. खूप लळा लागलाय तुमचा या शाळेला आणि मुलांनाही."


"हो नक्कीच. त्याबाबतीत मलाही खूप वाईट वाटतंय. पण, काय करणार आपल्या नोकरीचा हा एक भागच आहे. हे असे अनुभव तर वारंवार येणारच. त्यामुळे मनाची तयारी तर ठेवायलाच हवी ना."


"हो अगदीच. मनाची तयारी तर ठेवायलाच हवी. दुसरा पर्याय आहे का आता??"

थोड्या कातर स्वरातच अनिकेत बोलला. 


पहिल्यांदा प्रतिमाला अनिकेतच्या या बोलण्याचा आणि वागण्याचा अर्थ कळला नाही. त्याचे ओठ काहीतरी वेगळे बोलत होते आणि डोळे काहीतरी वेगळे. क्षणभर ती गोंधळली. शाळा सुटली. प्रतिमा रुमवर गेली तरी अनिकेतचा चेहरा काही तिच्या डोळ्यासमोरुन जायला तयारच नव्हता. त्याच्या त्या एका वाक्यात खूप काही अर्थ दडला होता. पण नेमका काय? हे तिला समजायलाच मार्ग नव्हता. खूप विचार केला तिने. तिच्या मनाच्या खोल सागरात विचारांच्या लाटा बेभानपणे उसळत होत्या. पण त्यांना किनाऱ्याचा मार्ग काही सापडायलाच तयार नव्हता. कधी नव्हे तो अनिकेतचा इतका विचार ती करत होती. पण का?? हे तिचे तिलाही समजेना. त्याचे ते वाक्य आणि त्याच्या बोलण्यातील ती दाहकता प्रतिमाच्या काळजात खोलवर जावून रुतून बसलो होती. प्रयत्न करुनही तिला झोप काही लागेना. शेवटी पहाटेच्या प्रहरी थोडा डोळा लागला तिचा. पण ऊन्हाची तिरीप जशी डोळ्यावर चमकली तशी लगेचच जागही आली तिला. 

आवरुन शाळेत पोहोचली तर रोज सर्वांच्या आधी शाळेत हजर असणारे अनिकेत सर आज दृष्टीसही पडेना म्हणून थोडी बेचैन झाली ती. आज सर येणार नाहीत, हे जेव्हा तिला समजले तेव्हा, "काय झाले असेल? का नसतील आले सर शाळेत?" एक ना अनेक प्रश्न लगाम नसलेल्या घोड्याप्रमाणे तिच्या मनाच्या मैदानावर सैरावैरा धावू लागले. 


पुढच्या दोन दिवसांतच प्रतिमाला पुढील कार्यासाठी शुभेच्छा आणि तिला निरोप देण्यासाठी शाळेत एक छोटेखानी कार्यक्रम ठेवण्यात आला. छान तयार होवून प्रतिमा शाळेत जायला निघाली. आज त्या शाळेत तिचा शेवटचा दिवस होता. नेहमीपेक्षा थोडी लवकरच ती शाळेत पोहोचली. आजही अनिकेत सर अजून आले नव्हते शाळेत. "आज तरी येतील ना सर??" मनालाच प्रश्न ती विचारत होती. 

शेवटी दुरुनच त्यांना येताना तिने पाहिले नि हलकेच तिच्या चेहऱ्यावर मग स्मित फुलले. मनाच्या खोल गर्तेत विचारांचा माजलेला हलकल्लोळ क्षणात स्थिरावला. आज स्वतःहून ती अनिकेतसोबत बोलण्यासाठी धडपडत होती. त्याच्या त्या वाक्याचा नेमका अर्थ काय? हे वेळ न दवडता विचारुन मोकळं व्हावं एकदाचं. असं क्षणभर तिला वाटलंही. पण दुसऱ्याच क्षणी तिने तिच्या मनाला आवर घातला. 


परिपाठ झाला. विद्यार्थ्यांनी त्यांच्या लाडक्या प्रतिमा मॅडमसाठी हाताने बनवलेले ग्रिटींग्ज दिले. कुणी गुलाबाची फुले तर कुणी शब्दरुपी भावनांची प्रेमळ भेट दिली प्रतिमाला. शाळेकडून सर्व स्टाफने मिळून बुके आणि सरस्वतीची सुंदर मूर्ती भेट म्हणून दिली तिला. सर्वांचे प्रेम पाहून प्रतिमाला गहिवरुन आले. काय बोलावे तिला काही सुचेनासे झाले. बोलता बोलता अनिकेत सरांवर तिची नजर खिळली. त्यांच्या चेहऱ्यावर मनातील वेदना स्पष्ट दिसत होत्या. का बरं सर इतके उदास असतील? मी जाणार म्हणून की, दुसरे काही कारण असावे?? क्षणभर तिच्या विचारांना तिने भावनांच्या स्वाधीन केले. पण जरी मी इथे नसले तरी त्यांना का फरक पडेल?? प्रश्नांची मालिका संपायचे नावच घेईना. पण परिस्थितीचे भान ठेवून मनातील विचारांना आणि भावनांना आवर घालणे बंधनकारक होते. प्रत्येकजण तिच्याबद्दल भरभरुन बोलत होता. तिच्या कामाचे भरभरुन कौतुक करत होता. तिने जावू नये यासाठी विद्यार्थी आग्रह करत होते. डोळ्यांत पाणी आणून तिला थांबवण्याचे केविलवाणे प्रयत्न त्यांचे सुरु होते. सर्वांनी मिळून प्रतिमाला जड अंतःकरणाने निरोप दिला आणि पुढील कार्यासाठी खूप साऱ्या शूभेच्छाही दिल्या. 


त्याच दिवशी प्रतिमा तिच्या घरी गेली. दुसऱ्याच दिवशी मग नवीन शाळा तिने जॉईन केली. पण आधीच्या शाळेत अडकेलेले तिचे मन तिथून बाहेर पडायचे नावच घेईना. ती शाळा, तेथील विद्यार्थी, स्टाफ, आणि विशेष म्हणजे अनिकेत सरांचा तो पडलेला चेहरा तिच्या डोळ्यासमोरुन हटायलाच तयार नव्हता. न राहवून तिने त्यांना फोन केलाच. पण समोरुन काहीच प्रतिसाद आला नाही. तिला मेल्याहून मेल्यासारखे झाले. "उगीच मी फोन केला. काय विचार करतील ते आता माझ्याबद्दल.? नको नको त्या विचारांनी पुन्हा एकदा तिच्या मनाचा ताबा घेतला. 


अंदाजे सात आठ दिवसांनंतर अनिकेत सरांनीच तिला फोन करायचे ठरवले. आता काहीही होवू दे. भावनांची बंधने तोडण्याची हीच ती योग्य वेळ आहे. घरच्यांनी पसंत केलेल्या दोन मुलींना नकार दिलाय मी. का? कशासाठी? कुणी मनात आहे का? या प्रश्नाचे उत्तरही नाही देवू शकलो मी. पण आता शांत बसलो तर खूप काही गमावून बसेल म्हणत त्याने प्रतिमाला फोन केला. त्याच्या हृदयाच्या स्पंदनांनी आगगाडीचा वेग पकडला होता. तितक्यात प्रतिमाने फोन उचलला. 

" कसे आहात सर.?"


"तम्हाला वाटतंय मी बरा असेल.? अहो तुम्ही गेल्यापासून शाळेत जाण्याची इच्छाच होइना. आठ दिवस सुट्टी घेवून गावी आलो मग. पण इथेही मन लागेना. प्रयत्न करुनही तुमची आठवण काढण्यापासून मनाला नाही थांबवू शकत मी. राग मानू नका पण एक स्पष्ट विचारतो, मला तुम्ही खूप आवडता, माझ्या हृदयाने, मनाने तुमचाच ध्यास घेतलाय. याआधी सांगण्याचा कधी प्रयत्नच केला नाही. कारण योग्य वेळेची वाट पाहत बसलो. आणि आता अजूनही जर शांतच बसण्याचे ठरवले मनाने तर आयुष्यभर मग पश्र्चाताप करण्याशिवाय दुसरे काहीच हाती उरणार नाही. तुमचा होकार, नकार जो असेल तो मोठ्या मनाने मी स्वीकारेल. मनातील भावनांना वाट दाखवल्याचे समाधान मात्र वेगळेच असेल."

"प्लीज मॅडम, माझ्याबाबतीत कोणताही गैरसमज करुन घेवू नका. शेवटी मीही एक माणूसच आहे ओ. मलाही भावना आहेत. तुम्हाला वेळ हवा असेल तर वेळ घ्या पण तुमचा योग्य तो निर्णय मला लवकर सांगा. कारण घरच्यांना मी जास्त दिवस नाही थांबवू शकत. त्यांच्याही काहीतरी अपेक्षा आहेत माझ्याकडून."


"पण सर माझीही एक अडचण आहे हो. माझा भूतकाळ माझा वर्तमान बनून माझ्या भविष्याच्या आड येतोय. मी तरी काय करु?" 


"हे पहा मॅडम, भूतकाळ काहीही असू दे त्याने मला फरक पडत नाही. जी व्यक्ती गेल्या एक वर्षापासून माझ्या समोर वावरतीये. तिला माझ्याइतकं चांगलं दुसरं कुणीच ओळखू शकत नाही."

"एक स्री म्हणून तुमच्या मर्यादा मी समजू शकतो. असं अचानक एखाद्याला "हो" म्हणणं थोडं अवघडल्यासारखं वाटणं स्वाभाविक आहे. त्यामुळे तुम्ही थोडा वेळ घ्या हवं तर."


"ऑलरेडी खूप उशीर झालाय सर. प्रतिमा लगेचच उत्तरली. कधी येताय मग घरी?? मला मागणी घालायला. प्रतिमानेही नि:संकोचपणे तिच्या मनातील भावनांना मग वाट मोकळी करुन दिली."


"लवकरच." अनिकेत म्हणाला. "खरंच,ऑलरेडी खूप उशीर झालाय मॅडम आता अजून उशीर नको करायला" म्हणत अनिकेतने फोन ठेवला. 


दोघांनीही मग वेळ न दवडता आपापल्या घरी एकमेकांबद्दल कल्पना दिली. आणि तितकाच विश्वास आणि खात्री बाळगण्याचे आश्वासनही दिले. नियमानुसार फक्त घरच्यांसाठी म्हणून पाहण्याचा कार्यक्रम आनंदात पार पडला. देण्या-घेण्याचा इथे विषयच नव्हता. कारण "आपल्या काळजाच्या तुकड्याला असं दुसऱ्याच्या स्वाधीन करताना जो त्याग करावा लागतो तो फक्त मुलीचे आई वडिलंच करु शकतात." असे अनिकेतचे विचार. "त्यामुळे आम्हाला फक्त मुलगी द्या, अगदी नारळाची सुद्धा अपेक्षा नाही."

खरंच, प्रतिमाच्या आई वडिलांचा उर अभिमानाने अगदी भरुन आला अनिकेतचे हे विचार ऐकून. 


पण प्रतिमाच्या वडीलांच्या आग्रहास्तव त्यांनी त्यांच्या पद्धतीने लेकीच्या लग्नाची सर्व जबाबदारी घेतली. जावयाची समजूत घालून त्यांचा योग्य तो मानपान त्यांना दिला. अगदी थाटामाटात लेकीच्या लग्नाचा सोहळा त्यांनी सजवला. 


कसं असतं ना आयुष्य, एखादी चुकीची गोष्ट आपल्यासोबत घडली की लगेच आपण नशिबाला दोष देवून मोकळे होतो. पण त्यामागेही परमेश्वराची काहीतरी योजना असू शकते, हे मात्र आपण हमखास विसरतो. योग्य वेळ येताच आपल्याला आपल्या वाटणीचे सुख नक्कीच मिळणार आणि आपल्या नशिबाचा खेळही नक्कीच पालटणार यावर विश्वास ठेवायलाच हवा. 


समाप्त..


धन्यवाद..


©® कविता  वायकर